आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोषणमुक्तीचे गान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहुलिंगी समाजाचा एक भाग म्हणून जगणारा माझा समुदाय. थोड्याफार फरकाने जसा जगतो, त्यांच्या त्या मानसिक गुंत्याची, आनंदाची काही उदाहरणे लिहीत आहे. त्यातून आपणास कुटुंब आणि गुरू-शिष्य परंपरेने मिळालेले प्रतिकुटुंब यांच्यात जगताना होणाऱ्या मानसिक घालमेलीचा अंदाज यावा.

    एक :
-    ती ‘अशी’ आहे, असा संशय येताच तिला जबरदस्तीने सामाजिक व्याखेत बसवण्याचा प्रयत्न करणारा बाप.
-    बहिणीला पाहुणे बघायला आले, तेव्हा आतल्या खोलीत बंद करणारी आई.
-   ‘तू मर तरी एकदाचा, तुझ्यामुळे मला माझे मित्र-मैत्रिणी नावं ठेवतात’ असं म्हणणारे बहीण-भाऊ.
-    तिची आई वारली, तेव्हा तिला स्वतःच्या आईला शेवटचं पाहायचं होतं, पण ‘तू कोण? आम्ही तुला ओळखत नाही’ म्हणून तिला पिटाळून लावणारे नातेवाईक.

    दोन :
-    तिला पुरणाची पोळी जाम आवडते, पण बारा वर्षे झाली, तिनं पुरणाच्या पोळीला तोंड लावलं नाही. आईची आठवण येते, म्हणून. 
-    म्हातारी झाली ती, पण ठरवून रंगपंचमीला अंगाला रंग लागू दिला नाही. भावंडे आठवतात, म्हणून.
-    ती तीन-चार वर्षांपासून दिवाळीच्या प्रकाशातही अंधाऱ्या कोपऱ्यात बसते. हमसून हमसून रडते. नवे कपडे, शूज, फटाके, आणणारा बाप आठवतो, म्हणून.
-    तिची घरच्यांना सोडून असलेली पहिलीच रमजान ईद. तिनं ठरवून टाकलंय, कधीच ईद साजरी करणार नाही म्हणून.

    तीन :
-    ती बाजारातून आली. थकला-भागला चेहरा पाहून चेला म्हणाला, ‘गुरू हातपैर धो लो मै चाय रखती हूं’ आणि तिच्या थकलेल्या चेहऱ्यावर निवांततेचा भाव आला...
-    तिला तिच्या घरच्यांनी बेदम मारहाण करून रस्त्यावर फेकलं. घटना कळताच गुरू लगेचच गाडी घेऊन तिथे गेली. तिला दवाखान्यात नेलं...
-    ती म्हातारी झाली. दुखण्यांनी अंथरूण धरलं तिनं. सगळ्या गुरुबहिणींनी मिळून दवाखाना केला. चेल्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत, न कंटाळता तिची सेवा केली...
-    नानी (गुरूची गुरू) प्रत्येक सणाला तिच्या नातीचेल्यांना कपडे घेते. घरात कुणी उदास राहू नये, म्हणून सतत धडपडत असते...

    चार :
-    ती सुंदर दिसते/ती गुरुंना जास्त आवडते/इत्यादी... म्हणून तिच्या गुरुबहिणी तिच्याशी ईर्षा भावनेने वागतात...
-    ती नियमांचे पालन न करता वागते, तिला समूहातील सारे तसं वागण्यास भाग पाडतात...
-    तिने आयुष्यभरात कुठल्याच संपत्तीचा संचय केला नाही, म्हणून तिला चेले टोमणे मारतात...
-    तिच्या गुरूनंतर सत्तास्थान आपल्या ताब्यात यावे, यासाठी तिचे मानसिक, शारीरिक शोषण करून, तिला घर सोडायला भाग पाडतात...
 
असे असले तरी नाते, भावनात्मक आधार, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि सुरक्षितता देणारी व्यवस्था म्हणजे, कुटुंब. ती कुणाला नको वाटते? माणूस म्हणून ही व्यवस्था प्रत्येकाला हवी आहे. या व्यवस्थेचे जगण्यासाठी असणेही तितकेच महत्त्वाचे. आदिम काळापासून माणूस हा समूहाने राहणारा प्राणी, पण सत्ता आणि योनिशूचितेचा आग्रह धरणाऱ्या पुरुषी व्यवस्थेने कुटुंब व्यवस्था संकुचित करून ठेवली. हजारो वर्षांपासून कुटुंब व्यवस्था ही जशी जशी पुरुष आणि योनिशूचितेभोवती गुरफटत गेली, तशा सामाजिक चौकटी मजबूत होत गेल्या. त्यात चपखल बसलं तर ठीक, नाही तर लोक काय म्हणतील? म्हणून एकतर घुसमटत राहायचं, किंवा या व्यवस्थेतून बाहेर पडायचं, असा नियम झाला. या व्यवस्थेत मिळणाऱ्या मानसिक आधाराच्या, सुरक्षेच्या, प्रेमाच्या नातेसंबंधांमुळे त्यातून झालेल्या हजारो वर्षांच्या संस्कारांची पाळेमुळे त्या-त्या कुटुंबातील सदस्यांमध्ये रुतत गेली, आणि त्यातून आजची पुरुषकेंद्री सत्ता स्थान कुटुंब म्हणून मिरवताहेत. तरी हजारो वर्षे झालेल्या नेणिवेवरील संस्कारांमुळे ते हवेसेही वाटत आहेत.
असाच सामाजिक पोकळ चौकटीत चपखल न बसलेला, बहुलिंगी समाज कुटुंबातून काढला जातो. क्वचितच निघतोही, पण समूहप्रिय माणूस आणि लहानपणापासून कुटुंब व्यवस्थेच्या संस्कारात जगलेला असल्याने त्याला ती व्यवस्था हवी, म्हणून त्याने तशीच भासणारी प्रतिकुटुंब व्यवस्था आपल्या सारख्यांच्या समूहात सक्रिय केली असावी, तेही त्यातल्या सकल गुणदोषांसह. बहुलिंगींमधील माझ्या समूहाची व्यवस्था ही कुटुंब, गुरू-शिष्य परंपरा, मोगलकालीन शासन व्यवस्था आणि पुरुष सत्तेचं मिश्रण आहे. म्हणून या व्यवस्थांच्या सकारात्मक फायद्यांसोबत तोटे मिळणेही साहजिक आले.

कुटुंबव्यवस्थेने स्त्रीला बहाल केलेली नाती, यात एक स्त्री वेगवेगळ्या भूमिकेत जगत असते. त्या स्त्रीच्या भावनिक विश्वाला पारंपरिक संस्कार जबाबदार असले, तरी तिला त्या जाणिवेपेक्षा ती भावनिक ऊब हवी असते. माझा समाजही या भावविश्वाला जगू पाहतो. जगतोही, पण त्या जगण्याला आर्थिक-भावनिक खेळापलीकडे महत्त्व नाही. म्हणून अजूनही माझा समाज समाजमान्य कुटुंब व्यवस्थेच्या प्रतीक्षेत आहे. सर्वसमावेशक, समानतावादी कुटुंब व्यवस्था हा बाकीच्या सामाजिक कुटुंबव्यवस्थेइतकाच आमच्यासाठीही गरजेचा विषय आहे. आपल्याकडे कुटुंब अधिकृत संभोगाचे साधन, वंशवाढ, सामाजिक, पुरुषी प्रतिष्ठा यातच गुरफटलेले दिसते. यातून मग या निकषांमध्ये न बसणाऱ्या व्यक्तीला सामाजिक गुन्हेगार किंवा कलंक म्हणून पाहिलं जातं. नाहीतर त्याचे सोयीचे दैवतीकरण केले जाते. या दैवतीकरणाच्या चौकटीत त्याचे सामान्य माणूस म्हणून जगण्याचे अधिकारही नाकारले जातात. ती व्यक्ती प्रतिकुटुंब व्यवस्थेचा आधार घेते, पण ही व्यवस्थाही पारंपरिक व्यवस्थेने प्रभावित असल्याने, आर्थिक-शारीरिक शोषणाची झालर नाकारावी, असं वाटत नाही. तसे वाटले तरी ते जमत नाही. आणि याच द्वंद्वात माझ्या कईक पिढ्या माणूसपणापासून दूर शोषणाच्या भट्टीत आपल्या मूलभूत हक्क आणि अधिकारासाठी जळत राहिल्या आहेत.

तरी उशिरा का होईना, याविषयी लोक बोलताहेत, विचार करताहेत, हे पाहून थोडा धीर येतो. माझ्या प्रत्येक समूहाला सर्वसमावेशक कुटुंब व्यवस्था लवकरच मिळो, ही अपेक्षा...
 
दिस ढळला जसा, वाटा परत वळाल्या
पाखरू खोपा गं शोधे, रातभर विसाव्याला
बाळाची चिव चिव, माय बाप पन देई
काडी कचऱ्याच्या खोपा, त्याला घरपन येई
नसे भीती माय बापा, पाखरू उडून जाईन 
त्यातही आनंद मनाला, बाळ आकाश पाहीन
पण माणसाचा जन्म , हाये चिखल स्वार्थाचा
बाळ जन्मास घाली, त्यात विचार स्वतःचा
त्याच्या चौकोनी जगात, नाही बसत जे बाळ
घरटं बाहेर हो फेके, त्याला जाळत आभाळ
गावकुसाबाहेर, असा जळलेला थवा
जोडी आपसात नातं, घेई क्षणाचा विसावा
असे स्वार्थ इथेही, जरा जगण्याची सूट
थोडी मोकळी इथली, आकाशाची हो चौकट
 
दिशा