आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article About Famous Singer Sameera Koppikar In RASIK

मेरी आवाजही पहेचान है... (सूररंग)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘हेट स्टाेरी २’मधील ‘आज फिर तुम पें प्यार आया हैं’ या गाण्यामुळे चर्चेत आलेला समीरा काेप्पीकर या नवतरुण गायिकेचा आवाज म्हणजे बाॅलीवूडला लागलेला सुरेल शाेध आहे. मात्र, केवळ इतकीच समीराची आेळख नाही. पाश्चात्त्य शास्त्रीय संगीत व भारतीय संगीताचा सुरेख मिलाफ करत तिने केलेले काही प्रयाेग तिच्या संगीत क्षेत्रातील व्यापक जाणिवांची प्रचिती देणारे आहेत.

शब्द असतात,
‘आइये मेहरबान...बैठीये जाने जाँ...
शाैक से लीजिये फिर इश्क पें इम्तेहान...’
गाणं जुनंय, पण आवाज मात्र कमालीचा ताजातवाना आहे... त्यात जसं मार्दव भरलंय, तशीच एक प्रकारची मादकताही झळकतेय. गाणं भारतीय आहे, पण मध्येच तरारून उठणारी सुरावट पाश्चात्त्य शास्त्रीय धाटणीचीच... मध्येच काही फ्रेंच शब्दही घुमतात; जे कळत नाहीत पण एेकत राहावेसे वाटतात, ठेका धरावासा वाटताे. त्या फ्रेंच गाणा-या गायिकेबराेबर आणखी एक प्रसन्न हसरा चेहरा आपल्या गाण्याने नि असण्याने लक्ष वेधून घेत असताे. गाण्याला कुठलाही कम्प्युटराइज्ड एडिटिंगचा स्पर्श जाणवत नाही. आपण फ्रान्समध्ये विंटेज काळात भारतीय पाेशाख घालून वावरत आहाेत, असा हवाहवासा वाटणारा भास हे गाणे एेकताना हाेत राहताे...

मुंबईतलं वांद्रे उपनगर. भल्या सकाळी स्टेशनवर उतरून गर्दीचे आवाज, रिक्षा-टॅक्सींची खडखड मागे टाकत लिंकिंग रोड ओलांडून आतल्या रस्त्यांना लागले, की शांत-निवांत परिसर लागतोे. कोप-यांवरच्या चहावाल्यांची वाफाळती लगबग फार तर भाेवती जाणवते. याच वातावरणातून एका आटाेपशीर पण प्रशस्त घरात पाऊल ठेवले, की यापूर्वीच बघितल्यासारखा एक हाॅलचा काेपरा लक्ष वेधून घेताे. हाॅलची ही एक बाजू क्लॅरिनेट, गिटारच्या संगीताने भारलेली असते, मध्येच ब्रशेस लाकडावर थिरकल्यासारखा एक लयबद्ध आवाज कानावर पडत असताे, नि याच संगीताची लकेर पकडत अत्यंत वेगळा, सुरेल, विंटेज काळातील गाण्याला नवा साज चढवत एक आवाज शब्दांना आपल्या तालावर हलकेच हवेत पाझरवत असताे...

आइये मेहरबान... या गाण्याला फ्रेंच संगीताशी बांधणारी गायिका समीरा काेप्पीकर हिचे ते घर असते. आत शिरता-शिरताच समीरा सांगते, हे गाणे मी केवळ एकाच टेकमध्ये नि लाइव्ह रेकाॅर्ड केलेय, नि या माझ्या या हाॅलमध्येच केलेय. तेव्हा व्हिडिआेमधील त्या नैसर्गिक प्रकाशामध्ये शूट केलेल्या गाण्यामधील हाॅलचा व या घराच्या नात्याचा उलगडा हाेताे.

समीरा काेप्पीकर, मूळची काेंकणी. कर्नाटकातील मंगलाेर येथून समीराचे कुटुंबीय पुढे मुंबईत स्थायिक झालेले. तिचे पूर्वज मूळचे काश्मीरातले. ‘हेट स्टाेरी २’चे ‘आज फिर तुमपें प्यार आया हैं’ आणि ‘माेहब्बत बरसा दें’ या गाण्यांमुळे आज समीरा सर्वांना परिचित असेल; पण केवळ बाॅलीवूडची ही दाेन गाणी इतकीच तिची आेळख नाही. पाश्चात्त्य शास्त्रीय संगीत आणि भारतीय शास्त्रीय संगीत यांचे रीतसर शिक्षण नि दाेहाेंच्या ताकदीची उत्तम जाण समीराला आहे व याच जाेरावर समीरा संगीतात नवनवे प्रयाेग सध्या करीत आहे.

समीरा सांगते, ‘माझ्या वडिलांची आई हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायची, तर आईची आई कर्नाटकी शास्त्रीय संगीत. स्वत: वडील अत्यंत सुरेख सतार वाजवत. त्यामुळे लहानपणापासूनच मला संगीताचा माहाेल माझ्या घरात मिळाला. टीव्हीवर लागणा-या जाहिरातींच्या जिंगल्स पटकन माझ्या आेठी येत. कार्डिआेलाॅजिस्ट असलेल्या माझ्या वडिलांनी माझ्यातले हे संगीताचे वेड आेळखले नि त्यांनी मला मेडिकलच्या रुक्ष वाटा चाेखाळण्याएेवजी कलाक्षेत्रातच आपले अस्तित्व निर्माण करण्यास प्राेत्साहन दिले. आज ते नाहीत, पण त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मला मिळाली आहे.’

समीराच्या बाेलण्यातली लय तिच्या गाण्यामागचे गमक सांगत हाेती. तिच्या आवाजाचा पाेत भारतीय वाटत नाही, असे तिला बाेलून दाखवताच ती शांतपणे हसली, ‘मी ज्या वेळी हेट स्टाेरी २चे गाणे रेकाॅर्ड करायला गेले हाेते, त्या वेळी स्टुडिआेतील लाेकांना माझे नाव फक्त समीरा इतकेच सांगण्यात आले हाेते. मी गेले त्या वेळी मी पाकिस्तानी आहे का, अशीच चर्चा त्यांच्यात हाेत हाेती. शिवाय माझ्या आवाजातले मार्दव हे भारतीय वाटत नाही, हे खरेच आहे. पण मी काेंकणी आहे, हेही तितकेच खरे आहे. पण भारतीय व पाश्चात्त्य शास्त्रीय संगीताचा मिलाफ करताना माझा हा आवाजाचा भरीव, ठाशीव पाेत कामी येताे.’ समीराने केलेला हा उलगडा तिच्याच आवाजातली आणखी एक वीण उलगडवून जाताे ती म्हणजे, तिला गझल आणि सुफी संगीताची असलेली जाण. संगीतातली एकात्मता, एकात्म भाव अध्यात्माकडे नेताे, ज्यामध्ये सुफी संगीत हे एक सर्वाधिक सुंदर माध्यम आहे, असे समीराला वाटते.

समीरा बाेलता बाेलता लुई बँक्स यांच्याकडे वळते. लुई बँक्स आणि जाे अल्वारिस हे समीरासाठी मेंटाॅर आहेत. जॅझ संगीतात ख्यातनाम असणा-या बँक्स यांच्याबराेबर समीराने आतापर्यंत कितीतरी आंतरराष्ट्रीय कार्यक्रम केले आहेत. बँक्स यांच्याकडे शिकणे, त्यांच्याबराेबर काम करणे, हा अविस्मरणीय अनुभव असल्याचे सांगणा-या समीराच्या ‘आइये मेहरबान’ या गाण्यातले फ्रेंच संगीताचे फ्यूजन कुठल्या प्रेरणेेने आले, याचा उलगडा हाेताे. स्वत: बँक्स आपल्या जॅ‌झ संगीतात कर्नाटकी संगीताचा अफलातून वापर करतात. समीराला आइये मेहरबान हे गाणे एका टेकमध्ये तेही पाश्चात्त्य शास्त्रीय संगीताबराेबर आपल्या आवाजात बसवायचे हाेते. बँक्स यांच्याकडे शिकल्याने ही संगती समीराला सहज जमून गेली. ‘कहून’ बाॅक्सवर ब्रशेस वाजविले जातात, शंकर ठक्कर हे क्लॅिरनेटवर भारतीय शैलीत संगीत थिरकवतात, अशा वाद्यांच्या साथीने मग समीराने हे गाणे नव्याने घडवले. शिवाय जॅझ स्टँडर्ड(आपल्याकडे भारतीय संगीतात बंिदश असते तसे)मध्ये कुठला राग बसताे त्यानुसार कुठली बंदिश जॅझमध्ये मिसळायची, कुठले भारतीय लाेकसंगीत जॅझबराेबर मॅच हाेईल, असे अनेक प्रयाेग समीरा करीत असते.

‘गाणं हे गाणं आहे... ते जितक्या सहजतेने गायलं जाईल तितकं ते मनाची पकड घेत जातं. गाण्यातील शब्दांच्या, संगीताच्या विश्वात एेकणारा हरवून जावा, त्याला काही क्षण आपल्या राेजच्या व्यवहारी विश्वापासून दूर, स्वप्नील जगात आल्यासारखे वाटावे, हेच गाण्याचे यश आहे. त्यासाठी गाण्यामध्ये त्या त्या प्रदेशाची आेळख असणं, विविध शैलींचा मिलाफ असणं मला नेहमीच एक उत्तम मार्ग वाटत आला आहे.’ समीराचा गाण्याकडे पाहण्याचा हा दृष्टिकाेन.
सतारीबराेबर समीराला आपला ठाशीव असलेला आवाज एकत्र बांधणे सध्या एक आव्हान वाटते आहे. प्रसिद्ध सतारवादक निलाद्रीकुमार यांच्याबराेबर तिला हा प्रयाेग करायची इच्छा आहे. सध्या असाच वेगळा प्रयाेग असलेला तिचा एक अल्बमही येताे आहे. आपल्याकडे पाश्चात्त्य संगीतातील पाॅप, रॅप चटकन उचलले गेले; पण अजूनही पाश्चात्त्य संगीताचा म्हणावा तितका प्रभावी वापर पाॅप्युलर संगीतात हाेत नाही. समीराला नेमके यावरच काम करायचे आहे. बाॅलीवूडमध्ये महिला संगीत दिग्दर्शक अत्यंत दुर्मीळ आहेत, याची समीराला पूर्ण कल्पना आहे आणि म्हणूनच तिला या क्षेत्रात जाणीवपूर्वक उतरायचे आहे. त्यासाठी सातत्याने संगीताच्या आत्म्याशी प्रामाणिक राहत नवनवीन प्रयाेग करत राहणे, हा तिचा ध्यासच आहे. आपल्याकडे सध्याची तरुण पिढी नवनवीन प्रयाेग माेठ्या उत्सुकतेने स्वीकारते आहे, याची समीराला जाण आहे. त्यामुळे निव्वळ ट्रेंडच्या फंदात न पडता स्वत:ची शैलीच एक ट्रेंड म्हणून विकसित करणे तिला अधिक याेग्य वाटते. गाण्यामागचा हा प्रवास उलगडवल्यानंतर समीरा हलकेच आपल्या आवडत्या गायिका आशा भोसलेंंकडे वळते. त्यांचेच गाणे पण स्वत:च्या शैलीतल्या हरकती घेत ती गायला लागते आणि संगीत क्षेत्रात, बाॅलीवूडमध्ये एक वेगळा आणि आश्वासक आवाज रुजू पाहताे आहे, याची खात्री पटते... ‘दिल चीज क्या हैं आप मेरी जान लीजिये... बस्स इक बार मेरा कहा मान लीजिये..’ समीरा या आेळी गाताना आपल्या विश्वात हरवून गेलेली असते आणि आपण तिच्या सुरांमध्ये....
dahalepriyanka28@gmail.com