आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article About Film On Bhagavandada By Anuja Karnik

मराठीशी माझे आंतरिक नाते...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका ठुमक्यावर जगाला डोलायला लावण्याची किमया साधणाऱ्या भगवानदादा यांच्यावर मराठी चित्रपट येत आहे. गुणी अभिनेता मंगेश देसाई भगवानदादांच्या भूमिकेत झळकणार आहे, तर गीता बालीची व्यक्तिरेखा हिंदी चित्रपटसृष्टीतली चतुरस्र अभिनेत्री विद्या बालन हिने साकारली आहे. याच निमित्ताने तिच्याशी झालेल्या संवादावर आधारित हा मुलाखतवजा लेख...
विद्या बालन माहेरी आली होती. संध्याकाळच्या प्रहरी घराच्या खिडकीत हातात वाफाळता कॉफीचा कप घेऊन आपल्या आवडत्या खुर्चीत निवांत विसावली होती...

‘कॉफीचं आणि माझ्या दाक्षिणात्य असण्याचं काही समीकरण असेल, असं मला वाटत नाही. माझं आडनाव आणि आई-वडिलांशी बोलायची भाषा या दोन गोष्टी सोडल्या, तर मी बाकी मराठीच आहे. एक तर मी मुंबईतलीच. माझा मित्रपरिवार मराठी. माझे भाऊजी (बहिणीचा नवरा) मराठी. माझा सगळा स्टाफ मराठी. आणि आता मी मराठी चित्रपटात काम करते आहे. मला मराठीही येतं. पण मी मराठीत फक्त माझ्या जवळच्या व्यक्तींशीच बोलते. कारण, इतरांशी बोलताना काही चुकले तर, अशी शंका मनात येत राहते...’

विद्याने स्वत:चं मराठीशी असलेलं नातं उलगडून सांगितलं आणि पुढच्याच क्षणी आमच्या मराठी चित्रपटांविषयीच्या गप्पा सुरू झाल्या. बोलण्याच्या ओघात विद्या सांगते, “लहानपणी मनोरंजनाची एकच वाहिनी होती, दूरदर्शन. त्यावर आठवड्यातून एकदा चित्रपट लागायचे. त्यात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डेंच्या विनोदी चित्रपटांचा भरणा असायचा. पण म्हणून मराठी विनोदी चित्रपटांच्या वाटेला मी विशेष कधी गेेले नाही. याचं कारण माझं विनोदाशी वावडं आहे, असं नाही; तर मला असं प्रामाणिकपणे वाटतं, की मराठी भाषेचं इत्थंभूत ज्ञान असेल, तरच तुम्हाला काही विशिष्ट कोट्या, विनोद समजू शकतात. मला मराठी भाषा येत असली तरी या भाषेवर माझं प्रभुत्व नाही. याचमुळे कदाचित मी कधी मराठी विनोदी चित्रपट करणार नाही. अर्थातच मराठीत संवेदनशील चित्रपट बनतात, ते मला आवडतात. ‘नटरंग’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘किल्ला’, ‘कोर्ट’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’ हे जाणकारांनी नावाजलेले चित्रपट मी बघितले आहेत. सध्या मी ‘यलो’ आणि ‘बालक-पालक’च्या डीव्हीडी घेऊन आलेय.”

विद्याने नुकतंच ‘एक अलबेला’ या भगवानदादांवर आधारलेल्या चित्रपटासाठीचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. शेखर सरतांडेल दिग्दर्शित या चित्रपटात मंगेश देसाई दादांच्या भूमिकेत, तर विद्या बालन गीता बालीच्या भूमिकेत झळकणार आहे. याविषयी ती म्हणते, “माझ्या मराठीशी असलेल्या रोजच्या संपर्कामुळे असावे कदाचित, पण बऱ्याच अवधीपासून मराठी चित्रपटात काम करावं असं मनात होतं. पण मनाला भावेल, अशी पटकथा समोर येत नव्हती. अशा वेळी ‘एक अलबेला’ हा चित्रपट मला मेकअप आर्टिस्ट विद्याधर भाटेंमुळे मिळाला...

विद्याधर भाटेंनी ‘परिणीता’, ‘मुन्नाभाई’, ‘बॉबी जासूस’साठी माझा मेकअप केला आहे. ‘बॉबी जासूस’च्या वेळी गप्पांच्या ओघात मी त्यांना मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. आणि सध्या चांगल्या ऑफर नसल्याचं सांगितलं. तेव्हा त्यांनी ‘एक अलबेला’विषयी सांगितलं. गीता बालींची भूमिका करणार का? विचारलं. मग मी उत्सुकतेपोटी शेखर सरतांडेलना भेटले. १५ मिनिटांमध्येच मला कथानक आवडले. एक तर मला ‘स्पेशल अपिअरन्स’ करायचा होता. शूटिंग खूप जास्त नव्हतं. दुसरी गोष्ट, गीता बालींसारख्या अभिनेत्रीची भूमिका साकारायला मिळणार होती. मला मराठीतली निर्मितीची प्रक्रिया भावली. खूप शांतपणे, नियोजनबद्ध काम होतं. हिंदीसारखा आक्रस्ताळेपणा त्यात नव्हता.”

विद्याने मुंबईतल्या फिल्मसिटीमध्ये चित्रपटाचं सहा दिवसांचं चित्रीकरण पूर्ण केलंय. तिच्यावर काही दृश्यं आणि दोन गाणी चित्रित झालीयत. त्याबद्दल ती सांगते, “‘शोला जो भडके’ आणि ‘भोली सूरत’ ही दोन गाणी माझ्यावर आणि मंगेश देसाईवर चित्रित झालीहेत. पण खरं सांगू का, ‘शाम ढले खिडकी तले’ हे माझं सर्वात आवडतं गाणं आहे. ते गाणं माझ्यावर चित्रित होणार नाही, म्हटल्यावर मी थोडी हिरमुसले होते. पण मला ते गाणं आवडतं, हे कळल्यावर दिग्दर्शकाने मिनिटभरासाठी ते गाणं चित्रित केलं. मी खूप खुश झाले. त्यांच्या निर्णयाने मला आनंदाचा धक्काच बसला.”

गीता बालींविषयी विद्या सांगते, “त्यांचे काही चित्रपट मी पाहिले आहेत. आजकाल नाचताना ‘डान्स फॉर्म’ला महत्त्व दिलं जातं. पण तेव्हाचे कलाकार नृत्यातला भाव, अदा किती सहज सुंदरपणे दाखवायचे. गीता बालींचा चेहरा आणि डोळे तर खूपच बोलके होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक खोडकर मुलगी लपली होती, ही गोष्ट मी लक्षात ठेवली.”

गीता बालीची भूमिका साकारल्यावर आता आत्मचरित्रपर चित्रपट करण्याचा विश्वास विद्याला आला आहे. ती म्हणते, “ मला मीनाकुमारींवरचा एक चित्रपट ऑफरही झालाय. मी निर्मात्यांना होकार दिला आहे. मला मीनाकुमारी आणि मधुबाला खूप आवडतात. त्यांच्यावर फिल्म करायला मला नक्कीच आवडेल.”

अभिनेता मंगेश देसाईशी या चित्रपटामुळे विद्याची चांगली ओळख झाली आहे. मंगेशशी झालेल्या ओळखीचा एक किस्सा ती आवर्जून सांगते, “मंगेशला मी सेटवर भेटले, तेव्हा तो भगवानदादांच्या भूमिकेत होता. हुबेहूब त्यांच्यासारखाच तो दिसत होता. त्यानंतर मी त्याला एकदम आमच्या नृत्याच्या सरावाप्रसंगी सत्यम स्टुडियोमध्ये भेटले. तेव्हा तो मेकअप न करता, साध्याशा कपड्यांमध्ये आला होता. त्यामुळे क्षणभर मी त्याला ओळखलंच नाही. त्याने मला अभिवादन केल्यावर, हा कोणी निर्मात्यांच्या टीममधला असावा, असं मला वाटलं. पण जेव्हा माझ्या डोळ्यातले थोडे अनोळखी भाव त्यांच्या लक्षात आले, तेव्हा त्याने मला त्याची ओळख सांगितली. मी अक्षरश: उडालेच. त्याच्यासोबत मी अभिनय करूनही त्याला ओळखूच शकले नव्हते.”

मंगेशची आणि विद्याची आता छान मैत्री झालीय. त्याने तिला ‘बायोस्कोप’ आणि ‘खेळ मांडला’ हे दोन चित्रपट पाहायला दिलेत...

गीता बालींच्या भूमिकेपासून मराठी चित्रपटात पदार्पण होणं याला विद्या स्वत:चं भाग्य मानते. ती म्हणते, देअर आर नो को-इन्सिडन्सेस ओन्ली इन्सिडन्सेस... मी त्यांच्या पडद्यावरच्या व्यक्तिमत्त्वाशी स्वत:चं नातं जोडू पाहते आहे...

विद्याच्या ठायी असलेला हाच विश्वास आणि तिच्या अंतर्मनाला जाणवलेली हाक मराठी भाषेशीच नव्हे, मराठी भावविश्वाशी नवं नातं निर्माण करणारी ठरणार आहे.
karnikanuja@gmail.com