आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल: पाच शतकी मनसबदारी !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर येथे न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या सामन्याच्या निमित्ताने भारतीय कसोटी क्रिकेट सामन्याचे पाचवे शतक पूर्ण झाले. जिद्द, ईर्षा आणि विजिगीषू वृत्तीच्या बळावर हा टप्पा ओलांडताना जसा समग्र भारतीय क्रिकेटचा देदीप्यमान इतिहास उजळून निघाला आहे, तसाच क्रिकेट चाहत्यांच्या आठवणींनाही नव्याने बहर आला आहे...
तब्बल महिनाभराच्या खडतर समुद्रप्रवासानंतर बोट लंडनच्या बंदराला लागली... सगळा शिणवटा दूर सारून भारतीय खेळाडू ‘मेरिलिबॉन डिस्ट्रिक्ट ऑफ लंडन’च्या लॉर्ड‌्स मैदानात उतरले, तेव्हा थंड बोचरे वारे मैदान व्यापून होते. प्रथेप्रमाणे टॉससाठी नाणे वर उडवले जाणार, तेवढ्यात भारतीय संघाच्या अधिकृतपणे कप्तानपदी असलेले पोरबंदरचे महाराजा नटवरसिंहजी पुढे आले आणि पहिल्यावहिल्या कसोटी सामन्याच्या कप्तानपदाचा मान त्यांनी मोठ्या सन्मानाने
सी. के. नायडू यांना देऊ केला. नायडू टॉससाठी पुढे सरसावले आणि भारतीय क्रिकेटच्या ऐतिहासिक प्रवासाचा तो प्रारंभबिंदू ठरला...
तो दिवस होता, २५ जून १९३२.
सामना तर सुरू झाला, मात्र हिंदू-मुस्लिम तेढीमुळे हा भारतीय संघ फारसा टिकाव धरणार नाही, असाही छद्मी सूर दर्शकांत उमटला. सरतेशेवटी तोही समज खोटा ठरला. सामन्याला सुरुवात करताना ‘हिंदू’ नायडूंनी मोठ्या विश्वासाने ‘मुस्लिम’ मोहम्मद निसारच्या हाती चेंडू सोपवला. निसारच्या जलदगती माऱ्याने पहिल्याच सत्रात इंग्लंडची अवस्था ३ बाद १९ अशी केविलवाणी केली. पाठोपाठ वसाहतवादी अहंकारही चेपला गेला. निसारने पहिल्याच सामन्यात पाच बळी मिळवण्याची किमया साधली, तर त्याचा जोडीदार असलेल्या अमरसिंगने इंग्लिश फलंदाजांच्या हृदयात धडकी भरवणारा मारा केला. क्रिकेटविश्वाला तो पहिला इशारा होता, जगज्जेत्यांच्या उदयाचा...
अपेक्षेप्रमाणे ८४ वर्षांनंतर ब्रिटिशांचा चेंडूफळीचा खेळ त्यांचा राहिला नाही, या खेळाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज केली. ही बाजारपेठ मिळवून देण्यात भारत कायम अग्रेसर राहिला. भारतीय संघाने कसोटी क्रिकेटचे पाचवे शतक (५००) पूर्ण केले. अजित वाडेकरांच्या संघाने वेस्ट इंडिजला कॅरिबियन बेटांवर जाऊन मालिकेत पराभूत केले आणि इंग्लंडला त्यांच्या मायभूमीत. त्या विजयाने भारताच्या नव्या पिढीला दिलेला विश्वास १९८३च्या विश्वचषक स्पर्धेत प्रतिबिंबित झाला. भारत विश्वविजेता बनला. क्रिकेटच्या बाजाराची कवाडे भारतात उघडली. धोनीच्या यंग ब्रिगेडने २००७चा ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला. पाठोपाठ जागतिक क्रिकेटच्या आर्थिक नाड्या भारताच्या हातात आल्या.
तब्बल आठ दशकांच्या ५०० कसोटींच्या वाटचालीतील पाच लक्षवेधी टप्पे विचारात घेतले तर, बहुतांश वेळा केवळ देशासाठी खेळण्याच्या ईर्षेने खेळाडू मैदानात उतरत होते, हे लक्षात येईल. कर्नल सी. के. नायडू यांच्यापासून, अमरसिंग, निस्सार यांच्यापर्यंतचे खेळाडू स्वातंत्र्यपूर्व काळातील क्रिकेटचे प्रतिनिधित्व करत होते. इंग्रजांचाच खेळ खेळून त्यांच्याविरुद्ध जिंकण्याची जिद्द त्यांच्यात निर्माण झाली, याचे प्रमुख कारण ब्रिटिशांनी लादलेले पारतंत्र्य हे होते. तो राग क्रिकेटच्या मैदानावर व्यक्त होत होता. पंचरंगी, चौरंगी क्रिकेटमध्ये धर्माच्या आधारावर खेळणारे संघ ब्रिटिशांविरुद्ध मात्र एकदिलाने, एकत्रित लढत होते. स्वातंत्र्यानंतरचा कालखंड विनू मांकड, उम्रीगर, अमरनाथ, विजय हजारे, विजय मांजरेकर आदींच्या प्रभावाचा होता. पराभवातही भारतीय क्रिकेटपटूंनी अस्तित्वाची जाणीव तमाम क्रिकेट विश्वाला करून दिली होती.
अर्थात, पाकिस्तानविरुद्ध १९५२मध्ये पहिली कसोटी मालिका जिंकून भारताच्या विजयगाथेला सुरुवात झाली. १९५५-५६मध्ये भारताने न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका जिंकली. पंकज रॉय (१७३) आणि विनू मांकड (२३१) या सलामीच्या जोडीचा ४१३ धावांच्या भागीदारीचा विश्वविक्रम त्या मालिकेत नोंदविला गेला. मात्र त्यानंतरचे संपूर्ण दशक भारतासाठी पराभवाचे ठरले. जसू पटेलच्या कसोटीतील १४ बळींनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कानपूर कसोटी भारताला जिंकून दिली आणि पराभवाची मालिका खंडित झाली. त्याच मालिकेत भर मैदानात, मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर एका भारतीय ललनेने अब्बास अलीचा चक्क ‘किस’ घेतला. १९६०च्या सुमारास भारतीय क्रिकेटला ग्लॅमर येऊ लागले. ग्लॅमरला देशप्रेमाची जोड देणारी भारत-पाकिस्तान यांच्यातील पाच कसोटींची मालिका अनिर्णित राहिली. त्यानंतर उद‌्भवलेल्या राजकीय-लष्करी संघर्षामुळे या दोन देशांमधील क्रिकेटचे संबंध तब्बल १७ वर्षे एवढ्या प्रदीर्घ काळासाठी खंडित झाले.
मात्र हाच काळ भारतीय क्रिकेटने कात टाकण्याचाही होता. वयाच्या २१व्या वर्षी भारतीय क्रिकेट संघाच्या नेतृत्वाची धुरा वाहण्याचा मान मन्सूरअली खान पतौडीला मिळाला. भारतीय क्रिकेटला त्याने उंचीवर नेऊन ठेवले. तरीही ६७-६८च्या दरम्यानचे इंग्लंड व ऑस्ट्रेलियाविरुद्धचे पराभव भारतीय क्रिकेट रसिकांना निराश करणारे ठरले. अखेर टायगर पतौडीच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडला थेट न्यूझीलंडमध्ये जाऊन मालिकेत ३-१ असे हरवले. परदेशातील कसोटी मालिका जिंकली. त्या विजयानंतरही भारतात ऑस्ट्रेलियाविरुद्ध १-३ असे आपण हरलो. त्या पराभवातूनही भारताला आशेची किरणे दिसायला लागली. त्या मालिकेत पदार्पणाच्या कसोटीतच शतक झळकावणारा ‘लिटल मास्टर’ गुंडाप्पा विश्वनाथ भारताला गवसला.
सातवे दशक भारतीय क्रिकेटसाठी नवी दिशा देणारे ठरले. अजित वाडेकरांच्या यशस्वी नेतृत्वगुणाचा परिसस्पर्श भारतीय क्रिकेटला झाला. कॅरेबियन आणि इंग्लंड दौऱ्यावरून मालिका जिंकून हा संघ मायदेशी परतला. वाडेकर आणि त्याच्या सहकाऱ्यांचे भारतात आणि प्रामुख्याने मुंबईत दैवदुर्लभ असे स्वागत झाले. इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरविण्याचा आनंद तर भारतीयांनी प्रचंड जल्लोशात स्वागत समारंभांचे आयोजन करून साजरा केला.
त्या यशाने साहेबांच्या खेळात आपणही नावलौकिक मिळवू शकतो, हा विश्वास निर्माण झाला. सुनील गावस्करच्या रूपाने सलामीला ‘रॉक ऑफ जिब्राल्टर’ मिळाला. बेदी-चंद्रा-प्रसन्ना-वेंकट या फिरकी चौकडीने तमाम क्रिकेटविश्वावर आपल्या फिरकीच्या जादूचे गारूड उभे केले. कपिलदेवच्या संघाने १९८३चा विश्वचषक जिंकला आणि जागतिक क्रिकेटची समीकरणेच बदलली. भारतीय क्रिकेटच्या सगळ्यात मोठ्या यशाला टेलिव्हिजनच्या क्रांतीने हात दिला. क्रिकेट घराघरांत शिरले. नसानसांत मुरले.
भारतीय उपखंड ही क्रिकेटची भावी बाजारपेठ बनली. कपिलदेव, मोहिंदर अमरनाथ, रवी शास्त्री यांच्या अष्टपैलूत्वामुळे भारताने त्यानंतरचे दशक मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही गाजवले. बोर्डाची तिजोरी भरत गेली. खेळाडूंचाही बँक बॅलन्स क्रमाक्रमाने वाढू लागला. क्रिकेटमध्ये करिअरही करता येते, हे तमाम भारतवर्षाला उमगलं.
८०च्या दशकात सचिन तेंडुलकर क्रिकेटच्या क्षितिजावर आला आणि भारतीय क्रिकेटमध्ये एका नव्या युगाची पहाट झाली. बालिश चेहऱ्याच्या या क्रिकेट ‘बटू’ने तमाम विश्वाला वेड लावले. भारताच्या छोट्या छोट्या गावातूनही महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, पार्थिव पटेल, इशांत शर्मासारखे नवोदित क्रिकेटपटू उदयास येऊ लागले. भारतीय क्रिकेटला त्यामुळे खऱ्या अर्थाने वैभवाचे दिवस आले. या बदलामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रिकटपटूंना चांगले दिवस आलेच, पण रणजीपटूंनाही नोकरीची (वर्षाकाठी छोट्या राज्याच्या रणजीपटूलाही आता १५ लाखांपेक्षा अधिक रक्कम मानधनापोटी मिळते.) गरज भासली नाही. ५०० क्रिकेट कसोटींचा पल्ला गाठताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतील भारत एक महत्त्वाचा व निर्णायक सदस्य बनला. देश आर्थिक महासत्ता बनणार की नाही, यावर चर्चेची गुऱ्हाळे सुरू असताना भारतीय क्रिकेटला महासत्तेचा मान मिळालासुद्धा. आता परिस्थिती अशी आहे की, भारताच्या इशाऱ्याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पानही हलत नाही. ही भारतीय बाजारपेठेची कमाल आहेच; पण त्याहीपेक्षा क्रिकेटविश्व गाजवणाऱ्या तमाम भारतीय क्रिकेटपटूंच्या असामान्य कर्तृत्वाचाही हा परिपाक आहे.
आणि मी सोबर्सचा मामा केला...
गॅरी सोबर्स विंडीजचा कप्तान होता. ज्या चुका सोबर्सने मैदानात करायला हव्यात, त्या मुद्दामच सोबर्सला ऐकू जाईल, अशा आवाजात मी बोलायचो. त्या वेळी ड्रेसिंग रूममध्ये भिंत नसायची, तर एक कापडाचा पडदा असायचा. मी आपल्या खेळाडूंसोबत काय डावपेच आखतो आहे, हे ऐकण्यासाठी सोबर्स कान टवकारून बसायचा. प्रत्यक्षात ते नाटक असायचे. ऐकलेल्या गोष्टी सोबर्स करायचा व खड्ड्यात पडायचा. त्या दौऱ्यात सुनीलने ७७४ धावांचा विक्रम केला होता. त्यामुळे सुनीलला सोबर्स लकी मानायचा. आधी सोबर्सच्या धावा होत नव्हत्या. पण, सोबर्स फलंदाजीसाठी जाताना जेव्हा जेव्हा सुनीलशी शेकहॅन्ड करायचा, तेव्हा त्याच्या धावा व्हायच्या. माझ्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर सर्वप्रथम मी सुनीलला सावध केले. सुनीलला बाथरूममध्ये लपण्याचा सल्ला दिला. योगायोगाने सोबर्स सुनीलला न भेटताच गेला व शून्यावर बाद झाला. भारताने त्रिनिदाची ती कसोटी जिंकली. १९७१ची मालिकाही.
- अजित वाडेकर
सारे काही क्रिकेटच्या प्रेमापायी - चंदू बोर्डे
मी साठच्या दशकात क्रिकेट खेळलो. त्या कालखंडात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया हे दोन प्रबळ प्रतिस्पर्धी होतेच, त्याशिवाय वेस्ट इंडिजसारखे अक्राळविक्राळ आणि वेगवान गोलंदाजीची आग ओकणारे देशही होते. त्या काळात हेल्मेट नव्हते, एल्बो गार्डदेखील नव्हता आणि एका षटकात किती बाऊन्सर्स टाकायचे, हा नियमही नव्हता. एवढेच काय, पण फ्रन्ट फूट नोबॉलचा नियमही नव्हता. त्यामुळे विंडीजचे वेगवान गोलंदाज चक्क २२ ऐवजी १८ यार्डावरूनच पुढे येत चेंडू फेकायचे, आपटायचे आणि लेग साईडलाही झेल टिपण्यासाठी भरपूर क्षेत्ररक्षक ठेवायचे. आम्ही खेळलो तेव्हा मानधन वगैरे प्रकार नव्हता. आम्ही देशासाठी खेळलो, क्रिकेटच्या प्रेमासाठी खेळलो. मी निवृत्त झालो तेव्हा एका कसोटीसाठी २०० ते २२५ रुपयांचा भत्ता सुरू झाल्याचे मला आठवतेय. तेव्हा आतासारखा विमानाने प्रवासही नव्हता. कसोटी सामन्यासाठीही आम्ही रेल्वेनेच जायचो. कोलकाता कसोटीसाठी जाताना तर ४० ते ४५ तासांचा प्रवास करायला लागायचा. मैदानावर उतरल्यावरही शरीर आणि मन रेल्वे प्रवासात जसे हलतो तसे हलत असायचे. पण रेल्वे प्रवासाची मजा और होती. मी कधी परदेश दौऱ्यावर बोटीने गेलो नव्हतो, परंतु इंग्लंडला लिग क्रिकेट खेळायला मात्र बोटीनेच गेलो होतो. तो २० ते २५ दिवसांचा प्रवास असायचा. एकदा समुद्र खवळला असताना त्या वादळात आमची बोट सापडली. कित्येक मजले उंच जात, पुन्हा तेवढीच खाली येऊ लागली. ती अवस्था इतकी बिकट की, बोटीवर ठिकठिकाणी उलट्या करून झोपलेले प्रवासी होते.
विनायक दळवी
vinayakdalvi41@gmail.com
बातम्या आणखी आहेत...