आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दप्तराविना शाळेचा आनंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘दप्तराविना शाळा’ या बातमीने लक्ष वेधून घेतले आणि समोर घेऊन वाचेपर्यंत मनात अनेक विचार डोकावून गेले. कारण दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी चोहीकडूनच मागणी चालू आहे. जड दप्तरं पाठीवर टाकून जाणाऱ्या मुलांना पाहून एका मातेचं मन बेचैन झालं. मुलांना या ओझ्याने अनेक त्रास होऊ शकतात. खांदे दुखणे, पाठीत दुखणे, यातनं उद्भवणारी इतर दुखणी इ. याच वैचारिक मंथनातून त्यांना ‘दप्तराविना शाळा’ ही कल्पना सुचली व त्यांनी प्रत्यक्षात त्याचा अवलंब करायला सुरुवात केली.

या मातेची, म्हणजे माझ्या मैत्रिणीची मी भेट घेतली, तिचे नाव शारदा नागरगोजे. त्या खामगाव, ता. गेवराई, जि. बीड येथील शाळेत शिक्षिका म्हणून काम करतात. त्यांना त्यांच्या या कार्यासाठी बीडच्या रोटरी क्लब मिडटाउन तर्फे आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार देण्यात आला आहे.

‘दप्तराविना शाळा’ ही कल्पना नेमकी काय, या प्रश्नावर त्या भरभरून बोलल्या. त्या म्हणाल्या, ‘माझ्या वर्गाचे मी वाराप्रमाणे विषयाचे वर्गीकरण करून घेतले आहे. म्हणून विद्यार्थ्याला तेवढ्या एकाच विषयाचे पुस्तक अन् वही शाळेत आणावी लागते. एवढंच दप्तर! हलकंफुलकं, सुटसुटीत. मुलं त्यातही शनिवार म्हणजे गोल्डन वाराची अतिशय आतुरतेने वाट पाहात असतात. या दिवशी तर दप्तराशिवाय शाळेत जायचे असते. आपल्याला आठवते की, आपण शाळेत जात असताना, दप्तराविना न जाण्याचे फक्त दोनच दिवस होते, एक २६ जानेवारी, दुसरा १५ ऑगस्ट. इथे तर आठवड्यातून एक दिवस.

शनिवारी शाळेत कवितेचे पाठांतर, शब्दांचा सराव, चित्रावरून गोष्ट तयार करणे, एखादे चित्र दाखवून त्यावर प्रश्न विचारणे, प्रत्येकाला बोलते करणे, वेगवेगळ्या कलाकृती मुलांकडून करून घेणे, निरनिराळे साहित्य वापरून गणितीय क्रिया करायला लावणे, पानं-फुलं वापरून निरनिराळे आकार बनवणे, यावरून कल्पना, कौशल्याचा विकास घडवणे, वेगवेगळ्या नेत्यांची माहिती सांगणे, त्यांच्या कार्याचा परिचय करून देणे, पुस्तकांशिवाय अवांतर ज्ञानाची माहिती देणे, अशा अनेक गोष्टींमध्ये शनिवार साजरा होतो. ज्यामुळे त्यांचे सामान्य ज्ञान वाढते. प्रश्न विचारल्यावर मुलं पटापट बोलती होतात.

अशामुळे मुलं स्वत: कथा, कविता लिहायला शिकले, स्वत:च्या मनातली घालमेल कागदावर मांडायला शिकले. एका मुलाने लिहिलेलं ‘शेतकऱ्यास पत्र’ पाहा. ‘हे शेतकरीराजा, जास्त पाऊस पडल्यामुळे पिकांचे जे नुकसान झाले आहे, त्यामुळे तू निराश झालेला आहेस.’ पण, त्या चिमुकल्या जिवाने विशाल दृष्टिकोनातून विचार केला आहे. ते या पत्रात वाचायला मिळाले. ‘तू निराश होऊ नकोस, आजचे पीक आले नाही म्हणून काय झाले? पण या पावसाने गेल्या काही वर्षांपासून पडलेला दुष्काळ हटलेला आहे. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य संपलेले आहे. नसता पाण्यासाठी माझी आई खूप खूप लांब जात होती. असाच त्रास खूप जणांना होत होता.
आम्हा मुलांनादेखील याचा त्रास व्हायचा. जनावरे पाण्याविना तडफडत होती. चाराही त्यांना नव्हता. हे सर्व चित्र आता बदलले आहे. दुष्काळाचे सावट नाहीसे झाले आहे. आताचे पीक नाही आले म्हणून काय पुढचे येणार नाही काय? तू आत्महत्या करण्याचा विचारसुद्धा मनात आणू नकोस. तू आम्हाला हवा आहेस, हवा आहेस.’ हे वाचून माझ्या डोळ्यात पाणी आले. यामध्ये काही शब्द माझे वापरलेत, पण भाव एकूणच महत्त्वाचा आहे. इतकी वैचारिक प्रगल्भता या छोट्या मुलांमध्ये निर्माण झाली आहे, हे कौतुकास्पद आहे.

नेत्यांची जयंती, पुण्यतिथीही कार्यक्रम घेऊन साजरी केली जाते. अगदी एखाद्या मुलाला त्या नेत्याची वेषभूषा देऊन वर्गातील प्रत्येक मुलाकडे काही ना काही काम सोपवून दिले जाते. कार्यक्रमाचे नियोजन, कार्यक्रम व्यवस्थित पार पाडणे, सगळं ही मुलंच करतात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही कुठलाही कागद हातात न घेता मुलंच करतात. या मुलांना सुट्टी आवडत नाही. कारण त्या दिवशी टीचरची भेट होत नाही. शाळेत यायला मिळत नाही, मजेचे खेळ खेळता येत नाहीत.

एकूण काय, ‘एकच ध्यास, मुलांचा विकास.’ तो कशाकशाने करता येईल, त्यांचे अनुभवविश्व कसे समृद्ध करता येईल, हाच ध्यास त्यांना लागलेला आहे.
याबरोबरच त्यांनी ‘पार्थ करिअर प्लॅन’ ही बचत योजना ३१ मुलांसाठी स्वत: पैसे गुंतवून सुरू केली आहे व त्यामध्ये दरवर्षी म्हणजे त्यांचा मुलगा पार्थ याच्या वाढदिवसानिमित्त गुंतवणूक करणार आहेत. वर्षभर आईवडिलांना शक्य असेल तर तेही त्यात पैसे टाकू शकतात. या पैशांचा उपयोग मुलांना बारावीनंतरच्या शिक्षणासाठी होईल, अशी तरतूद करून ठेवली आहे. ‘आकांक्षा दत्तक योजना’ त्यांनी चालू केली आहे.
यामध्ये ज्या मुली हुशार आहेत, पण आईवडिलांची शिकवण्याची परिस्थिती नाही, अशांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च त्या स्वत: उचलणार आहेत. ‘लाखात एक खामगावची लेक’ या योजनेचा त्यांच्या डोक्यात विचार सुरू आहे. यामध्ये मुलीच्या जन्माचे स्वागत करून मातापित्याचा सत्कार करणार आहेत. ‘पैसा काय येतो आणि जातो, पण हे केलेले कार्य कायम राहते. यातून जी मुलं घडतील, मोठी होतील, या देशाचे जबाबदार नागरिक बनतील.
ती माझी सर्वश्रेष्ठ कमाई असेल,’ असं त्यांना आवर्जून वाटतं.

पुस्तक एके पुस्तकच न करता मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल? यासाठी या मैत्रिणीचे प्रयत्न खरंच खूप अभिनंदनीय आणि प्रेरणादायी आहेत.
‘उजळून टाक तू हा अंधार,
हाती असू दे न्यायाची तलवार,
फुलांमध्ये पेरूनी सुसंस्काराचे पराग,
फुलू दे, फूलू दे, ही हसरी फुलबाग.
शुभांगी जुजगर, गेरवाई, बीड
बातम्या आणखी आहेत...