आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझा गणेशोत्सव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माझ्या सासरी, मोनेंच्या घरी रत्नागिरीत गणपती येतो. पण आम्ही दोघंही आपापल्या कामांत खूप व्यग्र असल्याने तिथे जाऊ शकत नाही. माझ्या माहेरीच आम्ही गणेशोत्सव साजरा करतो. माझ्या लहानपणी आमच्या सोसायटीतल्या ५२ बिऱ्हाडांमध्ये गणपती असायचा. आणि मग एकमेकांच्या घरी आरतीला जाणे, हा आमचा नित्यक्रम. प्रत्येकाच्या घरची सजावट वेगळी असायची.

आता मात्र ते दिवस फक्त आठवणीतच राहिलेत. पूर्वी गणेशोत्सव म्हणजे आपलेपणा होता. आता तो फारच व्यावसायिक झालाय. माझ्या लहानपणी आम्ही दहा दिवस गणपती बसवायचो. आता मात्र आईने दीड दिवसांचाच गणपती ठेवण्याचा निर्णय घेतलाय. ते दीड दिवस मी शूटिंग करत नाही. मला गणपतीची षोडशोपचारे पूजा सांगायला खूप आवडतं. गेली २० वर्षं मी पूजा सांगणार अन् दादा पूजा करणार, हा घरचा नियम. आता पुढच्या पिढीला तयार करायचा, आमचा विचार आहे. त्यामुळेच आता माझा भाचा पूजा करतो. लवकरच माझ्या जागी बसून माझ्या मुलीने पूजा सांगावी, अशी माझी इच्छा आहे. आम्हा भावा-बहिणीची परंपरा त्या दोघांनी चालू ठेवावी, असं वाटतं. मला मोदक करायला खूप आवडतात. दरवर्षी मी गणपतीत मोदक करते आणि सर्वांना खाऊ घालते. गणपतीच्या दिवशी, मी ब्राह्मणी पद्धतीची ओचा घालून नऊवारी साडी नेसते. सालंकृत मराठी साज करून त्या दिवशी घरी येणाऱ्या पाहुण्यांचे आगत-स्वागत करते. त्यामुळेच माझी आई दरवर्षी मला नवीन नऊवारी साडी भेट देते. माझे अनेक मित्र-मैत्रिणी खास त्या दिवशी मला पाहायला आमच्या घरी येतात. आता ‘इको-फ्रेंडली’ गणपती हा शब्द फार रूढ झाल्याने काही जण चांदीच्या किंवा एखाद्या धातूच्या मूर्तीची घरी प्रतिष्ठापना करतात. पण मला ते पटत नाही. बाप्पा आपल्या घरी वर्षातून एकदाच येतो. त्यातसुद्धा आपण असे करावे? त्यापेक्षा छान शाडूच्या मातीची मूर्ती आणावी. त्याचे वाजत- गाजत परंपरेनुसार स्वागत करावे. आपण हे संस्कार मुलांवर केले तरच त्यांना आपल्या सणांचं माहात्म्य पटेल.
(शब्दांकन - अनुजा कर्णिक)