आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दफनभूमी गाझा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1948 पासून सुरू असलेला अरबी पॅलेस्टाइन आणि इस्रायली ज्यूंचा संघर्ष सहा दशके उलटून गेल्यानंतरही धगधगतोय. अरबांनी यासेर अराफत यांच्या नेतृत्वाखाली अखेरीस वेस्ट बँक आणि गाझा पट्टीत आपला हक्क कायम केला; पण त्यामुळे इस्रायली लष्कराचा त्रास काही कमी झाला नाही. परिणामी हमास या पॅलेस्टाइन स्वातंत्र्यवादी गटाचे कार्यकर्ते इस्रायलवर हल्ले चढवत असतात आणि प्रत्युत्तर म्हणून इस्रायल गाझा पट्टीवर घमासान हवाई बॉम्बहल्ले करत असतो. हमास आणि इस्रायल यांच्या संघर्षात गाझा पट्टीत सर्वाधिक संहार घडतोय.
सततच्या युद्धामुळे गाझा पट्टीत कमालीची असुरक्षितता जन्माला आली आहे. एकेकाळी इस्रायली सैनिकांविरुद्ध लढणं वा त्यात मारलं जाणं, हे प्रतिष्ठेचं मानलं जायचं; पण सध्या परिस्थिती बदलली आहे. एकेकाळी हौतात्म्य पत्करायला उदार झालेले पॅलेस्टिनी लोक आता रोजच्या जीवन संघर्षाला कंटाळून आत्महत्येला प्रवृत्त होत आहेत. आणि यात प्रमाण जास्त आहे ते तरुणांचं; ज्यांच्या खांद्यावर आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी आहे; पण ती जबाबदारी पेलवत नाही, म्हणून स्वत:चा जीव घेण्याकडेच त्यांचा कल वाढत आहे. गाझातील जगणं जसं सुसह्य किंवा असह्य होतं, त्यानुसार इथल्या आत्महत्यांचा आकडाही कमी-जास्त होत असतो. एकीकडे गाझा सरकार याचा दोष या लोकांच्या इस्लामवरील तकलादू निष्ठेला देत आपली जबाबदारी टाळत आहे, तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय समुदाय याकडे युद्धाची अपरिहार्यता म्हणून दुर्लक्ष करत आहेत.
युद्ध ही गाझा पट्टीला नवीन गोष्ट नाही. पण आता त्या युद्धातील देशप्रेमाची भावना लयास जात आहे. उरली आहे, ती फक्त असहायता आणि अगतिकता! स्वत:ची बायकापोरं, आईबाप आपल्या डोळ्यांसमोर मारली जाण्यातली भयावहता. गाझातील घरं नष्ट होताहेत; दवाखाने नष्ट होताहेत; शाळा नष्ट होताहेत; रस्ते, बाजार, दुकानं, शेतं सारं सारं नष्ट होतंय. आणि या सार्‍यांत नष्ट होताहेत इथली लहान मुलं, त्यांची स्वप्नं, त्यांच्या आशा, त्यांचं भविष्यही. लहान मुलांना चित्र काढायला सांगितल्यावर ती पाना-फुलांऐवजी बंदुक, रॉकेट्स आणि रणगाड्यांची चित्रं रेखाटताहेत. कुटुंबाची जबाबदारी अंगावर असलेल्या महिलांचं जगणं तर याहूनही भीषण आहे. कारण पुरुषांप्रमाणे त्यांना आत्महत्या करता येत नाही आणि मुलांसाठी जगत राहताना आपल्या मुलांचं मरणही त्यांना सोसावं लागतंय. अनेक महिलांना हा ताण असह्य होऊन, त्यांना वेड लागायची पाळी आली आहे. इस्रायलकडून रात्री-बेरात्री बॉम्बहल्ले होताहेत. त्या हल्ल्यात पॅलेस्टिनी लहान मुलं-बाया-म्हातारे-कोतारे होरपळून जाताहेत.
गाझा पट्टीचं सध्या जगातील सर्वात मोठ्या आणि भयावह अशा तुरुंगात रूपांतर झालंय. इस्रायली सरकारने केलेल्या नाकेबंदीमुळे तिथे जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भुयारं. इस्रायल आणि इजिप्त सरकारनं जवळपास सर्वच वस्तूंच्या व्यापारावर इथं निर्बंध टाकल्यामुळे ही भुयारं सध्या गाझा पट्टीच्या श्वासनलिका बनल्या आहेत. त्यांच्याद्वारे गाझा आणि बाहेरच्या जगात, इजिप्त आणि इस्रायल यांच्यादरम्यान जगण्याचं दळणवळण होतं. खाण्यापिण्याच्या वस्तू, किराणा सामान, फर्निचर, वाहनं, मनोरंजनाची साधनं, पैसा आणि जनावरं-माणसांचीही ये-जा याच मार्गानं होत असते. ही भुयारं सध्या गाझा पट्टीला जगवत आहेत. ती बेकायदेशीर आहेत; पण सध्या ती गाझाची अत्यावश्यक गरज आहे. स्मगलरांच्या कृपेनेचे इथले 15 लाख लोक सध्या तग धरून आहेत. आणि त्याची भलीमोठी किंमत आहे, जी सर्वांनाच मोजता येत नाही. कारण बाजारात माल भरपूर असला तरी तो त्यांनाच मिळतो, ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे. बेरोजगारीचा दर 40 टक्क्यांवर पोहोचला आहे आणि ज्यांना काम आहे त्यांनाही जेमतेम पैसे मिळतात. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे; पण रुग्णांची संख्या मात्र वाढतच आहे. युद्धामुळे अपंग झालेल्या अनेकांना आवश्यक ती औषधं आणि उपकरणं मिळणं कठीण झालंय. त्याचा सर्वात जास्त परिणाम मुलांनाच भोगावा लागतोय. दुसरीकडे तरुणांमध्ये धार्मिक कट्टरतेचं वारं संचारलंय. मुलींना स्कर्ट घालायला बंदी आणि महिलांना बुरख्याची सक्ती करण्यात येत आहे. सामान्य अरबामध्ये आज हमाससाठी फारसं प्रेम वा आदर उरलेला नाही आणि इस्रायलविरुद्ध त्याच्या मनात सुडाचीही भावना नाही. इथल्या मुलांना वाटतं त्याप्रमाणे अरबांना फक्त सन्मानाचं जगणं हवंय, सूड नकोय. ही आशाच गाझाच्या भविष्याला उपयोगी पडणार आहे...