आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article About German Writer Gunter Gras In Rasik

विवेकबुद्धीचा पाठीराखा (साहित्यप्रतिभा)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अशोभनीय भूतकाळाचे समाजाला भान देतानाच माणसातल्या विवेकबुद्धीला जागवणा-या मोजक्या लेखकांपैकी गुंटर ग्रास एक होते. त्यांच्या लेखणीने नवी प्रतिमासृष्टी जागतिक साहित्याला दिलीच; पण त्याहीपेक्षा युद्धखोर वृत्ती-प्रवृत्तींना आव्हान देण्याचेही मोलाचे काम केले... गेल्याच आठवड्यात निधन पावलेल्या या नोबेल पुरस्कारप्राप्त लेखकाच्या लेखनसामर्थ्याचा धांडोळा घेणारे हे टिपण...

नोबेल पारितोषिक विजेते जर्मन लेखक गुंटर ग्रास यांनी १९५९मध्ये लिहिलेली ‘द टीन ड्रम’ ही कादंबरी गाजली. तिच्या अक्षरश: लक्षावधी प्रती जर्मन तसेच इंग्रजी भाषेत खपल्या. असं काय होतं या कादंबरीत? हिटलरच्या काळात ज्यंूचं करण्यात आलेलं शिरकाण हा जर्मनीचा डागाळलेला इतिहास त्या वेळी ताजा होता. पण तरीही त्याबद्दल कोणी बोलू धजत नव्हते. ‘टीन ड्रम’ या कादंबरीत पहिल्यांदा ग्रास यांनी लेखक म्हणून या जखमेवरची खपली काढण्याची हिंमत दाखवली. पत्र्याचा ड्रम वाजवणाऱ्या मुलाचे रूपक जर्मन देशासाठी तयार केले. हा मुलगा मनोरुग्णांच्या रुग्णालयात आहे आणि तो आपली कथा सांगतो आहे. त्याने लहानपणीच ठरवून टाकले आहे की, आपण मोठं व्हायचं नाही. त्याच्या गळ्यात हा ड्रम आहे आणि तो कोणी घेऊ पाहिल्यास, तो जिवाच्या आकांताने किंचाळतो. या कादंबरीच्या प्रसिद्धीनंतर हेन्रिक बॉल या दुसऱ्या जर्मन कादंबरीकाराने ग्रास यांचे वर्णन जर्मनांच्या युद्धोत्तर विवेकबुद्धीचे प्रतीक असे केले. १९९९मध्ये म्हणजे थोडे विलंबानेच, त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले. ग्रास यांनी ‘टीन ड्रम’नंतर आणखी दोन कादंबऱ्या लिहिल्या. या साऱ्यांना मिळून ‘डांझिग ट्रायोलॉजी’ म्हटले जाते. २००६मध्ये त्यांनी आपले आत्मचरित्र ‘पिलिंग द ओनियन’ या नावाने प्रसिद्ध केले. यामध्ये त्यांनी ‘वाफेन एस. एस.’ या अत्याचारांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या जर्मन सैनिक पथकात आपण वयाच्या १७व्या वर्षी काम केले होते, असा गौप्यस्फोट केला. जगभरच्या त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला. ख्रिस्तोफर हिचेन्ससारख्या बुद्धिवादी लेखकाने त्यांना ‘फ्रॉड’ म्हटले.

ग्रास यांचे वडील जर्मन होते, तर आई पोलिश. डांझिग येथे ते एक दुकान चालवत. स्वत: गुंटर ग्रास हिटलरच्या युवक पथकात सहभागी झाले होते. पुढे युद्धकैदी म्हणून एक वर्ष त्यांना तुरुंगात जावे लागले. युद्धानंतर त्यांनी खाणीत तसेच दगड तासणाऱ्या कारागिरांकडे सहायक म्हणून काम केले होते. त्या काळात त्यांची कम्युनिस्टांशी आणि माजी नाझींशी मोठ्या प्रमाणात वैचारिक देवाणघेवाण झाली. वादविवादही घडले.

ग्रास यांनी बर्लिनमधील ड्यूशेलवॉर्फ येथे चित्रकला आणि शिल्पकला यांचे शिक्षण घेतले. जाझ ड्रमर म्हणूनही स्वत:ला आजमावून पाहिले. आपल्या अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे तसेच रेखाटने त्यांनी स्वत:च केली. चित्रकलेच्या शिक्षणामुळेच कदाचित त्यांच्या कादंबऱ्या प्रतिमांच्या आणि रूपकांच्या भाषेत बोलणाऱ्या असत.

‘टीन ड्रम’चा नायक ऑस्कर माझेरॅत ही त्यांनी तयार केलेली प्रतिमा ठसठशीत नि प्रभावी होती. त्यांच्या पुढच्या सर्वच कादंबऱ्या उदा. कॅट अँड माऊस (१९६१), डॉग इयर्स (१९६३), लोकल अॅनास्थेटिक, डायरी ऑफ स्नेल, फ्लाउन्देर प्रतिमांच्या भाषेत बोलणाऱ्या होत्या. "लोकल अॅनास्थेटिक'च्या मुखपृष्ठावर जळती मेणबत्ती व त्यावर बोट दाखवलेले आहे, आणि कादंबरीत दंतवैद्याच्या खुर्चीवर बसलेला पेशंट आणि डॉक्टर अणुयुद्धापासून जागतिक राजकारणापर्यंत अनेक गोष्टींवर चर्चा करतात, असा बाज आहे. या कादंबरीची खासियत म्हणजे, यात टीव्ही हा मीडिया समाजाच्या संवेदना शिथिल करणारे साधन म्हणून येतो. ‘डायरी ऑफ स्नेल’मध्ये आजारी असलेली स्त्री हळूहळू बरी होते आणि तिच्या आयुष्यात आलेल्या दु:खाचे प्रतीक असलेल्या गोगलगायीला पायाखाली चिरडून मारते. या कादंबऱ्या आणि मुलाखतीतून गुंटर ग्रास यांनी मिएफ(MIEF) या जर्मन शब्दाचा उल्लेख केला आहे. याचा अर्थ आहे, एक प्रकारची पसरलेली धूळ. त्यांच्या कादंबऱ्याचे परीक्षण करताना जॉन अपडाइकने म्हटले आहे की, “ग्रास यांच्या कादंबरीत पानापानावर ही नैराश्येची धूळ पसरलेली आढळते.” निराशा आणि उदासीनता या दोन मानवी भावनांनी काफ्का, काम्यू, आपल्याकडचे विलास सारंग यांसारख्या अनेक लेखक आणि कलावंतांच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान बजावलेले आपल्याला जाणवते. ज्ञानेश्वरीमध्ये ‘नैराश्ये विनटला’ असा शब्दप्रयोगही आला आहे.

ग्रास यांची राजकीय भूमिका सुस्पष्ट होती. डाव्या विचारांच्या सोशल डेमोक्रॅटिक पक्षासाठी त्यांनी उमेदीच्या काळात भाषणे लिहिली.अणुस्पर्धेला प्राणांतिक विरोध केला. १९७२मध्ये डॉल्टमंड येथे निघालेल्या राजकीय मोर्च्यात ग्रास यांनी जर्मनीमध्ये आण्विक क्षेपणास्त्र येण्याला विरोध केला आणि सोशल डेमॉक्रॅटिक पक्षही सोडला. त्यांनी ल्युथेरन आणि कॅथलिक चर्चवरदेखील टीका केली. तसे करताना या चर्च व्यवस्थांचे वृत्ती-प्रवृत्तीच्या अंगाने नाझीवादाशी नाते असल्याचे म्हटले. साम्राज्यवादी अमेरिकेच्या दादागिरीला न जुमानणाऱ्या फिडेल कॅस्ट्रोला त्यांनी कायम पाठिंबा दिला. पण सोव्हिएत रशियाच्या वर्चस्वाखाली असलेल्या देशातील हुकूमशाहीवरही त्यांनी तितक्याच त्वेषाने टीका केली. धार्मिक मूलतत्त्ववादी सरकारे नेहमीच त्यांच्या टीकेचे धनी ठरले. आखाती युद्धालाही त्यांचा तीव्र विरोध होता. पूर्व आणि पश्चिम जर्मनीच्या एकत्रिकरणाने दमनकारी शक्तींचा नव्याने उदय होऊ शकेल, हे गृहीतक मांडून त्यांनी त्या प्रक्रियेविरोधात प्रतिक्रिया नोंदवली. २०१२मध्ये लिहिलेल्या एका कवितेत (what must be said) ज्यूबहुल इस्रायलचा उल्लेख त्यांनी ‘जागतिक शांततेला धोका’ असा केला, त्यामुळे आंतरराष्ट्रीय विचारविश्वात वादळ उठले. इस्रायलला जर्मन पाणबुडी विकणे, यामुळे जर्मनीही युद्धगुन्हेगारीत सामील आहे, असाही उल्लेख त्यांनी या कवितेत केला होता.

‘पॅरिस रिव्ह्यू’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात, ‘लहान असताना मी खोटे बोलण्यात अतिशय पटाईत होतो. पण माझ्या आईला हे खोटे बोलणे आवडत असे. मी १० वर्षांचा असताना ती मला पीटर जिंट (परीकथेतील एक पात्र) म्हणून हाक मारत असे. त्यामुळेच मी या कथा लिहून काढायला लागलो आणि आजही लिहीत आहे. वयाच्या १२व्या वर्षीच मी कादंबरी लिहायला सुरुवात केली. ती बुशेरियन यांच्याबद्दल आहे. आणि हीच कादंबरी पुढे ‘टीन ड्रम’च्या रूपात आली. त्यातील पात्र अॅना हे नायकाच्या आजीच्या रूपात आले आहे. माझ्या कादंबरीत पहिल्याच प्रकरणात सर्व पात्रे मरून जातात. पण त्यामुळे पुढे मला काही लिहिताच येईना. यातून मी धडा घेतला की, लिहिताना सजग राहायला हवे. सत्य हे कंटाळवाणे असते. पण थोड्याशा खोटेपणामुळे ते रंजक करता येते...’

खोटेपणाचे खऱ्यात रूपांतर करण्याचे कसब ग्रास १९८०च्या ‘द मीटिंग ऑफ टेलगेट’ याही कादंबरीत सराईतपणे वापरतात. १६४७मध्ये ३० वर्षांचे युद्ध संपले. त्यानंतर काही कवी जर्मनीत एकत्र जमले. त्यांचे साम्य दुसऱ्या महायुद्धानंतरच्या ग्रुप-४७ या गटाशी होते, ज्यात ग्रास कार्यरत होते. त्या एकत्रीकरणावर ही कादंबरी आधारित आहे. ग्रास यांनी अनेक प्रभावी पुस्तके लिहूनही ते वाचकांना माहीत आहेत, ते ‘टीन ड्रम’चे लेखक म्हणूनच. अनेक कम्युनिस्ट देशांत, मग त्यात पोलंडही आला, ‘टीन ड्रम’वर बंदी होती.

१९८०मध्ये वोल्कर शोन्डोर्ल्फ या दिग्दर्शकाने त्यावर चित्रपट बनवला आणि त्याला फ्रान्समध्ये प्रतिष्ठेचा ‘पाम द ओर’ हा पुरस्कार ‘अप्पोकॅलाकसी नाऊ’ या चित्रपटाबरोबर विभागून मिळाला. तसेच सर्वोकृष्ट परदेशी भाषिक चित्रपट म्हणून ऑस्कर पुरस्कारही मिळाला. ‘डॉग इअर्स’ ही कादंबरी डान्स (आताचे डान्झिग) या शहरातून जर्मनांना हाकलून दिल्याच्या विषयावर आहे, तर याच विषयावर २००२मध्ये त्यांनी ‘क्रॅबवॉक’ ही कादंबरी लिहिली. एकदंरीत त्यांच्या सर्वच कादंबऱ्यांत मनाचे आणि एकूण स्थितीचे रूपांतर कुठल्या ना कुठल्या तरी प्राण्यांच्या गडद प्रतिमांमध्ये झालेले आहे.

चित्रकला, शिल्प यांच्याबरोबर नृत्य आणि ड्रमर इत्यादी अनेक कलांमध्ये ते पारंगत होते. कादंबरीत निराशा आणि शोकांतिका रंगवणारा हा लेखक अनेक प्रकारचे नृत्य उत्तम प्रकारे करत असे. ग्रास यांच्या बाबतीतले हे सुखद सत्य स्वीकारणे त्यांच्या वाचकांना कठीण जाते; पण व्यक्तिमत्त्वातला दुभंगपणा हेही प्रतिभावंताचे एक लक्षण असते. गुंटर ग्रास नावाचा हा प्रतिभावंत मात्र विवेकबुद्धीचे उत्तुंग प्रतीकही होता.

shashibooks@gmail.com