आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईला विचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पूर्वी कोणतीही गोष्ट करायची म्हणजे ‘बाबांना विचारून सांगते’ अशी आईची प्रतिक्रिया असायची. पण हळूहळू सर्वच जबाबदा-या उत्तम पेलणारी स्त्री निर्णय स्वातंत्र्यही सहजरीत्या अनुभवतेय.
परवा बोलता बोलता हे मला म्हणाले की, पूर्वीचा काळच चांगला होता, जेव्हा घरात पुरुषांना इतका मान होता की, प्रत्येक गोष्ट बाबांना विचारून केली जायची. पण हल्ली कोणतीही गोष्ट मुलांनी विचारली की ‘आईला विचार’ असं बाबाच म्हणतात. हे सगळं क्षणभर ऐकायला चांगलं वाटतं. पण विचार केला तर हा काही एका दिवसातला फरक नाही आहे. कोणीही कोणाला असं एका दिवसात अधिकार किंवा मान्यता देत नाही आणि त्यातून नवरा बायकोला? तर या ‘आईला विचार’ला कारणे खूप आहेत.

पूर्वीच्या काळी कुठलेही निर्णय घरातले पुरुष घेत होते. मुलांनी कुठलीही गोष्ट करू का असं विचारलं तर बाबांना विचार, असं सांगितलं जायचं. मुलं बाबांना विचारायला घाबरायची. मग आईच्या मदतीने किंवा कुणी अन्य काकांच्या मदतीने मुलं धाडस करून वडिलांची परवानगी मिळवायची. परवानगी नाही मिळाली तर निराश होऊन बसायची किंवा लपून-छपून ती गोष्ट करायची. या सगळ्याचे कारण म्हणजे, आईला बाहेरच्या जगाबद्दल मािहती नसायची आणि बहुतेक निर्णय हे बाहेरच्या जगातील वावराशी निगडित असायचे.

आता बायकांनी घर आणि नोकरी हे उत्तम रीतीने सांभाळले आहे, सांभाळत आहेत. बायका बाहेर पडल्यामुळे मुलांच्या शाळेत आणणे-सोडणे, वेगवेगळे क्लासेस लावणे हे त्यांना महत्त्वाचे वाटायला लागले. ब-याच घरांत पुरुषांची या गोष्टीवर वेगळी मतं असतात, त्यामुळे आणि क्लासेस/शाळांच्या वेळापत्रकामुळे सोडणे-आणणे हे काम बायकाच करतात. यामुळे आईला मुलांचे वेळापत्रक, अभ्यास, खेळ या सगळ्याबद्दल जास्त मािहती असते. ज्या घरी आई नोकरी करत असते, तिथेही आईच या दोन्ही जबाबदा-या पार पाडत असते. आता बायको करतेच आहे म्हटल्यावर, स्वाभाविकपणे किंवा सोयीस्कर रीतीने बाबादेखील आईला माहीत आहे, आईला विचार, असं मुलांना सांगतात.

बायकांमध्ये क्षमता आहे, जी त्यांनी त्यांच्या गुणांनी सिद्ध केली आहे. बाहेरच्या जगात वावरल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. घरचे आणि बाहेरचे संभाळून त्यांची क्षमता दुपटीने वाढलेली आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बायकांचा मूळ स्वभाव. त्या स्वत:चे कारण सांगून मुलांची अाबाळ होऊ देत नाहीत. यामुळे मुलांना सकाळी कुठल्या क्लासला सोडायचे असो किंवा रात्री जागून प्रोजेक्ट करायचे असो, कितीही धावपळ असली तरी आई हे सगळं व्यवस्थितपणे करणार.

मग साहजिकच मुलं सगळ्या गोष्टी आईला विचारून करतात आणि सगळे निर्णय आई घेत असते. यामुळे काही ठिकाणी बाबांचा अहंकार दुखावला जातो, तर काही ठिकाणी त्यांना आपण मुलांना वेळ देऊ शकत नसल्याचे दु:ख होत असते. आणि काही ठिकाणी बायकोचा अभिमानही वाटत असतो. पण बदललेल्या काळाचे हे प्रतिबिंब आहे हे निश्चित.
बातम्या आणखी आहेत...