आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातरक्षकांचा उच्छाद!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोशाला काढल्याने गोसेवा होते, तर मेलेल्या गुरांची कातडी सोडविल्याने गोरक्षण होते, हे कधी तरी समजून घेणे गरजेचे आहे. मात्र हे समजून घेण्याची इच्छा नसलेल्या तथाकथित गोरक्षकांनी गुजरातमधील दलितांना मारहाण करणे, त्यावर सत्ताधाऱ्यांनी मौन बाळगणे, विरोधकांनी मीडियाच्या साक्षीने अन्यायग्रस्तांचे सांत्वन करणे, हा सगळा राजकीय बेरीज-वजाबाकीचा खेळ खरा; मात्र या घटनेच्या निमित्ताने दबा धरून बसलेले जातवास्तव जसे उघड झाले आहे, तसेच मृत गुरांची कातडी सोडवणाऱ्या वंचित समाजाचा आवाजही उंचावला आहे...

मेलेल्या गुरांचे कातडे सोडविणाऱ्या काही दलित व्यक्तींना तथाकथित गोरक्षकांनी निर्दयपणे मारले. प्रतिक्रिया म्हणून प्रचंड उद्रेक झाला. १९२७मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे आवाहन केले, त्याचा पुनरुच्चार झाला व गुजरातच्या दलितांनी जाहीर केले की, यापुढे आम्ही मेलेल्या गुरांचे कातडे सोडविण्याचे काम करणार नाही. १९२७ नंतर जातीव्यवस्थेवर झालेला हा सगळ्यात मोठा प्रहार आहे! एका अर्थाने गुजरातच्या दलितांनी जातीव्यवस्थेवर ‘भीमटोला’ लगावला आहे! मेलेल्या गुरांची कातडी सोडविली नाही तर चामड्यासाठी जिवंत गुरे मारावीच लागतील. याचा दुसरा अर्थ हाच की, हजारो वर्षे मेलेल्या गुरांची कातडी सोडवून दलितांनी गोरक्षण केले. दलितांना गोरक्षणाचे श्रेय देणे तर बाजूलाच राहिले, उलट तथाकथित गोरक्षकांनी ‘खऱ्या गोरक्षकां’ना बक्षीस म्हणून चोप दिला! गोशाला काढल्याने गोसेवा होते, मेलेल्या गुरांची कातडी काढल्याने गोरक्षण होते, हे कधी तरी समजून घेणे गरजेचे आहे.बहिष्कृत जीवन : म. गांधींच्या प्रोत्साहनाने १९३४मध्ये गोपाळराव वाळुंजकर यांनी सर्वप्रथम मृत गुरांच्या शवच्छेदनाचे काम हाती घेतले. त्यानंतर महाराष्ट्रात हे काम बाबा फाटक, अप्पासाहेब पटवर्धन, भास्कर रानडे, रमाकांत आर्ते यांनी हाती घेतले.

मृत गुरांचे कातडे सोडवितात म्हणून बाबा फाटकांना घरातून बाहेर पडावे लागले. अप्पासाहेब पटवर्धनांना ‘डुक्कर’ ही उपाधी मिळाली. भास्कर रानडे यांना घरचेच लोक त्या काळी दलितांना पाणी पाजत, तसे वरून पाणी देत. रमाकांत आर्ते यांना लग्नाला मुलगी मिळेना. ही सारी मंडळी उच्चवर्णीय होती आणि तरीही त्यांच्याच समाजाकडून त्यांना अशी वागणूक मिळत होती. मग दलितांना समाजाकडून कशी वागणूक मिळत असेल, याची आपण गुजरातची घटना पाहता कल्पना करू शकतो.

आव्हानात्मक काम : मेलेल्या गुरांचे कातडे सोडविणे हे किती आव्हानात्मक काम आहे, हे मी गागोदे येथे १९९८ पासून मृत गुरे सोडवण्याच्या स्वानुभवावरून सांगू शकतो. लोकं मेलेली गुरे रानावनात, नदी-नाल्याकाठी वा ओसाड माळावर टाकून देतात. तेथे जाऊन भर उन्हा-पावसात हे काम करावे लागते. मेलेली गुरे फुगलेली असतात. प्रचंड दुर्गंधी येत असते. माशा घोंगावत असतात. मेलेल्या गुराच्या नाका-तोंडाजवळ व गुदद्वाराजवळ अळ्या पडलेल्या असतात. काम करताना या अळ्या हातावर चढतात. काम करताना काम करणारा व कातडे यातील अंतर फुटभराचेही नसते. असे हे काम हजारो वर्षे, एका समाजाला वेठीस धरून आम्ही करायला भाग पाडले. याचे भान तर सोडाच, उलट त्यांना मारून आम्ही मोठे ‘गो-भक्त’ व ‘देशभक्त’ म्हणवून आज मिरवतो आहोत!

नैसर्गिक संपत्तीचे रक्षणकर्ते : चामडे हे निसर्गनिर्मित असून ती एक नैसर्गिक संपत्ती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२७मध्ये केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याने, आता हे काम महाराष्ट्रात दलित समाज करीत नाही. अगदीच अपवादात्मक स्थितीत मांग समाजातले लोक हे काम करताना नजरेस पडतात. मात्र पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश अशा राज्यांमध्ये आजही दलित समाज मेलेल्या गुराढोरांची कातडी सोडविण्याचे काम करतो. उर्वरित राज्यांतही फारशी वेगळी परिस्थिती नाही. दलित नेत्या मायावती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या होत्या. दलितांच्या वाट्याला दुष्ट सामाजिक परंपरेने आलेले हे भोग मायावतींच्या राजवटीतही संपले नाहीत. दुसरी बाजू अशी की, महाराष्ट्र व आता गुजरात वगळता एकाही राज्यातील दलितांनी मेलेल्या गुराढोरांची कातडी सोडविण्याचे काम आम्ही यापुढे करणार नाही, अशी खणखणीत भूमिका घेतलेली नाही.

महाराष्ट्रातील ४० हजार खेड्यांत वर्षाला अंदाजेे चार ते साडेचार लाख गुरे मरत असावीत. एका गुराच्या कमावलेल्या कातड्याची किंमत किमान दोन हजार रु. आहे. म्हणजे महाराष्ट्रात कोट्यवधी रुपयाचे चामडे आजही मातीत जात आहे. इतक्याच प्रमाणातल्या चामड्यासाठी असंख्य गुरे कत्तलखान्यात कापावी लागत होती. मात्र, यंदाच्या वर्षापासून महाराष्ट्रात गोवंशहत्या बंदी कायदा अमलात आला. आता गोवंशाच्या कत्तलीवर बंदी आहे, म्हशींच्या कत्तलीवर नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या कत्तलखान्यातील गुराढोरांची संख्या रोडावली (मी स्वत: एकेकाळी वर्षाला सरासरी १२ गुरेे सोडवायचो. पण आता ही संख्या शून्यावर आली आहे.) आहे, हे निश्चित. कातड्याची मागणी पूर्ण करण्यासाठी त्या व्यवसायातील लोक आता नेमके कोणत्या पद्धतीने काम करतात, हाही अभ्यासाचाच विषय आहे. पण मी काही त्या विषयातील तज्ज्ञ नाही. असो.

हजारो वर्षे आजपर्यंत दलितांनी ही नैसर्गिक संपत्ती वाचवली, पर्यावरणाचे व जोडे देऊन आपल्या पायाचे रक्षण केले आणि आपण गुजरातच्या दलितांना कसे मारले, हे थंडपणे वेफर्स खात टी.व्ही.वर पाहात आहोत! आमची नजर गेली आहे, आम्ही संवेदनहीन बनत आहोत. आम्ही आतून अस्वस्थ होत नाही, पेटून उठत नाही.

मूळ मुद्दा जातीव्यवस्थेचा : हे खरे की, गुजरातच्या घटनेमुळे जातीव्यवस्थेचे हिडीस स्वरूप पुन्हा एकदा समोर आले. म्हणूनच मूळ मुद्दा गोरक्षणाचा नसून, जातीव्यवस्थेचा आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, म. गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आचार्य विनोबा भावे या सर्वांनी अस्पृश्यता निवारण, जातिनिर्मूलन व जातिअंताच्या दिशेने प्रयत्न केले, जनजागृती केली, प्रबोधन केले व दोन्ही समाजाची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न केले. सहभोजनाचे कार्यक्रम केले, आंतरजातीय लग्न केले, आडनावाने जाती कळते म्हणून आडनाव टाकून आई-वडिलांचे नाव आपल्या नावापुढे लावू लागले, अनेकांनी दलितांची कामे हाती घेतली. यामुळे जातीव्यवस्थेवर घाव घातले गेले. जातीव्यवस्था भले मोडली गेली नसेल, पण बऱ्यापैकी खिळखिळी झाली. शासनालाही अनेक कायदे करणे भाग पडले. नोकरी व सत्तेच्या पदात आरक्षण आले. अॅट्रॉसिटीसारखे कायदे झाले.

हाती धुपाटणे आले! : गेल्या शंभर वर्षांत काही महापुरुषांनी आम्हाला काही गोष्टी मिळवून दिल्या. त्याने काही प्रमाणात स्वातंत्र्य व समता आली. म. फुलेंनी शिक्षण सर्वांना खुले केले, डॉ. आंबेडकरांनी चवदार तळ्याचे पाणी घेऊन पाणी सर्वांना मुक्त केले, गांधीजींनी दांडी यात्रा काढून नैसर्गिक संसाधनावरचे अधिकार आपल्याला मिळवून दिले. विनोबांनी तेरा वर्षे भूदान पदयात्रा करून भूमिहीनांना जमीन मिळवून दिली. मात्र आज काय घडते आहे? शिक्षण महाग करून समाजाला शिक्षणापासून वंचित केले जाते आहे. पाणी ही विक्रीची वस्तू बनवून, पाणी मिळणे मुश्कील केले आहे. जंगल, माती, वाळू, मीठ भांडवलदारांच्या हाती देऊन नैसर्गिक संसाधनांवरचे अधिकार काढून घेतले आहेत. विकासाच्या नावाने जमीन एक तर शासन ताब्यात घेत आहे किंवा भांडवलदारांना जमिनी देत आहे व शेतकऱ्यांना भूमिहीन व विस्थापित केले जात आहे! फक्त आमच्या गळ्यात मडके आणि पाठीला झाडू नाही इतकेच!! या विकास व्यवस्थेत प्रथम दलित मारला जातो आहे.

विचित्र अनुभव : बऱ्याच वर्षांपूर्वी नागपूरला आमच्या आत्यांकडे गेलो होतो. त्यांच्याकडे त्यांची ख्रिश्चन मैत्रीण आली. ती त्यांना म्हणत होती, ‘माझ्या मुलीसाठी एखादा ब्राह्मण-ख्रिश्चन मुलगा शोधा.’ पाहा. म्हणजे उद्या सारा देश पूर्ण ख्रिश्चन वा मुस्लिम झाला तरी त्यात ब्राह्मण-ख्रिश्चन, ब्राह्मण-मुस्लिम ही जातीव्यवस्था राहणार!जातीव्यवस्था ही अशी चिवट आहे. जातीव्यवस्था मोडण्याची गुरुकिल्ली कुणा एकाकडे आहे, असेही नाही. त्या दिशेने विचार करावा, प्रयत्न करावे, एवढेच आपल्या हाती आहे. शक्ती कमी असणे गुन्हा नाही. पण असलेली शक्ती न वापरणे हा मात्र गुन्हा आहे. आज आपण आपली शक्ती वापरली नाही, तर काळ आपल्याला क्षमा करणार नाही.
विजय प्र. दिवाण
shrikoteshawardevtrust.vinoba@gmail.com
(लेखक सर्वोदयी कार्यकर्ते आहेत.)
लेखकाचा मोबाइल क्रमांक ९०२८३२१०६३
बातम्या आणखी आहेत...