आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्योगी बायका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अस्ताव्यस्त पसरलेल्या वेळेचं काय करायचं, हा प्रश्न उतारवयात आ वासून उभा असतो. मात्र असं म्हणतात की, सतत कामात व्यग्र असणाऱ्या, काहीतरी उपयुक्त आणि क्रिएटिव्ह काम करत राहणाऱ्यांना नैराश्य स्पर्श करत नाही. त्यांना जगण्याचा कंटाळा येत नाही. वेळ कसा घालवायचा, हा प्रश्न त्यांना सतावत नाही. वेळ आणि स्वत:मधली कलात्मकता याचा सुंदर मेळ घालणाऱ्या बडोद्याच्या काही मैत्रिणींविषयीची ही आजची कव्हर स्टोरी.

बडोद्याच्या अठरा जणींचा अॅक्टिव्हिटी ग्रुप आहे तो. एखाद-दुसरा अपवाद वगळता सगळ्या जणी वयाने साठीच्या पुढच्या, सुखवस्तू घरातील आहेत. मुलं मोठी होऊन आपापल्या संसारात स्थिरावली आहेत. नातवंडंही आता स्वतंत्र झाली आहेत. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींबाबत असलेल्या जबाबदाऱ्याही कमी झाल्या आहेत. जोडीदाराची साथ राहिली नाही. पण तरीही त्यांच्या जगण्यातला आनंद त्या आजही अगदी पुरेपूर घेत आहेत. या अशा मैत्रिणींना एकत्र आणण्याची कल्पना जयमाला चव्हाण - पूर्वाश्रमीची विनोद करंदीकर - हिची.

जयमाला २८/२९ वर्षे एक ब्युटीपार्लर चालवत होती. वयोमानपरत्वे त्यातील कष्ट झेपेनासे झाले. पण स्वस्थ बसणाऱ्यातील ती नव्हेच. कलाकुसरीचा वारसा तिला आईकडून मिळाला होता आणि तिलाही तो छंद लागला होता. तिने कामाला सुरुवात केली. काही मैत्रिणी कामाचे कौतुक करू लागल्या. कोणी म्हणायचं, ‘बरं बाई तुला हा छंद तरी आहे. किती चांगला वेळ जातो तुझा.’ ती म्हणायची, ‘तुम्ही पण सुरू करा ना काहीतरी.’ ‘तरुणपणी मलाही नाद होता गं या कामाचा. पण आता विसरले.’ या बायका घरातील तक्रारी करायच्या. मुलांना वेळ नाही. त्यांचे त्यांचे उद्योग चालू असतात. पण त्यात या बायकांना स्थान नाही. घरात कामाला नोकरचाकर आहेत. नातवंडे मोठी झाल्याने त्यांना सांभाळायचे कामही आटोक्यात आले आहे. आपली कोणालाही आता गरजच उरली नाही, आर्थिक स्थिती चांगली असली तरी मानसिकदृष्ट्या त्या कमकुवत झाल्या होत्या. अशा प्रकारच्या महिलांना नैराश्यातून बाहेर काढण्याचे काम जयमालाने केले.

शासनातर्फे महिलांसाठी बऱ्याच योजना असतात. पण त्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटासाठी. त्या योजनांचे लाभ मिळवण्यासाठी या सुखवस्तू, उच्च मध्यमवर्गीय बायका काही सरकार दरबारी खेटे घालायला जायच्या नाहीत. मग अशा अनेक मैत्रिणींना जयमालाने एकत्र केले. आपण याही वयात खूप काही करू शकतो, ही भावना त्यांच्या मनात रुजवली. विस्मरणात गेलेल्या कलेला त्यांना उजाळा द्यायला लावला. नवीन नवीन डिझाईन्स देऊ करून त्यांना भरतकामाला किंवा इतर कलाकुसरीच्या कामाला प्रवृत्त केले. ज्यांना जे येत नव्हते ते तिने त्यांना शिकवले. काही नवीन गोष्ट बघितली तर ती शिकून घ्यायला प्रोत्साहित केले आणि बघता बघता हा ग्रुप तयार झाला. एकेक करत अठरा जणी जमल्या आणि गेली दहा वर्षे या ग्रुपचे काम उत्साहात चालू आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे, आता तरुण स्त्रियाही या कामाकडे आकर्षित होऊन ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी विचारणा करू लागल्या आहेत.

या ग्रुपमध्ये मराठी, गुजराती, कानडी, सिंधी अशा विविध प्रांतातील स्त्रियांचा समावेश आहे. दर शुक्रवारी या सगळ्या मैत्रिणी दुपारी दोन ते पाच या वेळात जयमालाच्या घरी जमतात. नेमाने येण्याची सक्तीही नाही. जमेल तसे यायचे. पण प्रत्येक जणीने आपल्या हातात नेहमीच काहीतरी काम घेऊन आले पाहिजे, ही मात्र अट आहे. मग ते भरतकाम असो, विणकाम असो किंवा क्रोशा, टॅटिंग, पेंटिंग असं काहीही. पण ते आवश्यकच. या ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही, हजेरी नाही, किंवा कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही. फक्त एकत्र भेटणे, गप्पा मारणे आणि हातात काहीतरी काम असणे, इतकीच आवश्यकता आहे. आणि वर्षातून प्रत्येकीने किमान दोन कामे तरी पूर्ण केलीच पाहिजेत. पण हो, आणखीही एक बारीकशी अट आहे - लेकी, सुना, जावई, नातवंडे अशा घरातील कोणालाही नावे ठेवायची नाहीत. त्यांच्याबद्दल सांगण्याजोगं काही असेल तर एकदोन वाक्यात सांगायचं.
त्यामुळे गप्पा असतात त्या मुख्यत्वेकरून एकमेकींच्या कामाबद्दलच्या, कौतुकाच्या आणि नवीन काहीतरी सुचवण्याच्याही.

या व्यतिरिक्त या मैत्रिणी पॉटलक पार्ट्याही करतात, सहलींना जातात, भरपूर मजाही करतात. त्यांच्या कामाचा दर्जाही फारच उत्तम प्रतीचा आहे. लोकाग्रहास्तव त्या गेल्या चार वर्षांपासून वर्षातून एकदा प्रदर्शन भरवतात आणि आपल्या वस्तू त्यात प्रदर्शित करून विकतात; पण पैसे कमावणं हा त्यामागचा हेतू मुळीच नाही. त्यामुळे त्याच्या किमती अतिशय वाजवी असतात. हे काम त्या स्वतःच्या आनंदासाठी, वेळेचा सदुपयोग करण्यासाठी, एकटेपणा घालवण्यासाठी करतात. स्वतः नजाकतीने बनवलेले कलाकुसरीचे नमुने इतरांना दाखवण्यासाठी करतात. या प्रदर्शनांना उत्तम प्रतिसादही मिळतो.

या उत्कृष्ट नमुन्यांमध्ये जयमाला आणि भावना यांनी बनवलेली डिझायनर क्विल्ट‌्स (शुद्ध मराठीत आकर्षक गोधड्या), वर्षा आणि आम्रपालीने तयार केलेल्या बॅगा आणि कुशन कव्हर्स, श्रेयाने बनवलेली दुपटी आणि टी शर्ट‌्स, अंजलीने विणलेली लहान मुलांची स्वेटर्स, बुमा आणि रंजनने ड्रेसवर केलेले भरतकाम, कोकिळाबेन आणि सुमनच्या भरतकाम केलेल्या साड्या, कमलाबेन, जयमाला, भावना, रजनी आणि किरणने शिवलेले ड्रेसेस, कल्पनाचे ग्लास पेंटिंग केलेले मेणबत्तीचे स्टँड्स अशा अनेक गोष्टी असतात.

आज हाताने काही काम करण्याचा जमाना भूतकाळात जमा झाला आहे. बाजारातून तयार वस्तू आणायच्या, वापरायच्या आणि बिघडल्या किंवा खराब झाल्या की फेकून द्यायच्या, ही आजची रीत आहे. जुन्या वस्तू दुरुस्त करून वापरणे आज इतिहासजमा झाले आहे. आजीची गोधडी, आईने विणलेला स्वेटर, मावशीने केलेली क्रोशाची लेस, ताईने पदरावर भरलेला कर्नाटकी कशिदा, आत्याने कौतुकाने शिवलेला स्मॉकिगचा फ्रॉक, मण्यांचे तोरण, छोट्या बहिणीचे वारली पेंटिंग इत्यादी गोष्टी पुढच्या पिढीला बहुधा साहित्यातच वाचायला मिळतील. त्या प्रत्येक कलाकुसरीमागची आठवण, करणारीची माया, जिव्हाळा मनाला कुठेतरी स्पर्शून जात असतो. पण त्याहीपेक्षा हे असं करत राहणाऱ्या स्त्रीला जो आनंद मिळत असतो, तो अवर्णनीयच असतो. असे सर्जनशील काम तिला जगण्याचे बळ देत असते. काहीतरी उपयुक्त आणि क्रिएटिव्ह काम सतत करत राहणाऱ्या अशा बायकांना जीवनात नैराश्य येत नाही, जगण्याचा कंटाळा येत नाही. वेळ कसा घालवायचा, हा प्रश्न सतावत नाही. या ग्रुपचाही अनुभव काही वेगळा नाही. या कामामुळे त्यांना स्वतःची ओळख मिळाली, प्रतिष्ठा मिळाली, नातेसंबंध सुधारले.

जिच्या प्रयत्नातून हा ग्रुप तयार झाला, ती जयमाला अतिशय परफेक्शनिस्ट आहे. तिने हौसेखातर बनवायला सुरू केलेल्या गोधड्यांना खूपच मागणी आहे. पण हे काम एकांतात शांतपणे करण्याचे. ग्रुपमध्ये बसताना ती दुसरं काहीतरी काम हातात घेते, तर टीव्हीसमोर बसण्यासाठी दोन सुयांवरचे विणकाम करणे तिला आवडते. तिचा दुसरा मोठा छंद आहे तो म्हणजे बोन्साय. गेल्या नोव्हेंबरमध्ये तिच्या एका बोन्साय झाडाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील परीक्षकांनी पारितोषिक दिले होते. तिच्या बागेमध्ये सुमारे शंभर बोन्सायची झाडे आहेत. अशी ही मैत्रीण सुगरण नसेल तरच नवल. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचे रुचकर पदार्थ ती बनवते. या मैत्रिणींच्या या सर्जनशील उपक्रमाला सलाम!
बातम्या आणखी आहेत...