आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रग आणि धगधग: जिद्दीचे दुसरे नाव जिप्सी!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्मप्रवाहांनी इतिहासापासून आजतागायत पूर्णत्वाने स्वीकार न केल्यामुळे सततच्या भटकंतीतून मिश्रभाषी, संमिश्र पद्धतीची संस्कृती जगभरात जन्माला आली. जी भारत आणि आशियात बंजारे भटके म्हणून, तर जगात जिप्सी म्हणून नावारूपास आलेली आहे.

जगात अनेक मानवी समूह आहेत जे जात, धर्म, पंथ, प्रदेश या सर्व मर्यादांच्या पलीकडे आणि माणूस म्हणून मानवी जगण्याच्या अधिक जवळ जाण्याचा सातत्याने कसोशीचे प्रयत्न करीत राहिले आहेत. परंतु वंशवर्चस्वाच्या नि जात, धर्म श्रेष्ठत्वाच्या अघोरी महत्त्वाकांक्षांनी भेदाभेदाची अन्यायात्मक तीक्ष्ण टोकं पुन:पुन्हा तीव्र होत राहिल्याने जगभरातील मानवहिताचे गाणेच बेसूर करून टाकले आहे. या साऱ्यांचा पहिले बळी ठरलेत, जगभरातील भटके, जिप्सी आणि बंजारे. हे मुशाफिरी करणारे समूह. खरं तर ‘हे विश्वची माझे घर’ या उक्तीप्रमाणे धरतीला माता आणि आकाशाला पिता मानून अवघ्या जगात विश्वबंधुत्वाचे नाते जोपासू पाहणाऱ्या या मुसाफिरांनी ज्या देशात, ज्या पर्यावरणात प्रवेश केला, तिथला परिवेष नि:संकोचपणे धारण करून जगण्याला हसतमुखाने सामोरे गेले. त्यांनी कुठलाच धर्म, पंथ, देश, प्रदेश, पेशा नि भाषा वर्ज्य मानली नाही. कारण मुळातच ते धर्मविरहित निधर्मी, वर्णबाह्य अवर्ण होते. तरीही भारतात हिंदू आदिवासी, भटके बंजारे, अरब-मुस्लिम देशात मुस्लिम बंजारे आणि पश्चिमी देशात ख्रिश्चन जिप्सी आदी धार्मिक आस्थांमध्ये रममाण झाले. पण त्यांचा धर्मप्रवाहांनी इतिहासापासून आजतागायत पूर्णत्वाने स्वीकार न केल्यामुळे सततच्या भटकंतीतून मिश्रभाषी, संमिश्र पद्धतीची संस्कृती जगभरात जन्माला आली. जी भारत आणि आशियात बंजारे भटके म्हणून, तर जगात जिप्सी म्हणून नावारूपास आलेली आहे.

जिप्सी, बंजारा, भटके, नोमॅडस् या तशा प्रवृत्तीवाचक संकल्पना, पण त्यांचे परावर्तन आपण जाती आणि जमातीत करून टाकले आहे. हेच समूह भारतातून राजस्थान, सिंध, पंजाब आदी भूभागातून हिंदूकुश पर्वतामार्गे, कॅप्सिअन समुद्रामार्गे इराण, तुर्की, मगदुनिया, ग्रीस, रोमानियापासून स्पेन, अमेरिकेपर्यंत जाऊन पोहोचले, जे भारतीय बंजारे, डोम, डोंबारी, सिकलगार, लोहार, गुर्जर, सांसी आदी जमातींचे लोक होत. बंजारांसारखे प्राचीन व्यापारी, कलेवर उपजीविका असणाऱ्या कलावंत जमाती, कारागीर, हस्तशिल्पी, लढाऊ जमाती या इसपूर्वीपासून १४व्या शतकापर्यंत भारतातून वेगवेगळ्या कालखंडात, अनेकविध कारणांनी बाहेर जात राहिल्या. बुद्धपूर्व काळापासून व्यापारानिमित्त गेलेले बंजारे लोक, इसपूर्व ३२३मध्ये अलेक्झांडरने अनेकांना आपल्यासोबत नेले. महंमद गझनीने अनेकांना गुलाम बनवून नेले. अरब, तुर्क, मंगोल आदींच्या वाढत्या आक्रमणामुळे नि सम्राट अकबराच्या सैन्याने ३० हजार बंजारांना ठार मारल्यामुळेही, हे सर्व लोक पुन्हा मायदेशी परतले नाहीत. पुढे ते जगभर पसरत गेले. हजारो वर्षांपासून हे लोक गुलाम, मजूर म्हणूनच जीवन कंठत आले आहेत.

या घटकेला मध्यपूर्व आशियापासून युरोप, रशिया, स्वीडन, स्पेन, ब्रिटन, इटली, तुर्की, फ्रान्स, ग्रीस, रोमानिया, हंगेरी आदी ५०-५५ देशांत त्यांचे वास्तव्य अाढळते. यात एकूण १३ प्रकारचे जिप्सींचे भिन्न भिन्न गट आहेत. जिगेनर, साईगेस, मानुस, तातार, गिटानी, यासीमागाल, शिंगन, रोमा, रोमानी, लोमानी, डोमारीन, लोमवरेन आदी नावांनी त्यांना ओळखले जाते. परंतु भारतीय बंजारांप्रमाणे ते आपली ओळख रोमा वा जिप्सी अशीच करून देतात. आरंभी कलावंत, कलोपासक, नृत्य, गीत-संगीतात रमणारे, शिल्पकार, शस्त्र बनवणारे, आज्ञाधारक सैनिक म्हणून त्यांना सन्मानजनक वागणूक मिळत गेली, परंतु काही शतकांपासून जगात सुरू झालेल्या वर्चस्वाच्या लढाईमुळे त्यांना प्रचंड जीवघेण्या संघर्षातून वाटचाल करावी लागत आहे. त्यांना तिसऱ्या दर्जाचा माणूस म्हणून, चोरटे, अस्पृश्य म्हणून अपमानजनक वागणूक दिली जात आहे. वंशभेदाच्या रोषाचे ते बळी ठरत आहेत. अनेक देश त्यांना नागरिक मानायला तयार नाहीत. घर, नोकरी, काम देत नाहीत. अनाथ जगणे त्यांच्या वाट्याला आले आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या नाझी फौजेने लाखो जिप्सींना मारले होते. अन्याय, अत्याचार सहन करूनही आपल्या ओळखीसह आपले विलक्षण वेगळेपण अबाधित ठेवण्याच्या त्यांच्या जिद्दीला, संघर्षाला सॅल्यूूटच करणे भाग आहे.
जिप्सी हे भारतातून जगभरात जाऊन पोहोचले, हे भारतीय तसेच रोमानी जिप्सी लेखक, अभ्यासक, संशोधकांनी अनेकवार सिद्ध केले आहे. ज्यामध्ये डॉ. कोस्नोव्हस्की, डॉ. इयान हेनकॉक ‘The Gypsies forgottten children of Indian’, ‘On Romani Origins and Identity.’ डॉ. रोनाल्ड ली ‘The Grammer of Lamani’ शिवाय डॉ. एस. एस. शशी, डॉ. राजेंद्र ऋषी, केतकर, डॉ. गणेश देवी आदींची याबाबतची निरीक्षणे अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. अभ्यासकांच्या मते, अधिकांश जिप्सींचे आचरण, भाषा, लोकसाहित्य, रहनसहन, नृत्य संगीत, पोशाख, दागदागिने, खानपान आदी बाबतीत भारतीय बंजारांशी विलक्षण स्वरूपाचे साम्य आहे. रोमा, रोमानी, लोमानी, लोवारीन या संख्येने सर्वाधिक असलेल्या जिप्सींच्या भाषिक वापरात आजही शेकडो शब्द, वाक्यरचना अर्थासह लमाण बंजारांसारखीच आहे.
समूहाने फिरते राहणारे रोमा जिप्सी बंजारांप्रमाणेच आपले रंगीबेरंगी कपडे स्वत:च्या हाताने शिवतात. कवड्या जोडलेले, रंगीत मण्यांचे, पैशाचे हार गळ्यात घालतात. बंजारांच्या उमनी(बैलगाडी)प्रमाणे घोडागाडीत (बग्गी) प्रवास करतात. मसालेदार मांसाहार हे त्यांचे मुख्य खाद्य आहे. त्यांच्या उत्पत्ती आणि आस्थांच्या धारणांमध्येही किती विलक्षण साम्य आहे, ते लोकगीतांतून लक्षात येईल.
"Once upon a time the sky and earth, were man and wife. They had five children- sun, moon, fire, cloud and water and between them they created a fine place for their children. They unsuccessfuly tried to part the earth and the sky, but failed. The other children tried too, but failed. But one day the wind lunged at them and the earth was parted from the sky.' तर लमाणांची ‘वळंग’ प्रकृती पूजा अशी आहे. "पेलो नाम सुरजा वारो लिजो, रातेरो कियो दन वजाळो, दुजो नाम चांदीसारो लिजो, चांदणी रात सुवावणी, तिजो नाम धरतीरा लिजो, जलसे उपजे हरिया मुंग, चवथो नाम म्हारे मेघजारो लिजो, जल बरसो दंडीबंदरो.' शिवाय ‘चांदान सुरीया दोईभाई, अमर वेगे जगेमांयी’, अशी असंख्य लोकगीते ऐकायला मिळतात. जिप्सींच्या सांस्कृतिक प्रतीक चिन्हांमध्ये सूर्य, चंद्र, तारे, कवड्या आणि सुरी यांना महत्त्व आहे, तर लमाणांमध्ये कवडी, रुपया, सुरी आणि देवीच्या प्रतिकृतींची पूजा करण्यात येते. चोखो नावाचे पिठाचे चक्राकार यंत्र काढून चंद्र, सूर्य आणि धरतीची प्रार्थना म्हटली जाते.
जिप्सींचा आरंभापासूनचा इतिहास फारसा सापडत नाही. यावरून एक गोष्ट प्रतीत होते ती म्हणजे, वंचितांचा इतिहास हा काही केवळ भारतातच अव्हेरला, दुर्लक्षिला जातो, असे नाही; तर अवघ्या जगाचेच हे चित्र आहे. पण वंचितांचा इतिहास हा त्यांच्या मनामनांवर, ओठांतील शब्दाशब्दांवर कोरला गेलेला आहे. तो काही केल्या पुसता येत नाही. तो पुन्हा नव्याने पाब्लोपिकासो, चार्ली चॅप्लीन, डॉ. आगस्त क्रोघ (विज्ञान नोबेल), रॉक अॅन्ड रोल सम्राट एल्विस प्रिस्ले, टायसन फुरी (विश्वविजेता बॉक्सर), यूल ब्रायनर, मायकेल केन, रिटा हायवर्थ (अभिनेते), इली नतासे (टेनिस), जोन्स बिहारी (वायोलीन), ग्लेकेरिया कोत्सुला, रेश्मा (गायक) फ्लामेंको, आमाया (नर्तक) आदी हजारो जगप्रसिद्ध प्रतिभावंतांच्या रूपाने जिप्सींच्या जगण्याला झळाळी मिळाली आहे.

अलीकडच्या काळात भारत सरकारच्या पुढाकाराने ‘बिछडे हुये भाई’ म्हणून रोमा जिप्सींचे संमेलन भरवण्यात येत आहे, ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे. परंतु, भारतातल्या तत्सम भटक्यांचीही त्याच दृष्टीने चिंता केली, तर खरोखरीच न्यायनीतीला अनुसरून असेल. असो. पण देश, काळ, स्थितीच्या कचाट्यातून वाचतवाचत जिद्द आणि संघर्षाने केलेल्या वाटचालीला ‘जिप्सी’ हे नाव दिले, तर फारसे वावगे ठरणार नाही.
वीरा राठोड
veerarathod2@gmail.com
बातम्या आणखी आहेत...