आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

त्रिसूत्री संवादाची

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैयक्तिक अथवा व्यावसायिक नात्याच्या यशासाठी संवादाची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. कौशल्यांच्या दुनियेत या सदरातून जाणून घेऊयात या नैसर्गिक प्रकियेमधल्या काही महत्त्वाच्या टप्प्यांबद्दल...
‘अरे, ऐकतोस ना, मी काय म्हणतेय ते! एवढ्या सकाळी उठून डबा करून देतच जाणार नाही मी अशानं. दररोज डबा तसाच परत आणतोस. काय बोलतेय मी, लक्ष कुठे आहे तुझं?’ आई पार्थवर ओरडत होती. मागच्या आठवड्यापासून तो दररोज डबा दोन-तीनच घास खाऊन परत आणत होता. ‘याला भूक कशी लागत नाही,’ ‘एवढा वेळ उपाशी राहतं माझं लेकरू,’ ‘सकाळी लवकर उठून डबा बनवून देण्याचे माझे परिश्रम वाया गेले,’ अशा संमिश्र भावनांची दाटी झाल्यामुळे ती अगोदरच वैतागलेली होती. पार्थ लक्ष देत नसल्याने अधिकच चिडत होती.

पार्थचं लक्ष होतं तरी कुठे? वर्गात काही चूक नसताना मिस रागावल्या होत्या. त्याचं त्याला खूप वाईट वाटलं होतं. तेच सगळे विचार अजूनही त्याच्या डोक्यात होते. त्यामुळे आईच्या बोलण्याकडे त्याचं खरोखरच लक्ष नव्हतं. असंच काहीसं तुमच्याही बाबतीत घडतं का? त्याचा त्रास होतो? असा त्रास होऊ नये यासाठी मी आता तीन मुद्द्यांचं विश्लेषण करणार आहे.

संवादप्रक्रिया ज्या पाच घटकांवर चालते, त्यामधील अखेरचा पण महत्त्वाचा घटक आहे, प्रतिसाद-फीडबॅक! आपण समोरच्या व्यक्तीला जे सांगत आहोत, ते आणि तेच त्याच्या त्याच (आपल्याला अभिप्रेत असणाऱ्या) अर्थासहित समोरच्यापर्यंत पोहोचतं आहे का, हे सांगणारा दुवा म्हणजेच फीडबॅक! समोरच्या व्यक्तीची शरीरभाषा, चेहऱ्यावरील हावभाव हा मुख्य फीडबॅक असतो. परंतु, पार्थच्या आईने त्याच्या फीडबॅककडे पूर्णत: दुर्लक्ष केले. स्वत: अभिव्यक्त होण्याची तिला एवढी जास्त गरज वाटली की, या महत्त्वपूर्ण घटकाकडे तिने लक्षच दिले नाही. त्यामुळे हे सर्व ऐकण्याच्या मन:स्थितीत तो सध्या नाही, हे तिला जाणवलेच नाही. तसे जाणवते तर ती त्याच्या बिघडलेल्या मूडचं कारण विचारती झाली असती.

संवाद प्रक्रियेमधला पाचपैकी तिसरा घटक आहे ‘संदेश घेणारा.’ संदेश, संदेश देणारा, संदेश घेणारा, माध्यम आणि फीडबॅक या पाचपैकी कोणत्याही घटकामध्ये अडथळा निर्माण झाला तर संवादप्रक्रिया डळमळते, गैरसमज निर्माण होऊ शकतात. परस्परांबाबत पूर्वग्रह असणं, विषयामध्ये आवड नसणं, स्वत:च्याच तणावामध्ये किंवा विचारांमध्ये गर्क असणं, असे अनेक अडथळे संदेश देणाऱ्याच्या संदर्भाने तसेच संदेश घेणाऱ्याच्या संदर्भाने असू शकतात. या अडथळ्यांमुळे संवादप्रक्रियेमध्ये व्यत्यय निर्माण होतो.

पार्थच्या उदाहरणामध्ये तो स्वत: ‘संदेश घेणारा’ घटक आहे, जो स्वत:च्या भावनांमध्ये अडकलेला आहे, शाळेतील घटनेमुळे दुखावलेला आहे. अन् त्यामुळेच तो आईच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. संदेश घेणाऱ्याच्या स्तरावरील ‘अडथळा’ हा प्रकार त्याच्या आईने समजावून घेतला असता तर तिचा पुढचा त्रागा टळू शकला असता. विविध संवादतज्ज्ञांनी ‘बोलण्याचा दर’ आणि ‘ऐकण्याचा दर’ याबाबत संशोधन केले आहे. यानुसार कोणत्याही व्यक्तीचा ‘बोलण्याचा दर १०० ते १७५ शब्द प्रति मिनिट’ या दरम्यान असू शकतो. तर ‘ऐकण्याचा दर ६०० ते ८०० शब्द प्रति मिनिट’ असा असतो. ही तांत्रिक बाब लक्षात घेतली तर दोन बाबी लक्षात येतात. एक- हे दोन्ही दर नैसर्गिक असतात. त्यात फारसा बदल करता येत नाही. आणि दुसरं म्हणजे ‘बोलण्याचा दर’ आणि ‘ऐकण्याचा दर’ यामधील तफावत खूप मोठी आहे.

या दोन्ही बाबी विचारात घेतल्यानंतर आता कोडे उलगडते की, कोणीही कितीही तळमळीने आपल्याच हिताचे सांगत असेल, तरी मन का भरकटते! बोलणाऱ्याचा दर सर्वोच्च म्हणजे १७५ शब्द प्रति मिनिट असा असला आणि ऐकणाऱ्याचा ६०० शब्द प्रति मिनिट असा निम्नतम असला तरी यामधील तफावत मोठीच आहे. त्यामुळे दूर कुठेतरी भटकून येण्याची संधी मनाला मिळते. हे फीडबॅकच्या माध्यमातून ओळखण्याचं कौशल्य बोलणाऱ्याकडे असायला हवं. मध्येच अनपेक्षितपणे प्रश्न, उपप्रश्न विचारून ऐकणाऱ्याला योग्य मार्गावर घेऊन येण्याचंही कौशल्य हवं आणि असा प्रयत्न करूनही ऐकणारी व्यक्ती दुसरीकडेच भटकत असल्याची जाणीव कायम राहिली, तर ‘हा अडथळा संदेश घेणाऱ्याच्या स्तरावरचा आहे,’ हे समजून घेण्याचं शहाणपणही हवं! ‘आपण या विषयावर नंतर बोलू,’ असं म्हणत शांतपणाने तो विषय तिथेच थांबवताही येईल. म्हणूनच जेव्हा बोलणाऱ्याच्या भूमिकेत असाल, तेव्हा फीडबॅक तपासा, संदेश घेणाऱ्याच्या/ऐकणाऱ्याच्या स्तरावरचे अडथळे ओळखा आणि बोलण्याचा व ऐकण्याचा दर निसर्गदत्त आहे, याची जाणीव ठेवून त्याचा स्वीकार करा!

anjalidhanorkar26@gmail.com
बातम्या आणखी आहेत...