आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छान ची पावती!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योग्य मोबदला देऊन त्रयस्थासारखे काम करवून घेणारे काही कमी नाहीत; पण तुमचा ‘छान’ हा एक शब्द त्या व्यक्तीला जे समाधान देऊन जातो ते तराजूत तोलता येणार नाही.
‘छ’ या अक्षरापासून मराठीत तसे फारच कमी शब्द आहेत. त्यापैकी ‘छान’ हा एक शब्द. छान हा दोन अक्षरी शब्द जर समोरच्याने उच्चारला तर मनाला किती सुख देऊन जातो. अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच. गंमत अशी आहे की, रक्ताचं नातं असो वा नसो, कोणत्याही व्यक्तीसाठी उच्चारायला मन मोठं असावं लागतं, अगदी आभाळाएवढं. अशा मनाच्या माणसाच्या तोंडून तो नकळत बाहेर पडतो व समोरच्याला आनंद देतो; पण त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हालाही आनंद देऊन जातो. लहान मूल जेव्हा मोठे होते. शाळेत जायला लागते. बडबडगीते म्हणते, बाई, घरातील आजी-आजोबांकडून त्याला ‘छान’ अशी दाद मिळते, तेव्हा तर त्याला कोण आनंद होतो! हीच गोष्ट पुढे मोठे झाल्यावर कला किंवा क्रीडा क्षेत्रात मुलांना त्यांच्या प्रशिक्षकांकडून मिळालेली ‘छान’ अशी दाद कोणत्याही बक्षिसापेक्षा मोठी वाटते.
मुलगी सासरी गेल्यावर ती जेव्हा एखादा पदार्थ करते तेव्हा तिच्या सासरच्या मंडळीकडून ‘छान’ अशी दाद मिळताच तिला फार मोठ्या परीक्षेत पास झाल्याचा आनंद मिळतो. ही दाद जर सासूकडून मिळाली तर केवढे ते भाग्य, पण हेही सर्वांच्या नशिबी नसते बरे! असो. या सगळ्या घरगुती किंवा वैयक्तिक गोष्टी झाल्या, पण तुम्ही खरेच जेव्हा एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमाला जाल किंवा कुठेतरी लग्नससारंभाला जाल तेव्हा तेथील यजमानांना ही दाद देऊन पाहा. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तुम्हालाही समाधान मिळेल आणि तेथून निघतानाही तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन जाल. पण होते नेमके उलटे. जी गोष्ट एखाद्याच्या हातून राहून जाते, त्यावरच जास्त ऊहापोह केला जातो आणि संपूर्ण वातावरणच बदलून जाते. हा प्रत्येकाच्या वृत्तीचा भाग असतो. समाधानी,आनंदी वृत्ती मुळातच असावी लागते.
आता जेव्हा हा छान शब्द समोरच्या व्यक्तीकडून तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींसाठी किंवा परिचयाच्या व्यक्तीसाठी उच्चारला जातो, तेव्हा तर तुमच्याकडे नक्कीच संयम असावा लागतो. आणि तो विवेकाने मिळवता येतो. काही काळानंतर नक्कीच तो शब्द तुमच्यासाठीही उच्चारला जाईल. कारण तुम्हीही त्यामागचे कष्ट, श्रम, वृत्ती यांचा अभ्यास करायला शिकाल व एका चांगल्या वाटेकडे मार्गस्थ व्हाल.
एखाद्या व्यक्तीकडून तुम्ही एखादे काम करून घ्याल, त्या व्यक्तीला त्याचा पुरेपूर मोबदलाही द्याल. पण बरोबरीने त्या कामाला ‘छान’ अशी दाद दिलीत तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी वेगळे असाल. कारण योग्य मोबदला देऊन त्रयस्थासारखे काम करवून घेणारेही काही कमी नाहीत. पण तुमचा ‘छान’ हा एक शब्द त्या व्यक्तीला जे समाधान देऊन जातो ते तराजूत तोलता येणार नाही.
अजून एका ठिकाणी ‘छान’ या शब्दाची दाद मिळते. संपूर्ण रामायण ऐकून झाल्यावर पुन्हा रामाची सीता कोण, असा प्रश्न विचारला जातो, तेव्हा उपरोधाने समोरच्याकडून ‘छान’ ही दाद मिळते, तेव्हा त्याचा अर्थ वेगळा असतो. पण अशी दाद अपवादात्मक परिस्थितीतच मिळते. तेव्हा तिचा विचार अपवादानेच करूया.