आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतर्मनाची हाक !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुस्तक ओळख- सुहास राजपूत
धावपळीच्या जीवनशैलीमुळेघराघरांतला संवाद तुटतोय. नाती दुरावताहेत. महत्त्वाकांक्षा, ध्येय, पैसा याचा पाठलाग करताना, माणूस स्वतःसाठीसुद्धा वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची दखल घेणं, त्यावर विचार करणं आणि सदसद्विवेकबुद्धीला जागून त्यावर कृती करणं, तर दूरचीच बात. परिणाम, संपूर्ण समाजात चालढकल वृत्ती बळावते आहे.
‘संवाद स्वतःशी’ हे संवेदनशील अभिनेत्री अनुराधा राजाध्यक्ष यांचं पुस्तक, समाजातल्या अशा विविध घटनांवर प्रकाश टाकतं. हे पुस्तक लेखिकेच्या अनुभवांचं आणि त्या अनुषंगानं तिच्या मनात निर्माण होणाऱ्या खळबळीचं, विचारमंथनाचं अत्यंत मनोवेधक चित्रण करतं.
हे अनुभव वाचताना प्रकर्षानं लक्षात येतं की, या सर्व घटना आपल्याही नित्य परिचयाच्या आहेत. परंतु लेखिका राजाध्यक्ष जितक्या गांभीर्यानं आणि सजगतेनं त्यावर विचार करताना दिसतात, तितकी सजगता आपण सहसा दाखवत नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर… ‘आनंदी दिवस’ या लेखाचा उल्लेख करता येईल. यात लेखिका आपल्या मुलाच्या स्पर्धेच्या निमित्तानं, महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराच्या देवळाच्या आवारात असणाऱ्या स्पर्धा स्थळी जाते. पिंडीवर हजारो भक्तांनी वाहिलेलं दूध, मंदिराबाहेरच्या गटारीतून तुंबून रस्त्यावर वाहताना ती पाहते. ते पाहून ती दुर्लक्ष करत नाही, तर तसे करण्यापासून रांगेत असणाऱ्या लोकांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करते. आलेल्या नकारांमुळे खचून जाता, निरनिराळ्या पद्धतीने निरनिराळ्या लोकांशी, देवळातल्या पुजाऱ्यांशी संवाद साधायचा प्रयत्न ती सोडत नाही. इतकेच नव्हे, तर योग्य गोष्टीचा आग्रह धरण्याच्या वृत्तीतून, दैनंदिन जीवनातल्याही आक्षेपार्ह गोष्टी बदलण्याचा चंगच बांधते आणि या प्रयत्नवादातून दिवस आनंदात कसा घालवते, याचे ओघवते वर्णन म्हणजे हा लेख आहे.
रिक्षाने प्रवास करताना रिक्षावाल्याशी, बसमध्ये कंडक्टरशी, ट्रेनमध्ये हवालदाराशी, शाळेत पालकांशी, घरात मुलांशी अशा सर्वच पातळ्यांवर सुसंवादाचा धागा गुंफण्याचा लेखिकेचा प्रयत्न, हा वाचकांच्या मनात नव्या कल्पनांची सकारात्मक पेरणी करतो. ध्येयापाठी धावतानाही मूल्य आणि तत्त्व यांचा ताळमेळ साधला गेला पाहिजे, याची जाणीव करून देतो. ‘माझा काय संबंध?’ किंवा ‘मी एकटा काय करू शकणार?’ या विचारसरणीचा पगडा असणाऱ्या बहुसंख्यांना, छोट्या छोट्या गोष्टींतून, स्वतःपासून बदलाची नांदी करायला प्रवृत्त करतो.
लेखिकेची भाषा साधी, सोपी, सुटसुटीत आहे. ‘संवाद स्वतःशी’ या पुस्तकाची संकल्पनाच मुळी स्वतःशी बोलणे, विचार करणे आणि त्यातून आशावादाला जन्माला घालणे, ही असल्याने लेखिका स्वसंवादातून वाचकालाही तसाच स्वसंवाद करायला उद्युक्त करते. हा स्व-संवाद असल्याने त्यात लेखिकेचे अनुभव येणे स्वाभाविक असले, तरी त्यात आत्मप्रौढी नाही किंवा वाचकांना कुठल्याही प्रकारची शिकवणी देण्याची भूमिका नाही. लेखिकेच्या संवादात्मक सहज भाषाशैलीमुळे, हे अनुभव लेखिकेचे राहता वाचकांचे होऊन जातात आणि नकळत वाचक त्या अनुभवांचा पुनःप्रत्यय घेत विचार करू लागतात, हेच या पुस्तकाचे यश आहे.
संवादाची गरज ही समाजाच्या, घराच्या आणि पर्यायानं देशाच्या, जगाच्या विकासासाठी अनिवार्य आहे. पण संवाद साधण्यासाठी आवश्यकता असते, आपलेपणाची आणि तोच संपुष्टात येत आहे. आत्मीयतेची जागा अलिप्ततेनं घेतल्यानं, सुखाच्या शोधात धावणारा प्रत्येक जण, माणूसपणाशी असलेली नाळ तोडून चालला आहे, याची जाणीव ‘संवाद स्वतःशी’ या पुस्तकातल्या प्रत्येक लेखातून होते. लेखिकेची सर्व घटनांकडे बघण्याची दृष्टी, आपलेपणाबरोबरच कर्तव्य भावनेतून जन्मलेली आहे. हा सामाजिक बांधिलकीचा वसा आपणही घ्यावा आणि स्वतःशी संवाद साधत, योग्य, अयोग्य याची शहानिशा करावी, असा संदेश नकळत देणारं हे पुस्तक, घराघरात आबालवृद्धांना नवी चेतना आणि जगण्याचा नवा दृष्टिकोन देईल, यात शंकाच नाही.
हा स्व-संवाद असल्याने त्यात लेखिकेचे अनुभव येणे स्वाभाविक असले तरी त्यात आत्मप्रौढी नाही किंवा वाचकांना कुठल्याही प्रकारची शिकवणी देण्याची भूमिका नाही.
* पुस्तकाचे नाव : संवाद स्वतःशी
* लेखिका : अनुराधा राजाध्यक्ष
* प्रकाशक : उद्वेली बुक्स
* किंमत : १६०/-
* पृष्ठे : १६०