आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article About Jawkhede Incident And Writers Reaction, By Sachin Tayde

जवखेडे, घुमान अन् भावनाशून्य साहित्यिक (लाइफ मंत्रा)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल नेटवर्कच्या माध्यमातून अगदी साध्यासुध्या माणसांनीही मोठ्या संख्येने आपले शब्दप्रभुत्व दाखवत बसण्यापेक्षा, तोडक्यामोडक्या भाषेत जवखेडे घटनेचा निषेध नोंदवला. परंतु इतकी मोठी हादरवून टाकणारी घटना महाराष्ट्रासारख्या सो कॉल्ड पुरोगामी राज्यात घडत असताना, मी मी म्हणवणारी साहित्यिक मंडळी कुठे गायब झाली आहे, हा सवाल मनाला छळतोय…
नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात जवखेडे या गावात झालेल्या ‘त्या’ क्रूर घटनेलाही आता अनेक दिवस लोटले आहेत. अजून तरी या तिहेरी दलित हत्याकांडामागे कोण होते, आहे, याचा आपल्या पोलिसांना शोध लागलेला नाही. नगर जिल्ह्यात घडलेली ही तिसरी मोठी घटना. जवखेड्याच्या या घटनेमुळे पुन्हा एकदा दलितांवरील अत्याचाराचा उभा-आडवा आलेख मांडण्यात येतोय. आपापल्या परीनं जो तो या हत्याकांडाविषयी आपली भूमिकाही घेताना दिसतोय. फेसबुक, व्हाॅॅट्सअॅपवर देहाचे तुकडे केलेले फोटोही आपल्यापैकी अनेकांनी पाहिले आहेत. याच सोशल नेटवर्कच्या माध्यमातून अगदी साध्यासुध्या माणसांनीही मोठ्या संख्येने आपले शब्दप्रभुत्व दाखवत बसण्यापेक्षा, तोडक्यामोडक्या भाषेत जवखेडे घटनेचा निषेध नोंदवला. परंतु इतकी मोठी हादरवून टाकणारी घटना सो कॉल्ड पुरोगामी राज्यात घडत असताना, मी मी म्हणवणारी साहित्यिक मंडळी कुठे गायब झाली आहे, हा सवाल मनाला छळतोय…

खरं तर, लवकरच पंजाबमधील घुमान येथे (सो कॉल्ड) अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजित केले जाणार आहे. या प्रसंगी घुमानमध्ये वकूब असलेले-नसलेले, भाटगिरी करणारे, पुरस्कार पदरात पाडून घेणारे, साहित्यचोरी करणारे, कंपूगिरी करणारे वगैरे असे अनेक जण जमा होतील. परंतु यांच्यामध्ये अपवादानं ख-या अर्थानं सत्य जगणारे आणि दर्जेदार लिहिणारेही आपली शबनम घेऊन उपस्थित असतील. मात्र अशांची संख्या कमी असण्याची पुन्हा खंत असेल. मग या प्रसंगी जणू साहित्य परिषदेच्या घटनेतच लिहून ठेवलंय, अशा न्यायाने, कुणी ना कुणी कसला तरी वाद एक तर जन्माला तरी घालेल किंवा एखादा वाद अंगावर तरी ओढवून घेईल. मग भाषणं होतील, मंत्री-संत्री आवर्जून पोहोचतील. या वेळी नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे विविध ठरावांचं वाचनही करण्यात येईल. मग या प्रसंगी मराठी भाषा वाढवली व जगवली पाहिजे, असा नेहमीचा ठरलेला ठराव वाचण्यात येईल. मात्र, हे सगळं चालू असताना, राज्यातला नागावलेला, पीडित-दलित मराठी माणूससुद्धा जगला पाहिजे, यावर काही ठोस बोलण्यात येईल का, हा सवाल या वेळी अधिक महत्त्वाचा असेल. खरं तर, जवखेड्याची घटना घडून आता एक महिना लोटत आला असताना महाराष्ट्रातल्या विविध साहित्य परिषदांनी ना एखादा मोर्चा वा एखादं पत्रक काढल्याचं वाचण्यात आलं, ना या अन्यायाच्या निमित्तानं कुठलासा परिसंवाद आयोजित केल्याचं ऐकायला मिळालं. एक तर याचा अर्थ हा की, या साहित्यिकांना अशा अत्याचारांचं फारसं काही पडलेलं नसतं किंवा त्यांच्या साहित्यविश्वासाठी असे विषय त्रासदायक असू शकतात. दुसरे जग छान आहे, जग गोड आणि सुंदर आहे, असं बोलत बसण्यात एक तर हे मश्गुल असतात किंवा हे अशा प्रकारचं लिखाण त्या ‘विद्रोही’वाल्याचं वा ‘अस्मितादर्श’वाल्यांचं असा एक पक्का समज यांच्यात असतो. जे काय असेल ते; मात्र हे जे काही आहे, ते वाईट आहे. हे असं बघितल्यावर, साहित्य म्हणजे समाजाचा आरसा, अशी व्याख्या करताना नेमक्या कोणत्या समाजाचा आरसा, हा गंभीर सवाल या वेळी उभा राहतो.
खरे तर, कित्येक ‘शब्दकुबेरांना’ शेजारच्या जिल्ह्यात काय शिजतंय आणि याहीपेक्षा आपल्या बुडाखाली काय जळतंय, याची बित्तंबातमी नसते. मात्र, तिकडे आखातातल्या तेलावर किंवा तिथल्या भयंकर अशा रासायनिक अण्वस्त्रांवर किंवा लॅटिन अमेरिकेत झालेल्या बदलांवर आपली लेखणी पाजळायला, यांचा हात मागेपुढे पाहत नाही. उंटाचा मुका घ्यायच्या स्पर्धेत उतरू पाहणा-या या तथाकथित विचारवंत लेखकांना देशाच्या विकासासाठी किंवा इथल्या एकूण प्रगतीसाठी सातत्यानं युरोपियन देश किंवा अमेरिकेच्या पाच-पन्नास राज्यांची तुलनाच लिटमस टेस्ट म्हणून का गरजेची असते, हे समजत नाही.

मध्यंतरी हॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये एफबीआय ही अमेरिकेची गुप्तचर संघटना सातत्याने काहीतरी अगम्य, अनाकलनीय, अद‌्भुत हालचाली करताना दाखवली जायची…त्यातले ते ‘एफबीआय’चे एजंट कधी अमेरिकेत, कधी अफगाणिस्तानात, कधी रशियाच्या बारक्याशा गल्लीत, तर कधी चीनमधल्या एखाद्या रेस्टॉरंटमध्ये अत्यंत शिताफीने आपापल्या जबाबदा-या पार पाडताना दिसायचे… एकूणच चित्रपट पाहताना असं वाटायचं की, हे अख्खं जग एफबीआय आणि अमेरिकाच चालवते की काय? आपल्याकडच्या या शब्दकुबेरांना कुलाबा पोलिस स्टेशन वा शुक्रवारपेठमधील दहा पोलिसांची नावं नीटशी माहीत नसतील; मात्र त्या एफबीआयमधले मागचे दहा मुख्य अधिकारी तोंडपाठ असतात. गंमत काय आहे की, ज्या क्षेत्रातलं जनसामान्यांना फारसं कळत नसतं, त्याच क्षेत्रावर अधिकारवाणीने बोललं, की मग आपण आपोआप मोठे होऊन जातो, असा एक गैरसमज या टोळ्यांमध्ये वाढायला लागलाय…मग ही माणसं बलशाली भारताची दूधखुळी स्वप्नं पाहतात… ही अशी स्वप्नं पाहणं वाईट नाही... मात्र त्याआधी गावागावात जाऊन आपण लोकांना संडास बांधण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे…आणि या संडासासाठी पाणीसुद्धा उपलब्ध करून दिलं पाहिजे.

असो. जवखेडे प्रकरणाचं जे व्हायचं ते होईल; मात्र पुन्हा दुसरा जवखेडा होऊ नये, म्हणून साहित्यिकांनी आपली लेखणी संघर्षाच्या काळात लिहिती ठेवली पाहिजे, ही एकच माफक अपेक्षा आहे.
sachingtayade@gmail.com