आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article About Kannad Language By DR. Sunilkumar Lavate

आंतरभारती (कानडी): कानडा विठ्ठलु कर्नाटकु

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तामीळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड या द्रविडी भाषा म्हणून ओळखल्या जातात. यात तामीळ भाषा प्राचीन मानली जाते. पण सर्वाधिक जुने द्रविड लिखित सापडते, ते कन्नडमध्ये. संस्कृतइतकीच कन्नड प्राचीन मानली जाते.
महाराष्ट्र हा कर्नाटक, आंधप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश आणि गोवा या राज्यांच्या कुशीत वसलेला प्रांत आहे. त्यामुळे इथल्या मराठी भाषेचा संबंध कोकणी, कन्नड, गुजराती, हिंदी, तेलुगू या भाषांशी असणे स्वाभाविक म्हणावे लागेल. पण त्यातही सर्वाधिक जवळचा संबंध जर कोणत्या भाषेशी, असे आपण शोधू लागू, तर आपल्या लक्षात येईल की, कन्नडच मराठीस अधिक जवळची भाषा आहे. त्याचे कारण आपल्या इतिहास व संस्कृतीत दडले आहे. प्राचीन महाराष्ट्र व कर्नाटकाचा प्रदेश हा एकाच राज्याचा भाग होता. त्यामुळे या दोन्ही प्रांतातील सांस्कृतिक परंपरा एकसारख्या दिसून येतात. सम्राट अशोकापासून ते बहामनी राज्यापर्यंतच्या इतिहासात डोकावताना लक्षात येते की, कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र या दक्षिणेतील राज्यांमध्ये एकच राजवटी होत्या. तिथे वेळोवेळी वेगवेगळी राजघराणी उदयाला आली तरी, त्यांचे आपसातील संबंध देवघेवीचे होते. पैठण(सातवाहन), देवगिरी (यादव) यांच्या राजधान्या महाराष्ट्रात होत्या. तर द्वारसमुद्र (होरसळ), बादामी, कल्याणी(चालुक्य), गुलबर्गा (बहामनी) या राजधान्या कर्नाटकात होत्या. इतिहासकाळात सुमारे दीड हजार वर्षे सह्याद्रीच्या पठारावर कन्नड-मराठी मिश्र संस्कृती विकसित होत राहिली. म्हणून आपण मराठीच्या पहिल्या लिखिताचा शोध घेतो, तेव्हा आपणास कर्नाटकातच जावे लागते. ‘श्री चावुण्डराजे करवियले’ हे मराठीचे आद्य लिखित ज्या गोमटेश्वर मूर्तीच्या पायथ्यावर कोरले गेले आहे, ते स्थळ श्रवणबेळगोळ कर्नाटकात आहे. इथल्या भागवत भक्तीचे नि वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत विठ्ठल हा मूळ कानडीच. "कानडा विठ्ठलु कर्नाटकु’ या उक्तीतूनही ते सिद्ध होते. अशी मराठीची जुळी बहीण, कन्नड. तिची लिपी मात्र स्वत:ची आहे. या दोन्ही भाषा संस्कृतप्रचुर खऱ्या, पण प्राकृतातून विकसित झाल्या.

तामीळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड या द्रविडी भाषा म्हणून ओळखल्या जातात. यात तामीळ भाषा प्राचीन मानली जाते. पण सर्वाधिक जुने द्रविड लिखित सापडते, ते कन्नडमध्ये. संस्कृतइतकीच कन्नड प्राचीन मानली जाते. नवव्या शतकापासून कन्नडमध्ये लिखित साहित्य आढळते. तिचा पहिला ग्रंथ ‘कविराजमार्ग’ याच काळातला आहे.

प्राचीन काळापासून ते एकोणिसाव्या शतकापर्यंतचे कन्नड साहित्य नजरेखालून घालत असताना आपल्याला दिसून येते की, कन्नड साहित्याचा प्राचीन काळ (आदिकाल) ‘सुवर्णयुग’ म्हणून ओळखला जातो. प्राचीन कन्नड साहित्यावर संस्कृत साहित्याच्या खोल प्रभाव स्पष्टपणे लक्षात येतो. तरी कन्नड भाषा व साहित्याची स्वत:ची अशी व्यवच्छेदक ओळख, वैशिष्ट्ये आणि परंपरा आहे. आर्य आणि द्रविड परंपरांचा सुदर समन्वय व संगम कन्नड भाषा आणि साहित्यात प्रतिबिंबित झाला आहे. आदिकाळात कन्नड साहित्य जैनमतामुळे समृद्ध झाले. मग कन्नडमध्ये वैदिक, शैव, माध्व, रामानुज इत्यादी संप्रदाय उदयाला आले. त्यातून कन्नड भक्तिकाव्य जन्माला आलं. त्या काव्यानं कर्नाटकचं समाजजीवन धर्मानुरागी केलं. बाराव्या शतकात बसवेश्वर, अल्लमप्रभू, अक्कु महादेवी यांनी लिहिलेल्या ‘वचन साहित्य’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीतिकाव्याचा कन्नड साहित्यात मोठा बोलबाला आहे. कर्नाटकात असलेल्या लिंगायत समाजासाठी, तर हे साहित्य जीव की प्राण! याच साहित्याचे अभ्यासक डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची प्रतिगामी, सनातनी विचारांनी केलेली हत्या, या साहित्याच्या पुरोगामीपणाला सिद्ध करतं.

भक्तिकाव्याप्रमाणेच छंद, अलंकार, रस यांची मीमांसा करणारं सौंदर्यवादी, काव्यशास्त्रीय साहित्यही कन्नडमध्ये आढळतं. त्यावरील संस्कृत प्रभाव स्पष्ट दिसतो. असाच आणखी एक काव्यप्रकार ‘चम्पू’. त्याचीही समृद्ध परंपरा कन्नडमध्ये आहे. पद्याबरोबर पूर्वकाळात गद्य लेखनही आढळतं. कवी पंप लिखित ‘आदिपुराण’ राघवांक लिखित ‘हरिश्चंद्रकाव्य’, कुमारव्यास लिखित ‘भारत’, रत्नाकरवर्णीचं ‘भरतेशवैभव’ या काव्यकृतींना विश्व साहित्य, वारसा साहित्य म्हणून ओळखलं जातं.

अन्य भारतीय भाषांप्रमाणे कन्नड साहित्याच्या आधुनिकीकरणास प्रारंभ झाला, तो ख्रिश्चन मिशनरींच्या लेखन प्रयत्नांमुळे. सन १८०९ मध्ये विल्यम केरीनी ‘बायबल’चे भाषांतर कन्नडमध्ये करून ते प्रकाशित केले. त्यासाठी सन १८३१मध्ये मिशनरींनी बेल्लारी व मंगलोर येथे छापखाने सुरू केले. धर्मप्रसारार्थ त्यांनी पत्रिका प्रकाशनास प्रारंभ केला. ‘सत्यदीपिके’, "कर्नाटक प्रकाशिके’ यांची नावे या संदर्भात उल्लेखनीय म्हणून सांगता येतील. विसाव्या शतकाच्या प्रारंभी आर. नरसिंहाचार यांनी १९०७मध्ये, ‘कर्नाटक कवि चरित्रे’ तीन भागात प्रकाशित करून, एका अर्थाने कन्नड साहित्य इतिहास लेखनाची परंपरा सुरू केली. पुढे सन १९१५मध्ये ई. पी. राइस यांनी ‘ए हिस्टरी ऑफ कैनरीज लिटरेचर’ची रचना केली.

आधुनिक कन्नड साहित्य विकसित होणाऱ्या काळात इंग्रजीचा आदर्श कन्नडपुढे होता. प्रारंभिक आधुनिक काळात मोठ्या प्रमाणात इंग्रजी साहित्यकृतींची भाषांतरे कन्नडमध्ये झाली. अशी भाषांतरे करण्यात एस. जी. नरसिंहाचार, पंजे मंगेशराव, एच. नारायण राव, एम. गोविंद पै आघाडीवर होते. बी. एम. श्रीकंण्ठ्या यांचं ‘इंग्लीषु गीतेगलु’ या संदर्भात उदाहरण म्हणून महत्त्वाचं. सन १९३०च्या दरम्यान कन्नडमध्ये प्रगतिवादी साहित्य लिहिले गेले. व्ही. के. गोकाक, के. एस. नरसिंह स्वामी, गोपालकृष्ण अडीग, बी. एच. श्रीधर, चन्नवीर कणवी हे या काळाचे प्रथितयश साहित्यकार होत. आधुनिक कन्नड कथा समृद्ध केली मास्ति वेंकटेश अयंगार (श्रीनिवास) यांनी. यापैकी डॉ. व्ही. के. गोकाक आणि मास्ति वेंकटेश अयंगार यांना पुढे भारतीय ज्ञानपीठाचे पुरस्कार लाभले.

कन्नड कादंबरी लेखनात कुवेंपु, शिवराम कारंथ, यु. आर.अनंतमूर्ती ही आघाडाची नावे. कन्नड ‘यक्षगान’ परंपरा डॉ. शिवराम कारंथांनी विकसित केली. ते पर्यावरणवादी म्हणूनही प्रसिद्ध होते. आधुनिक नाटकात गिरीश कर्नाड प्रसिद्ध झाले, ते त्यांच्या ‘हयवदन’ नाटकामुळे. या सर्वांना ज्ञानपीठाने गौरविले आहे. डॉ. नागराज, सी. एन. रामचंद्रन, गोविंदराय नायक हे आधुनिक निबंधकार म्हणून सर्वपरिचित आहेत. त्यांना साहित्य अकादमीचे पुरस्कार देऊन गौरविले आहे. बी. सी. रामचंद्र शर्मा लिखित ‘सप्तपदी’ व एस. नारायण सेट्टींचं महाकाव्य ‘युगसंध्या’ या आधुनिक कन्नड काव्याच्या उल्लेखनीय रचना आहेत. डॉ. शांतीनाथ देसाईंची कादंबरी ‘नमो नमः’ या शतकाच्या प्रारंभीची प्रसिद्ध साहित्य कृती.

साठोत्तरी कन्नड कथात्मक साहित्यात एस. एल. भैरप्पा प्रसिद्ध आहेत. ‘धर्मश्री’ या आपल्या पहिल्या कादंबरीपासूनच ते उल्लेखनीय ठरले. सन १९६६च्या दरम्यान आलेली त्यांची ‘वामसवृक्ष’ कादंबरीही गाजली. ‘दातु’ या सन १९७३च्या कादंबरीत त्यांची जातिव्यवस्थेचे वास्तववादी चित्रण केले. तर त्यांची ‘पर्व’ कादंबरी म्हणजे महाभारताची पुनर्व्याख्या होय.
तिरुमलबाला या आधुनिक स्त्रीवादी साहित्यिक म्हणून कन्नडमध्ये ओळखल्या जातात. अनुसया शंकर ‘त्रिवेणी,’ एम. के. इंदिरा याच परंपरेतील साहित्यिक. अनुसया शंकर यांची कादंबरी ‘शरपंजरी’स मोठा वाचक वर्ग लाभला. आधुनिक कन्नड साहित्यात कविता, कादंबरी, कथा, नाटक या प्रकारात विपुल लिहिलं गेलं. तसं चरित्र, आत्मचरित्र, निबंध, प्रवासवर्णन, गौरव ग्रंथ, वैज्ञानिक साहित्य, वैचारिक साहित्य, समीक्षा असं वैविध्यपूर्ण लेखनही आढळतं. आत्मकथेत शिवराम कारंथांची ‘हच्चु मनस्सिन हत्तु मुखगळु’, जी. पी. राजरत्नम यांची ‘हत्तु वरुष’ परंपरांच्या दृष्टीने प्रतिनिधिक रचना होत. कन्नडमध्ये महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या बरोबर टॉलस्टॉय आणि डार्विन यांच्या आत्मचरित्रांची भाषांतरेही उपलब्ध आहेत. कन्नड निबंधात प्रारंभी अनुवाद अधिक होते. आता मौलिक निबंध विपुल प्रमाणात प्रकाशित होतात. व्ही.सीतारामय्या लिखित ‘बेळुदिंगळु’, पु. ति. नरसिंहाचार्य लिखित ‘ईचलु मरद केळगे’, कुवेंपु लिखित ‘मलेनाडिन चित्रगळु’, हा. मा. नायक लिखित ‘नम्म मनेय दीप’ निबंध वाचनीय आहेत. कन्नडमध्ये गौरव ग्रंथांची मोठी परंपरा आहे. ‘संभावने’ (बी. एम. श्रीकण्ठय्या), ‘श्रीनिवास’ या परंपरेतील श्रेष्ठ ग्रंथ मानले जातात. कन्नड आधुनिक साहित्य विकासात ‘प्रबुद्ध कर्नाटक’, ‘संक्रमण’, ‘साक्षि’, ‘समन्वय’, ‘साधने’, ‘कर्नाटक भारती’, ‘विज्ञानभारती’, ‘मन्वंतर’ इत्यादी नियकालिकांचा मोलाचा वाटा आहे. नव साहित्य व समीक्षा प्रकाशनात यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

भाषा आणि साहित्य प्रेमापोटी अनेक कन्नड साहित्यकारांचा पत्रव्यवहार,भाषांतरे मी वाचली. काहींचा मला अल्प, दीर्घ सहवासही लाभला. पैकी डॉ. व्ही. के. गोकाक हे सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राचार्य असलेल्या काळात त्यांचा आणि वि. स. खांडेकरांचा पत्रव्यवहार होता. ‘दोन ध्रुव’ कांदबरी वाचून डॉ. गोकाक प्रभावित होऊन नतमस्तक झाले होते. (१९३८). डॉ. यु. आर. अनंतमूर्ती यांची कादंबरी ‘संस्कार’ मराठीत भाषांतरित झाली, तेव्हा तिचे परीक्षण मी लिहिले होते. गिरीश कर्नाड यांच्या ‘तुघलक’, ‘ययाति’, ‘हयवदन’ नाटकांची भाषांतरे व अगदी अलीकडे यांची आत्मकथा मी वाचली. ‘हयवदन’ मी पाहिल्याचेही आठवते. डॉ. शांतिनाथ देसाई हे कन्नड कथा, कादंबरीकार अनेक वर्षे कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठात इंग्रजी विभागाचे प्रमुख होते. त्या काळात आम्ही ‘रचना मंडळ’ चालवत असू. महिन्यातून एक-दोनदा जमायचं, आपण लिहिलेलं सादर करायचं. इतरांनी प्रतिक्रिया, प्रतिसाद व्यक्त करायचा. या काळात डॉ. देसाईंनी सादर केलेलं ‘नाना’ हे व्यक्तिचित्र अजून माझ्या लक्षात आहे. अलीकडचे आघाडीचे कादंबरीकार सांगलीच्या ८१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मेहता पब्लिशिंग हाऊसच्या स्टॉलवर एस. एल. भैरप्पा भेटले होते. या सर्वांच्या विविध संपर्क, सहवासातून कन्नड साहित्य, साहित्यकारांविषयीचं माझं असं एक आकलन तयार झालं आहे. कन्नडवर पारंपरिक प्रभाव मोठा आहे. संस्कार नि संस्कृती हे तिचं अधिष्ठान आहे. भाषागत अस्मिता तीव्र आहे. या भाषेत उकारान्त प्राबल्य आहे. परिणामी, माणसं ऋजुता घेऊन जन्मतात. मराठीशी तिचे अनुबंध पारंपरिक आहेत. सीमा लढ्याचा अपवाद सोडता, कन्नड-मराठी देवाणघेवाण- विशेषत: भाषा, साहित्य, संस्कृती प्रांतात मजबूत आहे. ‘कानडीने केला मराठी भ्रतार’ याचा व्यत्यासही तितकाच वास्तव आहे. हे सर्व लक्षात घेतलं की, कन्नड-मराठी सावत्र बहिणी नसून, सख्ख्या बहिणी असल्याचं स्पष्ट होईल.