आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाट्यदर्पण: मन की बात- दोनों की

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘के दिल अभी भरा नही...’ हे सुयोगचे नाटक म्हणजे एखाद्या दूरचित्रवाणी वाहिनीवरील मालिकेचा भाग वाटावा, असे आहे. सर्व उच्च मध्यमवर्गीयांच्या घरातली मालिका. मनातली मालिका. आजच्या वृद्ध पिढीवर आणि तरुण पिढीवर, त्यांच्या मानसिकतेवर भाष्य करणारी मालिका.
‘ढळला रे ढळला दिन सखया। संध्या छाया भिवविती हृदया’ असे वार्धक्याचे वर्णन कवीने केलेले असले तरी संध्या छायेच्या काळात एकमेकांची सावली व्हायच्या ऐवजी उन्हाच्या झळ्या होण्याचे कुणी ठरवले तर त्याला आपण काय करणार? सुयोग निर्मित ‘...के दिल अभी भरा नही...’ हे नाटक रंगभूमीवर आलं आहे. या नाटकात निवृत्त झालेल्या व घरी रिकामपण आल्याने एका वेगळ्याच समस्येला सामोरे जाणाऱ्या गृहस्थाची कथा आहे. पती जेव्हा प्रचंड कामात असतो, तेव्हा पत्नीच्या वाट्याला घरकामानंतर रिकामपण येतं. हे रिकामपण तिला खायला उठतं. मग पती निवृत्ती स्वीकारतो अन् घरी असतो. आपल्या रिकामपणात पत्नी सहजीवनाचे क्षण आपल्यासोबत अनुभवू शकेल, असे पतीला वाटते; पण पत्नी शास्त्रशुद्ध पौराहित्याचा अभ्यासक्रम शिकते अन् पूजा सांगत शहरभर फिरते. पती दात ओठ खात घरातल्या घरात फेऱ्या मारण्याशिवाय काही करू शकत नाही. असं एका-दोघांच्या नव्हे तर अनेकांच्या आयुष्यात घडतं. मग सुखाचा गोड संसार कडू कारल्याचा होतो.

सुयोग निर्मित, शेखर ढवळीकर लिखित आणि मंगेश कदम दिग्दर्शित ‘...के दिल अभी भरा नही...’ या नाटकात वंदना नगरकर (रिमा) आणि अरुण नगरकर (विक्रम गोखले) या निवृत्तीकडे, वार्धक्याकडे आलेल्या दांपत्याची कथा आहे. अरुण नगरकर हा अभियांत्रिकी पदवीधर मोठ्या कष्टाने फॅक्टरी उभी करतो, पण वय वाढल्याने फॅक्टरीच्या कामकाजातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतो. त्याचा मुलगा सिंगापूरला कुटुंबासह कायमचा स्थायिक झालेला असतो. तर मुलगी त्याच्याच शहरात राहात असते म्हणजे पुण्याचं हे कुटुंब. अरुण नगरकर लुंगीवर डान्स करून आपल्या नातवाला सिंगापूरला ती व्हिडिओ क्लिप पाठवत असल्याचा प्रारंभीचा सीन नाटकात आहे. ‘लुंगी डान्स लुंगी डान्स’ या गाण्यावर अरुण नगरकरचा डान्स सुरू आहे अन् त्याची मुलगी बागेश्री जोशीराव (राधिका) हा प्रसंग चित्रित करीत आहे. वंदना नगरकर घरी नाही. ती घरी नाही, याबाबत किरण नगरकरची कुरबुर सुरू झालेली आहे. अन् एवढ्यात वंदना घरी येते अन् मग दोघांमध्ये तू-तू-मैं-मैं सुरू होते.

आपण फॅक्टरीच्या कामातून निवृत्त होत असून आता दोघे मिळून उर्वरित आयुष्य एन्जॉय करू या, असा सल्ला अरुण नगरकर आपल्या पत्नीला वंदनाला देतो. पण तुम्ही आता निवृत्तीनंतर सुखी सहजीवनाची अपेक्षा करताय, जेव्हा फॅक्टरीत काम करीत होतात तेव्हा तुम्हाला माझ्याकडे ढुंकून पाहायला वेळ नव्हता, असे वंदना स्पष्टपणे सांगते. इतक्यात तिला एका पुरोहिताचा फोन येतो. पौराहित्याचे वर्ग सुरू असून तुम्ही फी भरून अॅडमिशन घ्या, असे पुरोहित वंदनाला सांगतो अन् मग वंदना पौराहित्य शिकून खूपच व्यग्र होते. घरोघर पूजा सांगते. इकडे अरुण नगरकर घरबसल्या चरफडतो. निवृत्तीनंतर आपण निराधार झाल्याची भावना बळावते. घरकामात मन रमविण्याचा सल्ला त्याला वंदना देते अन् जणू आगीत तेल ओतल्यासारखे तिचे शब्द अरुण नगरकरच्या जिव्हारी लागतात. नवरा-बायकोमधील संघर्ष इतका विकोपाला पोहोचतो की, मुलगी राधिका दोघांनाही मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जायचा निर्णय घेते. आयुष्यभर एकाच बेडरूममध्ये झोपलेले हे दोघे वेगवेगळ्या बेडरूममध्ये झोपू लागतात. एकमेकांपासून घटस्फोट घेण्याची भाषा करू लागतात. भांडण चक्क सिंगापूरच्या मुलापर्यंत पोहोचते. तो तिकडून सज्जड दम देतो. तुम्हाला तुमचे प्रश्न आपापसात सोडवावे लागतील. तुमच्या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडून सोडवून घेऊ नका. मी आता कायमचा सिंगापूर निवासी झालो आहे. अरुण-वंदनामधील भांडण निकराला पोहोचते. इतक्यात त्यांचा घरी सुधीर मेढेकर (जयंत सावरकर) हा निवृत्त गृहस्थ येतो व अरुण-वंदनाच्या डोळ्यात अंजन घालून जातो. निवृत्तीत एकमेकांशी भांडण्याऐवजी एकमेकांना समजून घेऊन समाजासाठी काहीतरी सेवा करण्याचा सल्ला तो दोघांना देतो. फ्रॅक्चर झालेल्या आपल्या बायकोची सेवा करता करता आपण वैद्यकीय शिबिरासारखे अनेक उपक्रम राबवित असल्याचे सुधीर मेढेकर सांगतो. वंदना आणि अरुण यांच्या डोक्यात प्रकाश पडायला सुरुवात होते न होते तोच अकस्मात सिंगापूरवरून मुलाचा फोन येतो- ‘इथे मुलाला सांभाळायला कोणी नाही. पाळणाघराचे पैसे खूप आहेत, ते परवडत नाहीत म्हणून आई तू सिंगापूरला निघून ये.’ ‘सुंठीवाचून खोकला गेला’ असा वरवर भाव वंदना आणि अरुण दोघांच्या चेहऱ्यावर; पण आतमध्ये जणू भावनांचे काहूर उठलेले. वंदना आपल्या मुलाकडे जाण्यास निघते. बॅग भरली जाते. पण पर्समध्ये पासपोर्ट नाही. आपली तगमग होते, असं ती बाहेरून दाखविते; पण आतून शांत असते. पासपोर्ट हरवल्याची तक्रार पोलिसातही केली जाते. पण खरा चोर वंदनालाच माहीत असतो. अरुणनेच पासपोर्ट दडवल्याचे माहीत असूनही वंदना शांत असते.

आयुष्यभर एकमेकांवर पराकोटीचे प्रेम करून उतारवयात एकमेकांशी संघर्षाला उतरलेल्या दांपत्याची ही कथा. हलकीफुलकी कथा. आपल्या नवऱ्याने पासपोर्ट लपवून ठेवलेला आहे, हे कळूनसुद्धा काहीच न बोलणारी वंदना सिंगापूरहून मुलाचा फोन येतो तेव्हा त्याला निर्धाराने सांगते, ‘आम्हा नवरा-बायकोला आता असे गृहीत धरू नकोस. तू तुझी वेगळी सोय कर तुझ्या मुलासाठी. जशी तुझ्या मुलासाठी तुला आमची गरज वाटते, तशीच या वयात आम्हाला एकमेकांची गरज वाटते. आम्ही एकमेकांना सोडून आता राहणार नाही.’ वंदनाची ही निर्धाराची वाणी ऐकून अरुणचे डोळे पाणावतात व नाटकाचा शेवट अर्थातच गोड होतो.

‘के दिल अभी भरा नही..’ हे सुयोगचे नाटक म्हणजे, दूरचित्रवाणी वाहिनीवरील कौटुंबिक जिव्हाळ्याची मालिका. आजच्या वृद्ध पिढीवर आणि तरुण पिढीवर, त्यांच्या मानसिकतेवर भाष्य करणारी. परदेशात राहणाऱ्या मुलांच्या देशस्थ आईवडिलांच्या भावविश्वाचे पदर उलगडून दाखविणारी. मालिकेसारखेच हे नाटक अथवा नाटकाचीच ही एका भागाची मालिका.
सुधीर मेढेकर या वृद्धाने म्हणजे, जयंत सावरकरांनी या नाटकात वर्णिलेला एक प्रसंग डोळ्यात अंजन घालणारा आहे. परदेशात आपल्या मुलाकडे गेलेल्या आपल्या पत्नीला पोलिसांनी अटक केली. का तर म्हणे, नातवाला धपाटा मारला अन् नातवाने पोलिसात आजीची तक्रार केली. या प्रसंगाचा धसका घेऊन आपली पत्नी कायमची अंथरूणाला खिळली. ती नातू आणि मुलाचा परदेश सोडून पुन्हा मायदेशी परतली. हा प्रसंग परदेशातल्या आपल्या मुलाबाळांचे अवाजवी कौतुक करणाऱ्या पालकांच्या डोळ्यात अंजन टाकणारा आहे. एकूणच परदेशात गेलेल्या आपल्या मुलाबाळांच्या बढाया मारण्यात स्वारस्य असलेल्या दांभिक पांढरपेशी समाजासाठी हा सुरमा आहे, असेच म्हणावे लागेल.

शेखर ढवळीकर यांचे नाट्यलेखन एखाद्या दूरचित्रवाणी मालिकेच्या संवादलेखनासारखे वाटते. त्यात अरुण नगरकर आणि वंदना नगरकर यांच्यातील कलगी-तुरा मात्र भरपूर मनोरंजन करून जातो. अनेक दांपत्यांना तो पुनःप्रत्ययाचा आनंद देणारा वाटेल. मंगेश कदम यांचे दिग्दर्शन चाकोरीतलेच आहे. नाटकच चाकोरीतले, मग दिग्दर्शनही चाकोरीतले. प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य प्रसन्न, नेत्रसुखद आहे. विक्रम गोखले यांनी अरुण नगरकर अतिशय परिणामकारकरीत्या उभा केला आहे. विशेषतः ही भूमिका विक्रम गोखले यांच्या पिंड प्रकृतीला शोभणारी आहे. रिमा यांनी उभी केलेली वंदना तोडीस तोड आहे. या नाटकातील ही जोडी खरोखरच ‘मेड फॉर इच अदर’ अशीच आहे. एकूणच हे हल्के अन् फुल्के नाटक आहे.
prakash.khandge@gmail.com