आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

125 वर्षांची परंपरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या खाद्यपदार्थाच्या दुकानाला १२५ वर्षं पूर्ण होणं, ही तशी खास बाबच. आणि या १२५ मधली ५० ते ६० वर्षं घरातल्या महिलांवर हे दुकान चालवायची जबाबदारी असेल, तर ती अधिकच खास बाब. ‘कोल्हापुरी संगीत चिवडा’ या वेगळंच नाव असलेल्या या दुकानाविषयी…
 
पंचगंगेच्या काठी विराजमान, दक्षिण काशी, कोल्हापूर! स्वतःची स्वतंत्र व आगळीवेगळी ओळख असणारी कोणे एके काळची महाराष्ट्राची राजधानी. राजर्षी शाहूंमुळे पुरोगामी महाराष्ट्राची वैचारिक राजधानी होण्याचा मान कोल्हापूरला मिळाला. अनेक महत्त्वाच्या अशा सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक चळवळी या शहरात जन्मल्या व रुजल्या. या सर्व गोष्टींबरोबर कोल्हापूरची स्वतःची अशी आगळीवेगळी खाद्यसंस्कृती आहे. ती बहुतांशी “जहाल” आहे. कोल्हापूरला मल्लविद्येची व अानुषंगिक बलोपासनेची समृद्ध परंपरा आहे. याचाच परिणाम म्हणून की काय, तेथे सामिष व तिखट पदार्थांचे प्राबल्य आहे. एका बाजूने रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर दुसऱ्या बाजूने कर्नाटक असल्याने कोकणी, कर्नाटकी व मराठी मसाल्यांचे एक स्नेहसंमेलन येथे भरते व रसिक खवय्यांच्या रसना तृप्त होतात. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, मिसळ ही या जहाल गटाची काही वैशिष्ट्ये अतिशय लोकप्रिय आहेत. या सर्व हातघाईच्या लढाईत “मवाळ” (शाकाहारी) गटाचे काय? की त्यांनी नुसती बघ्याची भूमिका घ्यायची? मुळीच नाही! कोल्हापुरात त्यांचीही सोय आहे. कोल्हापूर महालक्ष्मी देवळातून बाहेर पडल्यावर लगेचच मुख्य रस्त्यावर “कोल्हापुरी संगीत चिवडा” असे हट के नाव असणारे एक दुकान आहे. कोल्हापूरमधील पहिल्या तीन हॉटेलमधील हे एक! १८९२मध्ये वेंगुर्ल्यातले गोविंद विनायक मराठे व्यवसायाच्या शोधात कोल्हापुरी आले. चिपडे यांच्या वाड्यात त्यांनी चिवडालाडूचे दुकान सुरू केले. चालक व मालक ब्राह्मण असल्याने त्या वेळच्या रीतीनुसार ते “ब्राह्मणाचे फराळाचे दुकान” म्हणून ओळखले जाऊ लागले. या दुकानाला “संगीत चिवडा” का म्हणले जाते, याचा एक खुलासा मालक मंडळी देतात. कोल्हापुरात तत्कालीन नाट्य, संगीतशौकीन मोठ्या संख्येने होते. नाटक, सिनेमा पाहून घरी जाताना हे रसिक या चिवड्याचा आस्वाद घायचे. आधी संगीत व मग हा चिवडा! त्यांनीच या चिवड्याला संगीत चिवडा म्हणायला सुरुवात केली व हे नाव कायमचे चिकटले. काजू, मनुका, बेदाणे असणारा चिवडा हे या दुकानाचे मुख्य आकर्षण, तर त्यासोबत खव्याचा कुंदा, बुंदीचे, डिंकाचे लाडू, नाचणीचे लाडू व गुलकंद बर्फी अशी मैफील जमायची. सुरुवातीला पळसाच्या पानाचा द्रोण खाद्यपदार्थ द्यायला वापरला जायचा. उधारीवरही हा चिवडा मिळायचा. पण उधारी बुडवायचा प्रयत्न झाल्यास त्यावर एक नामी तोडगा मालकांनी काढला होता. “उधार खरेदीवरचे ग्राहक” असा एक फलक दुकानाच्या दर्शनी भागात लावला जायचा व त्यावर नाव झळकायच्या भीतीने आपसूक वसुली व्हायची. अल्पावधीत या चिवड्याची ख्याती सर्वत्र पसरली. साक्षात इंग्लंडच्या गव्हर्नरांचे एक स्तुतीपर पत्र दुकानाचे मालक मराठ्यांच्या संग्रही आहे. तसेच या दुकानात मिळणाऱ्या खव्याच्या कुंद्याच्या टिकाऊपणाबद्दल कौतुक करणारे बडोद्याच्या पंत अमात्यांचे एक स्तुतीपर पत्र त्यांना आलेले आहे.

या दुकानाला नुकतीच १२५ वर्षे पूर्ण झाली. या निमित दुकानाच्या विद्यमान मालक चालक नीलम मराठे यांनी एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करून या दुकानाच्या वाटचालीत ज्यांनी प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष हातभार लावला त्या सर्वांचा सत्कार केला. या दुकानाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, या दुकानाच्या वाटचालीत घरातील महिलावर्गाचाही फार मोठा वाटा आहे. यात प्रामुख्याने नाव घ्यायला लागेल ते कै. सिंधुताई श्रीराम मराठे यांचे. दुकान स्थिर होण्यात व त्याची प्रगती होण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. चिवड्याची चव व गुणवत्ता सातत्याने चांगली राहावी, याकडे त्या स्वत: लक्ष द्यायच्या. त्यासाठी लागणारा सर्व कच्चा माल हा चांगलाच असला पाहिजे, याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. प्रसंगी त्या जातीने चिवड्याचा एखादा घाणाही काढून इतरांना शिकवायच्या. त्यामुळे वर्षानुवर्षे या चिवड्याच्या चवीत तसूमात्र फरक पडला नसल्याचे जाणकार खवय्ये सांगतात. तसा हा चिवडा सर्व थरांत प्रसिद्ध आहे, तरीही मुंबईकरांना हा चिवडा जरा जास्तच आवडतो, असे मराठ्यांचे निरीक्षण आहे. महालक्ष्मी दर्शनासाठी आलेल्या मुंबईकर भाविकांची यात्रा जणू या दुकानाला भेट दिल्याखेरीज सुफळ संपूर्ण होत नाही. 

कालौघात लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलत आहेत. फास्ट फूडचा जमाना आहे, असे आपण समजतो. पण संगीत चिवडा आजही हवासा वाटतोच पट्टीच्या खवय्यांना.
 
पुढील स्लाईडवर वाचा, दुकानाला १२५ वर्षं पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने नीलम मराठे यांचं मनोगत...
 
 madhurimadm@gmail.com
बातम्या आणखी आहेत...