अनेकदा अशी चर्चा हाेते की, काेणी काही सांगून साहित्याची निर्मिती हाेऊ शकते. पण, मुळात ते प्रत्येकाच्या अात असावं लागतं अाणि असं सगळं असलं तरी अापल्या अातील कलेला अाकार द्यावा लागताे. हाच अाकार देण्याचं काम राजहंस लेखन शिबिरातून झाले. राजहंस प्रकाशनतर्फे नाशिकमध्ये नुकतेच लेखन शिबिर पार पडले. त्यात अनेक विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. नवलेखकांसह काही प्रस्थापित लेखकांनीही त्यात सहभाग घेऊन अापला अनुभव मांडत शंकांना वाट करून दिली. तर त्याला राजहंसच्या संपादक मंडळाने उत्तरे देतलेखनकला विकसित करण्याचे धडे दिले.
व्यक्त होणे प्रत्येक व्यक्तीची निकड असत. ती पूर्ण झाली की मनाला जसे समाधान लाभते. प्रत्येकाचे व्यक्त होण्याचे एक माध्यम असते. कुणी लिहून व्यक्त होतो कुणी बोलून तर कुणी अजून कुठल्या माध्यमातून. संगीत, गायन, वादन, चित्र-शिल्प वा कुणी निव्वळ
आपल्या कामातून. पण, व्यक्तीचे व्यक्त होणे त्याच्या तसेच समाजहितासाठी देखील गरजेचे असते. या व्यक्त होण्याच्या आविष्कारासंदर्भात दरवेळी तो अधिक परिपूर्णतेकडे झुकलेला असेल तर मिळणारे परिणाम हे सखोल उमटू शकतात.
जेव्हा भाषा हे माध्यम व्यक्त होण्यासाठी अधिक जवळचे आणि अधिक भिडणारे आहे अशी साधारणत: समजूत आहे तेव्हा समाजात लेखन-वाचन या त्या संबंधित क्रियांना महत्त्व प्राप्त होते. जसे आज आहे. व्यक्त होण्यासाठी माणसाने भाषेचा लिखित वापर कधी सुरू केला असेल यासाठीचा विचार करताना गुहांमधील चित्रांपर्यंत तो जाऊन पोहाेचतो. म्हणजेच आदिम काळापासून व्यक्त होण्यासाठी भाषेचा आधार घेतला जात होता हे समजते. लिखाण ही या दृष्टीने आदिम प्रेरणा मानायला हवी. ज्याप्रमाणे लिखाण ही माणसाची आदिम प्रेरणा आहे, त्याप्रमाणे वाचन हीदेखील त्याची आदिम प्रेरणा असावी. म्हणून तर जगभरात साहित्य वाचले जात आहे आणि सातत्याने वाचले आहे. परकीय भाषांतील साहित्यही आवडीने वाचले जात आहे. लिखाण अस्सल असले की ते वाचकांच्या मनावरच नव्हे तर बऱ्याचदा विचारांवरदेखील कब्जा करते असे म्हणतात. आज लोकमानसावर सर्वाधिक प्रभाव कुणाचा असेल तर तो साहित्याचा आहे. जगभरातील बहुतेक लोक ग्रंथ हेच गुरू मानत असतील तर खरोखरीच त्यांच्यापर्यत जाणारे साहित्य हे सकस असायला हवे. केवळ उपदेश, जीवनामृत न देता पुस्तके मनोरंजन, स्मरणरंजन, कालरंजन, इतिहास अवलोकनही करीत असतात तेव्हा त्यांच्यापर्यंत जाणारे लिखाण हे दर्जेदार असायला हवे. लिहिणे या अभिव्यक्तीचा मान राखताना वाचणे या अभिव्यक्तीचाही यथोचित मान राखायला हवा. त्यामुळेच लिखाण अस्सल अधिकाधिक सदोष व्हावे यासाठी लेखकाने प्रयत्न करायला हवे. पण, मुळात वाचकांना अमुकच एकप्रकारचे लिखाण आवडत नाही, त्यामुळे प्रसिद्ध लेखक अथवा त्याच्या शैलीची नक्कल करूनही उपयोग नसतो. बऱ्याचदा लेखकाचे अनुभव अस्सल असतात. मात्र, कागदावर उतरताना त्यातील जिवंतपणा गोठून जातो.
बऱ्याचदा लेखकाची शैली अप्रतिम असते, पण शब्दांचे केवळ फुलोरे असतात. या दोष किंवा अधिक सदोष शब्द म्हणजे त्रुटींना टाळून लिखाण करता येणे शक्य असते का? तर, असते. त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. गुरुकार्य केवळ आध्यात्मिक मार्ग उन्नत करण्यासाठीच नसते. पुस्तक लेखन करीत असतानादेखील गुरू लागतो. त्याला आजच्या भाषेत संपादक म्हणतात. केवळ उत्तम पुस्तक निर्मिती हा ध्यास न ठेवता उत्तम लेखक तयार करण्याची परंपरा असणारी प्रकाशन संस्था म्हणजे ‘राजहंस प्रकाशन’. लिहित्या हातांसाठी आणि कल्पक मेंदूंसाठी अधिक काही उत्तम करावे या हेतूने राजहंस प्रकाशनाने ‘लेखन शिबिरा’ची सुरुवात केली आहे. पुण्यात पहिले शिबिर घेतल्यानंतर ७ व ८ जानेवारी २०१७ रोजी गेल्या आठवड्यात नाशिकला कुसुमाग्रज स्मारकाच्या संयुक्त विद्यमाने लेखन शिबिर झाले. डॉ. सदानंद बोरसे, आनंद हर्डीकर, विनया खडपेकर आणि करुणा गोखले या राजहंसच्या संपादकांनी चाळीस शिबिरार्थींना दोन दिवस मार्गदर्शन केले. लेखन प्रेरणा, वैचारिक लेखन, आत्मचरित्र, चरित्र, संपादन, वाचनकला, ललितलेखन, (कादंबरी) अनुवाद आणि लेखनतंत्र व पुस्तकनिर्मिती या विषयांवर मार्गदर्शन व चर्चा यामुळे प्रत्येक सत्र खुलत गेले होते. लिहू इच्छिणाऱ्या, लिहिण्यास सुरुवात केलेल्या आणि लिहीत असलेल्यांसाठी हे शिबिर होते. संवेदना टिपणाऱ्या मनातील कल्पनेच्या बीजाला रुजवणे, मनात फुललेल्या कोंबाला खतपाणी घालणे, आणि उगवलेल्या रोपट्याची निगराणी करणे हा या लेखन शिबिराचा उद्देश होता. हीच लिखाणासाठीची पूर्वतयारी असते. दरवेळी नवी व दरवेळी नव्याने. काही गोष्टी या स्वानुभवातून अनुभूतीत होत असल्या तरी त्यासाठी सिद्धता कशी करावी हे या शिबिरातून समजले. हाताला धरून लेखक बनवता येत नाही, पण लेखक बनत असताना काय असावे, काय टाळावे, कशाला वळसा घालावा, कशाचा मोह परतावा याबद्दल चर्चा या ठिकाणी होत होती. शिबिरार्थी समाजाच्या वेगवेगळया विभागांचे तसेच महाराष्ट्राच्या विविध विभागांचे प्रतिनिधित्व करणारे होते. इतकेच नाही तर इंदोर येथूनही शिबिरार्थी आले होते. पत्रकार, सराफ, अनुवादक, नाटककार, ब्लॉगर, शेतकरी, प्राध्यापक, गृहिणी, मुद्रितशोधक ते राजकारणी. पण या सगळयांमधील सामायिक दुआ होता तो लिखाणाची प्रेरणा. शिबिराचे उद्घाटक विनायकदादा पाटील यांच्या शब्दात सांगायचे झाले तर ही , ‘अल्फाज के दिवानों की महफिल’ होती . सर्वप्रकारे लेखन प्रेरणा ढुंडाळता येतात आपली तहान भागवणारी ओंजळ कुठून मिळवायची ही लेखनप्रेरणेचा शोध ठरेल यानुसार दोन दिवसात बराच ऊहापोह झाला. सकस लिखाणासाठी वाचनाच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत ते लिखाणात ‘भान’ आदी विषयांवर बोलणे होत असतानाच पुस्तकनिर्मितीच्या तांत्रिक बाबी, परवानगी, लेखकाची रॉयल्टी संपूर्ण पुस्तकजगतातील ‘व्यवहार’ या विषयावर बोलणे झाल्यामुळे निश्चितच पुस्तक या विषयाचे अष्टांगाने दर्शन झाले. माहिती महाजालावरील पुस्तके आणि पुस्तक व्यवसायावर पडणारे त्याचे
पडसाद अशा विषयांवर चर्चा झाली. पुस्तकाबाबतीतला कुठलाच विषय वर्ज्य न ठेवल्याने हे शिबिर खरोखरच परिपूर्ण झाले. शब्दांचा लळा असलेले लोक आणि शब्दांना आतड्याच्या मायेने जपून त्यांचे भरणपोषण करणारे लोक कुसुमाग्रजांच्या भूमीत त्यांच्या नावाच्या वास्तूत एकत्र होते. हा दोन दिवसाचा ‘जागर’ नक्कीच उज्ज्वल दिशा
देणारा ठरेल.
यावर विशेष चर्चा
-लेखन प्रेरणा ढुंडाळता येतात. आपली तहान भागवणारी ओंजळ कुठून मिळवायची हा लेखनप्रेरणेचा शोध ठरेल
-पुस्तकनिर्मितीच्या तांत्रिक बाबी, परवानगी, लेखकाची रॉयल्टी संपूर्ण पुस्तकजगतातील ‘व्यवहार’
-अपर्णा क्षेमकल्याणी, नाशिक