आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्‍यरेषा: गरोदर नर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘पॅटर्निटी लिव्ह’चं पुरुषास केवढं कौतुक. पण थोडं निसर्गात डोकावलं, प्राणी-पक्ष्यांचं जगणं समजून घेतलं की कळतं, सोनेरी बेडूक, अंटार्क्टिकामध्ये पेंग्विन आणि सागरी घोडे केवळ मिरवत नाहीत, नवा जीव जन्माला घालण्यात प्रत्यक्ष वाटाही उचलतात...
बांधलेल्या घरट्यात मादीने अंडं घातलं की, सुगरण नराचा कार्यभाग संपतो. परंतु बऱ्याच प्राण्या-पक्ष्यांतील नर पिल्लांच्या संगोपनातही सहभागी होतात. बुशचॅट म्हणजे गप्पीदास. गायनकलेत गंधर्व पुरस्कार सहज मिळवू शकेल. ‘तेरी बात मे गीतों की सरगम’. केवळ गायकच नव्हे, तर तो बॉलीवूडचा नायकही शोभू शकतो. रोड रोमिओच म्हणा. रंगीबेरंगी पंख फडफडवत ‘आ दिलसे दिल मिला ले’ गात मादीभोवती पिंगा घालणारा हा रंगेल हीरो. आपल्या ओठांवर गाणं तरळतं, ‘तेरी चाल में पायल की छमछम’. तथापि बॉलीवूड नायकासारखा ‘बिनकामाचा’ नव्हे, तर ‘नवरा माझा कामाचा’ टाईपचा. ‘पटली रे पटली’ की दोघं मिळून लागतात कामाला. कापूस, लोकर अशासारख्या उबदार चिजा जमवून शेतबंधारे, दगडांची पोकळी यांत मऊसूत बिछाना तयार. स्वत:साठी नव्हे तर अवतरणाऱ्या बाळांसाठी.
जोडीने काम हा गुण अनेक पक्ष्यांत दिसून येतो. फॅनटेल पक्ष्याला ‘पटली’ की नर-मादी एकत्र येतात, विणीसाठी योग्य जागेच्या शोधास लागतात, एखादं नवपरिणीत जोडपं लागतं, तसं. रसिक प्रेमिकांना भावेल, अशा बागबगिच्यातल्या रम्य जागेस त्यांची पसंती असते. एखाद्या झाडाची इवलीशी फांदीदेखील त्यांना पुरेशी असते. (वनरूम-किचन, बस्स झालं!) त्यानंतर गृहसजावटीचं काम. दोघंही लागतात कामाला. हा एखादं गवताचं पातं हुडकून आणतो, ती एखादा गवताचा धागा. त्यानंतर ‘धागा धागा अखंड विणू या’ गीत ताल धरतं. गवताच्या नाजूक तंतूंचं विणकाम हे कलाकुसरीचा विलक्षण नमुना असतं. घरट्याचा बाह्य भाग मऊसूत पालवीने सजवलाही जातो. अशा उबदार देखण्या घरट्यात मादी दोन-तीन अंडी टाकते. अंडी उबवण्यास नरही हातभार लावतो.
उभयचर प्राण्यांत पनामा देशात आढळणारा सोनेरी बेडूक हा देखणा समजला जातो. पनामा देशाचं राष्ट्रीय चिन्ह म्हणून तो मिरवतो. परंतु त्याचे गुण वाखाणण्यासारखे नसतात. हा बेडूक विषारी. याच्या पिवळ्याधमक त्वचेवर काळ्याभोर रंगाचे त्रिकोण असतात. हेच त्याच्या सौंदर्याचे गमक. या बेडकाच्या नराच्या तळव्याला नप्चुअल पॅड ही मांसल गादी असते. ही मिलन गादी म्हणून ओळखली जाते. या गादीच्या साहाय्याने नर मिलनकाळात मादीला पकडून ठेवतो. मादीने अंडी घातल्यावर बीजारोपणाने ती फलित करण्याकरता, काही आठवडे तो मादीवरच लोंबकळत राहतो.
केवळ जोडीने काम, एवढंच नव्हे तर अंडी उबवण्याचं कामदेखील बऱ्याच नर प्रजाती खुशीने करत असतात. खुशीने वा आनंदाने म्हणताना, मला एंपरर पेंग्विन्सचं जीवन आठवतं. त्यांची प्रजनन प्रक्रिया हा एक निसर्ग चमत्कारच मानला पाहिजे. अंटार्क्टिकाचा हिवाळा हा पृथ्वीतलावरील सर्वात कडक हिवाळा. या काळात अंटार्क्टिकावरील सर्वच प्राण्यांनी स्थलांतर केलेलं असतं. अशा थंडीतही अंटार्क्टिकावर मुक्काम ठोकून असतात, नर एम्परर पेंग्विन्स! केवळ निसर्गाने नेमून दिलेलं कार्य करण्यासाठी. एम्परर पेंग्विनची मादी जून महिन्यात म्हणजे, तिथल्या ऐन हिवाळ्यात बर्फाळ प्रदेशावर अंडी घालते आणि स्थलांतरित होते. अंडी उबवण्याचं काम नरांकडे असतं. हे काम त्यांना १० आठवडे करावं लागतं. या काळात अंटार्क्टिकावरील तापमान उणे ४० ते उणे ७० एवढं घसरलेलं असतं. यासाठी ‘एकीचं बळ’ हे तत्त्व ते स्वीकारतात. त्या काळात सात-आठ हजार पेंग्विन्स एकत्र राहतात, एकमेकांत तसूभरही जागा न ठेवता. उष्णतेचं संवर्धन अशा तऱ्हेने करतात. या काळात वारेही भन्नाट असतात. त्यांना ते तोंड देऊ शकत नाहीत, पाठ देतात. वाऱ्याच्या दिशेला पाठ करून हा चमू दिवस (की रात्र? हा अंटार्क्टिकावरील अंधारी काळ.) कंठत असतो. प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही, सूर्यप्रकाशाची ऊर्जा नाही, ते तगून कसे राहतात, प्रश्न पडतो. ते तगून राहतात, त्यांच्या शरीरातील चरबीच्या साठ्यावर आणि एकीच्या बळावर. त्यांची भलीमोठी ढेरी आणि छोटे पाय हा निसर्गाने त्यांना बहाल केलेला इनक्युबेटर. यामध्ये अंडे ठेवून ते उबवण्याचं काम करत राहतात.
दहा आठवड्यांनी जेव्हा पिल्लू बाहेर येतं, तेव्हा हे नर निम्म्याने घटलेले असतात. तरीदेखील ते काम का करतात, याचं उत्तर, प्रजननाची नैसर्गिक प्रेरणा हेच होय. ही प्रेरणा इतकी उत्कट असते की, मादीने अंडं टाकलं की त्यावर कब्जा करण्यासाठी नरांमध्ये अहमहमिका चालू असते. या झटापटीत २५-३० टक्के अंड्यांचा नाश होतो. (या माद्या सहसा दोन अंडी घालतात, त्याचं कारण हेच आहे.) १० आठवड्यांनंतर पिल्लू बाहेर येतं, तोवर अंटार्क्टिकावरील हवा काहीशी उबदार झालेली असते. समुद्रातही थोडंफार खाद्य मिळू लागतं. पिल्लांच्या पोषणास्तव क्रिल मासे घेऊन माद्या परततात. पिल्लांच्या पालनपोषणाची जबाबदारी माद्यांवर असते. नर समुद्राकडे प्रयाण करतात. काही कालावधीनंतर त्यांना पुनश्च उबवण्याची कामगिरी करायची असते. चरबी साठा वाढवणे अत्यंत गरजेचे असते.
नर सागरी घोडा (सी हॉर्स) तर पिल्लावळ आपल्या उदरात घेतो. अंडी मादीच देत असते. तथापि ही अंडी ती नराच्या पोटावर असणाऱ्या पिशवीत घालते. बीजारोपण करून नर ही अंडी उबवतो. हा कालावधी साधारणपणे दोन आठवड्यांचा असतो. पिल्लं पोहण्याइतपत सक्षम झाली, की तो त्यांना पिशवीबाहेर येऊ देतो. पिल्लं पोहायला लागतात. हे नर ‘गरोदर नर’ म्हणून ओळखले जातात. एका वेळी शंभरहूनही अधिक पिल्लं जन्माला येतात. तथापि ९० टक्के पिल्लं जन्मानंतर अल्पशा कालावधीतच मृत्युमुखी पडतात...
डॉ. प्रकाश जोशी
eknathjosh@gmail.com
बातम्या आणखी आहेत...