आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गीतलेखनातले स्वानंद तरंग! (दो लफ्ज)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘जब लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल, होठों को करके गोल, सिटी बजाके बोल, ऑल इज वेल...’ पाच वर्षांपूर्वी आलेल्या ‘थ्री इडियट्स’ चित्रपटातल्या या गाण्याला तरुणाईने अक्षरश: डोक्यावर घेतले. एकविसाव्या शतकातील पिढीला उमजेल अशा भाषेमुळे ‘ऑल इज वेल...’ लोकप्रिय ठरले. याचे सारे श्रेय जाते, ते गीतकार स्वानंद किरकिरे यांना.
शुद्ध हिंदी, जड शब्द, अवघड रुपक, गहन उपमा टाळून ‘थ्री इडियट्स’मधील गाणी तरुणाईची दाद घेऊन गेली. हिंदी चित्रपटांचा सुवर्णकाळ अनुभवलेल्या पिढीने यातील शब्द ऐकून नाके मुरडली असली, तरी नव्या पिढीची भाषा हीच आहे, या पिढीला हेच हवे आहे, हे ‘ऑल इज वेल’ गाण्यातून नेमके हेरणा-या स्वानंद यांना रसिकांकडून भरभरून पोच मिळाली. इंदूर येथे एका मराठी कुटुंबात जन्मलेल्या स्वानंदचे पिता चिंतामणी आणि आई निलांबरी हे दोघेही नावाजलेले गायक. शास्त्रीय संगीताचे सूर लहानपणापासूनच स्वानंदच्या घरात रुंजी घालत. संगीताच्या तालावरच स्वानंद लहानाचा मोठा झाला. म्हणूनच संगीताची एक आगळी समज त्याला आहे. गायक आणि संगीतकार व्हायची मनीषा त्याच्यामध्ये किशोरावस्थेतच रुजली. महाविद्यालयीन जीवनात वाणिज्य शाखेची पदवी मिळवल्यानंतर स्वानंद दिल्लीला आला. तेथे ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये दाखल झाला. स्वानंदमधल्या कलावंताला येथे अनेक पैलू पडले. त्याच्यातला पटकथाकार, लेखक, गीतकार, अभिनेता येथे आकारास आला. त्याने मग भगतसिंगांच्या जीवनावर एक नाटक लिहिले, त्याचे दिग्दर्शनही केले. त्याच वेळी टीव्ही मालिकांचे निर्माते मंजू सिंह भगतसिंग यांच्यावर एक मालिका बनवत होते. त्याचे लेखन स्वानंदने केले. मग स्वानंदला मुंबई खुणावू लागली. स्वानंद मुंबईत दाखल झाला. मुंबईत पंकज पराशरशी मैत्र जुळले. त्यांनी दिग्दर्शक सुधीर मिश्राशी स्वानंदची ओळख करून दिली. त्यांची ‘कोलकाता मेल’ मालिका स्वानंदला मिळाली. दिल्लीत असताना स्वानंदने लिहिलेले ‘बावरा मन देखने चला एक सपना’ हे गीत मिश्राजींना भावले. ते त्यांनी ‘हजारो ख्वाइशें ऐसी’ या चित्रपटासाठी वापरायचे ठरवले. संगीतकार शंतनु मोइत्रा यांनी स्वानंदच्याच आवाजात ते स्वरबद्ध केले. ‘बावरा मन...’ रसिकांना भावले... आणि स्वानंद किरकिरे नावाचा एक चतुरस्र गीतकार उदयास आला. हजारो ख्वाइशें...मधून हजारो ख्वाइशे मनी घेऊन स्वानंदने गीतकार म्हणून कामाला सुरुवात केली. निर्माते विधू विनोद चोप्रा त्या वेळी ‘परिणिता’च्या निर्मितीत व्यग्र होते. संगीतकार शंतनु मोइत्रांकडून त्यांनी स्वानंद या नव्या गीतकाराबाबत ऐकले. त्यांनी परिणिताच्या गीतलेखनाची जबाबदारी स्वानंद यांच्यावर सोपावली. ‘पियू बोले...’, ‘कैसी पहेली जिंदगानी, कस्तो मज्जा, सुना सुना मन का आंगन’ व ‘रात हमारी तो चांद की सहेली है’सारखी आशयघन गाणी देत स्वानंद यांनी आपल्या काव्यप्रतिभेची चुणूक दाखवून दिली. ‘पियू बोले’ या त्यांच्या गीताला अनेक नामांकने मिळाली. मात्र ही केवळ सुरुवात होती. विधू विनोद आणि शंतनू मोइत्रा यांच्याशी स्वानंदचे सूर जुळले. परिणिताची गाणी गाजत असतानाच ‘लगे रहो मुन्नाभाई’ दाखल झाला. मग काय विचारता... या तिघांनी पुन्हा धमाल केली. चित्रपट धो धो चालला. “लगे रहो’ला चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्यातील एक होते उत्कृष्ट गीतलेखनाचे. स्वानंद किरकिरे यांना. यातील आने चार आने बचे है, लगे रहो मुन्नाभाय, ‘समझो हो ही गया’ या गाण्याबरोबरच ‘बंदे मे था दम...वंदे मातरम’ गाण्याला मोठा रसिकाश्रय लाभला. त्यानंतर आलेल्या ‘थ्री इडियट्स’मध्येही शंतनू-स्वानंद या जोडगोळीने अफलातून कामगिरी केली. ‘झुबी, झुबी...’, ‘गिव्ह मी सम सनशाइन’, ‘जाने नही देंगे तुझे’, ‘बहती हवा सा था वो’ आणि ‘ऑल इज वेल’ या गाण्यांनी तरुणाईला वेड लावले. यातील ‘बहती हवा सा था वो’ गाण्याने पुन्हा एकदा स्वानंदला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. नव्या विचाराने, नव्या पिढीशी गाण्यांतून संवाद साधण्यात स्वानंदचा हात धरणारा कोणी नाही, हे ‘थ्री इडियट्स’च्या यशाने दाखवून दिले. बावला सा सपना, देसी रोमान्स, तुमसे प्यार हो गया (शादी के साइड इफेक्ट‌्स), आशियाँ, बर्फी, क्यूँ ना हम तूम, मै क्या करू, फिर ले आया दिल, सावली सी रात (बर्फी), चंदा रे चंदा धीरे मुस्का (एकलव्य), चलाओ ना नैनों से बाण रे, नाच ले नाच ले, जबसे देखी है (बोल बच्चन), धाक धूक, नवरी माझी, गुस्ताख दिल (इंग्लिश विंग्लिश) आदी गाण्यांतून स्वानंदने आपले अष्टपैलूत्व सिद्ध केले आहे. अलीकडेच पडद्यावर झळकलेल्या ‘सोनाली केबल’मध्ये स्वानंद यांनी छोटी भूमिका करत “सिक्के अरमानों के’सारखे आशयसंपन्न गीत दिले आहे. गीतकार, संगीतकार, दिग्दर्शक आणि आता अभिनय असा स्वानंद किरकिरे यांचा बहुप्रसवा प्रवास सृजनशीलतेला न्याय देणारा ठरला आहे.
kajaykulkarni@gmail.com