आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article About Malin Mishap, Divya Marathi, Rasik

निसर्ग आक्रीत : धडा माळीण दुर्घटनेचा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पश्चिम घाटात पर्यावरणीय व भूसंरचनेत आमूलाग्र बदल घडून येत आहेत, ज्याचा फटका इथल्या रहिवाशांना बसतो आहे. माळीणमध्ये जे घडले, त्याला अनेक भूशास्त्रीय व सामाजिक तसेच आर्थिक परिमाणे आहेत.
भूस्खलन, कडा व दरडी कोसळण्याचा प्रकार महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यात फार मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होते आहे. पश्चिम घाटात पर्यावरणीय व भूसंरचनेत आमूलाग्र बदल घडून येत आहेत, ज्याचा फटका इथल्या रहिवाशांना बसतो आहे. माळीणमध्ये 30 जुलैला जे घडले, त्याला अनेक भूशास्त्रीय व सामाजिक तसेच आर्थिक परिमाणे आहेत.

माळीणची स्थिती पाहून हिमालयात घडणार्‍या भूस्खलन घटनांची आठवण होते. हिमालय पर्वतांची निर्मिती दोन भूस्तरांच्या टकरीमुळे झालेली आहे. आज जिथे ही पर्वतरांग मोठ्या दिमाखाने उभी आहे, तिथे आधी समुद्र होता. या समुद्रात चहुबाजूंनी गाळ साचत गेला व या गाळाला भारतीय उपखंडाचा भूस्तर एका बाजूने धक्के देत राहिला. गाळ साचणे व आडव्या रेषेत दाब पडण्याची क्रिया इतकी भरभर होऊन गेली की त्या गाळाला खडकाचा टणकपणा गाठता आला नाही. पण आडवा दाब सहन न झाल्याने या गाळाला वळ्या पडू लागल्या व त्यांची उंची आकाशाच्या दिशेने वाढू लागली. ही त्यांची वाढ अजूनही सुरू आहे. हिमालयाची उंची वाढतेच आहे.

हिमालय पर्वतांवर भारतीय भूखंड भूस्तराचा रेटा अजूनही कमी झालेला नाही. त्यातच बर्फाच्या विरघळण्यामुळे इथले नदी-नाले पर्वतांची झीज करताहेत. जेव्हा केव्हा हिमालय पर्वतावर पावसाचा जोराचा मारा होतो, तेव्हा इथल्या कडेकपारीवरील भुसभुशीत माती खाली येते. भूस्खलनाच्या अनेक घटना इथे नेहमीच घडत असतात.

पण भूसंरचनेच्या बाबतीत महाराष्ट्राची तुलना हिमालयाशी होऊच शकत नाही. तरीही भूस्खलनाच्या ज्या घटना घडताहेत त्यात कमालीचे साम्य दिसते. महाराष्ट्राचा म्हणून जो काही भूभाग आपण ओळखतो, तो सारा बसाल्ट नावाच्या खडकाने व्यापला आहे. या खडकाचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, तो लाव्हारसाच्या थंड होण्याच्या क्रियेपासून निर्माण झाला आहे. याची उत्पत्ती अतिशय उच्च तापमानातील घटकापासून झालेली आहे. भूमिगत लाव्हा कधी कधी दिवाळीतल्या पाऊस फटाक्यासारखा बाहेर पडतो, पण कधी कधी तो भूस्तराच्या भेगेतून पाण्यासारखादेखील बाहेर वाहत येतो. सहा-साडेसहा कोटी वर्षांपूर्वी भूहालचालींमुळे महाराष्ट्राच्या काही भागांत तडे गेले व त्यातून लाव्हारस बाहेर पडू लागला. भूस्तरावर आल्यानंतर काही लाव्हारस अत्यंत द्रुतगतीने थंड झाला. पण काही लाव्हारस अत्यंत धिम्या गतीने थंड झाला. थंड होण्याच्या वेळेतील फरकामुळे बसाल्ट खडकाची आतील व बाहेरील भौतिक तसेच रासायनिक संरचनेची घडण बदलत गेली. बर्‍याच मोठ्या वेगात थंड झालेला बसाल्ट जास्त सधन व टणक बनला, पण धिम्या गतीने थंड झालेला बसाल्ट एका वेगळ्याच भावविश्वाचा निर्माता ठरलेला आहे. थंड होण्याची क्रिया कासवाच्या गतीने होत असल्याकरणाने त्या लाव्हारसातील खनिज स्फटिक आरामात वाढत गेले. पण लवकर थंड होण्यामुळे खनिज स्फटिकांची वाढ होत नाही व ते खुजेच राहतात. त्यातच थंड होताना लाव्हारसातील जल व वायू उडून गेल्यामुळे हे बसाल्ट स्तंभाच्या स्वरूपात निर्माण होतात. लाव्हारसाच्या एका जथ्यात अनेक स्तंभ निर्माण होतात. पण या सार्‍या स्तंभात काही प्रमाणात पोकळी निर्माण झालेली असते. यालाच ‘कॉलमनर जाँटिंग’ किंवा ‘स्तंभीय सांधा’ असे म्हटले जाते.

भारताने अनेक उपग्रह अवकाशात सोडलेले आहेत. त्यांच्या छायाचित्रांतून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी जिथे उतारावर मोठ्या प्रमाणावर वस्ती आढळते, त्याचे सर्वेक्षण करून माळीणसारख्या घटना टाळण्याचे उपाय योजता येतील. गुगलमॅपवरूनसुद्धा असे प्राथमिक सर्वेक्षण करता येईल.

समोर बघताना बसाल्ट खडक फार टणक व कठीण वाटतात. ते असतातही. पण बसाल्ट खडकात अनेक भूगतिकीय हालचालींमुळे फार मोठ्या प्रमाणावर रासायनिक व भौतिक बदल घडून आलेले आहेत. या खडकांचे क्षरण झाल्याकारणाने मातीचा थर कमी-जास्त प्रमाणात त्यांच्यावर साचला गेला आहे. स्तंभीय सांधा बसाल्टबाबतसुद्धा हे खरे आहे. त्यांच्यावरही अनेक ठिकाणी माती जमा झालेली दिसून येते. दोन्ही प्रकारचे बसाल्ट खडक टणक व मजबूत दिसतात, वाटतात व असतात. पण यांच्यावर पावसाच्या पाण्याचा सातत्याने शिडकावा झाला तर परिस्थिती पूर्णत: बदलते.
कित्येकदा सुका दुष्काळ दर्शवण्यासाठी ‘फाटलेले’ शेत दाखवले जाते. स्तंभीय सांधा हासुद्धा काहीसा या फाटलेल्या शेतासारखाच प्रकार आहे. त्यांच्या सांध्यात माती अडकते व वरून आपल्याला सारं काही आलबेल असल्याचा भास होतो. पण पावसाच्या पाण्याचा निचरा जेव्हा या भेगांत होतो, तेव्हा तापमान विसंगतीमुळे बसाल्ट स्तंभावर ताण पडतो व ते कमकुवत बनतात. त्यातच भूहालचालींच्या रेट्यामुळे हे स्तंभीय खडक अनेक कोनात आडवेतिडवे कलतात. 30 ते 35 डिग्रीपर्यंत कलले तर या खडकांचा तसा कोणताच धोका संभवत नाही. पण याच्यापेक्षा जास्त अंशात कलले तर मात्र ‘दरडी’ कोसळण्याचा धोका हमखास उत्पन्न होतो. पावसाचे पाणी बसाल्ट खडकांच्या भेगा-खोबणीत झिरपले तर हा वाढीव भार त्यांना अजिबात पेलता येत नाही. त्यामुळे पावसाच्या निरंतर मार्‍याने असे खडक कमकुवत बनून खाली घरंगळत येतात.

समसमान उंचीच्या ठिकाणी दरडी कोसळण्याचा प्रकार घडत नाही. पण जिथे उंच व सखल भाग एकमेकांशेजारी दाटीवाटीने उभे असतात, तिथे नैसर्गिक धोके अंगभूत असतात. गुरुत्वाकर्षणाचे बल सर्व पदार्थांना स्वत:कडे खेचून घेत असते. उतारावर स्थित सारे घटक सपाट प्रदेशाकडे जाण्याची नैसर्गिक ऊर्मी बाळगून असतात. फक्त काही बाह्य कारणांची त्यांना वाट पाहावी लागते. पावसाळ्यात हे सारे बाह्य घटक उचल खातात व दरडी, कड्यांना स्वत:बरोबर उतारावरून खाली सपाट भागाकडे नेतात. या त्यांच्या प्रवासात जर मानवी वस्ती असेल तर मात्र अकारण जीवितहानी होते. वित्तीय हानी तर ठरलेलीच असते. पण ती टाळता येऊ शकते.

पर्यावरणीय बदल हे सदोदित घडत असतात. ते कालही घडत होते, आजही घडत आहेत व उद्याही घडत राहणार. मानवाच्या नैसर्गिक कार्यप्रणालीत हस्तक्षेप होवो अथवा न होवो, पण पर्यावरणाच्या संवेदनशील भागात मानवी शिरकाव जितका कमी करता येईल तितका केला तर नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाणे फार मोठ्या प्रमाणावर कमी होईल. त्यातच उतारावर एकाच पट्ट्यात पन्नास-शंभर घरांचा पुंजका न बांधता, दोन घरात पुरेसे अंतर राखले तर उतारावरून खाली येणार्‍या गाळाला निघून जाण्यासाठी पुरेशी वाट मिळेल. भारताने अनेक उपग्रह अवकाशात सोडलेले आहेत. त्यांच्या छायाचित्रांतून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी जिथे उतारावर मोठ्या प्रमाणावर वस्ती आढळते, त्याचे सर्वेक्षण करून पुढील अनर्थ टाळण्याचे उपाय योजता येतील. यात सामान्य लोकांनाही सहभागी करून घेता येईल. निसर्गाच्या आडवे जाणार्‍याला निसर्ग आडवे करतो, पण आडव्या करणार्‍या निसर्गालाही मानव विज्ञान व तंत्रज्ञानाच्या मदतीने सरळ करू शकतो, हे पुन्हा एकदा दाखवून देण्याची वेळ आलेली आहे.

pravin@iigs.res.in