आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article About Modular Kitchens In Madhurima, Divya Marathi.

अन्‍नपूर्णेला प्रसन्‍न करण्‍यासाठी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सुरुवातीला केवळ उच्चवर्गीयांपुरते सीमित असणारे मॉड्युलर किचन आता मध्यमवर्गीय लोकही वापरू लागले आहेत. याला कारण आहे, त्याची उपयुक्तता. स्वयंपाक करताना लागणाऱ्या वस्तू चटकन हाताशी मिळाल्या, तर काम करणे सोपे होते. मॉड्युलर किचनमध्ये नेमकी हीच गोष्ट हेरली आहे.
जुनी बैठी घरे जाऊन आता फ्लॅट संस्कृती आली. पंगत करून जेवण्याची पद्धत बदलून बुफे स्टाईल आली. भारतीय बैठक जाऊन सोफा, बीन बॅग्ज आल्या. साधा पलंग जाऊन डबलबेड आले. घरातल्या प्रत्येक खोलीत बदल झाला. मग स्वयंपाकघरात का नको? हेच कारण आहे, ज्यामुळे आज बहुतांशी लोक मॉड्युलर किचनला पसंती देऊ लागले आहेत.

बदलत्या काळानुसार घरातली स्त्रीसुद्धा काम करू लागली. तिच्या गरजा आणि अपेक्षा बदलल्या. स्वयंपाकघरात सहा-सहा तास काम करणे हे सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात शक्य होणारं नाही, शिवाय स्वयंपाकघर केवळ स्त्रियांचे न राहता घरातल्या इतर सदस्यांचाही वावर तिथे वाढला. वेळेला अनन्यसाधारण महत्त्व आले. मग या सगळ्यात टिकून राहणारे, युझर फ्रेंडली असे स्वयंपाकघर नको का? ‘मॉड्युलर किचन’ ही संकल्पना त्यामुळेच जन्माला आली. वेगवेगळ्या प्रकारची कॅबिनेट्‌स वापरून स्वयंपाकघरातले काम सोपे करणे, यासाठी मॉड्युलर किचन फायदेशीर ठरते.

पूर्वी स्वयंपाकघरात छोट्या भिंतींवर कडप्पा बसवून ओटा तयार केला जायचा. कालातंराने ग्रॅनाइट लावून ओटा तयार व्हायला लागला. त्यात चार इंच जागा कमी लागल्यामुळे थोडीफार जागा वापरायला मिळायची. पुढे ओटा तयार करण्यासाठी किंवा लाकडी अलमारी बनविण्यासाठी अॅल्युमिनियम आणि स्टेनलेस स्टीलचे फ्रेमिंग केले जाऊ लागले. आजही बहुतांश घरांमध्ये अॅल्युमिनियम आणि स्टेनलेस स्टीलचे फ्रेमिंग असलेले प्लायवूड आणि लाकडी अलमाऱ्या तयार केल्या जातात. पण, प्लायवूड कालांतराने खराब होते. त्यामुळे अॅल्युमिनियम आणि स्टेनलेस स्टीलचे फ्रेमिंग न करता कारकेस पद्धतीने फ्रेमिंग केले जाऊ लागले. हाच मॉड्युलर किचनचा पाया होय. शटर, ट्रॉली, हॅन्डल्स जागोजागी दिसतील ते मॉड्युलर किचन. इटालियन किचन, जर्मन किचन, हायग्लास फिनिश किचन, मॅट फिनिश किचन, अॅल्युमिनियम बॉर्डर किचन, मरीन (वॉटरप्रूफ), प्लायवूड किचन आदी मॉड्युलर किचनची मॉडेल्स आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.

मॉड्युलर किचनमध्ये वापर केल्या जाणाऱ्या ट्रॉली पंधरा, सतरा, एकोणीस इंचाच्या असतात. तसेच आपल्या इच्छेनुसारदेखील ट्रॉलीचा आकार बनवून घेता येतो. त्यातही कटलरी ट्रॉली, कप अॅण्ड सॉसर ट्रॉली, थाली ट्रॉली, पुलआउट ट्रॉली, ग्रेन ट्रॉली, कॉरोसल युनिट ट्रॉली आदी प्रकार आहेत. युरो कंपनीच्या ट्रॉलींना महिलांची विशेष मागणी आहे. मॉड्युलर किचनमध्ये ओट्यांवर स्नेनलेस स्टीलच्या अॅक्सेसरीज लावूनही किचन सुशोभित करता येते. हे किचन ५० हजारांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत तयार केले जातात. मॉड्युलर किचनमध्ये कोरीयन, मार्बल, ग्रेनाईटचा ओटा लावला जातो. मॉड्युलर किचन १५ ते २० वर्षे सहज टिकतात. कमी जागेत जास्तीत-जास्त साहित्य योग्य पद्धतीने मांडणी करणे म्हणजे मॉड्युलर किचन होय, अशी माहिती कुचिना या देशातील आघाडीच्या किचन उत्पादक कंपनीचे संचालक नमित बजोरिया देतात.

मॉड्युलर किचन आणि चिमणीमध्ये अनेक नवीन अाविष्कार बाजारात आणणारे बजोरिया म्हणतात की, भारतीय खाद्यपदार्थांमध्ये फोडणीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याकडे मॉड्युलर किचन जरी असले तरी आपण चिमणीऐवजी एक्झॉस्ट पंखा बसवतो. मात्र या पंख्यामुळे भिंत तर काळी पडतेच, शिवाय कालांतराने भिंतीचे पापुद्रेही निघतात. मॉड्युलर किचनमध्ये गॅसच्या वर चिमणी लावण्याचा आग्रह त्यामुळेच धरला जातो. चिमणीमुळे स्वयंपाकघरातली गरम तेलकट हवा, फोडण्यांचे वास लगेचच बाहेर जातात आणि किचनमध्ये पाऊल टाकल्या टाकल्या ताजेपणाचा अनुभव येतो. यात आणखी एक पाऊल पुढे टाकत किचन अप्लायन्समधील आपल्या तिसऱ्या टप्प्यात कुचिनाने ऑटो क्लिनिंग चिमणी बाजारात आणली आहे. याशिवाय हॉलमध्ये सुरू असलेल्या टीव्ही मालिका आणि स्वयंपाक यांचे गणित जुळवण्यासाठी एलसीडी टीव्ही असलेली चिमणी असा नवा प्रयोग बजोरिया यांनी सुरू केला आहे, जेणेकरून महिलांना स्वयंपाक करता करताच मालिकांचा आनंद घेता येऊ शकेल.

मॉड्युलर किचनचा वापर परदेशात पहिल्यांदा सुरू झाला. तिथली संस्कृती व आर्थिक सुबत्ता यामुळे तिथे मॉड्युलर किचन लोकप्रिय झाले; मात्र आपल्याकडे ही संकल्पना रुजण्यासाठी थोडा कालावधी जावा लागला. सुरुवातीला केवळ उच्चवर्गीयांपुरते सीमित असणारे मॉड्युलर किचन आता मध्यमवर्गीय लोकही वापरू लागले आहेत. याला कारण आहे, त्याची उपयुक्तता. आर्थिक सुबत्ता वाढली आहेच; पण त्याशिवाय वेळेचे गणित जुळविणेही गरजेचे बनले आहे. स्वयंपाकाला लागणारा वेळ इतरही गोष्टींमध्ये वाटला जातो आहे. वस्तू चटकन हाताशी मिळाल्या, तर काम करणे सोपे होते. मॉड्युलर किचनमध्ये नेमकी हीच गोष्ट हेरली आहे.
पुढील स्‍लाइडवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो..