आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Adv.Manisha Dhoot Article About Mother's Relation With Daughter After Her Marriage

अगं आई जरा थांब ना !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुलसी विवाह झाले, आता लग्नांची धूम सुरू होईल. मुलांच्या आयांना वाटत असतं, सुनेशी कसं वागायचं म्हणजे ती आनंदात राहील, तर मुलीच्याही आईच्या डोक्यात तोच विचार, मुलगी आनंदात आहे ना ? पण म्हणून सतत तिच्या वैवाहिक आयुष्यात नाक खुपसायची गरज नाही, त्याचे फार अनिष्ट परिणाम होऊ शकतात, असा कौटुंबिक न्यायालयात काम करताना आलेल्या अनुभवांवरचा धडा देणारे हे दोन लेख.
अगं आई जरा थांब ना ! (अॅड. मनीषा धूत, अकोला)

खरोखरच अशी वेळ का यावी, की जन्मदात्या आईलाच थांब म्हणावे लागावे. जेव्हा कौटुंबिक न्यायालयात काही संसार पालकांच्या हस्तक्षेपामुळे उद्ध्वस्त होताना दिसतात, तेव्हा हे शब्द मला म्हणावेसे वाटतात. घटस्फोटाची अनेक कारणे असतात. लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचा संसार नसतो, तर दोन्ही कुटुंबांचे, परिवारांचे, नातलगांचेही नाते कुठल्या ना कुठल्या स्वरूपात जुळते. पण स्वत:च्या पालकांच्या हस्तक्षेपामुळेच जेव्हा हा संसार न्यायालयाच्या दारावर येऊन मोडतो तेव्हा फार दु:ख होते.

दूरध्वनी ही विज्ञानाची देन आजकाल अभिशाप बनतेय की काय, असे वाटते. दिवसातीलच नव्हे, तर अापल्या मुलांच्या आयुष्यातील मिनिटा/सेकंदाच्या घडामोडी पालक विचारत असतात. याची अतिशयोक्ती होऊन दोन भिन्न कुटुंबांत वाढलेल्या व्यक्तींच्या परस्पर संबंधामध्ये मतभेद निर्माण करते आणि हा तणाव एवढा वाढतो की, त्यातून केवळ गैरसमजच निर्माण होतात. घटस्फोटाची वेळ येते.

सागर व सरिता दोघेही उच्च विद्याविभूषित. संसाराला चारच महिने झाले होते; परंतु सरिताने माहेरी कुठलेही काम केलेले नाही. तिने केवळ एक वेळचा स्वयंपाक घरी हाताने करावा, ही बाब आईला आवडत नाही. माझ्या मुलीने काम करावे म्हणून मी शिक्षण दिलेले नाही, अशा शब्दांचा त्यांच्याकडून प्रयोग होतो. परंतु बारावीनंतर उच्च शिक्षणाकरिता बाहेरगावी राहिलेल्या सागरला एकदाचे जेवण घरचे असावे, असे वाटते. त्यात आरोग्याचेही हित. सरिता सागरच्या प्रेमापोटी सगळे करायला तयार असते. पण मोबाइलवर आईचे बोलणे ऐकले की, तिचे मत बदलते. ‘आज स्वयंपाकच सांगतो, उद्या अजून काही सांगणार. नको गं सरू. तू एवढी गुणी, कशाला त्याची चाकरी करतेस? हाताने स्वयंपाक केला तर उद्या त्याच्या आईवडिलांना डोक्यावर आणून बसवेल,’ असे आईचे वारंवार बोलणे मोबाइलवर चालू असते. मग सागर काहीही बोलला तरी सरिताला उलटेच वाटतेे. मग त्याचा परिणाम दोघांमध्ये बरेच वाद होऊन घटस्फोटापर्यंत जातो.
अलका व राजेश हे दोघेही मध्यमवर्गीय कुटुंबातील. राजेश आपला व्यवसाय सांभाळतो व अलका घर सांभाळते. दोघांच्याही लग्नाला सहा महिने झालेले. अलका, राजेश व राजेशची आई एवढेच कुटुंब. अलका व तिच्या आईचे दिवसभर फोनवर बोलणे चालू असते. राजेश दिवसभर स्वत:च्या व्यवसायात गुंतलेला असतो. पोळ्या करताना जेव्हा अलका मोबाइलवर बोलते तेव्हा सासूला ते योग्य वाटत नाही. त्या म्हणतात, ‘गॅसजवळ मोबाइल नेणे धोकादायक आहे.’ असेच वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकतानाही अलकाचे मोबाइलवर बोलणे चालूच असते. तेव्हा मोबाइल मशीनमध्ये पडून खराब होईल, असेही सासूचे म्हणणे अलकाला आवडत नाही. कारण आईचा फोन महत्त्वाचा व तो दिलेलाही आईनेच. आईचे म्हणणे असते, की अलकाने नेहमी त्यांच्याशी बोलावे. कारण त्यांचे मुलीवर खूप प्रेम आहे. तिनेच का घरची कामे करावी, असेही त्यांना वाटते.
अनुप व प्रिया दोघेही शांत व समंजस. त्यांच्या संसारात आता आरोही ही छोटीशी पाहुणी. ती सहा महिन्यांची झाली. आरोही नाजूक असल्यामुळे तिची प्रतिकारशक्ती कमी. ती वारंवार आजारी पडायला लागली. प्रियाला सतत तिची काळजी घेऊन मानसिक व शारीिरक थकवा यायचा. आईशी नैितक आधार म्हणून बोलायची. आईशी झालेला संवाद, ‘हो गं बाई, तुझी आरोही पोटात असताना जर थोडीशी काळजी घेतली असती, तर ती अशी आजारी नसती पडली. किती सहन करावे लागते माझ्या पोरीला. आता आरोहीचं कसं होणार!’ हे ऐकल्यावर अनुपशी बोलताना प्रिया सगळे दोष अनुपवर लावायची. मग दोघांमध्ये गैरसमज वाढायचे. केवळ आई व वडिलांच्या विनाकारण हस्तक्षेपामुळे विवाहबंधन तोडून घटस्फोटाकरिता आलेली अनेक जोडपी असतात. चांगली शिकवण नाही देऊ शकत तर उलट तर शिकवून माझा संसार मोडू नको.’ काही पालक असेही असतील, की ज्यांच्या मुलींना खरोखर घटस्फोटाची आवश्यकता असेल किंवा तिला अतिशय मानसिक व शारीरिक त्रास असेल. त्या पालकांनी निश्चितच तिच्या पाठीशी उभे राहावे; जेणेकरून तिला योग्य न्याय मिळेल व सोबतच नैितक आधारही. कारण आमची मुले-मुली आम्हाला जड नाहीत, हे त्यांना सांगणे खूप महत्त्वाचे आहे. पण आवश्यकतेपेक्षा जास्त ढवळाढवळ संसार उद्ध्वस्त करते. मुलींना त्यांच्या संसारात संसारहिताचे निर्णय घेण्याची क्षमताच कमकुवत होत जाते. असे निर्णय घ्यायला त्यांना मदत करा, परंतु त्यांनाही विचार करण्याची संधी द्या, असे नक्की सांगावेसे वाटते. आईची भूमिका मुलीच्या संसारात फार महत्त्वाची. सागर आणि सरिता यांच्या संसारात जर आईने फक्त एवढेच म्हटले तर - अगं, खरंच सरू, घरचं जेवण किती पौष्टिक. इतरांसोबत आपल्यालाही ताजं व चांगलं अन्न मिळतं. सागर समजदार म्हणून तर तो तुला म्हणतोय एक वेळ घरचं जेवू.

अलका व राजेश यांच्या संसारात जर आईने केवळ आठवड्यातून एक दिवस नव्हे तर दिवसातून एक वेळ जर मोबाइलवर बोलण्याची बांधून घेतली तर तिचा संसार सुरळीत होईल. दूरध्वनीचा वापर कधीही, केव्हाही, योग्य नाही. प्रिया व अनुप यांच्या प्रकरणात आईने जर खरोखरच प्रियाला नैितक आधार देऊन केवळ एवढे म्हटले, की “अगं प्रिया, वैद्यकशास्त्र खूप पुढे गेले आहे, होईल आरोही बरी. मोठी झाली, चांगली जेवली, की प्रतिकारशक्तीही वाढेल. मुलं आजारी पडतच असतात. काळजी करू नको.’ झालं, प्रिया एकदम निश्चिंत होईल ना. कधी-कधी प्रसंगानुरूप खचलेल्या व्यक्तीला केवळ शब्दांचा आधार महत्त्वाचा असतो. कौटुंबिक न्यायालयात जेव्हा अशा प्रकरणांच्या माध्यमातून घटस्फोटाची, न्यायालयात दाद मागण्याची खरी कारणे जेव्हा लक्षात येतात, तेव्हा मग सरिता, अलका, प्रिया यांच्यासारख्या लेकी म्हणतात, ‘ए आई, जर थांब ना!’
-----------------------
माता न तू... (अॅड. नसीम देशमुख, जळगाव)
‘बोल ना वकीलबाईकु। मेरे मुंह में क्या जबान नहीं। रहने दे, मैच बोलती।’ अन् ती मला सांगू लागली.

‘मॅडम, ये मेरी कुल्सुम. ६ महिने झाले बघा लग्न होऊन. अन् माझ्या मुलीची काय हालत करून टाकली तिच्या सासरच्या लोकांनी! मी तिला मध्ये थांबवले, विचारले, ‘तू कोण बाई? अन् तुझे नाव काय? तुझ्या मुलीतर्फे केस दाखल करायची आहे ना? मग तिलाच सांगू दे काय घडलं ते. तीच होती ना सासरी?’ तिने तिचे नाव सलमाबी सांगितले. तिच्यासोबत तिची मुलगी कुल्सुम होती. त्यांना कुल्सुमची खावटीची केस दाखल करायची होती. कुल्सुमला सासरी सासूच्या सांगण्यावरून मारहाण होत होती, वेळेवर जेवण दिले जात नव्हते. तिच्याकडून ढोरासारखे काम करवून घेतले जात होते. तिची कहाणी ती शांतपणे सांगत होती. तिला पतीसोबत नांदण्याची इच्छा होती, असे तिच्या बोलण्यावरून कळत होते. तिचे शांतपणे मला माहिती देणे तिच्या आईला अजिबात पटत नव्हते. ती बराच वेळ बेचैन. काही मिनिटांतच न राहवून ती रागारागाने आणि त्वेषाने सांगू लागली.

‘मॅडम, ही काय सांगेल? मी काय सांगते ते लिहा. नवरा दारू प्यायचा. दुसऱ्या बाईकडे जायचा. सासऱ्याची हिच्यावर नजर...’ कुल्सुम मध्येच बोलण्याचा प्रयत्न करीत होती... ‘अम्मा, अगं काय बोलते आहेत तू, असं काहीही नाही. माझा सासरा हाजी आहे.’ पण तिची आई सलमाबी काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. माझ्या लक्षात सर्व प्रकार येत होता. कुल्सुमला सासरी ठेवण्याची तिच्या आईची इच्छा नव्हती.
झाल्या असतील काही आपसात गोष्टी, पण सलमाबीचा इगो हर्ट झालेला. त्यात ती अशिक्षित. आता सलमाबीने सांगितलेले आरोप लावून मी केस दाखल केली असती तर शेवट काय झाला असता? शेवट तर सोडा. कुल्सुमचा नवरा मुसलमान. त्याने लगेचच काही कारणे दाखवून तलाक पाठवून दिला असता. म्हणजे कुल्सुम आयुष्यातून उठली असती. पण मग कुल्सुमच्या आयुष्याचा नाश कुणी केला असता?

आईने स्वत:च्या इगोसाठी मुलीच्या संसाराचा बळी घेतल्याची असंख्य उदाहरणे समाजात आपणास दिसतात. लग्नानंतर मुलीच्या संसारात तिच्या आईने ढवळाढवळ करायची नसते. मुलीला तिचे सासरचे प्रश्न तिथेच सोडविण्याची हिंमत आईने मुलीला प्रेमाने द्यायला पाहिजे. पण तेही दुरूनच. शेवटी सासरच्या मंडळींनी आपल्या मुलाच्या संसारात ढवळाढवळ करणे कुणालाच आवडणार नाही. या लहानसहान गोष्टींचे भान मुलीच्या आणि मुलाच्याही आईने ठेवायला पाहिजे. अन्यथा कुल्सुमसारख्या मुलींचे सांसारिक आयुष्य उद्ध्वस्त झाल्यास त्यांना म्हणावेच लागेल, ‘माता न तू...’