आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चळवळींचा 'केमिकल लोच्या'?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जागतिकीकरणाच्या बसमध्ये आपण सर्वच जण बसलो आहोत. ती आपली इच्छा नव्हे, तर अपरिहार्यता बनली आहे. जीवन जगण्याचा संघर्ष सर्वांसाठीच तीव्र झाला आहे, त्यामुळे दैनंदिन शर्यतीचे नियम बदलले आहेत. मीडिया- सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर जे होते आहे, त्याची दखल घेणे अपरिहार्य बनले आहे. पण या सगळ्यांत महाराष्ट्रातल्या परिवर्तनवादी चळवळींची पीछेहाट होत चालली आहे का? सामाजिक चळवळ आणि परिवर्तन ही खरे तर निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे तिला विशिष्ट वैचारिक चौकटीत बंदिस्त करण्याचे काही कारण नाही. मात्र, आज समता म्हणजे काय, याबाबतच पुरोगामी विचारांचे कायकर्ते आणि समर्थकांमध्ये दुमत आहे का? बदलत्या अर्थस्थितीमध्ये उभी राहणारी आव्हाने पेलण्याची ताकद ही चळवळ गमावून बसली आहे का आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, वंचितांबद्दलची संवेदना हरवत चाललेल्या सधन वर्गाला या प्रक्रियेत सामील करून घेण्याची क्षमता या चळवळींमध्ये आहे का?... ५५ व्या महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मान्यवरांनी परिवर्तन चळवळींची केलेली ही चिकित्सा...


‘पुरोगामी च‌ळवळीच प्रतिगामी शक्तींना रोखतील’
सुबोध मोरे


आज केंद्र व राज्यामध्ये भाजप आघाडीचे सरकार आहे. या सत्तेमुळे प्रतिगामी शक्तींची ताकद देशात प्रचंड वाढलेली आहे, हे सत्य आहे. मात्र, प्रतिगामी शक्ती सत्तेवर येण्यामागे पुरोगामी चळवळीची नकारात्मकता जबाबदार आहे, असा जो आरोप केला जातो, त्यात तथ्य नाही. या देशात प्रतिगामी चळवळींनी धर्माचे व धर्मांधतेचे मुद्दे उकरून काढून १९८० पासून सातत्याने राजकारण केले. परिणामी पुरोगामी शक्ती, डावे पक्ष या देशातील सर्वसामान्य माणसांचे जगण्या-मरण्याचे प्रश्न घेऊन लढाई, संघर्ष करीत होते, ते मागे पडत गेले. १९९०च्या दशकात नवे आर्थिक धोरण व खासगीकरण, जागतिकीकरणाचे जे युग सुरू झाले, त्याचाही मोठा फटका देशातील कामगार, कष्टकरी चळवळींना बसला. धर्मांध शक्ती ज्या प्रमाणात पुढे आल्या, नेमकी त्याच काळात डाव्या, पुरोगामी पक्षांची ताकद िदवसेंदिवस नव्या आर्थिक धोरणाच्या परिणामांमुळेही कमी होत गेली. त्यांचे कामगार संघटना, शेतकरी संघटनांवरील वर्चस्व क्षीण झाले.

कबीर आणि महाराष्ट्रातील संतपरंपरा यांनी समाजाला उत्तम दिशा दाखवली. त्या गोष्टींशी नाळ जुळवण्याचे डाव्या तसेच पुरोगामी चळवळींनी फारच तोकडे प्रयत्न केले होते. ही त्यांची मोठी चूक होती. परंतु अलीकडच्या डाव्या, पुरोगामी चळवळीने संस्कृती व परंपरेतील चांगल्या गोष्टींशी आपली नाळ जोडून चळवळी उभ्या करण्याचा प्रयत्न चालवला आहे. हे भान जर या पुरोगामी चळवळींना १९८०च्या दशकापूर्वी आले असते तर ब्राह्मणी व जाती व्यवस्था बळकट करणाऱ्या रूढीवादी पक्षसंघटनांनी धर्माचा दुरुपयोग करून जे भावनिक राजकारण केले, त्याला आळा बसला असता.

दाभोलकर आणि पानसरे यांची धर्मांध, प्रतिगामी शक्तींकडून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. देशात पुन्हा एकदा नथुराम गोडसे याचे पुतळे उभारण्याची भाषा केली जात आहे. साक्षी महाराजसारखे भाजपचे खासदार मुस्लिम समुदायाला धमकावत आहेत. या घटनांवरून जात्यंध हिंदुत्ववादी विचारसरणीच्या पक्षांचे प्रतिगामी राजकारण आज किती टोकाला गेले आहे, याची कल्पना येते. परंतु हे हल्ले आणि हत्या जरी होत असल्या तरी आज पुन्हा एकदा देशातील पुरोगामी शक्ती आणि अनेक पक्ष-संघटनांबाहेर असलेले व सदसद्विवेकबुद्धी शाबूत असलेले तरुण रस्त्यावर उतरून या प्रतिगाम्यांना आव्हान देत आहेत. पुरोगाम्यांची जरी तात्पुरती पीछेहाट झाली असली तरी या देशाला बुद्ध, चार्वाकापासून फुले, आगरकर ते आंबेडकरांपर्यंतच्या पुरोगामी विचारांची परंपरा आहे आणि त्या विचारांवर आधारित चळवळीच पुढील काळात प्रतिगामी शक्तींना रोखण्याचे कार्य करतील.

subodhvidrohi@gmail.com
(सामाजिक कार्यकर्ते आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे माजी सरचिटणीस)
पुढील स्लाइडवर वाचा, काय म्हणतात इतर मान्यवर...

बातम्या आणखी आहेत...