आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनौरस विलेट (फिल्मफेस्ट)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जे अनुभवलं, जे वाटलं, जे अस्वस्थ करत होतं ते कागदावर उतरवलं, असे सांगणा-या विलेट ल्युडुक या लेखिकेच्या आयुष्यावर बेतलेला व मार्टिन प्रोवोस्ट या दिग्दर्शकानं बनवलेला ‘विलेट’ हा चित्रपट २०१३मध्ये झळकला. त्यामुळे विलेट आणि तिचं लिखाण समजायला नक्कीच मदत होते.

विलेट ल्युडुक वेगळी होती. अगदी जन्मली तेव्हापासून. लग्न न झालेल्या एका मोलकरणीची मुलगी...अनौरस... आपल्या या अनौरस असण्याची जाणीव तिला होतीच. पण त्यानंतर तिच्यातलं आणखी एक वेगळपण तिला जाणवलं. समलैंगिक आकर्षण आणि संबंधांचं. हॉस्टेलमध्ये मैत्रिणीबरोबर समलैंगिक संबंध उघड झाल्यामुळं विलेटची तिथून हकालपट्टी झाली. पहिलं महायुद्ध युरोपला उद‌्ध्वस्त करत असताना विलेट वयात येत होती. आपल्या या वेगळेपणाच्या जाणिवेमुळं ती अस्वस्थ झाली नाही; तर आपण असे का आहोत, याचा शोध घेण्याचा तिनं प्रयत्न केला. विलेटला हवी असलेली उत्तरं कधीच सापडली नाहीत. पण तिनं आपला शोध सोडला नाही. अगदी आयुष्यभर... आपल्या लेखनातूनं तिनं आपल्या अस्वस्थतेला मोकळी वाट करून दिली. ‘द बास्टर्ड’ हे तिचं आत्मचरित्र १९६४ला प्रसिद्ध झालं. तोवर विलेटची पाच पुस्तकं प्रसिद्ध झाली होती. त्यातली ‘ला एसफिक्सी’, ‘ला अफेमी’ आणि त्यानंतर आलेलं ‘रावेज’ ही पुस्तक प्रचंड गाजली. एका अनौरस मुलीचा प्रसिद्ध लेखक बनण्याचा प्रवास इतका सोपा नव्हता. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धासारख्या बिकट परिस्थितीत जगलेली विलेट तत्कालीन फ्रेंच साहित्यात वरच्या क्लासमध्ये असलेल्या सिमोन द बोव्हा, अल्बर्ट कामू, जिन गॅनेट, ज्याँ पॉल सात्र अशा लेखकांच्या पंक्तीत जाऊन बसली. बार्नेस आणि नोबेलपर्यंत तिची मजल नाही जाऊ शकली; पण तिनं जे काही लििहलं, ते अगदी मनापासून. जे अनुभवलं, जे वाटलं, जे अस्वस्थ करत होतं ते कागदावर उतरवलं, जे माझ्या मनाला पटलं तेच लिहिलं, असं ठामपणे सांगणाऱ्या या वादग्रस्त लेखिकेवरचा जीवनपट ‘विलेट’ २०१३मध्ये झळकला. मार्टिन प्रोवोस्ट या दिग्दर्शकानं ‘द बास्टर्ड’चा आधार घेत विलेटच्या आयुष्यातले अनेक प्रसंग उभे केलेत. यामुळं विलेट आणि तिचं लिखाण समजायला नक्कीच मदत होते.

तो काळ होता दुसऱ्या महायुद्धाचा. सर्वसामान्यांचं जगणं कठीण करणारा हा काळ. या काळात जगण्यासाठी चीज आणि मांस चोरून विकण्याची पाळी विलेटवर आली होती. त्यासाठी तिला कित्येकदा तुरुंगाची हवा खावी लागली. पण त्या स्थितीत चोरीचा माल विकण्याशिवाय तिला पर्याय नव्हता. वाचनाची आवड लहानपणीची, पण विलेटला लििहतं केलं होतं तिचा मित्र मॉरियोसनं. विलेटसारखा तोही समलिंगी होता. अशा या दोघांचं एकत्रं येणं ही फार आश्चर्याची बाब होती. पण तरीही ते एकत्र आले. रोजची तगमग आणि अस्वस्थता कागदावर उतरवण्याची कल्पना माॅरियोसचीच. विलेटनं जे लिहिलं ते साहित्यिकदृष्ट्या अव्वल होतं. आपल्या विचारांची कवितेसारखी सोपी आणि प्रभावी मांडणी ही विलेटच्या लेखनाची वैशिष्ट्ये. आपण हे जे लििहतोय ते कुठेतरी छापलं जावं, अशी तिची किमान अपेक्षा. त्या काळात तिला सिमोन द बोव्हाची ‘शी केम टू स्टे’(१९४३) कादंबरी सापडली. सिमोनचं लेखन स्त्रीप्रधान होतं. फ्रेंच साहित्यात फेमिनिझमची बीजं तिनं रोवली होती. आपण जे लिहिलंय ते असंच आहे, आपल्या अस्वस्थतेतून निघालेले विचार इतरांसारखेच असून ते छापले गेले पाहिजेत, या भावनेतून विलेटनं थेट सिमोनला गाठलं. आपलं पहिलंवहिलं हस्तलिखित तिला सुपूर्द केलं. सिमोननं ते वाचलं तेव्हा ती इतकी प्रभावित झाली की तिनं ते छापायला मदत केली. त्यानंतर या दोन फेमिनिस्ट लेखिकांची गट्टी जमली ती अगदी कायमची. विलेट(२०१३) सिनेमात या दोन लेखिकांच्या मैत्रीचा प्रवासच जास्त आहे. सिमोनचं जगप्रसिद्ध पुस्तक ‘द सेकंड सेक्स’ही याच काळातलं. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या मैत्रीला विलेटच्या दृष्टीनं प्रेमाचं स्वरूप आलं. ती सिमोनवर प्रेम करायला लागली होती. तिनं सिमोनला हे स्पष्ट सांगितलं होतं. त्या वेळी मोरियोसनं तिला जो सल्ला दिला होता, तोच सिमोननंही दिला. तुझी ही अस्वस्थता कागदावर उतरव. डोक्यातलं सर्व कागदावर मांड. त्यानंतर विलेटनं जे लिहिलं, ते तिच्या विचारांशी प्रामाणिक होतं. स्त्री समलिंगी संबंधांवर इतकं तरल आणि सहज लििहणारी ती त्या काळातली एकमेव लेखिका होती. पण ते जसंच्या तसं छापणं कठीण होतं. ते तसंच छापलं जावं, यासाठी तिनं खूप प्रयत्न केला. पण ते शक्य नव्हतं. शेवटी माघार घेत तिने काही स्त्री समलिंगींचे वर्णन करणारे अनेक उतारे काढून टाकले. ‘रावेज’ हे तिचं पुस्तक जेव्हा प्रसिद्ध झालं, तेव्हा ती जास्त अस्वस्थ होती. कारण जे तिला सांगायचं होतं, ते पुस्तकातून काढून टाकण्यात आलं होतं. मग तिनं आपलीच गोष्ट जशीच्या तशी सांगायचं ठरवलं आणि त्यातून मग ‘द बास्टर्ड’ आकाराला येत गेलं.

सिमोनइतकी नाही, पण फ्रेंच साहित्यात आता विलेटचीही जागा तयार झाली होती. पण इथं विलेटचा फक्त फ्रान्सपुरता विचार करता येणार नाही. कारण तिनं जे लिहिलं ते जगातल्या तमाम महिलांचं अंतरंग होतं. What Women Wants? अर्थात, बाईला काय हवं, हे नक्की सांगणं कठीण आहे, असं म्हणतात. स्वत: ती, तिचं भवताल, जगाकडून असलेल्या तिच्या अपेक्षा आणि त्याहून वेगळं होऊन तिनं स्वतंत्रपणे स्वत:चं असं शोधलेलं अंतरंग, हे सर्व अगम्य पण तरीही तिच्यातल्या ‘ती’पणाला पुरेपूर साजेसं असं. आजच्या भाषेत म्हणायचं झालं तर, ‘इट्स हर चॉइस.’ हे सर्व काही विलेटनं जसंच्या तसं आपल्या लेखणीतून मांडलं. म्हणूनच सर्वसामान्यांचे कुठलेही नियम तिच्या लेखनाला लागू पडले नाहीत. कारण ती तशीच जगली होती. दुर्लक्षित, निराशेत आणि उपेक्षित. तिच्या लेखनात कवितेची लय होती, पण ते काव्य नव्हतं. जसं तिचं जगणं तसं तिचं लेखन. ‘द बास्टर्ड’मध्ये विलेट लिहिते, ‘वयाच्या पाचव्या, सहाव्या, सातव्या वर्षी मला अचानक रडू यायचं, ते फक्त रडण्यासाठी असायचं, माझ्या आत अफाट दु:ख होतं ते बाहेर पडायचं.’ सिनेमात हेच दाखवण्यात आलंय.

विलेट(२०१३) या सिनेमाची विभागणी सात भागांमध्ये करण्यात आलीय. पहिला भाग मॅारियोसवरचा आहे. विलेट आणि माॅरियोस यांचं एकत्र येणं किती वेगळं होतं, तिला बायका आवडायच्या आणि त्याला पुरुष. असं हे जगावेगळं जोडपं पहिल्या महायुद्धानंतर एकत्र आलं. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी एकमेकांपासून दुरावलं. त्यानंतर सिमोन, जीन, जॅक, बर्थ असे अनेक जण विलेटच्या आयुष्याला वेगवेगळा अर्थ देऊन गेले. कुणीही तिच्याबरोबर कायमचं राहिलं नाही. ती आयुष्यभर एकाकी राहिली. अस्वस्थ राहिली. या अस्वस्थतेमुळं काही काळ मानसिक रुग्णही बनली. हे सर्व ‘द बास्टर्ड’मध्ये विलेटनं जसंच्या तसं लििहलं. यामुळेच विलेट पाहताना ती प्रेक्षकांना तिच्याइतकीच अस्वस्थ करते. अगदी सिमोनच्या भाषेत सांगायचं झालं तर, ‘विलेट गरिबी, एकाकीपणा आणि दु:खात गुंतली होती. पण एके दिवशी तिला खरा सूर गवसला. एकाच वेळी तो हळवा आणि आक्रमकही होता.” अशीच एकाकी आणि आक्रमक विलेट सिनेमातही भेटते, हे विशेष.

narendrabandabe@gmail.com