मुक्ता : / मुक्ता : माझा निष्ठावान सैनिक (रसिक दिवाळी अंक)

देबू बर्वे

Nov 08,2015 05:00:00 AM IST
इच्छित स्थळ गाठण्यापेक्षा त्या स्थळापर्यंत केलेला प्रवास, त्या प्रवासात लाभलेले सख्खे सोबती, त्यांचे प्रभाव-संस्कार आणि त्यातून होत गेलेली जडणघडण लाखमोलाची असते... देबू बर्वे यांनी आपली धाकटी बहीण, मराठी रंगभूमी-मालिका आणि चित्रपट या तिन्ही प्रांतांत आपल्या चतुरस्र भूमिकांनी प्रेक्षकांना आपलेसे केलेल्या ध्येयनिष्ठ कलावंत मुक्ता बर्वे यांचे रेखाटलेले हे चित्तवेधक शब्दचित्र... खास दिव्य मराठी ‘रसिक’ दिवाळी अंकासाठी...

‘मुक्ता, घरी गेल्यावर आई विचारेल चप्पल कुठे आहे, तर ओढ्यात वाहून गेली, असे सांगायचे नाही! फक्त ‘हरवली’ एवढेच सांगायचे! ‘हो दादा.’ मुक्ताचा आणि माझा ‘बहीण-भाऊ’ आणि ‘दोस्त’ असा दुहेरी ‘बाँड’ असा खूप घट्ट आणि पहिल्यापासूनचा आहे. हं, आता वरची गोष्ट पूर्ण करतो.

बालवाडीत जाताना मुक्ताला सकाळी शाळेत सोडायची जबाबदारी ‘दादा’ म्हणून माझी होती. ८०च्या दशकातल्या सुरुवातीचे चिंचवड, आताचे पुण्याचे उपनगर ‘पिंपरी-चिंचवड’ झाले नव्हते. प्रामुख्याने औद्योगिक नोकऱ्यांसाठी महाराष्ट्र आणि देशाच्या इतर भागातून आलेल्या कनिष्ठ मध्यमवर्गीय लोकांनी वसलेले गाव होते ते. मध्येमध्ये चाळींचे पट्टे, त्यांना जोडणारे रस्ते आणि उरलेले मोठमोठे रिकामे जमिनीचे प्लॉट्स. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसरीकडे जायला रस्ते वापरणे, आम्हा लहान मुलांना मूर्खपणाचे वाटायचे. मी तिसरीत होतो, मुक्ता बालवाडीत, तिला शाळेत सोडायला जाण्यासाठीचा रस्ता लांबचा होता. रिकाम्या मैदानातून जर गेले आणि एका ओढ्यावरून दगडावरून पलीकडे जाता आले, तर दोन मिनिटांत शाळा यायची. मला मुक्ताला शाळेत सोडण्याचा ‘सोपस्कार’ पटकन संपवता यायचा. आणि माझ्या तुकडीतला माझा एकनिष्ठ सैनिक (एकमेव सैनिक) मुक्ता माझे आदेश गुमान पाळायचा. असाच एक दिवस ओढा ओलांडताना मुक्ताची चप्पल वाहून गेली. एका पायात उरलेली चप्पल आणि दुसरा पाय अनवाणी, अशा परिस्थितीत, मी तिला शाळेत सोडून आलो.

मुक्ताने खरे बोलू नये एवढा साधा आदेश पाळला, तर सर्व प्रश्न सुटतील, असा माझा विचार. मी घरी परत आलो. थोड्या वेळाने शाळेतून बाईंनी मुक्ताला घरी पाठवले, प्यूनने सांगितले. ‘तुमची मुलगी एक चप्पल घालून शाळेत आली आहे आणि काही केल्या दुसरी चप्पल कुठे आहे, ते सांगत नाही.’ आईने मला विचारल्यावर मला सगळे सांगावेच लागले; पण मुक्ता शे‌वटपर्यंत काहीही बोलली नाही. ‘दादा’ विषयीचा असा ‘बाँड’ ती आजही जपते! कधी कधी तो एकनिष्ठपणा हास्यास्पदही वाटतो. आता या वयात, विशेषत: आई-बाबा आणि माझी बायको निवेदिता हमखास या ‘बावळट’पणाविषयी हसतात आणि टिप्पणी करतात. पण, मला माझ्या ‘दादा’गिरीचे वावगे वाटत नाही आणि मुक्ताला तिचे वागणे बालिश वाटत नाही. काही गोष्टी पूर्वापार चालत येतात आणि त्या रीतिरिवाजांना आपण कधीही प्रश्न करत नाही, तसंच झालं आहे आमच्या नात्याचं.

[email protected]
(देवदत्त ऊर्फ देबू बर्वे हे चित्रकार आणि व्हिज्युअल डिझायनर आहेत.)
पुढील स्लाइड्सवर वाचा, देबू यांनी सांगितेला मुक्ताचा जीवनप्रवास...
चिंचवड, बालपण, टीव्ही.. नंतरचे दिवस मुक्ता आणि मी ‘ट्रांझिट’; जनरेशनमधले आहोत. मोठ्या भावाला ‘दादा’; म्हणणारी, आई-बाबांना ‘आई-बाबा’; म्हणणारी मुलांची शेवटची पिढी म्हणता येईल. म्हणजे आईला ‘ए आई’; आणि बाबांना अहो बाबा (ए बाबा नव्हे!) म्हणणारी. त्यामुळे, बाकी सगळ्या गोष्टी आपोआप वर्गवारी करता येण्यासारख्या आहेत. आमची आई चिंचवडच्या शाळेत शिकवायची. ती फत्तेचंद जैन विद्यालयातली मुलांमध्ये प्रिय असणारी शिक्षिका होती. अप्रतिम ‘मराठी’; भाषा शिकवणारी. विशेषत: कविता, गॅदरिंग स्पर्धांसाठी नाटके बसवणारी आणि स्वत: अतिशय सुंदर चित्र काढणारी आमची आई. आमच्या घरात परंपरेने, आमच्या आमच्यात असे म्हटले जाते की, ‘कला-गुण’; आम्ही आईकडून घेतले आहेत. म्हणजे आमच्या बाबांकडून जणू काही घेतले नाही. पण ते अजिबात खरे नाही. एक परफेक्ट मध्यमवर्गीय मराठी कुटुंबामध्ये लहानाचे मोठे होण्याचे भाग्य मुक्ताला आणि मला लाभले. आई-बाबा दोघेही महाराष्ट्रातल्या अगदी भिन्न भागांमधून कामानिमित्त चिंचवडला स्थायिक झाले. घरात बाबा खूप वाचायचे, ‘सोबत’;सारखी साप्ताहिके, मला त्यातले अवाक्षरही कळत नसताना घरातल्या वातावरणात होती. पु.ल. देशपांडे यांचे साहित्य वाचणे, पुण्याला जाऊन ‘बालगंधर्व’;ला नाटके बघणे, चित्र, रांगोळ्या स्पर्धा असा सगळा पोषक मसाला आईबाबांनी त्या वातावरणात भरून टाकला होता. चिंचवडमध्ये असूनदेखील लहानाचे मोठे होताना हा सगळा पोषक मसाला मुक्ता आणि मी पुरेपूर वापरला. कोणत्याही प्रकारचे भक्कम आर्थिक पाठबळ नसले (आणि लहानपणी हे सगळे तुम्हाला कळतही नसते), तरी अतिशय संपन्न सांस्कृतिक वातावरण आमच्या घरात होते. मुक्ताला आणि मला त्या वातावरणाला प्रतिसाद देणे फारच सोपे होते. मी आम्हाला ‘ट्रांझिशनल जनरेशन’;चे म्हणण्याचे कारण मात्र वेगळे आहे. घरी आलेला पहिला ब्लॅक अँड व्हाइट टीव्ही आम्हाला आठवतो आहे. दुपारपासून ‘मुंग्या’; बघत बसलो होतो, आम्ही दोघे आणि दूरदर्शनचा तो अँटिक लोगो गोल-गोल फिरू लागला, तेव्हा बिल्डिंगमधल्या मित्र-मैत्रिणींना बोलावून ताटवाट्या वाजवून नाचलो होतो. बाबांची पहिली बजाज स्कूटर, ‘मुंबई ते पुणे’; विमान प्रवासवाली शाळेची सहल, ‘कॅम्लिन’;ची कंपास पेटीतली कुपन्स चित्रकला स्पर्धेसाठी जपून ठेवणं, ही-मॅन, डकटेल्स असे सगळे नुसते अनुभवणे नव्हे, तर मनापासून अनुभवणे आणि त्या आठवणी अजूनही जपणे, असे सगळे त्यात होते. उन्हाळ्याच्या सुटीत आजोळी जाणे िकंवा कैऱ्या-चिंचा खाणे, हे सगळे त्या बालपणात नव्हते, पण व्हिडिओ गेम, उन्हाळी ‘वर्क शॉप’; असे तुलनेने नंतरच्या जनरेशनचे बालपणही ते नव्हते. मुंबईत राहणारा आमचा आतेभाऊ शेखरदादा रिझर्व्ह बँकेत काम करायचा, आणि त्याने आमच्यासाठी आणलेली अफलातून छोटी खेळणी आमच्यासाठी मौल्यवान होती. बाबांच्या मित्रांनी आणलेले फाइव्ह स्टार किंवा डबलडेकर चॉकलेट महत्त्वाचे होते, किंवा भाड्याने आणलेला कलर टीव्ही-व्हीसीआर आणि त्याबरोबर आणलेली तीन पिक्चर्स एक मराठी चित्रपट अशोक सराफ यांचा, एक हिंदी- कोणाचाही आणि एक इंग्लिश-जॅकी चॅन वगैरे हे सगळे ‘व्हॅल्युएबल’; वाटायचे. आता मागे वळून बघताना वाटते की, हो ते सगळेच महत्त्वाचे होते. पण हे आमचेच नाही, आमच्याबरोबर वाढलेल्या सगळ्यांच्याच आयुष्यात या गोष्टी महत्त्वाच्या होत्या. मी चित्रकार झालो आणि मुक्ता अभिनेत्री झाली, म्हणून नव्हे, पण डॉक्टर, इंजिनिअर, लेखक, पत्रकार आणि काहीही क्षेत्र निवडलेल्या आमच्या पिढीतल्या कोणालाही या आणि अशा तऱ्हेवाईक आठवणी आता महत्त्वाच्या वाटत असतील. सांगायचा मुद्दा हा की, आमच्या बालपणीदेखील याच गोष्टी मौल्यवान वाटल्या. चित्रकार आणि थोर अभिनेत्यांची चरित्रे वगैरे वाचून प्रेरणा मिळाली, अशातला भाग नव्हे.‘तुमची मुले वेगळी आहेत’; ते ‘मला तुमच्यासारखे व्हायचे आहे! मला आठवते, अनेकदा मुक्ता किंवा माझ्या कलागुणांचं कौतुक करण्याच्या प्रोसेसमध्ये कोणी आमच्या पालकांना म्हणायचे की ‘तुमची मुले वेगळी आहेत हो!’; आणि त्यावर आमची आई तत्परतेने म्हणायची. ‘तसे अजिबात नाही. आम्ही त्यांना हवे ते करू देतो.’; आताच्या मुलांच्या बाबतीत हे काही जगावेगळे वाटत नाही. खूपच वेगळ्या पद्धतीने आताचे पालक मुलांना वाढवताना दिसतात, प्रसंगी पराकोटीचे दुसरे टोक गाठताना दिसतात& पण तो विषयच वेगळा. ज्या वातावरणात आम्ही लहानाचे मोठे झालो, तिथे मुलांच्या महत्त्वाकांक्षा एका पठडीमध्ये बसवण्याचा पालकांचा हट्ट असायचा. त्यात सहामाही परीक्षा एका आठवड्यावर आली असताना, नाटकाच्या तालमीमध्ये जर शाळकरी मुले बिझी असली, तर जगावेगळी वाटणे स्वाभाविकच होते. पण तेव्हा काही लोकांनी कौतुक आणि काही लोकांनी वेड्यात काढले असेल तरी आता नक्की म्हणेन की, आमच्या आईबाबांच्या आमच्यावरच्या विश्वासाला शंभर मार्क द्यावे लागतील. हो, खरेच मुक्ता आणि मी जरा वेगळे होतो आणि ते वेगळे असण्याचे सगळे श्रेय आमच्या ‘तऱ्हेवाईक सांस्कृतिक’; पालकांना द्यावे लागेल. आता ‘मला तुमच्यासारखे व्हायचे आहे’; विषयी. माझ्यापेक्षादेखील मुक्ताच्या वाट्याला अशा चाहत्यांची संख्या खूप जास्त येते. अनेकदा नाटकाच्या प्रयोगानंतर ग्रीनरूममध्ये लहान मुला-मुलीला घेऊन आलेले पालक मी पाहिले आहेत. ‘ही तुमची मोठ्ठी फॅ ऽ ऽ ऽन आहे, हिला तुमच्यासारखे व्हायचे आहे. इत्यादी&’; आणि मुक्ताने त्या डोळ्यांची पापणीपण न मिटणाऱ्या पालकांना दिलेली क्लासिक उत्तरे मी ऐकली आहेत. मी, मुक्ता यावर अनेकदा त्यानंतर बोलतो. मुक्ता मला म्हणते ‘दादा, या लोकांना एंड-रिझल्ट हवा असतो, प्रोसेसशी काही घेणे नाही.’; मला वाटते, कमीत कमी शब्दांत यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने या मानसिकतेचे वर्गीकरण करता येणार नाही.मुक्ता, मुक्ताची ‘प्रोसेस’; कोणतीही प्रोसेस तुम्हाला घडवते? ती फक्त चित्रकाराला, अभिनेत्याला लागते का कोणालाही? ‘तुमचे ठीक आहे तुम्ही ‘क्रिएटिव्ह’;मधले आहात. म्हणजे काय? लोक जेव्हा असे कंपार्टमेंट्स करतात, तेव्हा हसू येते खरे तर. काहीच क्षेत्रातल्या लोकांना ‘क्रिएटिव्हिटी’; लागते असे म्हणणे म्हणजे, जगातल्या काहीच लोकांना फुलाचा वास घेता येतो, असे म्हणण्यासारखे आहे. ‘अभिनेत्याचे’; अभिव्यक्त होणे सार्वजनिक असते म्हणून, त्याचे क्रिएटिव्ह असणे सार्वजनिक असते, असे मला वाटते, अन्यथा ही कोणत्या एका क्षेत्राची मक्तेदारी नाही. नेमकी इथेच, माझी मुक्ताचा दादा असण्याची आणि ‘नो ऑल’; असण्याची सद्दी संपली खरे तर. कारण हा विचार पक्का झाला, तो मुक्तामुळेच. तिचा अभिनय क्षेत्रात जाण्याचा निर्णय, त्यानंतरचा स्ट्रगल, तिचे निर्णय, निवडलेले-नाकारलेले चित्रपट, नाटके, मालिका आणि त्यानंतर तिचे अभिनेत्री म्हणून प्रस्थापित होणे ही सगळी ‘प्रोसेस’; जवळून पाहिली आणि लक्षात आले की ती म्हणते ते खरे आहे. ‘प्रोसेस महत्त्वाची& प्रवास करणे महत्त्वाचे, डेस्टिनेशनला पोहोचणे हे तितके महत्त्वाचे नाही. काय असते, ही प्रोसेस&? मला वाटते, त्याची एकच टेम्प्लेट असू शकत नाही. ज्याचा-त्याचा प्रवास ज्याने-त्याने करायचा असतो. रस्ता सगळ्यांसाठी सारखाच असतो, तरी अनुभवाची पोतडी प्रत्येकाची वेगळी असते. ‘मला तुमच्यासारखे व्हायचे आहे’; हे मुळातच शक्य नाही, आणि म्हणूनच मला स्वत:ला मुक्ताची तुलना कुठल्याही बऱ्या, वाईट, उत्तम, विख्यात अभिनेत्रीशी केलेली आवडत नाही. कोणी मुक्ताला म्हणाले की ‘तुमचे काम पाहिले तर अमक्या तमक्या अभिनेत्रीची आठवण होते.’; तर मी समजू शकतो. पण मुक्ताची प्रोसेस खूप जवळून पाहिल्यामुळे मी ठामपणे असे म्हणेन की, ते पूर्ण खरे नाही, फार तर असे म्हणणे, मी मान्य करीन की, याचा अर्थ मुक्ता - या कॅटेगरीतल्या अभिनेत्रीमध्ये मोडते असे लोकांना वाटते& पण तितकेच. या पलीकडे मुक्ताचा प्रवास हा तिचा स्वत:चा आहे. तिचे यश, अपयश आणि ‘एंड रिझल्ट’; हा सर्वस्वी तिचा आहे. मेंटॉर, आदर्श, दैवत आणि ‘थोर’; जर काही गोष्टी मोठा भाऊ म्हणून मी मुक्ताला सोपवल्या असतील& किंवा जर सहजपणे एखाद्या गोष्टीचे श्रेय मला घ्यायचे असेल तर मी या गोष्टीच घेईन. मुक्ताला मी गोष्टी ‘नाकारायला’; शिकवल्या. मी स्वत: माझ्या आर्ट््स स्कूलमधल्या शैक्षणिक कालखंडात कोणत्याही चित्रकाराला, शिक्षकाला, जिवंत अथवा मृत ‘प्रस्थापित’; थोरांना, देव मानणे कटाक्षाने टाळले. त्याची मूळं कशात आहेत माहीत नाही, पण जेव्हा मी माझी कला महाविद्यालयातली वर्ष संपवून उद्योग-धंद्याला सुरुवात केली, त्याच वेळेस मुक्ताने बारावीनंतर पुण्याच्या ‘ललित कला केंद्रात’; नाट्यशास्त्राचे शिक्षण सुरू केले. नव्वदच्या दशकातल्या मध्यातला काळ. मुक्ता फारच चांगल्या वातावरणात आणि उत्तम मित्रमंडळींच्या संगतीत पुणे विद्यापीठात शिकली आणि तिला फारच उत्तमोत्तम आणि ‘प्रस्थापित’; गुरुजन लाभले. ती त्यांना मानते, आदर करते, वाद घालते, सहमती-असहमती दर्शवते. कौतुक करते. टीका करते& पण कधीही कोणाला ‘देव’; मानत नाही. प्रसंगी काही गुरुवर्य मंडळींनी त्यामुळे तिला वेगळ्या पंगतीला बसवले आहे. पण मुक्ताला त्यामुळे फरक पडला नाही. कोणी मोठ्या हुद्द्यावर अथवा मोठ्या सन्मानाचा मानकरी आहे, म्हणून कोणालाही गुरुस्थानी मानण्याचा मूर्खपणा तिच्याकडून कधीही झाला नाही. हे फक्त माणसाच्या बाबतीत नव्हे, पण काही प्रस्थापित प्रवाहाच्या बाबतीतही म्हणता येईल. कलाक्षेत्रात विशेषत: ललित कलांमध्ये काही सरधोपट ठोकताळे आहेत. हे म्हणजे ‘प्रायोगिक’;, हे म्हणजे ‘व्यावसायिक’;, हे म्हणजे ‘चांगला अभिनय’;, हा म्हणजे ‘सन्मान’;, ‘हे म्हणजे फालतू प्रोजेक्ट.’; ही यादी फार मोठी आहे. बऱ्याचदा ही वेगवेगळ्या सांस्कृतिक माफियागिरीमधून येते, बऱ्याचदा सांस्कृतिक अगतिकतेमुळे लोक एका डबक्यात जाऊन बसतात. पण मुक्ताने ते कटाक्षाने टाळले आहे. तिचे चाहते, प्रेक्षक ते जोखतात आणि त्यांच्या दृष्टिकोनातून जे दिसते, त्याचे कौतुकही करतात. त्यांचे शब्द कधी फार साधे असतात. ‘तुमचे ‘जोगवा’;तले काम, एकदम बेस्ट’;, ‘तुमची मंजुळा, आम्ही अजून विसरलो नाही.’; ‘तुमचा ‘डबल-सीट’; फार फार अावडला.’; पण मुळात, यामागे मुक्ताचे तिच्या प्रोजेक्ट्सविषयी सिन्सिअर असणे, तिचा दिग्दर्शकांवरचा विश्वास आणि सह-अभिनेत्यांबाबतचा आदर असे बरेच फॅक्टर असतात आणि याचा संबंध तिच्या थेट जडणघडणीशी निगडित आहे. ती सरधोपटपणे एका पठडीत जाऊन अडकली असती तर अशी कित्येक प्रोजेक्ट्स आणि भूमिका तिने नाकारल्या असत्या आणि एकाच पद्धतीचे तथाकथित प्रस्थापित काम करून ‘थोर’; झाली असती. तिचा भाऊ म्हणून, तिच्या कुठल्याही एका भूमिकेविषयी किंवा तिच्या प्रसिद्ध असण्याविषयी मी समाधानी नाही, पण तिच्या या वैविध्यपूर्ण भूमिका करण्याच्या पद्धतीविषयी मला अतोनात अभिमान वाटतो. ‘छापा काटा’;, ‘फायनल ड्राफ्ट’;, ‘कबड्डी कबड्डी’; अशी तिची नाटके ‘मुंबई-पुणे-मुंबई’;, ‘जोगवा’;, ‘डबल सीट’; अशा तिच्या फिल्म्स आणि तिने ललित कला केंद्रात तिच्या मित्रांंबरोबर केलेली प्रायोगिक नाटके, हे सगळेच फार मनापासून ती करत आली आहे& आणि प्रत्येक वेळेस आम्ही तिचे अगदी जवळचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी अपार कौतुकाने हे अनुभवत असतो. तिचे चाहते आणि प्रेक्षकांच्या बरोबरीने&पोतडीमधले सगळेच महत्त्वाचे मी उपयोजित कला, चित्रकला यांच्या अनुषंगाने माझ्या टीममधल्या डिझायनर्सना आणि माझ्या विद्यार्थ्यांना एक गोष्ट आवर्जून सांगत असतो. चित्रकार, डिझायनर आहात तर तो फक्त पेशा नव्हे, तर ती अख्ख्या जीवनाची दिशा आहे. कामाच्या आठ तासांत जागतिक दर्जाचे आर्टवर्क करून घरी जाताना, तुम्ही रस्त्यावर कागदाचा बोळा टाकू शकत नाही. रस्त्यावरून घरी जाणारा, दुपारी डबा खाणाराही चित्रकारच असायला हवा. मुक्ताच्या बाबतीत हे तंतोतंत बघायला मिळते. तीन तासांच्या नाटकाच्या प्रयोगानंतर किंवा दिवसभराच्या शूटिंगनंतर तिच्यातली अभिनेत्री निवृत्त होत नाही. तिला लोकांचे निरीक्षण करताना, नोट्स काढताना, स्केचेस करताना किंवा छोटी-छोटी निरीक्षणे डायरीत लिहिताना मी तिला खूपदा पाहिले आहे. ‘हायवे’;सारख्या सिनेमामध्ये, ज्या नजाकतीने ती शिवराळ बोलते& ते काही शिकून आलेले नाही. त्यातली सहजता तिने तिच्यातल्या २४ तास अभिनेत्री असण्यामुळे कमावलेली आहे. पण अभिनेत्री असणे हे निव्वळ प्रसिद्धी, पैसा आणि कौतुक यांनी व्यापलेले जग नाही. जसे कौतुकाचे तसेच टीकेचे (प्रसंगी बेजबाबदारपणे केलेल्या टीकेचे) धनी होण्याची तयारी असावी लागते. मुक्ताच्या बाबतीतही अनेकदा क्लेशकारक अनुभव येतात. कोणतेही ‘रॅशनल’; न विचारता भाऊ म्हणून तिच्या बाजूने खंबीरपणे उभे राहावे लागते. सुदैवाने ती एकटी अजिबात नाही. तिचे मित्रमंडळ आणि मी (मी आणि माझी बायको निवेदिता), आमचे आई-बाबा असे मोठे बॅक-ऑफिस मुक्ताच्या मागे खंबीर उभे असते. प्रत्येकाचेच असे सपोर्ट इंजिन उभे असतेच, पण अभिनेत्याला याची गरज खूप जास्त लागते. लाखो लोक, अनेक चाहते, प्रेक्षक सतत तुमच्या कामाकडे लक्ष ठेवून असतात. जसे ते कौतुक करताना थांबत नाहीत, तसेच टीका करायलाही. अभिनेत्याचा रोजचा प्रवास अनेकदा ताणतणावांनी भरून जातो. कौतुकापेक्षाही अशा नकारात्मक वातावरणात आप्त-मित्रांची सोबत जास्त लागते. अभिनेत्याच्या जडणघडणीमध्ये, बाजूने अशा सगळ्याचीच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे बांधणी होत असते. मला अजूनही तो प्रसंग आठवतो. मुक्ताने सर्वात आधी मला ठामपणे सांगितले, ‘दादा मला ‘ललित कला केंद्रा’;त जायचे आहे. बारावीनंतर मी नाटक करणार’; आई-बाबांचा विरोध होणार नव्हता. पण मुक्ताच्या वतीने हे प्रपोजल चर्चेला आणण्याची जबाबदारी माझ्यावर आली होती. आमचे बाबा सेकंड शिफ्ट संपवून रात्री साडेबारा-एक वाजता घरी आले. आम्ही जागे होतो आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली. ‘मुक्ता, तुला अभिनय क्षेत्रात करिअर करायचे आहे, हे नक्की ना? पण म्हणजे त्याबरोबरीने येणारे सगळे चढ-उतार, प्रवास आणि स्ट्रगल याची तयारी आहे तुझी?’; बाबांनी मुक्ताला विचारले. मुक्ता ‘हो’; म्हणाली आणि मला खुणेने विचारले, ‘हो’; हे उत्तर बरोबर आहे ना? तिथून सुरू झालेला तिचा ‘ऑन-गोइंग’; प्रवास, चालूच आहे आणि तो असाच चालू राहणार आणि साहजिकच तिच्याबरोबर चालू राहणार. प्रत्येकाचा आपला-आपला प्रवास कुटुंबीयांचा, चाहत्यांचा, प्रेक्षकांचा आणि सहकलाकारांचा. तिच्या पोतडीमधले सगळेच आहे असे सुरस, रंजक आणि खूप महत्त्वाचे.
X