आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्जकता आणि सवंगतेचे लक्षवेधी द्वंद्व (माध्यम-मीमांसा)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्जनशील कलात्मकता आणि सवंग पण हमखास खप असलेल्या मीडिऑकर मालिका यांच्यातलं द्वंद्व हा मुद्दा अभिराम भडकमकर लिखित ‘अॅट एनी काॅस्ट’ या कादंबरीमध्ये अतिशय ठळकपणे मांडलेला आहे. खरं तर याच मुद्द्यावर भाष्य करण्यासाठी या साऱ्या कथानकाचा व्यूह रचला आहे, याची कल्पना आपल्याला पुस्तक वाचतानाच येऊ लागते.

२००३ मध्ये मी जेव्हा मनोरंजन क्षेत्रात काम सुरू केलं, तेव्हा टेलिव्हिजनवर साप्ताहिक मालिकांची सद्दी संपून डेली सोपचं राज्य सुरू होत होतं. ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’, ‘हसा चकटफू’ अशा काही दर्जेदार आणि अखेरच्या ‘विकली सोप’ना असिस्ट करायचं भाग्य मला लाभलं, हे माझं नशीब. त्यानंतर सुरू झाला तद्दन सास-बहु टाइप डेली सोपचा ‘दौर’, ज्यात वास्तवाला सोडून काही म्हणजे काहीही घडवता येत होतं. लोक मरत होते, पुन्हा जिवंत होत होते, प्लास्टिकची भांडी विकत आणावीत इतक्या सहजपणे ‘प्लास्टिक सर्जरी’ होऊ शकत होती, लिप घेण्याच्या नावाखाली वीस वर्षांच्या नायिकेला बावीस-तेवीस वर्षांची मुलं दाखवली जात होती. मालिकांच्या या बदललेल्या स्वरूपामुळे सर्जनशील घटकांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता अभिराम भडकमकर यांनी लिहिलेल्या ‘अॅट एनी कॉस्ट’ या कादंबरीत अचूक टिपली गेली आहे. धंदेवाईक मालिका, सर्जनशीलता, कलेचं व्यावसायिकीकरण, अभिरुचीचा घसरत जाणारा दर्जा, माणूस, जीवन, मृत्यू, सुख, दु:ख अशा अनेक पातळ्यांवर चिंतन करणारी एक सुरेख कादंबरी भडकमकरांनी लिहिली आहे.

एक यशस्वी निर्माता, विकास सरदेशमुख... ज्याच्यावर असलेली चॅनलची मेहरनजर फिरते आणि एका रात्रीत होत्याचं नव्हतं होऊन, तो धुळीला मिळतो. सगळं हरलेला विकास सगळ्यांपासून पळण्यासाठी त्याच्या गावी येतो. तिथे धनंजय चांदणे नावाचा गावातलाच एक छोटासा नट त्याला भेटतो, ज्याला ब्रेन ट्यूमर आहे आणि तो लवकरच मरणार आहे. त्याच्या याच प्रॉब्लेममध्ये विकासला दिसते आपली नवी मालिका, आपलं नवं यश आणि सुरू होतो एक असा प्रवास ज्यात धनंजय, त्याचा परिवार, त्याचं गाव चंदनवाडी, तिथले गावकरी, तिथलं राजकारण, चॅनल, मीडिया, सर्वसामान्य प्रेक्षक, सारं सारं ढवळून निघतं. थोडक्यात, अॅट एनी कॉस्टचा विषय असा मांडता येत असला तरी या कादंबरीची व्याप्ती इतकी मर्यादित नक्कीच नाही. या कादंबरीला अनेक पदर आहेत, जे एक एक आयुष्य उलगडत जातात आणि एक साधीशी वाटणारी मालिका आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला कुठे कुठे आणि कसा कसा छेद देत जाते, हे आपल्यासमोर उलगडू लागतं.

अभिराम भडकमकर यांनी या कादंबरीतून एक फार मोठा कॅनव्हास आपल्या समोर उभा केला आहे. मालिका निर्मितीतली प्रत्येक प्रोसेस त्यातून आपल्या डोळ्यासमोर उभी राहते, पण पोहोचत राहतो तो त्या प्रोसेसमधला माणूस. मग तो विकाससारखा एक मुत्सद्दी निर्माता असो किंवा ‘हरामखोर’ या विशेषणाने संबोधली जाणारी डॉमिनेटिंग प्रोग्रामिंग हेड ‘संयुक्ता’ असो. अगदी कपर्दिक रोल करून उद्या सिनेमाचा ‘हीरो’ बनण्याची स्वप्नं पाहणारं ‘स्ट्रगलर्स’चं टोळकं असो किंवा संपूर्ण आयुष्यात अनेक सिनेमे करूनही ‘ज्युनियर आर्टिस्ट’ हीच ओळख उरलेली ‘शब्बो दि’ असो... अभिनय ठासून भरलाय पण रूप नाही, म्हणून ‘साइड रोल’ करणारी ‘तनुजा’, सारं काही जिंकता जिंकता सारं काही गमावत जाणारा ‘शुक्लेंदू’, काम मिळवताना केलेला लाळघोटेपणा स्वभावाचा भाग बनून राहिलेला ‘धरम’, चॅनल इपीच्या खुर्चीचा माज करणारी आणि क्षणात नो वेअर होणारी ‘सृष्टी’... ही सारी हाडामांसाची माणसं या कादंबरीद्वारे भेटतात आणि अशा अनेक अंगांना एकत्रित करत ही कादंबरी भाष्य करत जाते, सीरियल इंडस्ट्रीतल्या फोलपणावर आणि क्षणभंगुरतेवरही...

या कथानकाच्या ओघात सर्जनशील कलात्मकता आणि सवंग पण हमखास खप असलेल्या मीडिऑकर मालिका यांच्यातलं द्वंद्व हा मुद्दादेखील अतिशय ठळकपणे मांडलेला आहे. खरं तर याच मुद्द्यावर भाष्य करण्यासाठी या साऱ्या कथानकाचा व्यूह रचला आहे, याची कल्पना आपल्याला कादंबरी वाचतानाच येऊ लागते. मनोरंजन क्षेत्रात वावरताना हेच द्वंद्व मनात घेऊन फिरणारे अनेक जण मला भेटले आहेत. नाटक आणि सिनेमाचं आयुष्य मर्यादित आणि मिळणारा पैसाही कमी म्हणून त्यांना सीरियलकडे वळायचं असतं, पण सीरियलमध्ये पैसा असला तरीही अजिबात ‘क्रिएटिव्ह सॅटिसफॅक्शन’ नाही, म्हणून त्याचं मन तिथेही रमत नाही. अशी त्रिशंकू अवस्था असलेल्या अनेक कलाकार, तंत्रज्ञांसारख्याच दोन पात्रांचं प्रयोजन या कादंबरीत हा पेच मांडण्यासाठी सुरेखपणे केलेलं आहे. धनंजय चांदणेच्या मृत्यूवर बेतलेल्या या मालिकेचा सहायक दिग्दर्शक म्हणून अरविंद या प्रोसेसमध्ये ओढला जातो. काहीतरी नवीन शिकायला मिळेल आणि आर्थिक विवंचनाही सुटतील, म्हणून हे काम सुरू करतो आणि या साऱ्या परिस्थितीत अभिजात साहित्यिक मूल्यांचे संस्कार असलेल्या त्याच्या मनाची अवस्था अतिशय बिकट होऊन जाते. नाट्य आणि कथा मांडणी याबद्दल रंगमंचावरील अनुभवातून, विचारवंतांच्या साहित्यातून त्याने जे जे काही आडाखे बांधलेले असतात, त्याच्या विरुद्धच सगळं इथे घडत असतं. हे सारं प्रेक्षकांना मुळीच आवडणार नाही, म्हणताना प्रेक्षक ते डोक्यावर घेतात आणि कलेबद्दल त्याच्या मनात असलेल्या सगळ्या व्याख्या बदलून जातात. अरविंदचं हे वैचारिक स्थित्यंतर आपल्यासमोर स्टेप बाय स्टेप येतं. त्याची होणारी ओढाताण, पैसा आणि कलात्मकता यातील काय निवडावं हा पेच, ते करताना आयुष्यभर झालेल्या संस्कारांशी करावी लागणारी तडजोड, आणि इतकं सारं करून नेमकं सुख कशात हा त्याच्यापुढे उरणारा प्रश्न, आपल्यालाही विचार करायला भाग पडतो. आपण पाहत असलेल्या मालिकांबद्दल, त्यांच्या कलात्मक दर्जाबद्दल आणि प्रेक्षक म्हणून स्वत:बद्दलही.

या कादंबरीच्या विषयाचा मूळ गाभा हा खूप गंभीर असला तरीही लेखकाने त्याची मांडणी करताना कुठेही तसा आव आणलेला नाही. अरविंदचं स्थित्यंतर, त्याच्या मनातली होणारी घालमेल हे सारं दाखवण्यासाठीही अगदी साध्या प्रसंगांचा हुशारीने वापर केला आहे. अरविंद आणि आभासदरम्यान होणारं ऑनलाइन चॅटिंग, चॅनल ऑफिसमधल्या मीटिंग, फाइव्ह स्टारमधल्या गप्पा, शूटिंगनंतर दारू पिताना रंगलेली मैफल अशा अनेक ‘रेग्युलर’ चर्चांमधून ही माणसं आणि त्यांचे विचार आपल्या रोजच्या बोलीभाषेत आपल्यापर्यंत पोहोचतात. त्यातही कोण चूक, कोण बरोबर, याचा न्याय करण्याच्या फंदात न पडता लेखकाने प्रत्येक पात्र, त्याचे विचार जसे आहेत तसे रंगवले आहेत. त्यामुळेच संपूर्ण कादंबरी वाचताना कुणाकडेही पारडं न झुकता आपणही तटस्थपणे जे घडतंय ते पाहू शकतो आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतूनही पडतो. शेवटाजवळ जाताना मात्र एका पॉइंटला विषय जरा निसटल्यासारखा होतो; पण तोपर्यंत आपण त्या पात्रांमध्ये इतके गुंतलेले असतो की अखेरची काही पानं सर करणं जड जात नाही. अभिराम भडकमकर यांनी मनोरंजन क्षेत्रातील आपला सारा अनुभव या कादंबरीत अतिशय प्रभावीपणे मांडल्याचं प्रत्येक बारकाव्यातून जाणवत राहतं. पण तरीही ही कादंबरी फक्त या क्षेत्राशी संबंध असलेल्या लोकांपुरती मर्यादित न राहता सर्वसामान्यांचं मनोरंजन करणारीही ठरते, हे विशेष.

अॅट एनी कॉस्ट
लेखक - अभिराम भडकमकर
प्रकाशक - राजहंस प्रकाशन
पृष्ठसंख्या - ३७३
मूल्य - ३०० रु.

omkar.mangesh@gmail.com