आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोंगाटप्रिय तरीही स्वागतशील अॅडली (मैत्री-पर्व)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१८४० मध्ये ड्युमोंट डि ऊर्विले हा फ्रेंच साहसवीर अंटार्क्टिकावर पोहोचला. या पेंग्विन्सनी त्याचं ‘यथोचित’ स्वागत केलं आणि त्यांची कर्णकर्कश पिकपिक चालू झाली. या पिकपिकीने ऊर्विलेला आपल्या बायकोची आठवण झाली. त्याच्या बायकोचं नाव अॅडेली होतं. तो या पेंग्विन्सना अॅडेली म्हणू लागला आणि तेच नाव रूढ झालं.
माणूस अंटार्क्टिक भूमीवर पाऊल ठेवतो आणि त्याच्या स्वागताला तिथं पेंग्विन्स तयार सज्ज. हे अॅडेली पेंग्विन. हे साधारणतः उणे २० से. तापमानात सागरकाठच्या हिमभूमीवर वस्तीला असतात. हजारो पेंग्विन एकत्र राहत असतात. सामान्यजनांना (विशेषतः बाळ-गोपाळांना) अंटार्क्टिकाचं आकर्षण पेंग्विनच. अंटार्क्टिकाहून परतल्यावर प्रत्येक जण पेंग्विनविषयीच विचारायचा. पेंग्विन हे पक्षी असूनही त्यांना उडता येत नाही. याचं मुख्य कारण, त्यांचं गब्दुल शरीर. त्यांचे पंख अगदीच छोटे असतात. उडण्यासाठी त्यांचा उपयोग होत नसला तरी छोटे पाय, आखूड शेपटीसमवेत पोहताना ते सुकाणू म्हणून उपयोगी पडतात. गब्दुल असले तरी उंच उडी मारण्यात पटाईत. समुद्रातले क्रिल गट्टम करून झाले की काठावर येण्यासाठी ते दोन-अडीच मीटर उडी सहज मारू शकतात.

माणसासारखे ते दोन पायांवर चालतात. छोट्या पायांमुळं त्यांची गती मंद असते. परंतु त्यांची दुडुदुडु चाल फारच गंमतशीर असते. चाल मंद असल्याने संकटसमयी ते पोटावर ओणवे होतात आणि पायाची बोटं आणि पंख यांच्या साहाय्याने सरपटत आपला वेग वाढवतात. पेंग्विन्सच्या १६ प्रजाती अंटार्क्टिकावर आढळतात. छोटे व मोठे पेंग्विन असं त्यांचं ढोबळ वर्गीकरण केलं जातं. छोटे पेंग्विन्स मुख्यतः कृष्ण-धवल रंगात असतात, तर मोठे पेंग्विन रंगीबेरंगी असतात. मोठ्या पेंग्विन्समध्ये किंग (उंची १ मीटर) आणि एंपरर पेंग्विन (उंची सव्वा मीटर) अतिशय देखणे असतात. किंग १५-१६ कि.ग्रॅ. वजनाचे असतात. यांचे शरीर रंगावली असते. विधात्याने त्यांच्या कायेवर निळाईची पिचकारी शिंपडली असावी. खांदे व मान चंदेरी करडे. गाल तपकिरी मऊसूत लोकरीचे. कान म्हणजे चंद्रकोरच. उर्वरित कायेवर नारिंगी छटा. एंपरर हे सर्वात मोठे पेंग्विन. हेही टेक्निकलर. वजन ३० कि.ग्रॅ. भरत असल्याने त्यांच्या गब्दुलपणाची कल्पना यावी. त्यांच्या केवळ दोन डझन रूकरीज अंटार्क्टिकावर आहेत.

गेट्टू, चिनस्ट्रप आदी प्रजाती छोट्या पेंग्विनमध्ये मोडतात. छोट्या पेंग्विनमध्ये महत्त्वाचे अॅडेली. साधारणपणे पाऊण मीटर उंचीचे. अंटार्क्टिकावर स्वागताला अॅडेली पेंग्विन्सच असतात. माणूस पाहून ते बुजत अगर आक्रमक होत नाहीत. त्यांच्याशी दोस्ती होऊ शकते. त्यांच्याशी हस्तांदोलन (पंखहस्तांदोलन) करता येतं. ते अत्यंत चौकस असतात. नवखा प्राणी पाहून त्यांचं कुतूहल जागं होतं. एखादा पेंग्विन धीटपणाने पुढं येतो आणि या नवख्या प्राण्याशी ‘पिकपिक... पिकपिक’ संवाद साधू इच्छितो. त्याच्या संवादाला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. तो आपल्या जातभाईकडं (त्यात काही भगिनीही असतील) परततो. त्यांच्यात काही पिकपिकिंग होतं. मग दुसरा पेंग्विन पुढं सरसावतो. त्याच्या पिकपिकिंगलाही हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. शेवटी सर्वच पेंग्विन्सची पिकपिक... पिकपिक... चालू होते. कर्कश आवाजाचा गोंगाट चालू होतो. या गोंगाटाला माणूस वैतागतो. हे अॅडेली पेंग्विन. यांच्या ‘अॅडेली’ या नामकरणामागचा किस्सा मनोरंजक आहे.

गोष्ट १८४० मधली. ड्युमोंट डि ऊर्विले हा फ्रेंच साहसवीर अंटार्क्टिकावर पोहोचला. या पेंग्विननी त्याचं ‘यथोचित’ स्वागत केलं आणि त्यांची कर्णकर्कश पिकपिक चालू झाली. या पिकपिकीने ऊर्विलेला आपल्या फ्रान्समधील बायकोची आठवण झाली. त्याच्या बायकोचं नाव अॅडेली होतं. तो या पेंग्विनना अॅडेली म्हणू लागला आणि तेच नाव रूढ झालं.

इंडो-फ्रेंच टेक्निकल असोसिएशनमध्ये माझा अंटार्क्टिकावरचा स्लाइड शो चालू होता. तिथं हा किस्सा मी सांगितला. फ्रेंच पुरुष (त्यांच्याच) बायकांकडं बघून हसू लागले. मी बायकांना दिलासा दिला, फ्रेंच बायांनो, एवढं मनाला लावून घेऊ नका. (खरं म्हणजे फ्रेंच महिला अशा गोष्टी मनाला लावून वगैरे घेणा-या नसतात. चांगल्या खेळकर-स्पोर्टी असतात.) भारतातही अशीच परिस्थिती आहे. कदाचित महिलांची पिकपिक हा वैश्विक मामलाही असू शकतो. त्यानंतर त्यांना पुढचा किस्सा सांगितला. ‘आपल्या बायकोची पिकपिक ऊर्विलेने जगजाहीर केली असली, तरी त्याचं बायकोवर अत्यंत प्रेम होतं. याच मोहिमेत त्याने एका बेटाचा शोध लावला. त्याने त्याचं नामकरण ‘टेरे अॅडेली आयलंड’ असं केलं.’ टाळ्या मिळाल्या, हे सांगायला नको.
मला शिकाडा किड्याच्या कवितेची आठवण झाली. शिकाडा हा जंगलात, बाग-बगिचांत आढळणारा कीटक. मानव-पुरुषाला हेवा वाटावा असं त्याचं जीवनगाणं. हा कीटक सुरेल आवाजात गुणगुणतो. परंतु नर शिकाडा; मादीला आवाज नाही. एका इंग्लिश कवीला याचा खरोखरीच हेवा वाटला आणि त्याने काव्य रचलं-
Happy the cicada’s lives
They have voiceless wives