आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Divya Education-‘चिकाटी’पोटी फळे रसाळ गोमटी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महान कामे केवळ सामर्थ्याने नाही तर चिकाटीच्या बळावर पूर्णत्वास जातात.- सॅम्युअल जॉन्सन.
हा ती घेतलेलं कोणतंही काम पूर्ण करण्यासाठी अनेक गोष्टींची गरज भासते. या गोष्टी म्हणजे मेहनत, उत्साह, विश्वास, ज्ञान इत्यादी या त्या गोष्टी पूर्ण करण्याची साधने असतात, पण ही साधने असूनही ब-याचदा कामं पूर्ण होत नाहीत. त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्या अंगी असलेला चिकाटीचा अभाव. ही चिकाटी जर नसेल तर एखादं सोपं काम पूर्ण होणंही अवघड होऊन जातं, पण चिकाटी असेल तर कठीण आणि वेळखाऊ कामेही तडीस नेली जातात. ही चिकाटी मोठी चिवट गोष्ट आहे. ती अंगात भिनवणं ही जरा कठीणच बाब असते, पण एकदा का तिची सवय लागली तर मात्र तुमच्या प्रत्येक कामात तिची मोलाची मदत होऊ शकते.
चिकाटीचा हा गुण निसर्गात सगळीकडे आढळतो. भली थोरली क्लिष्ट वारूळे उभारणारी मुंगी, शिकारीच्या शोधाने तासन्तास दबा धरून बसणारे शिकारी प्राणी, पाणी नसलेल्या जागेतही केवळ पहाटेच्या दवावर स्वत:चा जीव जगवणा-या वनस्पती या चिकाटीच्या बळावरच जगतात. कवयित्री बहिणाबार्इंनी आपल्या एका कवितेत सुगरण पाखराच्या चिकाटीची गोष्ट अतिशय सुंदर शब्दांत मांडली आहे. त्या लिहितात,
खोपा इनला इनला, जसा गिलक्याचा कोसा।
पाखराची कारागिरी, जरा देख रे माणसा॥
तिची उलीशीच चोच, तेच दात, तेच ओठ ।
तुले देले रे देवानं, दोन हात, दहा बोट ॥
सुगरण पक्षी इवलासाच असतो, पण त्याची घरटी सुरेख विणलेली असतात. आणि इतकं सुरेख विणकाम ते फक्त आपल्या चिकाटीच्या बळावर करतात. आपल्या मनासारखं घरटं झालं नाही तर ते सोडून ते नवं घरटं विणायला घेतात. जोवर स्वत:चं पूर्ण समाधान होत नाही तोवर त्याचं हे विणकाम सुरू असतं. या छोट्याशा पाखराकडून आपल्यालाही चिकाटीच्या ब-याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.
हाती घेतलेलं काम पूर्ण होत नाही तोवर स्वस्थ न बसणे.
आपल्या कामानं आपलं पूर्ण समाधान होत नाही तोवर ते करत राहणे. म्हणजेच परिपूर्णतेचा ध्यास बाळगणे.
हाती काय साधनं आहेत त्यापेक्षा आपल्याला काय साध्य करायचं आहे ते महत्त्वाचे मानणे.
जी साधनं उपलब्ध आहेत त्यांचाच योग्य तो उपयोग करणे.
नसलेल्या साधनांची भरपाई आपल्या चिकाटीच्या बळावर करणे.
श्रमांत आनंद शोधणे व काम हाच विरंगुळा समजणे.
चिकाटी हा आत्मसात करण्याचा व सवयीने अंगी रुजवण्याचा गुण आहे. हे एका दिवसात होत नाही. आपल्या नेहमीच्या लहानसहान कामांतही तिचा उपयोग करूनच त्याची सवय मनाला आणि शरीराला लावता येते. परिस्थिती प्रतिकूल असो, हाती साधने नसोत, कोणाची मदत न मिळो, अशा कठीण काळात केवळ आपल्या चिकाटीच्या बळावर अनेकांंनी महान कामं पूर्ण केली आहेत. आयुष्य कधीच सोपं नसतं, पण म्हणून हार मानायची नसते. चिकाटीने तिचा सामना करता येऊ शकतो. स्वत:वर विश्वास हवा की हे काम केवळ आपल्यासाठीच आहे आणि ते आपल्याच हातून पूर्ण व्हायला पाहिजे. चिकाटीच्या या गुणावरच यशाची फळे चाखायला मिळतात.