आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article About Pet Animal's By Gajoo Tayde In RASIK Divya Marathi

शुभशकुनी बोका (कोपच्यात)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चार वाजून सव्वीस मिनिटे झाली. मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सुरू झाला. मुख्यमंत्र्यांनी सुरू केलं ‘मी...’ इकडे म्यांव... असा आवाज झाला. दारात गोल्डी बोका उभा होता...
पाळीव प्राणी हा तसा जंगूरावांच्या आस्थेचा विषय नव्हता. आयुष्य मुंबईतच गेल्यामुळे ग्रामीण साहित्यात आढळणारे कपिला गाय, राजा-सर्जा नामक बैल, खंड्या कुत्रा वगैरे प्राण्यांशी त्यांचा कधी संबंध आला नव्हता. नाही म्हणायला, राणीच्या बागेतले प्राणी दुरूनच पाहायला त्यांना आवडे. शिवाय, नाक्यावरची ‘गाईला चारा'वाल्या बाईची लोकांच्या पैशानं चारा खाऊन पुष्ट झालेली गाय, गल्लीबोळांमधले रात्री अंगावर येणारे भटके कुत्रे, मासळी बाजारातली माजोरी मांजरं, वगैरे त्यांच्या परिचयातली होती.

"पपा, आपण पेट पाळू या का?’ असा प्रश्न एकदा मुलीनं केल्यावर जंगूराव प्रचंड दचकले होते. ‘पेट पालना' हा हिंदी वाक्प्रचार त्यांना ठाऊक होता, त्यामुळे आपल्या कुटुंबाचं भरणपोषण आपण नीट करतो आहोत की नाही, अशी शंका त्यांच्या मनाला चाटून गेली. पण दुस-याच क्षणी ‘पेट' म्हणजे ‘पाळीव प्राणी' हे लक्षात येऊन त्यांना हुश्श वाटलं. पोरांना इंग्रजी माध्यमात टाकण्याचे हे परिणाम!

जंगूरावांनी मुलीच्या कल्पनेला कडाडून विरोध केला. तो विषय तिथेच बारगळला. पण जंगूरावांचं घर पाळीव प्राण्यावाचून राहणं नियतीला मंजूर नव्हतं.
एक दिवस भल्या पहाटे जंगूरावांच्या घराबाहेरून अत्यंत क्षीण ‘म्यांव म्यांव' ऐकू येऊ लागली. जंगूरावांची साखरझोप मोडली; पण तिकडे दुर्लक्ष करून ते पुन्हा घोरू लागले. ‘म्यांव-म्यांव' अधिकच केविलवाणी झाली, तेव्हा जंगूरावांची मुलगी उठली आणि तिनं दार उघडलं. दारात एक लहानसं मांजराचं पिल्लू होतं. मुलीनं त्या पिलाची आई आजूबाजूला कुठं दिसते का, त्याचा शोध घेतला; पण तिचा कुठं मागमूसही नव्हता. जुन्या सिनेमातल्या कुमारी माता जशा आपलं नवजात मूल एखाद्याच्या दारात (प्रदीर्घ स्वगत म्हणून) सोडून जात, तसाच काहीसा प्रकार त्या पिलाच्या आईनं केला असावा.
"ओ: यू पुअर पुअर बेबी...’ म्हणत मुलीनं पिलाला आत आणलं. घरातल्या खडबडीनं जंगूराव आणि सौ. जंगूरावही हॉलमध्ये आले. मुलीनं त्यांना घडला प्रकार करुण रसात ओतप्रोत भिजवून सांगितला. त्यामुळे जंगूरावांना ढिम्मही फरक पडला नसला तरी सौ. जंगूरावांचं मातृहृदय मात्र कळवळलं. त्यांना अगदी पान्हा फुटला नसला तरी ब-याच मोठ्या प्रमाणात त्यांचा वत्सलरस जागृत झाला. त्यांनी पटकन जाऊन एका बशीत दूध आणलं आणि पिलासमोर ठेवलं. चुटुचुटु दूध पिऊन पिल्लू सोफ्यावर शांतपणे झोपी गेलं. पाच-सात महिने उलटले. पिल्लू कायमचं जंगूरावांच्या घरीच राहिलं. सौ. जंगूराव आणि मुलगी यांच्या लाडाकोडाने, दूध, मासे, स्पेशल कॅट फूड वगैरेंच्या रतिबाने त्याचं रूपांतर एका पुष्ट बोक्यात होऊ लागलं. अंगावरच्या सोनेरी केसांवरून त्याचं नामकरण करण्यात आलं ‘गोल्डी'. (हे जंगूरावांनाही आवडलं; कारण ते विजय आनंदचे चाहते होते.) जंगूरावांनाही हळूहळू गोल्डीचा लळा लागला.

अशातच राज्यात निवडणुका झाल्या. भाजपला सर्वात जास्त जागा मिळाल्या. भाजपनं नव्या मुख्यमंत्र्यांसह आपल्या मंत्र्यांचा भव्यदिव्य शपधविधी सोहळा स्टेडियमवर घेण्याचे ठरवले. राजकारण्यांशी संबंध ठेवून असलेल्या एका मित्रानं जंगूरावांनाही दोन पासेस आणून दिले. पासेस पाहून सौ. जंगूराव प्रचंड हरखल्या. पण त्यांना भाऊबिजेसाठी माहेरी नागपूरला जायचं असल्यानं त्या शपथविधीला जाऊ शकणार नव्हत्या, म्हणून त्यांना चुटपुट वाटू लागली. सभा-समारंभ, गर्दी यांचा जंगूरावांना प्रचंड तिटकारा होता. त्यांना ही नसती कटकटच वाटली.
"माझ्या नशिबात नाहीये हा सोहळा, पण तुम्ही तरी जाऊन या हं!’ सौ. म्हणाल्या.
"अगं त्या झिम्माड गर्दीत काय करणार मी जाऊन? मी आपला घरीच टीव्हीवर पाहीन तो समारंभ.’ जंगूराव.

"ते काही नाही. तुम्ही जायलाच हवं. एवढी मोठमोठी लोकं तिथं येणारेत, मोदीपण असणारेत. मग तुम्हाला काय होतंय जायला?’
"अगं, पण मग गोल्डीकडे कोण बघणार?’
"मी आहे की पपा!’ मुलगी.
आता मात्र जंगूराव नाइलाज होऊन गप्प बसले. सौ. नागपूरला रवाना झाल्या. जंगूराव शपथविधी सोहळ्यात न जाण्यासाठी काय काय बहाणे करता येतील, याचा विचार करू लागले. मात्र त्यांना काहीच सुचेना.
शपथविधीचा आदला दिवस. सायंकाळी जंगूराव घरी आले, तो मुलगी मलूल चेह-याने बसलेली.
"काय गं, बरं वाटतंय ना?’ त्यांनी विचारलं.
"पपा, आपला गोल्डी...’
"गोल्डी? काय झालं त्याला?’ जंगूरावांनी धास्तावून विचारलं.
"गोल्डी नाहीसा झालाय दुपारपासून!’
"काय?’ जंगूराव मटकन सोफ्यावर बसले. घरात आल्यापासून आजवर गोल्डी कधीच घराबाहेर पडला नव्हता; त्यामुळे त्याचं असं नाहीसं होणं चिंताजनकच होतं.
पण वयात येणारी मांजरं केव्हा ना केव्हा बाहेर भटकू लागतातच, हेही जंगूरावांना ठाऊक होतं; म्हणून मुलीला धीर देत ते म्हणाले, "अगं येईल तो परत. मांजरं आपली घरं विसरत नाहीत. अगदी पोत्यात घालून गावाबाहेर सोडून दिलं, तरी बरोब्बर येतात घरी.’
रात्र झाली. बोक्याचा पत्ता नाही. जंगूराव आणि मुलगी भयानक अस्वस्थ. त्यांच्या घशाखाली डिनर उतरेना. तशात जंगूरावांना सौंचा फोन आला. त्यांनी गोल्डीची चौकशी केली. गोल्डी नाहीसा झाल्याचं कळताच, सौंनी एक अस्फुट हंबरडा फोडला. जंगूराव त्यांना धीर देत म्हणाले, "जर आज रात्री गोल्डी परतला नाही, तर आम्ही उद्या त्याच्या शोधासाठी आकाशपाताळ एक करू!'
सकाळ. गोल्डी गायबच. जंगूराव आणि मुलगी गोल्डीच्या शोधार्थ बाहेर पडले. गोल्डीला खाणं देताना जंगूराव दोन थाळ्या एकमेकांवर आपटीत. त्या आवाजानं गोल्डी धावत येई. तशाच दोन थाळ्या वाजवत जंगूराव रस्त्यांवर फिरू लागले. लोक त्यांच्याकडे चमत्कारिक नजरेनं पाहू लागले. एकानं तर त्यांना भिकारी समजून चक्क थाळीत रुपयाही फेकला. मात्र जंगूरावांना त्याची तमा नव्हती. त्यांचं सगळं ध्यान गोल्डीत होतं. तिकडे मुलगी तिच्या स्कूटीवर फिरत गोल्डीचा शोध घेऊ लागली. मोबाइलवर काढलेले गोल्डीचे फोटो याला त्याला दाखवू लागली. व्हाॅट्सअ‍ॅपवर शेअर करू लागली. बापलेक वणवण फिरू लागले. एव्हाना जंगूरावांचा बोका हरवल्याचं अख्ख्या दुनियेला ठाऊक झालं होतं. दुपारचे चार वाजले. जंगूराव आणि मुलगी घटकाभर टेकावं आणि पुन्हा शोध सुरू करावा, म्हणून घरी परतले. चहा घेता-घेता मुलीनं सहज चाळा म्हणून टीव्ही सुरू केला. शपधविधी सुरू होणार होता. उन्हातान्हात लोक घाम पुसत स्टेडियममध्ये बसले होते. आपण तिथे नाही, याबद्दल तशा विषण्ण मनःस्थितीतही जंगूरावांना हायसं वाटलं.
चार वाजून सव्वीस मिनिटे झाली. मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सुरू झाला. मुख्यमंत्र्यांनी सुरू केलं, "मी...’
"म्यांव...!!’ दारात आवाज झाला! जंगूराव आणि मुलीनं चमकून दाराकडे पाहिलं. दारात गोल्डी उभा होता. मुलीनं त्याच्याकडे धाव घेतली आणि त्याला तिनं गच्च कवटाळून धरलं. आतापर्यंत आवरलेला भावनांचा बांध फुटला आणि ती मनसोक्त रडू लागली.
जंगूरावांचेही डोळे पाणावले. त्यांनी मुलीकडून बोक्याला घेतलं आणि ते त्याची सहस्र चुंबने घेऊ लागले. गोल्डी सापडल्याच्या समाधानात आपला शपथविधी सोहळ्याला जाण्याचा ताप चुकला, याचा आनंदही मिसळला होता. हा शुभशकुनी बोका आडवा गेला नसता, तर जंगूरावांचे भोग अटळ होते. तिकडे टीव्हीवर निरनिराळ्या आवाजांत ‘मी... मी...' सुरू असताना इकडे गोल्डीच्या ‘म्यांव म्यांव'नं जंगूरावांचं घर प्रसन्न करून टाकलं होतं...
gajootayde@gmail.com