आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजबिंब: नो मिन्स नो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजवर ज्या सिनेमाने स्त्रियांना उपभोग्य वस्तू म्हणून पेश केलं, तोच सिनेमा पुरुषप्रधान व्यवस्थेला सवाल करू पाहतोय. नुकत्याच प्रदर्शित ‘पिंक’ सिनेमाने स्त्री आणि पुरुषांमधल्या परस्पर-संवादाची एक खिडकी उघडली आहे...
“नो मिन्स नो... कोई लडकी हो, अपनी बिवी हो, या फिर कोई सेक्सवर्कर; इफ शी सेज नो, दॅट मिन्स नो. ‘नो’ ये शब्द नही बल्की अपने आपमें पुरा वाक्य है। इसका दुसरा कोई स्पष्टीकरण नही होता माय लॉर्ड...” नुकत्याच प्रदर्शित ‘पिंक’ सिनेमात आतून खदखदून उठलेला वकील दीपक सहगल (अमिताभ बच्चन) पुरुषी अत्याचाराची बळी ठरलेल्या तरुणीची बाजू कोर्टात त्वेषाने मांडतो, तेव्हा पडद्यावरची त्याच्या आसपासची पात्रंच नव्हे, थिएटरमधला प्रेक्षकही अवाक‌् होतो. एखादी मुलगी तुमच्यासोबत रॉक कॉन्सर्टला येते, तुमच्यासोबत दारू पिते, तिने त्यापूर्वी मित्रासोबत शरीरसंबंधाचा अनुभव घेतलेला असतो. म्हणजे तिचा कौमार्यभंग झालेला असतो. पण याचा अर्थ, तुम्ही उपभोग्य वस्तू समजून तिच्यावर अत्याचार नाही करू शकत, हे त्या वकिलास स्पष्टपणे सुचवायचं असतं. शेवटी, कितीही झालं तरीही सिनेमा हा वास्तवावर बेतलेला कल्पनाविस्तार, वास्तव नव्हे. पण, ते काय सांगतं?
२०१०-११मध्ये युनायटेड नेशन्सने दक्षिण आणि मध्य आशियाई देशातल्या जवळपास १० हजार पुरुषांचं सर्वेक्षण केलं. सर्वेक्षण करताना प्रश्न विचारला-पुरुष बलात्कार का करतात? ७० ते ८० टक्के पुरुषांनी एकसमान उत्तर दिलं- जोडीदाराची परवानगी न घेता शरीरसुख मिळवण्याचा आमचा हक्कच आहे! अलीकडेच आम्ही हैदराबादच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या कॅम्पसमध्ये ‘समभाव’ फिल्म फेस्टिव्हल अंतर्गत चर्चा घडवून आणली. फिल्म होती हाँगकाँगची ‘शी ऑब्जेक्ट्स’. टायटलमध्ये नकार आणि उपभोग्य वस्तू हे दोन्ही अर्थ दडलेले. फिल्म पाहून झाल्यानंतर मुली मोकळ्या झाल्या. म्हणाल्या, कॉलेजमध्ये, घरी, वस्तीत मुलं बुभुक्षित नजरांनी आमचा पाठलाग करत असतात. दे टेक अस ग्रँटेड. मुलगी आवडली की, ती मिळायलाच हवी, असा त्यांचा अॅटिट्यूड असतो...
दिल्लीतल्या ‘निर्भया’ प्रकरणानंतर जस्टिस जे. एस. वर्मा कमिटीने अहवाल दिला. त्या आधारे कलम ३५४ अंतर्गत लैंगिक छळविरोधी कायदा अस्तित्वात आला. या कायद्याने कमीत कमी एक ते अधिकाधिक तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा निश्चित केली. पण, धाक कुणाला आहे? हा मला पडलेला प्रश्न.
१९९५ मधली ही घटना आहे. मुंबईतल्या जुहू भागात दीप्ती खन्ना नावाच्या १९ वर्षीय तरुणीच्या चेहऱ्यावर अॅसिड हल्ला झाला, त्यात तिचा सबंध चेहरा विद्रूप झाला. हे सारं घडलं तिचा काहीही दोष नसताना. कारण, हल्लेखोरांना तिच्यासारख्या दिसणाऱ्या सलमाच्या तोंडावर तिच्या नवऱ्याच्या सांगण्यावरून अॅसिड फेकायचं होतं. सलमाच्या नवऱ्याने जे वर्णन केलं होतं, ते दीप्तीशी जुळणारंही नव्हतं; तरीही पाच जणांनी तिचं आयुष्यच उद्ध्वस्त केलं. आम्ही तिला भेटण्यासाठी त्या वेळी नानावटी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. तिच्यावर तेव्हा १०-१२ ऑपरेशन्स झाली. तिची आई तिला खूप धीर देत होती. तुझी काहीच चूक नाही, सांगत होती. मात्र दीप्तीचा एकच सवाल होता- पण त्या सलमाचा काय कसूर होता? तोच धागा पकडत आमच्या ‘मावा’ (मेन अगेन्स्ट व्हायोलन्स अँड अब्युज) संस्थेने दीड महिन्यात ७५ हजार रुपये गोळा करून तिला मदत म्हणून दिले होते. मुद्दा आम्ही पैसे दिल्याचा नव्हता, तर तू माझी नाही तर दुसऱ्या कुणाचीच नाही, या समाजात रुजत चाललेल्या विखारी मानसिकतेचा होता.
याच मानसिकतेचं प्रतिबिंब सिनेमांत, सिनेमांतल्या गाण्यांत वर्षानुवर्षं उमटत आलं होतं. किंवा असंही म्हणता येईल, त्याच्या प्रभावातून समाजमन घडत आलं होतं. त्या सुमारास नाना पाटेकर-मनीषा कोईरालाचा ‘अग्निसाक्षी’ सिनेमा रिलीज झाला होता. पुरुषी वर्चस्वाचं हिंसक रूप त्या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळालं होतं. पण त्याही आधी तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नही, तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी’ हे राज कपूरच्या तोंडी असलेलं गाणं यातला ‘मुश्किल’ हा शब्द काय दर्शवत होता? ‘बार बार देखो, हजार बार देखो, देखने की चिज है...’ किंवा ‘तू चिज बडी है मस्त मस्त..’ यातला ‘चिज’ हा शब्द स्त्रीला कोणत्या कॅटेगरीत ढकलत होता? ‘तू हाँ कर या ना कर, तू है मेरी किरन...’ हा शाहरुख खानने ‘डर’मधल्या गाण्यातून बोलून दाखवलेला आक्रमक विचार कोणत्या मनोवृत्तीचं प्रतिनिधित्व करत होता?
मुलगी ‘नाही’ म्हणते, याचा अर्थ तिला ‘हो’ म्हणायचं असतं. शेवटी ती मुलगी आहे, सरळ ‘हो’ कशी म्हणणार, अशी पुरुषांची पक्की धारणा असते. तसेच संस्कार त्यांच्यावर झालेले असतात. पण, स्त्रिया खरोखरच ‘हो’ म्हणतात का, किती प्रसंगांत कोणत्याही दबाबाविना ‘हो’ म्हणतात, हे आपण कधीच गांभीर्याने तपासून पाहात नाही. सर्वसाधारणपणे असं जाणवतं की, जेव्हा बाईचा विषय येतो, बहुसंख्य मुला-पुरुषांमध्ये सहसंवेदनेचा अंशच जाणवत नाही. किंवा तो अनेकांमध्ये पुरुषी वर्चस्वव्यवस्थेमुळे कधी विकसितच होत नाही. अशा वेळी समाजव्यवस्थेने एक पुरुष म्हणून दिलेले विशेषाधिकार (प्रिव्हिलेजेस) नाकारण्याचा आणि पुरुषप्रधान व्यवस्था सहवेदना व्यक्त करण्यावर जी बंधनं (रिस्ट्रिक्शन्स) लादते, त्यावर मात करण्याचाही प्रश्न येत नाही. समाज म्हणून आपला कल नेहमीच झाकून ठेवण्याकडे असतो. ज्याला आपण निरोगी संवाद म्हणू, असं क्वचितच घडताना दिसतं. दिल्लीतलं निर्भया प्रकरण आणि मुंबईतलं शक्ती मिल प्रकरण; दोन्ही प्रकरणातले बहुतांशी गुन्हेगार १८ वर्षांखालचे आहेत. त्यांच्या जबान्या घेतल्या गेल्या. तेव्हा एकसामायिक बाब समोर आली ती म्हणजे, या मुलांना ब्लू फिल्म पाहण्याचं व्यसन होतं. म्हणजे हे उघड होतं की, ही मुलं ब्लू फिल्म पाहून, त्यातल्या क्रिया-प्रतिक्रिया डोक्यात ठेवून पुरुषांनी कसं वागायला हवं, तसंच स्त्रीचा रोल कसा असायला हवा, याचे धडे घेत होती. पण ब्लू फिल्ममध्ये जे दाखवलं जातं ते सारं काल्पनिक असतं. एकसलग नव्हे तुकड्या-तुकड्याने जोडलेलं असतं. त्यात काम करणाऱ्या मॉडेल्सना त्या कामाचा मोबदला मिळत असतो, हे त्यांना कधी ध्यानातच येत नाही. मागे, मुंबईतल्या एका कॉलेजात व्हॅलेंटाइन डे निमित्त ‘लैंगिकतेपलीकडे निकोप मैत्री असू शकते का?’ या विषयीचं चर्चासत्र घेता येईल का, अशी विद्यार्थ्यांकडून आम्हाला विचारणा करण्यात आली. मी म्हटलं, का नाही? मात्र त्या दिवशी पुरुष प्राध्यापक उपलब्ध नाही, असं कारण सांगून कॉलेजने ते टाळलं. माझं म्हणणंय, मुलं जेव्हा स्वत:हून चर्चेची मागणी करतात, तेव्हा तर संवाद साधण्यासाठी प्रोत्साहनच मिळायला हवं. म्हणजे एका बाजूला संवाद नाही आणि मागणी आली की जागा नाही. बरं, आता शहरी-ग्रामीण असाही फारसा फरक राहिलेला नाही. जे शहरात आहे ते टेक्नॉलॉजीमुळे ग्रामीण भागातही पोहोचलंय. जग ‘हायपर सेक्शुअलाइज्ड’ झालंय. निरोगी परस्परसंवादाअभावी असं जग म्हणजे, अत्याचार-बलात्काराला आमंत्रणच आहे. आम्ही गेली तीन वर्षं सातत्याने पथनाट्य, गटचर्चा, निवासी शिबिरं, फिल्म फेस्टिवल अशा भिन्न व्यासपीठांचा वापर करून स्त्री-पुरुषांमध्ये निरोगी संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहोत. यात हस्तमैथुनामुळे अशक्तपणा येतो, मुलीने लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवू नयेत, जेव्हा मुलगी ‘नाही’ म्हणते तेव्हा खरं तर तिला ‘हो’ म्हणायचं असतं, तोकड्या कपड्यात वावरणारी मुलगी हिंसेला वा बलात्काराला आमंत्रण देते, पुरुषाने पुरुषाशी किंवा स्त्रीने स्त्रीशी शरीरसंबंध ठेवणे अनैसर्गिक आहे... आदी समजुती-गैरसमजुतींवर खुलेपणानं, मनातले पूर्वग्रह दूर सारून, चूक-बरोबरच्या फुटपट्ट्या टाळून मुला-मुलींमध्ये चर्चा घडवून आणतो. त्यात माझं सगळ्यांना हेच सांगणं असतं, स्त्री ही देवी आहे ना दासी, ती एक हाडामांसाचं माणूस आहे. तिलाही स्वत:चं मन आणि भावना आहेत. तिच्याही आवडी-निवडी आहेत. तिचा माणूस म्हणून आदर करायला शिकणं, तिच्या चार भिंतींआडच्या कामाचं मोल करणं ही दृष्टिकोनातल्या बदलाची पहिली पायरी आहे. मुळात, लैंगिकतेबद्दल मुला-मुलींमध्ये मोकळेपणाने बोललं जात नाही. जोपर्यंत तसं होणार नाही, मुलींशी असलेल्या संवादातही मोकळेपणा येणार नाही. तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार नाही. लिंगसमानता प्रत्यक्षात येणार नाही.
धुळे आणि जळगाव भागात महाविद्यालयीन मुलग्यांसोबत काम करणारा आमचा प्रकल्प समन्वयक अमोल काळेनं ‘पिंक’ बघितला. सिनेमा बघितल्यानंतर मनातले तरंग व्हॉट्स अॅपवरून शेअर करताना तो म्हणाला, ‘स्त्रिया एकविसाव्या शतकाची दिशा पकडून स्वबळावर प्रगती करताहेत आणि आम्हा पुरुषांचा एक पाय अजूनही पंधराव्या-सोळाव्या शतकातच आहे. स्त्रियांच्या निम्म्या जगाला काय-काय सहन करावं लागतंय, हे डोळे असूनही का दिसत नाही आपल्याला?’ मात्र, सिनेमाचा शेवट सकारात्मक असला तरीही वास्तव जगात हे खरोखरच शक्य आहे का, अशी शंकाही त्याच्या मनात डोकावली. एक खरं, ‘पिंक’ सिनेमाने परस्परसंवाद आणि आत्मपरीक्षणाची एक खिडकी तर उघडून दिली आहे. यातला सुखदायक विरोधाभास असा की, ज्या सिनेमाने स्त्रीच्या चुकीच्या प्रतिमा समाजमनावर ठसवल्या, तोच सिनेमा आता तिच्यातल्या माणूसपणाकडे प्रेक्षकांचं लक्ष वेधू पाहतोय. तिच्या मन-भावनांचा, तिच्या इच्छा-आकांक्षांचा पारदर्शी आलेख मांडू पाहतोय.
म्हणजे, सिनेमा बदलतोय. पण समाज?
हरीश सदानी
saharsh267@gmail.com
बातम्या आणखी आहेत...