आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article About Poem By Parmeshwar Vyavhare In Rasik

कविता सत्वशीलतेचे कुंपन घालते (काव्यार्थ)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगण्याशी आणि अनुभवांशी आपण प्रामाणिक राहिलो तर कविता आपल्याला न्याय व बळ देऊ शकते, हा अनुभव मला कवितेने दिला. बदललेल्या काळाबरोबर आपण बदललो नाही तर आपला ऱ्हास होऊ शकतो, ही बाब कवितेने लक्षात आणून दिली.

खरं म्हणजे लहानपणापासून प्रत्येकाचा कवितेशी कमी-अधिक प्रमाणात संबंध येत असतो. कारण कविता ही माणसाची आदिम प्रेरणा आहे, ती माणसाला संवेदनशील बनविते आणि ही संवेदनशीलता जगताना आपल्याला अस्वस्थ करत असते. हीच अस्वस्थता माणसाला व्यक्त होण्यास प्रेरित करत असते. मात्र ही कविता माणसाच्या मनात केव्हा आणि कशी रुजते, हे सांगता येत नाही. आपण जगताना जे पाहतो, भोगतो, अनुभवतो ते खोल-खोल आपल्या मनात रुजत असते, मुरत असते. तेव्हा कधी पोटात कळा उठतात, मन कासावीस होते, मेंदू गांगरून जातो, देह गलितगात्र होतो. मनात अनेक विचार निर्माण होतात, हे विचार भावनेत परिवर्तीत होतात. आपले आत्मभान जागे होते. अशा घुसमट अवस्थेत आपल्या मनात नकळत काव्यबीज पडते. मग ते रुजते. मात्र, त्याला आपल्या प्रतिभेने पोषकद्रव्य पुरविले तर ते बी अंकुरते, फुलते. आपल्यातील सच्चेपणाची ओल त्याला मिळाली तर आपली कविता अस्सल बनते. अशा अवस्थेतून काहीसा माझा काव्यप्रवास सुरू झालेला आहे.

कविता आपल्याकडे काही मागत असते, कारण काळाची सृजनशील प्रतिक्रिया तिला द्यायची असते. त्यामुळे आपल्याला परिपूर्ण राहावे लागते. पूर्वाश्रमीचे आपले काही जीवनानुभव असतात. वाचन, मनन, चिंतन, सूक्ष्म निरीक्षण यांच्या प्रयासाने या जीवनानुभवाला नवीन कंगोरे फुटतात आणि मग उत्स्फूर्तपणे कागदावर आपण व्यक्त होतो. हा अाविष्कार एवढा सहज असतो की, आपणही थक्क होतो. यालाच काव्यनिर्मितीचा साक्षात्कार म्हणतात. आपल्या निर्मितीचे मूळ भूतकाळात रुतलेले असते, त्याची वर्तमानाशी सांगड घालावी लागते.

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर हे माझं मूळ गाव. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेलं. तेथील कृषी जीवन, बोली, संस्कृती यांच्याशी माझी नाळ जुळली. ग्रामीण भागातील लोककला, लोकगीतं यांचे लहानपणीच माझ्यावर नकळत संस्कार झाले. प्राथमिक शाळेत िशकत असताना सातव गुरुजी भसाड्या आवाजात ‘या बालांनो, या रे या’ ही कविता म्हणत असत. त्यांच्या मागोमाग आम्ही म्हणत होतो. तेव्हा कवितेचा संबंध फक्त तोंडापुरता आला. पुढे १०व्या वर्गात असताना हरिभाऊ पांडव सर हे ‘शर आला तो धावुनी आला काळ’ ही गंभीर कविता तालासुरात म्हणायचे. ती वारंवार त्यांच्या तोंडून ऐकावी वाटे. तेव्हा कवितेचा संबंध कानाशी जोडला गेला आणि जेव्हा मी १२वीत होतो, तेव्हा वसंत बापटांची ‘फुंकर’ ही प्रेमकविता प्रा. नारायण कुळकर्णी कवठेकर यांनी तब्बल तीन दिवस शिकवली, तेव्हा हृदयात कालवाकालव झाली. या वेळी कवितेचा संबंध योग्य ठिकाणी म्हणजे हृदयाशी आला, भावनेशी आला आणि येथेच कवितेने मला साद दिली. म्हणजे, महाविद्यालयीन जीवनापासून कवितेने माझ्यावर भुरळ घातली. कवितेवर निष्ठा असणारे समकालीन मित्र, प्राध्यापक लाभले, त्यामुळे मराठी कवितेच्या अधिक जवळ जाता आले. शिक्षण पूर्ण झाल्यावर बरीच वर्षे पत्रकारितेत गेल्याने लेखनामध्ये सातत्य आले. सभोवताली घडलेल्या घटनांचा लेखाजोखा मांडता मांडता चिंतनाचा पिंड घडत गेला. या चिंतनाचे भावनिक पातळीवर अभिस्मरण होताना बऱ्याचदा कवितेची बीजं मनात पडायची आणि मग सुरू व्हायची एक घुसमट, जिला आपण निर्मिती प्रक्रिया म्हणतो.

जगण्याशी आणि अनुभवांशी आपण प्रामाणिक राहिलो तर कविता आपल्याला न्याय व बळ देऊ शकते, हा अनुभव मला कवितेने दिला. बदललेल्या काळाबरोबर आपण बदललो नाही तर आपला ऱ्हास होऊ शकतो, ही बाब कवितेने लक्षात आणून दिली. म्हणून मध्यंतरीच्या काळात जाणीवपूर्वक थांबावे लागले. आजची मराठी कविता कुठे आहे? तिची अभिव्यक्ती, शैली, आशय, विषय, प्रयोग या बाबतीत चिंतन करावं लागलं. कवितेला कोणत्याच विषयाची बाधा नसते. आपल्या प्रकृतिधर्माला आवडणारे, न आवडणारे विषय कवितेच्या परिघात येऊ शकतात. ग्रामीण भागात राबणारा शेतकरी, कष्टकरी, सामान्य माणूस हा माझ्या कवितेचा केंद्रबिंदू आहे. शेती, गाई-गुरे, ढोरे आणि पोटाची खळगी भरण्यासाठी धडपडणारी माणसं मी जवळून पाहिली. त्यांचे दैन्य, दु:ख, व्यथा, लाचारी मी अनुभवली. म्हणून माझी कविता श्रमजीवी वर्गाचे आत्मभान निर्माण करते. येथील पोखरलेल्या व भ्रष्ट झालेल्या व्यवस्थेने मानवी जीवनातील आनंद हिरावून घेतला आहे. म्हणून स्वैर झालेल्या मानवी मनाला ही कविता सत्त्वशीलतेचे कुंपण घालते. विवंचनेत त्रस्त असलेल्यांना ती धीराचा शब्द देते. वर्तमानाच्या विषम व अस्वस्थ वास्तवाची ती मांडणी करते, तर वस्तुस्थितीचे भान न ठेवता भ्रामक कल्पनेत रमून महासत्तेची वल्गना करणाऱ्यांना ती चपराक देते आणि सामान्यांचे शोषण थांबावे म्हणून ती टोकाची भूमिका घेऊन व्यवस्था बदलाचं सूचन करते. शासनाची उदासीनता व निसर्गाचा लहरीपणा यामुळे येथील भूमिपुत्र वैतागला आहे. तो मरणाला कवटाळत आहे. अशा स्थितीत ही कविता त्यांच्यात नवी उमेद निर्माण करते आणि ‘घुमव वेगात गोफण फुलेल हिरवं सपन’ असा कानमंत्र देते. नामदेव ढसाळ, वसंत आबाजी डहाके, नारायण कुळकर्णी कवठेकर, मंगेश काळे, वर्जेश सोळंकी, दिनकर मनवर हे माझे आवडते कवी. त्यांच्या कवितांचा जवळून परिचय झाला, तेव्हा आपणही कविता लिहिण्याचं धाडस करावे काय? कविता लिहिणं खरंच सोपं असतं का? ती तर आकाशाची वीज असते. ही गंभीर जाणीवही मला कवितेने करून िदली. तेव्हा अट्टाहास न बाळगता कधी कधी कवितेने हाक दिली तर तिचा आदरपूर्वक सन्मान करतो. कदाचित याच कारणामुळे माझ्या संग्रहाला खूप उशीर झाला आहे, असे मला वाटते. प्रत्येक वेळी कविताच मला धीर देते, माझं सांत्वन करते.

शब्दांकन - विष्णू जोशी
vishnujoshi89@gmail.com