आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article About Poet Keshav Khating In RASIK Divya Marathi

कवितेनं दिली आयुष्याला स्थिरता (काव्यार्थ)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१५ ते २० वर्षांपासून सातत्याने दर्जेदार कविता लिहिणारे कवी केशव खटींग हे आडगाव रंजेबुआ, जि. हिंगोली येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ‘सालोसाल’ हा त्यांचा पहिलाच कवितासंग्रह प्रसिद्ध झाला असून त्याला अलीकडेच विशाखा काव्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
अनेक मान्यवर समीक्षकांनी त्यांच्या कवितेची प्रशंसा केली असून नव्या पिढीतील एक महत्त्वाचे कवी म्हणून आपल्याला त्यांचा उल्लेख करावा लागेल.
एखादी घटना किंवा विषयाचा ठिपका पडतो आणि मन, मेंदूत आशयाची वलये निर्माण होत जातात. अवघा देह केंद्रित होत जातो या ठिपक्यावर. अनेक दिवस, अनेक आठवडे कधी कधी महिने ही तगमग सोसावी लागते. कवितेची एखाद्-दुसरी ओळ आकाराला आली की बरे वाटण्याची झुळूक येऊन जाते. आशयाने अभिव्यक्तीचा तगादा लावलेला असतो. राजन गवस म्हणतात तसं, आयुष्यभर कवी असण्याचा तणाव सोसणं ही अवघड गोष्ट आहे. कवितेच्या कचाट्यात सापडलेल्या कवीला मोजक्या ओळींत मोठा आशय मांडावा लागतो. जगण्याचा व्यापक आवाका मांडणा-या कवींनी आपापल्या एका एका कवितेत मोठ्या कथा, कादंब-यांचे सांगणे खेचून घेतल्याची उदाहरणे आपल्यासमोर आहेतच. कुणी याला कैफ म्हणो, की धुंदी, बेहोशी. या िठपक्याच्या िवस्तारत जाण्याचा कवीवर खोलवर आणि लांबवर परिणाम झालेला असतो. कवी लोकांतात दिसत असला तरीही या तणावाने तो सतत एकांतात असतो. आशयाच्या झोताखालीच त्याचे जगणे असते आणि एकदा का कवितेनं आकार घेऊन कवीला मोकळीक दिली की कवीला जे मिळतं त्याला केवळ आनंद असं नाव देता येत नाही. या जागेवर जे मिळतं त्यासाठी कवी मागचं सगळं सोसू शकतो. मी आनंदानं सोसलंय.

माझं मूळ गाव परभणीजवळ सायाळा. लहानसं गाव. १९७२ला मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना झाली आणि माझ्या गावासकट पाच गावच्या जमिनी संपादित झाल्या. आमचा अर्धा शिवार संपादित झाला. गाव राहिलं. बाजूची गावं उठली. माझ्या वडिलांचं कुटुंबासह नव्या गावात स्थलांतर झालं. माझ्यासकट कुटुंबाला लहानपणापासूनच आपण गुढेकरू असल्याची भावना होती. आलेल्या नवीन गावात प्राथमिक शिक्षणाची सोयसुद्धा नव्हती, म्हणून बाजूच्या गावच्या जरा चांगल्या शाळेत प्राथमिक शिक्षण झालं. पुढे शिक्षणाच्या निमित्ताने दोन-तीन गावं बदलली गेली. आई-वडील गावावर, मी शिक्षणाच्या निमित्तानं बाहेर. आता नोकरीमुळे शहरात. कुठंही स्थिरता नाही. आपलं वाटावं असं ठिकाण सापडत नव्हतं.
शहरात तर स्थिर वाटायचं काही कारणच नव्हतं. इथली मुळंच नाहीत आणि मातीही रुजवून घेणारी नाही. पाय टेकत नव्हते, करमण्याची जागा सापडत नव्हती; परंतु जसजसे कवितेने माझ्या जगण्याचे दोर हातात घेतले, तशी आधाराची जागा मिळत गेली. स्थिर होण्याची शक्यता निर्माण झाली. शेतकरी आणि वारकरी कुटुंबात जन्म झालेला. परिस्थिती जेमतेम. रूढार्थाने शिक्षणाचा वारसा नव्हता. वडील सहीपुरते साक्षर आणि आई निरक्षर; परंतु निसर्गज्ञानाची समृद्ध परंपरा होती. शेतीमुळे निसर्गाचं फुलून, उमलून येण्याचं आणि वाळण्या-करपण्याचं रूप पाहायला मिळायचं. माझं वाचन आणि आवाज चांगला असल्यानं पोथ्या वाचण्याची संधी मिळायची. मी दहावी होण्याआधी श्रीधराच्या पोथ्या, रामायण, नवनाथाची पोथी सगळं वाचलं होतं. माझी वाचनाची भूक भागत होती. भजनात सहभाग होता. कीर्तनाची आवड निर्माण झालेली. त्याहीपेक्षा अधिक टाळ आणि मृदंगाची. शंभर-शंभर टाळ आणि दोन-दोन पखवाज वाजून तालाचा संभार उभा राहायचा. मी जीव तोलून एेकायचो. तालासुरांचा असा संभार पुढे एेकायला मिळाला नाही. जुन्या-नव्या गावात लोकसंगीत, लोकलय, लोककथा यांचा समृद्ध वारसा. मला हे हवं तसं मिळालं. भुलाबाईची गाणी, मुंज्याच्या डाका, पोतराज, वासुदेव, गोंधळी यांची गाणी यांनी लोकलयीची विविधता मिळाली. विहारावरून भीमगीतं ऐकायला मिळाली. वामनदादांची किती तरी गाणी मी वाचण्याच्या अगोदरच मला मुखपाठ होती. भीमगीतांतलं चैतन्य, त्यातला उजेड यांनी खेचून घेतलं.

शिकायला लागलो ते गाव प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांचं. त्यांचा सहवास लाभण्याच्या अगोदर मला त्यांच्या गावातला महानुभाव संप्रदायाच्या वातावरणाचा संपर्क झाला. चक्रधर आणि महानुभाव वाङ‌्मय मला पुढे वाचायला मिळालं; पण त्या आधी बालपणावर या नीरव शांततेचा खोलवर परिणाम झाला. शाळेत कविता पाठ करण्याचा नाद लागला. एका कवितेला अनेक चाली देऊन त्या शिक्षकांना एेकवणं, यात मोठा आनंद मिळायला लागला. शिक्षणात मी साधारणच होतो; परंतु पाठांतर भक्कम. आपल्याला काही चांगलं पाठ होऊ शकतं, याचा विश्वास कवितेच्या पाठांतराने दिला. शाळेतल्या शिक्षकांनी हेरून कथाकथन, वक्तृत्व, नाटक यांमधून सतत संधी दिली. इंद्रजित भालेराव गुणवंतांच्या सत्कारानिमित्त आमच्या शाळेत आले होते. माझा सत्कार नव्हता; परंतु शाळेतल्या सरांनी कविता म्हणून गाणी गायला लावली. भालेराव सर कार्यक्रमात माझ्याबद्दल भरभरून बोलले आणि त्यांना मिळालेली शाल आणि वर पाच रुपये बक्षीस दिलं. कविता लिहिण्याच्या उगमाजवळ ही प्रेरणादायी घटना घडली. पुढे सतत त्यांच्या संपर्कात राहिलो. बारावी ते शिकवत असलेल्या महाविद्यालयातून झालो. मला प्राथमिक शिक्षकाची नोकरी लागली. त्यामुळे पुढचं सगळं शिक्षण बहि:स्थ विद्यार्थी म्हणूनच घ्यावं लागलं. वारकरी, महानुभाव, देशी, ग्रामीण, दलित साहित्य टप्प्याटप्प्यात वाचून झालं. दलित साहित्यानं सगळ्यात जास्त अंतर्बाह्य उलथापालथ केली. वंचिताचं जगणं हाच आपल्या लेखनाचा मार्ग आहे, हे कळलं.

भालचंद्र नेमाडे, नामदेव ढसाळ, ना. धों. महानोर, नारायण सुर्वे यांनी आपलं केलं. नारायण कुळकर्णी कवठेकर, उत्तम कोळगावकर, श्रीकांत देशमुख यांची कविता घरची वाटली. अरुण काळे, भुजंग मेश्राम यांच्या कवितेनं हादरवून सोडलं. गाव-पाड्यावरून लिहिणारे हात वाढले आहेत. आशयाला वेगवेगळे कंगोरे फुटत आहेत. सगळं नीट समजून घ्यावं वाटतंय, हे महत्त्वाचं आहे. आता स्थलांतरित, धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त यांचं जगणं समजून घेऊन काही मांडता येईल का, ते बघायचं आहे. सगळीकडून जगण्याच्या वेगवेगळ्या पटांवर फार चांगलं लिहून होतंय. ते समजून घेण्याचा आनंदही खूप मोठा आहे.
(शब्दांकन: विष्णू जोशी)
vishnujoshi80@gmail.com