आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article About Politics By Deepak Patwe In RASIK Divya Marathi

कृतीशील नेतृत्त्वाचा प्रभाव (जागर राजकारणाचा)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विरोधकािवषयीच्या असंतोषाची तीव्रता वाढवणे, हा निवडणूक रणनीतीतला एक भाग झाला. त्यामुळे मतदार सत्ताधा-यांना मत देणार नाही; पण जोपर्यंत आपण सक्षम पर्याय आहोत, हे मतदाराला पटत नाही; तोपर्यंत तो आपल्यालाही मतदान करणार नाही, हे ब-याच नेत्यांच्या लक्षात येत नाही.
एमआयएमचे, अर्थात, ‘मजलीस-ए- इत्तेहादूल मुसलमीन’ या पक्षाचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या निवडणूकविषयक कार्यपद्धतीची तुलना मागच्या लेखात नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीशी केल्यामुळे असंख्य वाचकांना नवल वाटले. त्यातल्या बहुतेकांनी आपले मत, माझ्याशी संपर्क साधून स्पष्टपणे नोंदवलेही. या विषयाला अशा तुलनात्मक पद्धतीने सादर केल्यामुळे काहींना ते आवडलेही. पुढच्या लेखात काय असेल, यािवषयी उत्सुकता निर्माण झाली आहे, हे सांगणारेही खूप फोन आले. अर्थात, हे सारे अपेक्षितच होते. मराठवाड्यात पुन्हा रझाकारी आणू पाहणारा हा पक्ष असून तो राष्ट्रद्रोही आहे, असे जाहीरपणे बोलले आणि लिहिले जात असताना ओवेसी यांची तुलना मोदी यांच्या कार्यपद्धतीशी करणे हे एमआयएमचे उदात्तीकरण आहे, असे वाटणे स्वाभािवकच आहे. मात्र, हे उदात्तीकरण नसून राजकीय यशाच्या मार्गाचा घेतलेला तुलनात्मक धांडोळा आहे, हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी स्वबळावर सरकार स्थापन करता येईल, इतके मोठे यश मिळवले. हे यश सर्वांनाच अनपेक्षित होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एमआयएमने असेच अनपेक्षित यश मिळवले आहे. दोघांची तुलना करण्याचे हेच तर कारण आहे. दोघांच्या यशाची तुलना त्यांनी किती जागा मिळवल्या यावरून नाही, तर दोघांचे यश अनपेक्षित होते म्हणून आहे.
मोदींच्या यशाचे श्रेय सर्वस्वी माध्यमांच्या वापराचे श्रेय आहे, असे अनेकांना वाटते. कारण मोदींनी माध्यमांवर किती खर्च केला आणि किती माणसे त्यासाठी कामाला लावली होती, याची आकडेवारी एका संशोधक संस्थेने वेबसाइटवर टाकली आहे. मोदींनी माध्यमांचा वापर केला नसता, तर काय झाले असते? मोदी यशस्वी झाले नसते? लोकसभा निवडणुकीत मोदींनी माध्यमं वापरली ती स्वत:ची प्रतिमा तयार करण्यासाठी नाही; तर आपली प्रतिमा जशी आहे तसेच आपण आहोत, हे मतदारांपर्यंत केवळ पोहोचवण्यासाठी. ऐन निवडणुकीत माध्यमं कोणाची प्रतिमा घडवू शकत नाहीत आणि बिघडवूही शकत नाहीत, याची अनेक उदाहरणे आहेत. सन २००७ आणि २०१२ या दोन्ही निवडणुकीत सर्व माध्यमं विरोधात असतानादेखील मोदी गुजरात विधानसभा निवडणुकीत यशाचे धनी झाले होते, हे विसरता येणार नाही. त्यामुळे मोदींच्या यशाला माध्यमं कारणीभूत आहेत, असं सरसकट म्हणता येणार नाही. २००९च्या लोकसभा निवडणुकीत हेच नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून समोर आले असते आणि आता ज्या पद्धतीने त्यांनी माध्यमांचा उपयोग केला तसाच त्या वेळीही केला असता तर आतासारखे बहुमत त्यांना मिळाले असते? मुळीच नाही. कारण त्या वेळी तत्कालीन सत्ताधा-यांविषयी जनक्षोभाची तीव्रता आता इतकी शिगेला पोहोचलेली नव्हती. किंबहुना, जनक्षोभ नव्हताच. याचाच अर्थ, मोदींच्या यशाचं श्रेय बहुतांशी मनमोहनसिंग यांच्या सरकारला द्यायला हवं. तरीही मोदींचं कौतुक का, तर मोदींनी जनक्षोभाची तीव्रता वाढवली आणि सक्षम पर्याय म्हणूनही स्वत:ला सादर केलं. एमआयएमच्या ओवेसींनीही तेच केलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच तुमचं आतापर्यंत अहित कसं केलं, हे सांगून त्या पक्षािवषयीच्या असंतोषाची तीव्रता वाढवली आणि तुमच्यासाठीचा सक्षम पर्याय आम्ही आहोत, हे त्यांनी मुस्लिम मनावर बिंबवलं. त्यामुळे मुस्लिम समाजातला तरुणच नव्हे; सर्व वयोगटातला मतदार आेवेसींच्या मागे गेला आहे, हे मतदानाची आकडेवारीच सांगते.

विरोधकािवषयीच्या असंतोषाची तीव्रता वाढवणे, हा निवडणूक रणनीतीतला एक भाग झाला. त्यामुळे मतदार सत्ताधा-यांना मत देणार नाही; पण जोपर्यंत आपण सक्षम पर्याय आहोत, हे मतदाराला पटत नाही; तोपर्यंत तो आपल्यालाही मतदान करणार नाही, हे ब-याच नेत्यांच्या लक्षात येत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बाबतीत तेच झालं. विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या भाषणांनी सत्ताधा-यां विषयीच्या असंतोषाची धार तीव्र झाली खरी; पण आपण सक्षम पर्याय आहोत, हे राज सिद्ध करू शकले नाहीत. त्यामुळे ती मते त्यांच्याकडे वळण्याऐवजी भाजपा आणि काही ठिकाणी शिवसेनेकडे गेली. मोदींनी गुजरात राज्यात केलेली कामे मतदारांसमोर ठेवली आणि ओवेसी यांनी हैदराबादमध्ये केलेली कामे मुस्लिम मतदारांसमोर ठेवली. तसे राज यांना त्यांनी नाशिकमध्ये काही काम केले असते, तर ते समोर ठेवता आले असतेे; पण सहा महिने आयुक्त दिला नाही, अशी सबब ते सांगत राहिले. मतदारांना अडचणी सांगणारा नेता नको असतो, रिझल्ट देणारा नेता हवा असतो. मोदींमध्ये सा-या देशाने आणि ओवेसींमध्ये महाराष्ट्रातल्या मुस्लिम मतदारांनी तो चेहरा पाहिला, हे स्पष्ट आहे. सत्ताधा-यांिवषयी असंतोष निर्माण करून स्वत:चा पर्याय समोर ठेवणे, हे मोदी आणि ओवेसींमधले एक साम्य झाले. इतर अनेक साम्यस्थळे आपण पुढच्या लेखात पाहू.
deepakpatwe@gmail.com