आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article About Psychology Behind Selfi In RASIK DIvya Marathi

‘सेल्फी’ची गुंतवळ (माणूस आणि मन)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुमारे एकशे पंचाहत्तर वर्षांपूर्वी अमेरिकेतल्या फिलाडेल्फिया येथील रॉबर्ट कॉर्नेलिस नावाच्या तरुणाने जगातला पहिला सेल्फी काढल्याचा दावा नुकताच अमेरिकी माध्यमांनी केला आहे. ‘सेल्फी’मागे दडलेल्या मानसिकतेचा शोध घेणा-या जोन अॅकोसेल्ला लिखित मे-२०१४मध्ये प्रकाशित ‘न्यूयॉर्कर’ मासिकातील लेखाचा हा अनुवाद…

इसवीसनपूर्व पहिल्या शतकातला रोमन कवी ओविडच्या ‘मेटामॉरफॉसिस’ नावाच्या दीर्घकाव्यात नार्सिसस नावाचा तरुण आपल्याला भेटतो. हा तरुण कमालीचा देखणा असतो. एकदा हा तरुण वनातल्या एका तळ्याकाठी पोहोचतो. पाणी पिण्यासाठी म्हणून वाकतो, तसं पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबात त्याला त्याचा चेहरा दिसतो. पहिल्यांदाच स्वत:चं असं देखणं रूप पाहून तो स्वत:च्या प्रेमात पडतो. धडपडत प्रतिबिंबाचं चुंबन घेण्याचा प्रयत्न करतो. वेडापिसा होऊन काय करू नि काय नको, या अवस्थेला जाऊन पोहोचतो. त्यातूनच नैराश्य त्याला घेरतं. तो खाणं-पिणं विसरतो. त्याची झोप उडते. सरतेशेवटी भ्रमिष्टावस्थेला तो पोहोचतो आणि वनातच मरण पावतो.

नार्सिससच्या याच कथेने बहुधा जगाला ‘नार्सिझम’ या शब्दाची ओळख करून दिली. नार्सिझम म्हणजे, स्वप्रेमात आकंठ बुडणे. हजारो वर्षांनंतर आधुनिक मानसशास्त्राच्या प्रगतीबरोबरच ही संकल्पना अधिकच गुंतागुंतीची होत गेली. मानवी मनाचा तळ खरवडून काढणा-या सिगमंड फ्रॉइडने ही कल्पना मुख्यत: स्त्रीवर्गाशी निगडित असल्याचं मानलं. त्या समर्थनार्थ त्यानं एक प्रश्न उभा केला, स्त्रीला काय हवं असतं? त्यावर त्याचं उत्तर होतं, पुरुषाला असलेलं लिंग. हा हवाहवासा अवयव नसल्यानेच त्याची भरपाई म्हणून त्या स्वत:च्या चेह-याचं, शरीराचं भारी कौतुक करत राहतात आणि नार्सिसिस्टिक होतात, असा त्याचा सिद्धांत.

मात्र, जसाजसा काळ सरत गेला, अनेक मानसशास्त्र अभ्यासकांनी फ्रॉइडपेक्षा अधिक शास्त्रीय पद्धतीने ‘नार्सिसिझम’ या वर्तनशैलीचा अभ्यास केला. १९८०मध्ये अमेरिकन सायकिअॅट्रिक असोसिएशनच्या ‘डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ मेंटल डिसऑर्डर’ (डीएसएम)मध्ये या अवस्थेचा मानसिक आजार म्हणून समावेश झाला. संस्थेच्या अलीकडच्या या विषयावरील अंकात नार्सिसिझमचं प्राथमिक लक्षण अवास्तव कल्पनारम्यता हे मानलं गेलं. त्यानुसार स्वप्रेमात असलेले लोक स्वत:च्या कर्तृत्वाचे तारस्वरांत डिंडिम वाजवतात. त्यांना कायम असं वाटत राहतं की, जगात ते ‘स्पेशल’ आहेत आणि ‘स्पेशल’ माणसांमध्येच त्यांना समजून घेण्याची कुवत आहे. नोकरी-धंद्यात सर्व प्रकारच्या सुखसोयी मिळणं, हा त्यांना त्यांचा जन्मसिद्ध अधिकार वाटतो. स्वत:पलीकडे इतरांबद्दल त्यांना फारशी आस्था वाटत नसते. सर्वसाधारणपणे अशा प्रकारच्या माणसांचं चांगला किंवा वाईट असं वर्गीकरण केलं जातं, पण ‘डीएसएम’च्या नजरेत अशी माणसं चांगली किंवा वाईट नव्हे, तर मनाने निरोगी किंवा आजारी असतात. डीएसएमसाठी नार्सिसिझम हा व्यक्तित्ववैगुण्याचा एक प्रकार आहे. अमेरिकेतल्या टेनेसी प्रांतातल्या व्हॅनडरबिल्ट विद्यापीठात इतिहासाचे अध्यापन करणा-या एलिझाबेथ लुनबेक नावाच्या विदुषीने या अवस्थेची पाठराखण करताना ‘अमेरिकनायझेशन ऑफ नार्सिझम’ नावाचं पुस्तक नुकतंच लिहिलं आहे. दुसरे एक लेखक ख्रिस्तोफर लॅश. त्यांचं ‘दी कल्चर ऑफ नार्सिसिझम : अमेरिकन लाइफ इन अॅन एज ऑफ डिमिनिशिंग एक्स्पेक्टेशन्स’ असं भल्यामोठ्या नावाचं पुस्तक अमेरिकेत तुफान खपलं होतं. पण लुनबेकने लॅशवरही तोफ डागली होती. युद्धोत्तर अमेरिकी समाजात नीतिमूल्यांची झालेली घसरण अशा प्रकारच्या वर्तनाला कारणीभूत असल्याचा लॅशने काढलेला निष्कर्ष तिने सपशेल नाकारला होता.

१९७९मध्ये रॉबर्ट रस्किन आणि केल्विन हॉल या दोन मानसोपचार तज्ज्ञांनी नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी इन्व्हेंटरी नावाची चाचणी पद्धत शोधून काढली होती; पण याही पद्धतीवर चहुबाजूंनी टीका होऊ लागली. एकूणच नार्सिसिझम ही अवस्था मानसशास्त्राच्या गटात मोडत असल्याबद्दल अनेक पातळ्यांवर प्रश्नचिन्हं उभी करण्यात येत होती. प्रश्न उपस्थित करणा-यांमध्ये लुनबेक आघाडीवर होती. फ्रॉइडशी मतभेद झालेला त्याचा शिष्य सँडोर फेरेन्झी लुनबेकचा समविचारी म्हणून पुढे आला होता. फ्रॉइडच्या मते, कमालीच्या हटवादी स्वभावामुळे स्वप्रेमाचा आजार जडलेल्यांवर उपचार शक्य नाही. तर फेरेन्झी अशा मताचा होता की, कसंही असलं तरीही नार्सिसिस्ट असलेल्या माणसांवर उपचार झालेच पाहिजे. त्यांच्या हटवादी वृत्तीचा स्वतंत्रपणे अभ्यासही झाला पाहिजे. फ्रॉइडला असंही वाटायचं की, मानसोपचारतज्ज्ञाने उपचार करताना स्वत: बोलण्यापेक्षा रुग्णाचं म्हणणं तेवढं नीटसपणे ऐकलं पाहिजे. तर फेरेन्झी म्हणत होता की, नार्सिसिस्ट रुग्णांना आईच्या मायेनं समजून घेतलं पाहिजे, त्यांना कधीही न मिळालेलं प्रेम आणि जिव्हाळ‌ा दिला पाहिजे. अर्थात, फेरेन्स हा एकच लुनबेकचा विश्वास संपादन करणारा मानसशास्त्रज्ञ नव्हता. हाइन्झ कोहट नावाचा व्हिएन्नामधून अमेरिकेत स्थलांतर झालेला आणखी एक तज्ज्ञ होता. फेरेन्सप्रमाणे त्याचा दावा होता की, नार्सिसिझमची समस्या मुख्यत: आईच्या आपल्या मुलांकडे झालेल्या दुर्लक्षातून उद्भवते. अशी दुर्लक्षित मुलं स्वत:चा आत्मविश्वास गमावून बसतात. पण ही अवस्था एका विशिष्ट टप्प्यावर पूर्ण नव्हे तर ब-यापैकी नाहीशी होते. पुन्हा जेव्हा कधी त्या माणसाच्या आयुष्यात नैराश्याचे, अपयशाचे क्षण येतात, तेव्हा हे व्यक्तित्ववैगुण्य त्याच्यात उसळी मारून वर येते. कोहट मानवी दृष्टिकोनातून या समस्येकडे बघत होता. ७० आणि ८०चे दशकही मानवीय सिद्धांतांचे आणि उपचारांचे दशक होते. कार्ल रॉजर्स, अब्राहम मॅस्लो यांसारखे तज्ज्ञ स्वप्रेमाचा विकार जडलेल्या रुग्णांना उपचारांचा एक भाग म्हणून मनमोकळेपणाने रडण्यास, ओरडण्यास, खुर्ची-टेबल आदी वस्तू लाथाडण्यास, म्हणजेच दबलेल्या मनाचा निचरा करण्यास प्रवृत्त करत होते. कोहटने या समस्येकडे बघण्याचा तज्ज्ञांचा दृष्टिकोन आमूलाग्र बदलून टाकला होता. हेच कदाचित लुनबेनला अपेक्षितही होते. पुढे सायमन ब्लॅकबर्न नावाच्या लेखकाने ‘मिरर मिरर : दी युजेस अँड अब्युजेस ऑफ सेल्फ लव्ह’, थिंक, बिइंग गुड, लस्ट, ट्रुथ, आदी पुस्तकांतून लुनबेकच्या विचारांना समर्थन देताना स्वप्रेमाच्या मर्यादांची जाणीवही करून दिली होती. ब्लॅकबर्नच्या म्हणणं होतं की, आपण स्वत:वर प्रेम जरूर करावं; पण जगाला स्वत:पासून पूर्णपणे वेगळं काढून किंवा जगाचं अस्तित्वच नाकारून निर्णय मात्र घेऊ नयेत. शक्य झालं तर इतरांच्या विचार-भावनांनी जाणीव असू द्यावी. या संदर्भात आपलं म्हणणं अधिक स्पष्ट करताना ब्लॅकबर्न उत्क्रांतीवादाचा क्रांतिकारी सिद्धांत मांडणा-या चार्लस डार्विनच्या थोरल्या मुलाची गोष्ट सांगतो. डार्विनचं निधन झालेलं असतं. वेस्टमिन्स्टर अॅबेमध्ये दफनविधीचा कार्यक्रम सुरू असतो. दरम्यान, कुठल्या तरी अर्जावर सही करण्यासाठी म्हणून डार्विनचा थोरला मुलगा विलियम एका हातातला मोजा डोक्यावर चढवतो आणि संपूर्ण विधीदरम्यान तो हातमोजा डोक्यावरून काढण्याची तसदी घेत नाही. ब्लॅकबर्नच्या म्हणण्यानुसार, डार्विनच्या मुलाचं ते वागणं कुणाला वरकरणी आत्ममग्न आणि स्वजाणिवेला नाकारणारं वाटत असलं तरीही प्रत्यक्षात मात्र तिथे उपस्थित असलेल्यांचं अस्तित्व नाकारणारं होतं. इतरांचं कायम आपल्याकडे लक्ष जावं, अशी स्वप्रेमात असलेल्यांची इच्छा असते आणि त्या हेतूनेच ते वागत-बोलत असतात. डार्विनचा मुलगा त्याला अपवाद नव्हता. ब्लॅकबर्नच्या म्हणण्यानुसार, सद्वर्तन हे इतरांच्या अस्तित्वाची दखल घेतल्याची पहिली खूण असते. प्रत्येकाचा अवकाश जपल्याची पावतीसुद्धा. पण नार्सिसिस्ट माणूस यापासून जाणीवपूर्वक स्वत:ला वेगळं ठेवत असतो. म्हणजे, लॅश ज्याप्रमाणे नार्सिसिस्ट माणसांची लक्षणं काय, हे सांगून नकारात्मक सूर लावतो; एलिझाबेथ लुनबेक नार्सिझम ही समस्या नाही, असं एका पातळीवर म्हणते; पण ब्लॅकबर्न या दोघांपेक्षा वेगळी भूमिका घेत, स्वप्रेम ही काही फारशी विघातक बाब नाही, असं म्हणतो. किंबहुना, आत्ममग्नतेकडे थोडंसं प्रेमानं बघा. पण त्यात वाहवत जाऊ नका. मुख्य म्हणजे, स्वत:पलीकडे जाऊन दुस-यांचा विचार करा. आजचं ‘सेल्फी’मय जग दुस-यांचा विचार करणारं आहे का, हाच अंतर्मुख करायला लावणारा प्रश्न आहे.