आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article About Ravan By Raghuveer Kul, Divya Marathi, Rasik

खलनायक : रावण-सर्वश्रेष्ठ खलनायक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामायण हा आपल्या संस्कृतीचा पाया आहे. त्यामधील घटना आणि पात्रे वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या रूपामध्ये (दहा तोंडे) घेऊन पुन:पुन्हा आपल्यासमोर आली आहेत. मात्र, या सर्वांमध्ये ‘रावण’ हा आदी खलनायक आहे. त्याला प्रणाम. त्याला पर्याय नाही.

जगातील सर्वश्रेष्ठ आणि सर्वप्रथम खलनायक म्हणून जर कोणाची पाद्यपूजा करायची असेल तर ती रावणाची करावी लागेल. होय, पाद्यपूजाच. कारण तो होताच तसा विद्वान आणि कलावंत. वेदांचा अभ्यासक असणारा रावण उत्तम वीणावादक होता. त्याच्या ध्वजावर वीणेचे चित्र होते.

रावण या शब्दाचा शब्दश: अर्थ ‘रडवणारा’ असा असला तरी सिंहली भाषेमध्ये ‘रा’ म्हणजे सूर्य आणि ‘वणा’ म्हणजे पिढी - नवीन जनरेशन. तामिळ भाषेत ‘इरावन’ म्हणजे राजा. भारताविरुद्धच्या भावनेला हात घालण्यासाठी श्रीलंकेमधील अतिरेक्यांनी भारतीयांना म्हणजे आर्यांना विरोध करणारा प्रथम पुरुष रावणाला ठरवला होता. पेरियार रामास्वामींनी हेच पुन:पुन्हा आयुष्यभर सांगितले. दशानन, लंकेश्वर अशी अनेक नावे असणारा रावण भविष्यवेत्ताही होता. ‘रावणसंहिता’ नावाचा भविष्यकथन करणारा ग्रंथ आणि राजकीय राज्यशास्त्राचा अभ्यासपूर्ण ग्रंथ त्याच्या नावावर आहे.

रावणाला बिभीषण, कुंभकर्ण हे दोन भाऊ होते आणि अहिरावण हाही त्याचाच भाऊ मानला जातो. तसेच रावणाच्या बहिणीचे नाव चंद्रणखा अर्थात शूर्पणखा (टोकदार नखं असणारी) असे होते. वडील ऋषी आणि क्षत्रिय असल्यामुळे विद्या आणि शूरता त्याच्या रक्तातच होती. अग्निहोत्राचे पालन करणारा रावण आपल्या चंद्रमुखीसारख्या बहिणीचे- शूर्पणखाचे नाक कापले म्हणून सुडाने पेटला होता. ब्रह्माची मर्जी संपादन करण्यासाठी त्याने नर्मदेकिनारी घोर तपश्चर्या केली आणि दहा वेळा आपले शिर कापून त्याच्या चरणी अर्पण केले. प्रत्येक वेळी पुन:पुन्हा त्याच्या धडावर शिर आले आणि तो दहा तोंडाचा दशानन झाला. लवणासुरही त्याचा भाऊ मानला जातो. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, पार दिल्लीजवळील मथुरेपर्यंत त्याचा वावर होता. शिवाचा भक्त रावण पार्श्वनाथाचाही भक्त होता. राजस्थानातील अलवारमध्ये त्याची पत्नी मंदोदरीने मंदिर वसवले आहे. ती जोधपूरची राजकन्या होती. मंदोदरीच्या नावावरून मंदोर हे गावही राजस्थानमध्ये आहे. रावणाचे उल्लेख पार हडप्पा संस्कृतीपर्यंत मिळतात. मध्य प्रदेशातील विदिशानगरात कन्याकुब्ज ब्राह्मण रावणाची पूजा करतात. भागवत पुराणामध्ये वैकुंठाचे द्वारपाल जय-विजय होते. त्यांच्या आगळिकीमुळे रागावून विष्णूने त्यांना पुढील जन्मामध्ये रावण आणि कुंभकर्ण म्हणून जन्माला घातले, अशी कथा आहे.

रावणाच्या तपश्चर्येच्या आणि युद्धाच्या अनेक कथा आहेत. शिवाला भेटण्यासाठी गेलेल्या रावणाला नंदीने अडवले आणि त्याने नंदीला चिडवण्यास सुरुवात केल्यावर नंदीने त्याला शाप दिला की, तुझी लंका माकडाकडून नाश पावेल (मारुतीने केलेले लंकादहन). शिवाला प्रसन्न करण्यासाठी जंग जंग पछाडणार्‍या रावणाला शिवाचे भक्तगण त्रास देत होते, तेव्हा त्यांना मारून त्यांच्या आतड्याची तार बनवून रावणाने वीणेला लावली आणि शिवाच्या स्तुतीचे गाणे सुरू केले. शिवाने प्रसन्न होऊन त्याला चंद्रहास तलवार म्हणजे चंद्राच्या कोरीसारखी वक्र आणि धारदार तलवार दिली. त्याआधी कैलास पर्वत आपल्या हाताने उचलून घेणार्‍या रावणाला शिवाने आपल्या पायाच्या अंगठ्याने दाबून ठेवले, तेव्हा वेदनेने ओरडणार्‍या रावणाच्या भीतिदायक आरोळी किंवा आक्रोशामुळेच रावण नाव पडले, असेही म्हणतात. रडणारा किंवा रडवणारा रावण. याच वेळी त्याने शिवतांडव स्तोत्र रचले. आजही हे स्तोत्र वाणी, उच्चार शुद्ध करण्यासाठी पाठ केले जाते.

एवढे सारे लेखाच्या सुरुवातीला सांगितले; कारण आपल्या चित्रपटामध्ये पद्धत आहे की, खलनायक किती ताकदवान, क्रूर, हुशार, पाताळयंत्री आहे, हे प्रत्यक्ष युद्धाआधी सांगितले किंवा दाखवले की मग हीरोचे त्याला मारणे, हरवणे कित्येक पटीने मोठे होते. आता लक्षात घ्या, अशा महापराक्रमी, महाबलाढ्य रावणाचे युद्ध होणार आहे रामाशी. (रावणाची लंका सोन्याची होती. अशी लंका जी रावणाच्या योग्य आणि जनकल्याण नीतीमुळे समृद्ध झालेली, संपन्न असणारी, सामान्य माणसांच्या घरातही सोन्याची भांडीकुंडी असणारी. या लंकेवर वनवासात फलाहार आणि कंदमुळे खाणार्‍या वानरांची सेना घेऊन राम आक्रमण करणार होता.) रावणाची आगळीक काय तर त्याने रामाच्या बायकोला- सीतेला फसवून पळवली; ‘किडनॅप’ केली. हा सगळा प्लॉट एकदम परफेक्ट, उत्तम रंगतदार क्लायमॅक्ससाठी योग्य मटेरियल. रामायण हा आपल्या संस्कृतीचा पाया आहे. त्यामधील घटना आणि पात्रे वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या रूपांमध्ये (दहा तोंडे) घेऊन पुन:पुन्हा आपल्यासमोर आली आहेत आणि या सर्वांमध्ये ‘रावण’ हा आदी खलनायक आहे. त्याला प्रणाम. त्याला पर्याय नाही. घनघोर युद्धामध्ये रोज नवनवीन आव्हाने उभी करणारा रावण सर्वगुणसंपन्न खलनायक ठरतो. एक एक शिर उडवल्याबरोबर त्या जागी पुन:पुन्हा शिर घेऊन येणारा रावण हा झोप उडवणारा आहे. आपल्याला काय गरज आहे इतका उत्तम खलनायक असताना अमेरिका, युरोपमधील सायन्स फिक्शन आणि काल्पनिक यंत्रमानवाचा खलनायक बघण्याची. त्या सर्व कल्पनांचा आधार रावणच आहे.

ब्रह्माकडून चिरंजीव होण्याचे वचन घेऊन आपणास कोणीही मारू शकणार नाही, याचा गर्व होऊन उच्छाद मांडणार्‍या या राक्षस राजाचा जीव, परीकथेमधील राक्षसासारखा त्याच्या बेंबीमधल्या अमृतकुंभामध्ये होता. नेहमीप्रमाणे फितुरी होऊन रामास ही गोष्ट बिभीषणाकरवी समजली आणि त्याने रावणाचा वध केला. शेवटी रावणाचा वध झालेला असला तरी आजतागायत रामाच्या बरोबरीने रावणाचे नाव लोकांच्या तोंडी आहे. रावण हा सर्वगुणसंपन्न, सर्वश्रेष्ठ खलनायक आहे, हे सांगण्यासाठी कुठल्याही वाल्मीकी रामायणाची किंवा तुलसीदासाच्या रामचरितमानसची गरज आहे का?
raghuvirkul@gmail.com