आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article About Reason's Behind Increasing Numbers Of Divorce

आणि ते सुखाने नांदू लागले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परस्परांबद्दलच्या वाढत्या अपेक्षांमुळे विवाह आणि कुटुंबसंस्थेला तडे जाऊ लागले आहेत. मुंबई कुटुंब न्यायालयाच्या अहवालानुसार गेल्या एक दशकापासून घटस्फोटांच्या प्रकरणांत चौपट वाढ झाली आहे. काय आहेत यामागची कारणं...

‘शयनगृहाची खिडकी उघडी असेल तर जिला झोप येत नाही आणि तीच खिडकी बंद असेल तर ज्याला झोप येत नाही, अशा स्त्री-पुरुषांच्या युतीस विवाह असे म्हणतात.’ जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी केलेली ही विवाहाची गमतीदार पण मार्मिक व्याख्या! पिढ्या बदलल्या तरी ही व्याख्या आजही चपखल वाटते. विवाहापूर्वीच्या स्वप्नरंजनात अशा रुक्ष गोष्टींचा विचार कोणी करत नाही. त्यामुळे नंतरचे अपेक्षाभंग अपरिहार्य होतात! आता तर अपेक्षांचं आणि अपेक्षाभंगांचं प्रमाण दोन्ही बाजूंनी इतकं वाढलंय की विवाहसंस्थेला तडे जाऊ लागले आहेत. मुंबई कुटुंब न्यायालयाच्या अहवालानुसार गेल्या एक दशकापासून घटस्फोटांच्या प्रकरणांत चौपट वाढ झाली आहे.

‘मी माझा’कार चंद्रशेखर गोखले म्हणतात...

घर असतं दोघांचं
दोघांनी सावरायचं
एकाने पसरवलं
तर दुस‍ऱ्याने आवरायचं.

पूर्वी स्त्री-पुरुषांमधे घरातल्या आणि बाहेरच्या कामांची विभागणी स्पष्ट होती, तोवर हे शक्य होत होतं. जागतिकीकरणानंतर कधी आर्थिक गरज तर कधी स्वत:चा अवकाश शोधायला म्हणून स्त्री जेव्हा घराबाहेर पडू लागली पण श्रमविभागणीचं प्रमाण मात्र व्यस्तच राहिलं, तेव्हा तिचा त्रागा वाढू लागला. तिला ‘स्पेस’ हवीशी वाटू लागली, तिचं आत्मभान जागं होऊ लागलं तसतशी तिची घुसमट होऊ लागली.

धावपळीच्या आयुष्यामुळे पती-पत्नींमधला संवाद कमी होत गेला, त्यामुळे होणाऱ्या शारीरिक व मानसिक कुचंबणेची परिणती कधी नकळत तर कधी हेतुपुरस्सर विवाहबाह्य संबंधांमध्ये होताना दिसू लागली. झोपडपट्ट्यांतूनही ‘दारुड्या नवऱ्याचा रोज मार खाण्यापेक्षा आईबापाच्या घरी राहून चार घरची धुणीभांडी केलेली बरी’ म्हणत परत आलेल्या स्त्रियांची संख्या वाढू लागली. या सामाजिक उलथापालथींचा परिणाम म्हणजेच वाढते विवाहविच्छेद.

जेव्हा शारीरिक किंवा मानसिक अत्याचार विकोपाला पोचतात तेव्हा घटस्फोटाला इलाज नसतो. पण फालतू कारणांमुळे घेतले जाणारे घटस्फोट हा चिंतेचा विषय आहे. उदा : बहुसंख्य पुरुष अहंकारामुळे आजही बायकोचं बदलतं सामाजिक स्थान स्वीकारू शकत नाहीत. दुसऱ्या बाजूला काही मुली नव‍ऱ्याकडून जगातल्या सर्व सुखसोयींची अपेक्षा करत असतानाच त्याच्यासह येणाऱ्या जबाबदाऱ्या सोयिस्करपणे टाळू पाहतात. मागच्या पिढीला स्वत:च्या करिअरपुरती शिडी म्हणून वापरतात. तर कधी नातेवाईक अवाजवी हस्तक्षेप करतात. अर्थात घटस्फोटित स्त्रीचं जिणं आजही किती बिकट आहे याची जाणीव असलेल्या स्त्रिया हौस म्हणून या टोकाला नक्कीच जात नाहीत. काही वेळेस काही शल्यं सांगता येत नाहीत, पण आयुष्य आतून पोखरत राहतात. जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे. म्हणूनच आजच्या पिढीला सरसकट दोषी ठरवणं अन्यायाचं होईल. ‘आमचे नाही का झाले संसार,’ ‘हल्लीच्या पिढीला कसल्या जबाबदाऱ्या नकोत,’ ‘हे सगळं मुलींना डोक्यावर बसवल्यामुळे झालंय,’ वगैरे टोकाच्या प्रतिक्रिया देणाऱ्या मागच्या पिढीने हादेखील विचार करावा की पूर्वीचे सगळेच संसार खरोखर सुखी होते का? की ती ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ होती? परतीची दारं बंद असल्याने, बेताचे शिक्षण आणि अपु‍ऱ्या संधींमुळे, इतर आर्थिक पर्याय नसल्याने, मनावर ‘लोक काय म्हणतील’ याचे प्रचंड दडपण असल्याने, काही ठिकाणी ‘त्यागाच्या भारतीय परंपरेला’ पूर्णपणे स्वीकारल्याने संसार ‘एकसंध’ राहत.

ते काही असले तरी यामुळे मुलांना कौटुंबिक आणि मानसिक स्थैर्य मिळत असे हे मात्र नाकारता येणार नाही. आजच्या वाढत्या घटस्फोटांमुळे भरडली जाते आहे ती उद्याची पिढी. अलीकडेच विधी आयोगाने घटस्फोटाच्या प्रकरणात मुलांना काही काळ आई आणि वडील या दोघांजवळही राहू देण्याची परवानगी असावी, अशी शिफारस केली आहे. काही प्रकरणांमध्ये मुलांचा सांभाळ करण्यासाठी आईकडून अवाजवी भरपाई मागण्यात येत होती, तर नोकरी-व्यवसायाचे कारण सांगून वडिलांनी मुलांची जबाबदारी टाळण्याचे प्रमाणही खूप जास्त होते. मुलांवर लादले जाणारे एकल पालकत्व, त्यातून निर्माण होणारी मानसिक गुंतागुंत आणि त्यामुळे खालावणारा मुलांचा भावनांक येत्या काळात एक उग्र सामाजिक प्रश्न बनून उभा ठाकणार आहे.

स्वत:ला झोकून देऊन सामाजिक काम करणारी दांपत्यं संसारातील कुरबुरींना अपवाद असावीत. उदा. सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते दांपत्य बंग किंवा आमटे. ‘उदात्त ध्येय, समविचार, त्यागी वृत्ती आणि परस्परांवरील निरपेक्ष प्रेम’ हे याचं सूत्र असू शकेल. पण सर्वसामान्य जोडप्यांमधल्या वाढत्या विसंवादाचं काय!

लग्न करतानाच्या निकषांमध्येच याची कारणं दडलेली आहेत. ‘Many a men in love with a dimple, make the mistake of marrying the whole girl’ असं स्टीफन लकॉकने मिश्किलपणे म्हटलंय. फक्त रूप पाहून वधूची आणि कमाई पाहून वराची निवड केली जाते! नंतर चष्मा, मंगळ, शनी, मुलीला भाऊ आहे की नाही अशा ‘अजब’ माहितीला प्राधान्य असते. लग्न करताना आजच्या काळातही ‘परस्परपूरकता’ हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा विचारातच घेतला जात नाही. विवाहानंतर दोन वेगवेगळ्या आचार, विचार, संस्कृतीच्या कुटुंबात १/३ आयुष्य घालवलेली दोन माणसे एकत्र येतात तेव्हा त्यांच्या सहजीवनविषयक कल्पनांमध्ये फरक असणारच. हे लक्षात घेऊन तो पचवायला आवश्यक तेवढा वेळ देण्याच्या आधीच फारकतीची घाई केली जाते.

मात्र, नातं तोडण्याची घाई करण्यापेक्षा समुपदेशनाची मदत घेता येईल. आलेल्या परिस्थितीतून योग्य मार्ग काढत दांपत्यातील असे ताण कमी करता येऊ शकतात. बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीच्या वागण्यामागे ती स्वत: कारणीभूत नसून परिस्थिती कारण असते हे कळायला त्यातून मदत होते. परस्परांपेक्षा स्वत:च्या अहंभावाशी काडीमोड घेतला आणि स्त्री/पुरुष यापलीकडे जाऊन एकमेकांचा माणूस म्हणून खुल्या मनाने विचार केला तर ही नाती नव्याने फुलतील. Time (एकमेकांसाठी वेळ,) Trust (परस्परांवर विश्वास,) Talk (आपसातला संवाद) आणि Touch (आश्वासक स्पर्श) या चार T मधे कोणतही नातं भक्कमपणे पेलण्याची ताकद असते, असं मानसशास्त्राचे अभ्यासक म्हणतात. मानवी मन आणि नातेसंबंधाची संपूर्ण उकल ही अवघड बाब आहे, तरीही हा गुंता कमी करण्याचा प्रयत्न या कारणांना समजून घेऊन केला जावा. तसे घडले तर ‘...आणि ते सुखाने नांदू लागले’ हा केवळ परीकथेचा शेवट नसेल. ती एक नवी डोळस सुरुवात असेल.

एखाद्या व्यक्तीच्या वागण्यामागे ती स्वत: कारणीभूत नसून परिस्थिती कारण असते हे कळायला समुपदेशनातून मदत होते. परस्परांपेक्षा स्वत:च्या अहंभावाशी काडीमोड घेतला आणि स्त्री/पुरुष यापलीकडे जाऊन एकमेकांचा माणूस म्हणून विचार केला तर तुटू पाहणारी नाती नव्याने फुलतील.

mohinimodak@gmail.com