आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फापटपसारा: यंत्रमानवाचे आक्रमण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनच्या टॅन्सेन्ट कंपनीने बनवलेला रोबोट पत्रकार नुकताच चर्चेत आला. कुतूहल चाळवणाऱ्या या रोबोटकडे हार्डवेअरपेक्षा सॉफ्टवेअर म्हणून पाहिले, तर भविष्यातली गुंतागुंत समजून घेता येते...

या महिन्याच्या पूर्वार्धात चीनच्या टॅन्सेन्ट कंपनीने तयार केलेला रोबोट पत्रकार चर्चेत आला. रोबोट बातमी लिहू शकतो, याचे काहींना आश्चर्य वाटले, तर काहींनी ही गोष्ट फारशी गंभीरपणे घेतली नाही. कुठल्याही क्षेत्रात जिथे आकडेवारी हा बातमीचा मुख्य गाभा असतो, त्या प्रत्येक क्षेत्रात ऑटोमॅटिक रोबोट्स वार्तांकने करू लागली आहेत. शेअरबाजारातला निर्देशांक १०० अंशांनी खाली असेल, तर हा -१०० आकडा रोबोटला पुरवल्यानंतर ‘मुंबई शेअरबाजार १०० अंशाने कोसळला', ‘शेअरबाजारात १०० अंशाची घसरण', ‘शंभर अंशाने घसरला शेअर बाजार' अशा विविध वाक्यरचना करून रोबोट त्यापासून बातमी तयार करू शकतो. हेच निवडणुका, हवामान, इतर खेळ आणि अशा काही क्षेत्रांच्या बातम्या बनविताना लागू पडू शकते. गणिताचा थोडाफार अभ्यास असणाऱ्यांना यात प्रोबॅबिलिटी, पर्म्युटेशन्स, काँबिनेशन्सचा वापर केला आहे, हे लगेच कळून येईल. चीनने बनविलेला हा रोबोट हार्डवेअरपेक्षा सॉफ्टवेअर रोबोट या नजरेने पाहिला तरच त्याचा व्यवस्थित अर्थ समजून घेता येईल.

रोबोट हा शब्द उच्चारल्यानंतर साहजिकच कॉमिक बुक्स आणि टीव्हीवर पाहिलेल्या चौकोनी ठोकळ्यांची आकृती डोळ्यासमोर येते. वास्तवात आपल्या आजूबाजूचे यांत्रिकी जग हे बहुतांशी रोबोट्सने वापले असून त्यात नानाविध रोबोट्सचा सहभाग आहे. जेसीबी मशिन किंवा पिठाच्या गिरणीत असणाऱ्या मशिन्ससारखी ही अशी मशिन्स आहेत, ज्यांना एकदा आज्ञावली फिड करून त्यांच्याकडून एकच काम वारंवार करून घेतले जाते. हे रोबोट्स मग प्लास्टिक वितळवून त्याला विविध मोल्डमध्ये घालू शकतात, एखाद्या वस्तूचे सुटे भाग एकत्र करून त्याला नटबोल्ट‌्स लावू शकतात किंवा मग खारवलेले पॅकेज्ड शेंगदाणे पॅक करताना एकूण एक शेंगदाण्याचा फोटो घेऊन त्यातले खवट शेंगदाणे बाजूला करू शकतात. या वृत्तपत्राची तुमच्या हातात असलेली पुरवणी ही मुख्य पेपराच्या आत टाकण्याचे कामही रोबोटकडूनच होते. सेमिकंडक्टर आयसीचा शोध लागल्यानंतर टेपरेकॉर्ड‌र्स जसे लहान लहान होत गेले, त्याचप्रमाणे संगणक आणि उद्योगक्षेत्रातली यंत्रेही आकाराने लहान होत गेली. उत्पादन करणाऱ्या कुठल्याही मशिनला संगणक जोडून त्यावर त्या मशिनची आज्ञावली ठेवण्याचा मार्ग काढण्यात आला. यामुळे कामे वेगाने आणि अचूक होऊ लागली आणि अ‍ॅसेंब्ली लाईनवर कामगारांची संख्या कमी झाली. पुढे हे तंत्र जसजसे अधिक विकसित होत गेले, तसतशी ही रोबोटिक यंत्रे कारखान्यातली कित्येक कामे सुपरवायझरच्या देखरेखीशिवाय करू लागली. आज लाखो बाटल्या कोल्ड्रिंक बनविणाऱ्या बॉटलिंग प्लँट‌्समध्ये फक्त एकच माणूस कामगार म्हणून नेमला जातो आणि त्याचे कामही फक्त मशिन चालू असताना एके ठिकाणी शांत बसून "काही घोटाळा होत नाहीये ना', हे पाहणे एवढेच असते.

रोबोटच्या अशा वाढत्या वापराला उत्पादन क्षेत्रातल्या कंपन्यांचे नेहमीच समर्थन मिळाले आहे. जगातल्या काही भागात असलेल्या गरीब राष्ट्रांनी मग या रोबोट्सला पर्याय म्हणून आपल्या देशातील माणसे उपलब्ध करून दिली. पोटाची भूक भागविण्यासाठी ही माणसे तक्रार न करता यंत्रवत एकाच प्रकारचे काम पुन:पुन्हा करीत राहतात. गेल्या दशकात चीनने उत्पादन क्षेत्रांत घेतलेल्या गगनभरारीमागे रोबोट्सला पर्यायी असणाऱ्या स्वस्त मजुरांचा सहभाग महत्त्वाचा होता. आजकाल मजुरी अजूनही स्वस्त असली तरी काही क्षेत्रांतले उत्पादन हे अमेरिका वा युरोपच्या विकसित राष्ट्रांमध्ये सारख्याच खर्चाचे झाले असल्याने चीनमधले बरेचसे निर्माणकार्य अमेरिकेत परत जायला सुरुवात झाली असून ही कामे आता माणसांऐवजी रोबोट‌्स करीत आहेत. ऑटोमेशनचे प्रगत होत जाणारे हे तंत्रज्ञान येत्या वीस वर्षांत उत्पादन क्षेत्रात काम करणाऱ्या ५०%हून अधिक लोकांची नोकरी घालवू शकते. जे चित्र उत्पादन क्षेत्रात आहे, तेच आता बरेचसे सॉफ्टवेअर क्षेत्रातही दिसू लागले आहे. दैनंदिन जीवनात मशिन्सऐवजी फक्त कॉम्युटर्सचा जिथे वापर होतो तिथे नेहमीच्या डेटा एंट्रीज करणे, हाताने लिहिलेल्या कागदांचे डिजिटलायझेशन, मालाचा हिशेब ठेवणे या कामांसाठी तयार होणारी नवी सॉफ्टवेअर्स अधिकाधिक माणसाच्या हस्तक्षेपाची गरज नसणारी अशी बनविली जात असून त्यांचे स्वरूप हे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या वाढत्या विकासाचा पुढचा टप्पा आहे. मोबाइल फोन कंपनीला फोन केल्यानंतर ऐकवली जाणारी प्रिरेकॉर्डेड माहिती किंवा रेल्वे स्टेशनवर स्मार्ट कार्ड दाखवून तिकीट देणारे मशिन, हे या सॉफ्टवेअरच्या रोबोट्सची उदाहरणे आहेत. उत्पादन क्षेत्राप्रमाणेच सॉफ्टवेअर आणि बीपीओ क्षेत्रातल्याही रोजगारांची संख्या या रोबोट्समुळे कमी व्हायला सुरुवात झाली असून २०२५ पर्यंत संगणकावर माणसांनी करावे लागणारे ७५% रोजगार हे पूर्णतः संगणकाकडून केले जातील, किंवा मग त्याचे स्वरूप संपूर्ण बदललेले असेल. गेली दोन दशके माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने मुसंडी मारणाऱ्या भारत आणि फिलिपाइन्ससारख्या देशांसाठी ही निश्चितच धोक्याची घंटा आहे. भारतातील आयटी क्षेत्राचा विस्तार मंदावत असून या क्षेत्रात नव्याने फार रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. यापुढच्या टप्प्यात रोजगारांची संख्या रोडावण्याची शक्यताही नाकारता येत नाही. उत्पादन क्षेत्रात चीनला मागे टाकण्याची आकांक्षा ठेवून असणारा भारत किंवा सॉफ्टवेअर क्षेत्रात भारताच्या तोंडचा घास हिसकावू पाहणारा चीन या देशांतले वर्तमान राजकारण पाहता दोन्ही देशांनी रोबॉटिक्स अथवा ऑटोमेशन तंत्राकडे फार गंभीरतेने पाहिले आहे, असे वाटत नाही. उत्पादनाच्या संधी वा संगणकावर केली जाणारी कारकुनी कामे भविष्यातही अशीच चालू राहतील, या संभ्रमात हे देश आहेत. त्यामुळे ‘मेक इन इंडिया’सारख्या योजना कितपत खऱ्या आणि कितपत स्वप्नवत आहेत, याचा फरक स्पष्ट व्हावा.
माहिती तंत्रज्ञानाचा विस्फोट झाल्यानंतर प्रत्येकाच्या हातात आलेले स्मार्ट फोन्स, इंटरनेटचा वाढता प्रसार, सर्व कार्यालयीन कामकाजात संगणकाचा अनिवार्य वापर यामुळे आपले आयुष्य पूर्णतः तंत्रज्ञानावर अवलंबून झालेले अाहे. माणसे या स्वयंचलित व्यवस्थेची गुलाम होत आहेत. ही व्यवस्था बनविणारीही माणसेच आहेत, पण या माणसांचे मेंदू सामान्य माणसांपेक्षा बरेचसे प्रगत आणि वेगळ्या पद्धतीने चालतात, ज्यावर जगातल्या फक्त मूठभर कंपन्यांचे वर्चस्व आहे. तंत्रज्ञानाचा वाढता वापर या कंपन्यांना अधिकाधिक शक्तिशाली बनवत असून माणसांच्या जमातीचे भविष्य आता वॉलस्ट्रीटवरच्या हजारहूनही कमी लोकांच्या हातात एकवटले आहे. ‘नफा' हे एकमेव उद्दिष्ट ठेवून चालणाऱ्या कंपन्यांना हे सामर्थ्य मग त्यांना ‘माणूस' असण्याच्या मूलभूत व्याख्येकडून दिवसेंदिवस दूर नेत असून त्यातून आर्थिक शोषण, पिळवणूक, पर्यावरणाचा वेगाने होणारा ऱ्हास यांसारख्या गंभीर समस्यांचा जन्म होत आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून साम्यवादी राष्ट्रातल्या लोकांना गुलाम बनविणे, लोकशाही राष्ट्रांमध्ये कळसुत्री बाहुल्यांची सरकारे स्थापून ते देश आपल्या ताब्यात घेणे आणि जगातल्या एकूण एक भूभागाची इंच न‌् इंच जमीन मोजून ती आपल्या ताब्यात आणण्याचे प्रकार आरंभिले आहेत. हे सर्व कसे थांबविता येईल, यावर तीव्रतेने विचार करणाऱ्या संगणक तज्ज्ञांचा नवा समूह आकारास येत असून त्यात कडवे आणि सौम्य अशा हॅकर्सचा समावेश आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या स्वातंत्र्यावर डिजिटल माध्यमातून कशी बंधने आणत आहेत, यावर भाष्य करणारी ‘मिस्टर रोबोट' नावाची एक सिरीयल सध्या पूर्ण जगभर गाजत असून या सिरीयलमध्ये मांडलेले वर्तमानाचे वास्तव एकाच वेळी अनेक लोकांचे मनोरंजन आणि चिंतेचा भाग बनले आहेत. ‘मिस्टर रोबोट'मध्ये दाखविलेले न्यूयॉर्क शहर हे हॉलिवूडपटांमध्ये दाखविलेल्या अपार्टमेंटच्या सेटपेक्षा फार वेगळे असून त्याच्या कथानकात न्यूयॉर्क शहरांचे रस्ते आणि गरीब वस्त्या पाहायला मिळतात. या शहराची परिस्थिती खूप वेगळी असून त्यातल्या बऱ्याचशा फ्रेममध्ये माणसांशिवाय झाडे वा आणखी दुसरा कुठलाही जीव दिसून येत नाही. या सिरीयलमध्ये दिसणाऱ्या इमारती, परिसर आणि लोकांचे चित्रण, हे भांडवलवादाच्या एकाधिकारशाहीनंतर रंग उडालेल्या व्यवस्थेचे चित्रण आहे. वाढत्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आपल्या सभोवतालचे जग वेगाने बदलत असून आपल्या मोबाइलची बॅटरी संपून ती पुन्हा चार्ज करण्यासाठी ज्या दिवशी वीजच मिळणार नाही, त्या वेळी फोनमध्ये डोकावणाऱ्या आमच्या झुकलेल्या माना सरळ रेषेत येऊन आजूबाजूला जेव्हा बघतील, तेव्हा या एका पूर्ण वेगळ्या विश्वात त्यांना दिसणारे चित्र "मिस्टर रोबोट'मध्ये दाखविलेल्या भयावह चित्रापेक्षा वेगळे नसेल.
rahulbaba@gmail.com