भारतातील ग्रामीण भागात बहुतांश महिला आजही पाळीच्या दिवसांत जुने सुती कपडे वापरतात. शहरी भागात बहुतांश मुली आता सॅनिटरी नॅपकिन्स वापरू लागल्या आहेत. परंतु दर महिन्यात वापरल्यानंतर फेकून देण्यात येणा-या सॅनिटरी नॅपकिन्सचं काय होतं? पर्यावरणावर याचे किती गंभीर परिणाम होतात, याचा विचार केल्यास भयंकर वास्तव समोर उभं ठाकतं...
तुम्हाला माहिती आहे?
— सॅनिटरी नॅपकीन वापरणा-या प्रत्येक महिलेकडून पाळी असलेल्या वर्षांमध्ये जवळपास १२५ किलो अविघटनशील कचरा फेकला जातो.
— एका अभ्यासानुसार, जर पाळी सुरू असलेली भारतातील प्रत्येक महिला सॅनिटरी नॅपकिन्स वापरू लागली तर दरवर्षी ५८,५०० दशलक्ष पॅड्स कच-यात फेकले जातील.
— बहुतांश ब्रँड्सच्या सॅनिटरी नॅपकिन्समध्ये प्लास्टिकचा वापर केला जातो. यामुळे एका पॅडची १०० टक्के विल्हेवाट लागण्यासाठी ५०० ते ८०० वर्षे लागू शकतात.
— बहुतांश नॅपकिन्स शुभ्र पांढरे दिसण्यासाठी त्यात क्लोरीन ब्लीच वापरले जाते. यामुळे प्रतिकारशक्ती कमी होणे, स्तनाचा कर्करोग, गर्भपिशवीसंबंधी आजार उद्भवू शकतात.
सॅनिटरी नॅपकीन कशापासून बनतात?
— नॅपकिनचा वरील थर पॉलिप्रोपायलीनपासून बनतो. यातून द्रवपदार्थ शोषले जाऊन हा थर कोरडाच राहतो.
— त्यानंतरच्या थर सर्वात महत्त्वाचा असून त्यात द्रवपदार्थ शोषून घेणारे पॉलिमर्स आणि लाकडी भुसा असतो.
— त्यानंतर द्रवपदार्थ बाहेर न येण्यासाठी एका अच्छिद्र पॉलिथिनचा थर नॅपकिनच्या खालच्या बाजूस असतो.
— काही नॅपकिन्समध्ये सुगंधाचाही वापर केलेला असतो.
म्हणजेच सॅनिटरी नॅपकिनमध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणा-या प्लास्टिकमुळे उद्भवलेली समस्या भविष्यात उग्र रूप धारण करू शकते.