आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञान शिक्षण: अंडे किती वजन पेलेल?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


एखाद्या व्यक्तीला तू अंड्याएवढा शक्तिमान आहेस असे म्हटले तर त्याला नक्कीच राग येईल. पण अंडी खरेच किती वजन पेलू शकतात हे आज तुम्ही प्रयोगामधून सिद्ध करून दाखवायचे आहे. मुळात अंडे किती पटकन फुटते हे बहुतेकांनी स्वयंपाक घरात पाहिले असेल. त्याच्या एका टोकावर चमच्याने हळुवारपणे ठोकले म्हणजे त्यातील बलक बाहेर पडतो. जरा जोराने ठोकले तर अंडे हातातच फुटते. मग आजच्या प्रयोगामध्ये काही गोंधळ तर नसेल?
याचे उत्तर मिळवण्यासाठी जरा अभ्यासाची आवश्यकता आहे. सध्या सगळीकडे कॉलम सिमेंट व स्टील वापरून घरे आणि मोठमोठ्या इमारती बांधण्याची पद्धत आहे. पण दोनशे वर्षांपूर्वीची कोणतीही इमारत पाहा त्याचे बांधकाम कमानीवर बांधलेले आहेत. ब्रिटिशांनी बांधलेले कित्येक पूल कमानी आणि त्यावर रस्ता असे बांधलेले आहेत. या कमानी दगड आणि चुन्यानी बांधलेल्या आहेत. विजापूरमधील सुप्रसिद्ध इमारत गोलघुमट असो की औरंगाबादमधील बीबीका मकबरा. सर्व इमारतीचे वजन भल्या मोठ्या कमानींनी तोललेले आहे. दोन हजार वर्षांपूर्वी रोमन स्थापत्य शास्त्रज्ञांनी कमानीवरून पाण्याचे कालवे बांधून रोमला पाणी आणले होते. याचे अवशेष आजही शाबूत आहेत. असो. अंडे टणक पृष्ठभागावर आपटले तर सहज फुटते पण अंडे उभे हातात धरून दोन बोटांनी त्यावर दाब दिला तर तुमच्या कल्पनेहून अधिक दाब ते सहन करू शकते. हे करून पाहताना थोडी काळजी घ्या. कारण वेडेवाकडे फुटलेल्या अंड्याच्या कवचाच्या तुकड्यांनी हाताला जखम होण्याची शक्यता आहे.
आजच्या प्रयोगाचे साहित्य तीन ताजी अंडी, दोन डिनर प्लेट्स, मार्कर पेन, कातर, एखादे मोठे पुस्तक व भरपूर मासिके. तुम्ही प्रयोगासाठी फक्त अंड्याचे कवच वापरणार आहात. अंड्यातील बलकाचे तुम्ही काय करायचे आहे हे आई किंवा दादावर सोडून द्या. अंडी वाया जाणार नाहीत हे समजल्यानंतर तुम्हाला प्रयोगाची परवानगी सहज मिळेल. आता प्रत्यक्ष प्रयोग. अंड्याचे नीट निरीक्षण करा. त्याचे एक टोक रुंद व दुसरे निमुळते आहे. एक बाउल हाताशी असूद्या. निमुळत्या टोकाशी एक छिद्र पाडून त्यातून अंड्यातील सर्व बलक बाउलमध्ये काढून घ्या. तीनही अंड्यांतील बलक काढून घेतल्यानंतर अंड्याच्या कवचाच्या सर्वात रुंद ठिकाणी परिघावर मार्कर पेनने वर्तुळाकार खूण करून घ्या. निमुळत्या टोकाशी केलेल्या छिद्रातून एक धारदार कातर घालून वर्तुळाकार खुणेवरून अंड्याचे कवच कापून घ्या. अंड्याचे कवच कापताना फार वेडेवाकडे तुकडे उडणार नाहीत याची खात्री करून घ्या. कापलेल्या अंड्याचे कवच उलटे प्लेटमध्ये ठेवले म्हणजे त्याची पूर्ण कड प्लेटच्या पृष्ठभागावर चिकटली पाहिजे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे तीन कापलेल्या अंड्यांची कवचं प्लेटमध्ये उलटी ठेवा. त्यावर दुसरी प्लेट ठेवा. तुमच्या प्रयोगाची तयारी पूर्ण झाली. अंड्यांचे कवच किती वजन पेलू शकते हे नेमके पाहायचे असेल तर घरातील सर्व साबणाच्या वड्या हाताशी ठेवा. डिटर्जंट वडीचे वजन प्रत्येकी शंभर, दीडशे ग्रॅम, तर भांडी घासण्याच्या वडीचे वजन दोनशे ग्रॅम असते. अशा सहा सात वड्या जमवा. प्रत्येक वडीचे वजन किती आहे ते लिहून ठेवा. वरील प्लेटमध्ये एक एक वडी ठेवत राहा. तीन अंड्यांची कवचं सहज 1500 ते 2000 ग्रॅम वजन पेलू शकतात. साबणाच्या वड्या मिळाल्या नाहीत तर वरील प्लेटमध्ये एक एक करून पुस्तके वह्या घालत राहा. दोनशे पानी दहा वह्या व पाच पुस्तके वरील प्लेटमध्ये घातल्या तरी अंड्याचे कवच तसेच राहील. प्रयोगाच्या प्रारंभी आपण कमानींचा उल्लेख केलेला आहे. त्याचा व अंड्याचा संबंध काय, हा प्रश्न तुमच्या मनात नक्की आला असेल. तर अंडे हे नैसर्गिकपणे वक्राकार बनले आहे. अशा वक्र आकारामुळे वजन अंड्याच्या सर्व भागावर विभागले जाते. काळजी घेतली तर थोड्या प्रयत्नाने वीस किलो वजनाचा मुलगा उघड्या पायाने अंड्याच्या ट्रेवरून चालू शकतो.


madwanna@hotmail.com