आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article About Shivsena By Sanjay Parab In RASIK, Divya Marathi

वाघाची संयमी डरकाळी! (सत्ताबाजार)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रात हाती आलेल्या सत्तेची मांड पक्की करताना भाजपने कैक वर्षांपासून ‘नैसर्गिक मित्र’ असलेल्या शिवसेनेला शत्रू पक्षात ढकलल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा पुन्हा एकदा कस लागणार आहे. विश्वासदर्शक ठरावाप्रसंगी राष्ट्रवादीच्या मदतीने भाजप राजकीय जुगाड करत असताना त्यांना शिवसेना एकसंध ठेवण्यात आलेले यश दुर्लक्षिण्यासारखे नसले तरीही काँग्रेसपेक्षाही शिवसेनेला भाजपकडून सगळ्यात मोठा धोका आहे, याचे भान जपणे ही त्यांची राजकीय अपरिहार्यता ठरली आहे.

गेल्या पंधरा-एक दिवसांमधील राजकीय घडामाेडींवर नजर टाकली असता बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे काय होणार? याची चर्चा चांद्यापासून बांद्यापर्यंत सुरू होती. १२ नोव्हेंबर रोजी विधानसभेत सरकार टिकवण्यासाठी नीतिमत्तेचा कायम टेंभा मिरवणा-या भाजपने नैसर्गिक मित्र असलेल्या (लोणकढी थाप) शिवसेनेला बाजूला फेकून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने जी काही शरदचंद्री कसरत केली, ती पाहता ‘नरेंद्र’ व ‘देवेंद्र’ यांची भाजप जिंकली असली, तरी उद्यासाठी ती हरलेली आहे आिण शिवसेना पराभूत होऊन भविष्यासाठी जिंकली आहे... हे कोणी राजकीय विश्लेषक म्हणत नाही, तर सामान्य जनतेचा हा आवाज आहे.

१२ नोव्हेंबरच्या रात्री मुंबईत लोकल ट्रेनमधून प्रवास करत असताना मराठी सोडाच; गुजराती, राजस्थानी, हिंदी भाषकांमध्येही हीच चर्चा एेकायला मिळाली होती. भाजपने शिवसेनेला डावलून राष्ट्रवादीला मारलेली मिठी योग्य नव्हती... असंच बरेच जण सांगत होते. मात्र, गेेले वर्षभर नरेंद्र मोदी यांची आरती ओवाळणा-यांनी हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवले होते. ‘नो काॅमेंट्स’ ही त्यांची प्रतिक्रिया बरेच काही सांगूनही जात होती...

काँग्रेसमुक्त भारताचा नारा देत नरेंद्र मोदींनी चलाखपणे प्रादेशिक पक्षांच्या खच्चीकरणाचा एककलमी कार्यक्रम हाती घेतला, हे राजकारणातील ओपन सिक्रेट ठरले आहे. यूपीएतील प्रादेिशक पक्ष सोडाच, पण एनडीएमधील प्रादेशिक पक्षांनाही संपवण्याची खेळी ते अत्यंत चलाखीने खेळत आहेत. याच रणनीतीचा एक भाग म्हणून आधी चर्चेचे गुऱ्हाळ लावून निवडणुकीआधी योग्य वेळ साधून शिवसेनेबरोबरची युती तोडली गेली आिण तोच प्रयोग सेनेला राज्यात सत्तेबाहेर ठेवतानाही केला गेला. सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे भासवत विश्वासदर्शक ठरावाच्या सकाळी शिवसेनेला विरोधी पक्षातच बसण्यास भाग पाडले गेले. खरे तर हे सर्व आधीच लिहिलेल्या पटकथेप्रमाणे घडत होते. कुठल्याही परिस्थितीत सेनेला मोठे होऊ द्यायचे नाही, असा फतवा जणू मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष मोदीभक्त अिमत शहांनी काढला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही याची कल्पना आल्याने त्यांनी दोन आठवड्यांत भाजपलाही आपल्या रीतीने खेळवले.

केंद्रात दोन कॅिबनेट, राज्यात उपमुख्यमंत्रिपदासह १२ मंत्रिपदे, नंतर आठ मंत्रिपदे अशा मागण्या कायम ठेवल्या. भाजप म्हणत होती, आधी विश्वासदर्शक ठरावाला पािठंबा द्या, मग सत्तेचे बोलू. शिवसेना सांगत होती, आधी सत्तेच्या वाट्याचे बाेला... मग ठरावाचे बोलूया! हा सगळा उंदरा-मांजराचा खेळ राज्यात सुरू होता. तो दोन्ही बाजूंनी खेळला जात होता, हे त्याचे वैशिष्ट्य होते.

उद्धव यांनी हा खेळ करतानाच, आपल्या पक्षातही खेळाचा दुसरा डाव मांडला होता. त्यांनी धूर्तपणा दाखवत सेनेतील सत्तालोलूप नेत्यांना, नव्याने निवडून आलेल्या आमदारांना, तसेच दुस-या पक्षातून येऊन सेनेच्या तिकिटावर जिंकलेल्यांना बांधून ठेवण्याची करामत साधली होती. विश्वासदर्शक ठरावावेळी शिवसेना फुटली असती, तर उद्धव यांच्या माथी अपयशाचे मोठे खापर फुटले असते. म्हणूनच त्यांनी ‘जुळलं तर जुळलं’ असं भासवत आमदारांची फूट टाळण्यात यश मिळवलं. महत्त्वाचे म्हणजे, या सर्व घटनाक्रमात उद्धव अत्यंत संयमीपणे वागले... युती तोडण्याची घोषणा त्यांनी आधी भाजपला करू दिली. तसेच सेनेला विरोधी पक्षात ठेवण्यासही त्यांनी फडणवीसांनाच भाग पाडले! एकीकडे केंद्रात कॅिबनेट मंत्री होण्यासाठी शिवसेनेचे संजय राऊत यांची महत्त्वाकांक्षा शिगेला पोहोचली होती. मात्र, उद्धव यांनी त्यांच्या महत्त्वाकांक्षेबरोबरच अति उत्साहीपणालाही कात्री लावताना नव्यानेच खासदार झालेल्या अनिल देसाई यांचे नाव पुढे केले. शिवाय भाजपबरोबर बोलणी करण्यासाठी कायम अनिल देसाईंबरोबर बुजुर्ग सुभाष देसाई या सेनेतील संयमी नेत्यालाच पाठवत रािहले.

साम-दाम-दंड-भेद अशा सा-या आयुधांचा वापर करत नावारूपास आलेल्या मोदी-प्रयोगाला सरसावलेल्या उद्धव यांनी विश्वासदर्शक ठरावापूर्वी मग आपल्या नेत्यांसाठी तसेच आमदारांसाठी व्हीपच काढला... ‘कुठेही बडबड करू नका. भाजपचा मोदी प्रयोग पाहत राहा.’ वस्तुत: भाजपने सेनेतील असंतुष्ट आमदारांची एक यादी तयार करून संबंधितांना गळाला लावण्याचे कामही सुरू केले होते. हा संभाव्य धोका ओळखून उद्धव यांनी आधी एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात गटनेतेपदाची माळ घालून सेनेची तटबंदी केली. रिक्षा ड्रायव्हर, कामगार, शाखाप्रमुख, आमदार ते ठाणे जिल्हाप्रमुख असा प्रवास करणारे शिंदे हे कुशल संघटक आहेत. आर्थिक ताकद, तसेच मनुष्यबळाची साथ ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. असा हा नेता सेेनेतील महत्त्वाकांक्षी आमदारांना वेसण घालू शकतो, हे लक्षात ठेवून बांधणी केली. जाणकारांच्या म्हणण्यानुसार, शिंदे आणि त्यांना मानणारा दहाएक आमदारांचा गट फुटीच्या उंबरठ्यावर होता. मात्र, उद्धव यांनी त्यांच्याच गळ्यात एकीची माळ घातल्याने त्यांचा नाइलाज झाला. त्याच वेळी भाजपच्या राज्यातील नेत्यांबराेबर बोलणी करण्यासाठी कदम, रावते, गोऱ्हे यांच्यासारखे दूतही दिमतीला ठेवले. बोलीिणी फिस्कटल्यानंतर याच दूतांकरवी मग ्विश्वासादर्शक ठरावाच्या दिवशी भाजपच्या राष्ट्रवादीप्रेमाचा बुरखाही फाडण्याचे काम कौशल्याने करून घेतले!

िनवडणुकीचे िनकाल लागताक्षणीच सत्तेची गणिते जुळवताना शरद पवारांनी भाजपला पािठंबा देऊन िशवसेेनेची कोंडी केली, असे सर्वसाधारण चित्र रंगवले गेले. प्रसारमाध्यमांनी रंगवलेल्या या िचत्राचे खरे रूप िशवसैिनकांसमोर मांडण्यासाठी उद्धव १७ नोव्हेंबरपासून राज्याच्या दौ-यावर िनघत आहेत. या दौ-यात िजल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, शाखाप्रमुख, गटप्रमुख, कार्यकर्ते यांच्याशी ते चर्चा करणार आहेत. या संवादाच्या निमित्ताने सेनेचा खुंटा हलवून मजबूत करण्यावर ते भर देणार, हे उघड आहे. हा दौरा िहवाळी अिधवेशनापर्यंत सुरू राहणार असून या निमित्ताने भाजपिवरोधी वातावरण नििर्मती करून स्वत:चे नेतृत्व अधिक ठसठशीत करण्याकडेच उद्धव ठाकरेंचा कल असणार आहे. मात्र, असे करताना हिंदुत्वाचा मुद्दा (तोही मोदींनी नव्हे, तर त्यांनी उपस्थित केलेला) त्यांना पुन्हा एकदा तपासून बघावा लागणार आहे. भाजपच्या नैतिकेबद्दल प्रश्नचिन्ह उभे करताना त्यांना पक्षाच्या अनैतिक कृत्यांचा (प्रतिभा पाटील-प्रणव मुखर्जी या काँग्रेसच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारांना पाठिंबा देणे, प्रीतिश नंदींसारखे अमराठी खासदार राज्यसभेवर पाठवणे आदी) जाब देण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. सत्तेचे गणित जुळवताना आपणही सक्षम आहोत, हे पक्ष कार्यकर्त्यांना पटवून द्यावे लागणार आहे.

ही सगळी आव्हाने नजरेपुढे ठेवून उद्धव ठाकरे यांनी संयमाने पावले टाकल्यास आश्चर्य नाही. १७ नोव्हेंबरचा राज्यव्यापी दौरा ही त्याची सुरुवात ठरावी.

महागुरू पवारांची दाद
परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरीही अंगाला तेल लावलेल्या पहिलवानासारखी सुटका करून घेत सत्तेचा सोपान सहज चढून जातात, अशी शरद पवारांची आजवरची ख्याती. राजकारणातील महागुरुपदाचे दावेदारही तेच. असे हे महागुरू पवार खासगीत नव्हे, तर सार्वजनिक स्तरावर उद्धव ठाकरे यांच्या संयमीपणाचे जाहीर कौतुक करताना आढळतात. ज्या राजकीय नेत्याकडे प्रचंड संयम आहे, तो दीर्घकाळ राजकारणात टिकतो. उद्धव यांच्याकडे तो गुण आहे, असे पवार नेहमी सांगतात. आता त्या गुणांना खुद्द उद्धव जागतात का, हाच कुतूहलाचा विषय ठरावा.

मोदी-पवार मॅचफिक्सिंग
निवडणुकीचे निकाल लागताक्षणी शरद पवारांनी स्थिर सरकारसाठी भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा करून शिवसेनेची कोंडी केली. टीकाकारांच्या निरीक्षणांनुसार, भाजप-राष्ट्रवादीचे संगनमताने झालेले हे मॅचफिक्सिंग होते. अन्यथा अजित पवार, भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्यावर महाभ्रष्टाचाराचे आरोप करणा-या फडणवीस-खडसे-मुनगंटीवार यांची मोक्याची क्षणी बोलती बंद झाली नसती. निवडणूक काळात घोटाळेबाजांना तुरुंगाची हवा खायला लावू, अशी घोषणा करणारे विनोद तावडे आता कुणाला तुरुंगाची हवा खायला लावणार आहेत?
sanjay.parab5@gmail.com