आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article About Short Story Writer Borhas In RASIK

उत्तुंग प्रतिभेचा लघुकथाकार (क्लासिक्स)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होरे लुई बो-हॅस या अर्जेंटिनियन लेखकाने केवळ लघुकथा लिहून जागतिक साहित्यात नाव पटकावले. त्याच्या कथा प्रामुख्याने फेबल्स आहेत. मराठीत त्यासाठी रुपककथा असा शब्द आहे, पण तो तितकासा अचूक नाही. जी. ए. कुलकर्णी यांच्या कथांवर बो-हॅसचा प्रभाव होता...

होरे लुई बो-हॅस या अर्जेंटिनियन लेखकाने केवळ लघुकथा लिहून जागतिक साहित्यात नाव पटकावले. त्याच्या कथांना अनेकदा लघुनिबंधवजा नॉन फिक्शनचे रूप असते. उदाहरणार्थ- ‘बुक ऑफ सँड’ या कथेत सुरुवातीला एक वाक्य येते- “एक दिवस आम्ही ज्ञानाच्या समस्येवर चर्चा करत होतो. कुणी तरी एक प्लेटोप्रणीत युक्तिवाद केला, की आपण या सा-याच गोष्टी या अगोदरच्या कुठल्या तरी जगात पाहिल्या आहेत. त्यामुळे एखादी गोष्ट ‘माहीत असणे’ म्हणजेच ‘ओळख पटणे’ होय. माझे वडील म्हणत, बहुतेक बेकनने (फ्रान्सिस) असे म्हटले आहे की, जर शिकणे म्हणजे आठवणे असेल, तर एखादी गोष्ट माहीत नसणे म्हणजे ती विसरणे होय.’’ तरीही त्याच्या कथांना काहीतरी विलक्षण कथानक असते. ‘बुक ऑफ सँड’ ही होरे लुई बो-हॅसची प्रसिद्ध कथा. या कथेत लेखकाला भेटायला एक माणूस येतो आणि तो त्याला एक पुस्तक देतो, त्याला शेवटचे पानच नसते. त्याची पाने क्रमाने नसतात. पहिले आणि शेवटचे पान हातातच येत नाही. पुस्तक अनंत पानांचे असते. आपल्याकडचे दुर्मीळ बायबल आणि पेन्शनची रक्कम देऊन तो ते पुस्तक विकत घेतो. विक्रेत्याला भारतात बिकानेरमध्ये ते पुस्तक मिळालेले असते. आणि त्यावर ‘होली रिट’ असे लिहिलेले असते. एखादे पान पाहिल्यावर ते पुन्हा दिसत नाही. लेखक ते विकत घेतो खरे, पण पहाटे तीन-चारला उठून ते तपासतो. तो ते पुस्तक कुणालाही दाखवत नाही, पण दोन प्रकारच्या भीतीने तो ग्रस्त होतो. एक म्हणजे, पुस्तक आपल्याकडून चोरीला जाईल, ही भीती आणि दुसरे म्हणजे, पुस्तक अनंत पानांचे नसेल ही भीती. पुनःपुन्हा तपासल्यावर मात्र पुस्तकाच्या अफाटपणाची त्याला खात्री पटते. तो मित्रांना भेटणेही टाळायला लागतो. थोडक्यात, हे पुस्तक त्याला कैद करते. निद्रानाश सुरू होतो. झोप लागते तेव्हा स्वप्नात पुस्तक दिसू लागते. एकूण हे पुस्तक भयंकर आहे, याची त्याला खात्री पटते. त्यापासून तो सुटका करून घ्यायची ठरवतो. एक विचार मनात येतो, तो पुस्तक जाळण्याचा. पण हे पुस्तक अफाट जाळ निर्माण करेल आणि पृथ्वी भस्मसात करेल, अशी भीती त्याला वाटते. शेवटी ते पुस्तक तो राष्ट्रीय वाचनालयात ठेवतो. त्याच्या एका कथेत एक तरुण माणूस त्याच्याच प्रौढ प्रतिमेला भेटतो. हे कसं शक्य आहे, असा विचार आपल्या मनात येतो. ‘एथनोग्राफर’सारखी त्याची कथा दोन पानांची आहे, तर ‘बुक ऑफ सँड’ चार पानांची आहे. त्याच्या कथा प्रामुख्याने फेबल्स आहेत. मराठीत त्यासाठी रुपककथा असा शब्द आहे, पण तो तितकासा अचूक नाही. जी. ए. कुलकर्णी यांच्या कथांवर बो-हॅसचा बराच प्रभाव होता. ‘सांजशकुन’मधल्या कथांमध्ये तो दिसतो. एथनोग्राफर या कथेत फ्रेड मरडॉक हा अमेरिकन माणूस एका पुरातन जमातीच्या काही कर्मकांडांचे रहस्य शोधायला जातो. त्याचे प्राध्यापक सुचवतात, की प्रेअरी प्रदेशात जा आणि जे दिसेल ते लिहून काढ. विद्यापीठ ते प्रसिद्ध करेल. दोन वर्षं तो तिथे राहतो. वेगळे कपडे घालतो. कधी उघड्यावर तर कधी जुन्या भिंतींमध्ये मुक्काम करतो. पहाटे उठतो आणि सूर्यास्ताला झोपतो. उग्र स्वादाचे अन्न खातो. प्रेअरीमध्ये ‘रेड इंडियन’ जमातीत राहतो. दोन वर्षांनी त्याला रहस्य शिकवण्यात येते. ते घेऊन तो परत येतो, पण प्राध्यापकांना म्हणतो, की मी पुस्तक लिहिणार नाही. ते रहस्य उलगडून सांगणार नाही. प्राध्यापक विचारतात, तू तशी शपथ घेतली आहेस का? आपली भाषा ते रहस्य सांगायला अपुरी आहे का? त्यावर तो म्हणतो, मी शंभर भाषेत ते रहस्य सहज सांगू शकतो, ते रहस्य कळल्यावर मला आपले सारे विज्ञान म्हणजे थोतांड वाटते; पण ते रहस्य महत्त्वाचे नाही. ज्या मार्गाने जाऊन मी ते मिळवले, त्याच मार्गाने प्रत्येकाने जायला हवे. प्राध्यापक विचारतात, मग तू परत प्रेअरीत जाऊन राहणार का? तो म्हणतो, प्रेअरीतल्या माणसांनी मला जे काही शिकवले आहे, ते जगात कुठेही उपयोगी आहे, आणि शेवटी तो येल विद्यापीठात ग्रंथपाल म्हणून नोकरी करतो.
पॉल थेरॉ हा ब्रिटिश लेखक एकदा अर्जेंटिनात जाऊन बो-हॅसला भेटला. बो-हॅसची दृष्टी गेल्याने, तो त्याला रुडयार्ड किपलिंगचे पुस्तक वाचून दाखवत असे. मग दोघे जेवायला जात. भल्यामोठ्या रेस्टॉरंटमध्ये बो-हॅसने पाऊल ठेवले की, रेस्टॉरंटमधले सारे बोलायचे थांबत. बो-हॅस खुर्चीवर जाऊन बसला, की बोलायला सुरुवात करत. पॉल थेरॉ म्हणतो, लेखकाचा इतका आणि असा सन्मान मी कुठेही पाहिला नाही. बो-हॅसने कविता आणि निबंधही लिहिले आहेत. तो स्वतः एक मोठा वाचक आहे आणि ग्रंथपाल आणि राष्ट्रीय वाचनालयाचा अध्यक्ष म्हणून त्याने काम केले. त्यामुळे जागतिक वाङ‌्मयीन संदर्भ त्याच्या लिखाणात कायम येतात.
shashibooks@gmail.com