आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्वनिरचनेचे अदभूत विश्व

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विक्रम त्याच्या बेडरूममध्ये सुन्नपणे बसलेला असतो. अचानक तो हातात पिस्तूल घेतो, उभा राहतो. बेडरूममधून घराच्या मुख्य दरवाजापाशी जात पुन्हा पिस्तूल रोखत बेडरूमकडे चालत येतो. बेडरूममधील बेडच्या दिशेने पिस्तूल रोखतो. ‘मद्रास कॅफे’ या चित्रपटातील हे दृश्य. रॉ ऑफिसर असलेल्या विक्रमच्या पत्नीचा निर्घृण खून झालेला असतो. परंतु तो नेमका कसा झाला असेल, याचा अदमास या पद्धतीने विक्रम घेताना दिसतो. प्रेक्षकाला तोपर्यंत विक्रमविषयी सहानुभूती, एक भयाची शिरशिरी, भयानक अस्वस्थता या सगळ्याची अनुभूती आलेली असते. हे दृश्य चालू असताना एक प्रकारची विलक्षण शांतता पडद्यावर वावरते. त्याच्या घरभर वावरण्याला कुठलेही संगीत नाही, तरी पार्श्वभूमीवर एक अस्वस्थ ठेका वावरतो आहे, जो या दृश्याची इंटेन्सिटी जाणवून देण्याचे काम करतो आहे...

ही किमया खरे तर साउंड डिझायनिंगची. दिग्दर्शक सुजित सरकार यांनी मला या चित्रपटाचं साउंड डिझायनिंग करशील का, असं विचारलं त्याच वेळी ही किमया साधण्याची एक उत्तम संधी माझ्याकडे चालून आली होती. भारतात डॉल्बी अ‍ॅटमॉसमध्ये तयार झालेला हा पहिलाच चित्रपट. त्यामुळे साउंड डिझायनिंगच्या दृष्टीने हे नवे तंत्रज्ञानही उपयुक्त ठरले. ‘मद्रास कॅफे’च्या बाबतीत आमच्यासमोर आव्हान होते, ते चित्रपटाच्या कथेतील विशिष्ट काळाचे आणि चित्रपटाच्या भावनिक तीव्रतेचे. 1980च्या दशकातील सिंहली आणि तामिळी लोकांचा संघर्ष दाखवताना आजच्या काळातील एके-47सारख्या आधुनिक रायफलींचा आवाज आम्हाला वापरून चालणार नव्हता. राजकीय थरारपट असला तरीही चित्रपटाला भडक स्वरूपही आम्हाला येऊ द्यायचे नव्हते. संवेदनशीलता आणि भावनाशीलता यांची पराकोटीची परीक्षा पाहणारे कितीतरी वास्तव प्रसंग या चित्रपटात होते, ज्यात आम्हाला पारंपरिक पद्धतीने साउंड डिझायनिंग करून मेलोड्रामा निर्माण करण्याची संधी होती. पण मग चित्रपटाचा उद्देशच साधला गेला नसता. चित्रपटाला मेलोड्रामा नको होता, जळजळीत वास्तव आहे ते तितक्याच वेदनपातळीवर मांडायचे होते. त्यामुळे चित्रपटभर प्रेक्षकाला समोर दु:ख आहे, पण त्यावर धड रडताही येत नाही, की त्यातून बाहेर येऊन त्याकडे तटस्थपणे पाहताही येत नाही, असे वाटण्याइतपत मला आवाजाची दुनिया उभारायची होती.

राजीव गांधी यांची बॉम्बस्फोट होऊन हत्या झाली, तेव्हा ही घटना व तिचा शोधप्रवास कथन करणार्‍या नायकाच्या नजरेतून साउंड डिझायनिंग करणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे सुरुवातीला विलक्षण धक्क्यात असलेल्या नायकाला, म्हणजे विक्रमला काहीही ऐकू येत नाहीय, मग पुढे त्याच्या हृदयाचे ठोके केवळ पडदाभर ऐकू येतात व मग महिलांचा आक्रोश, पळापळ हे सगळे ऐकू येते. हे आवाजाच्या दुनियेचे कौशल्य आहे, ज्यातून मला बॉम्बस्फोटावरच्या विक्रमच्या प्रतिक्रियेचा, तेथल्या परिस्थितीचा नैसर्गिक परिणाम साधता आला.

आधुनिक इमारतीतील कॉरिडॉरमधून एक माणूस येरझारा घालतो आहे. आपण मधोमध असलेल्या एका खोलीत बसलो आहोत, दार बंद आहे, तो येरझारा घालणारा माणूस आपल्याला दिसत नाही; पण तरीदेखील कानोसा घेतला, तर तो उजवीकडून डावीकडे की डावीकडून उजवीकडे येरझारा घालतो आहे, हे ओळखण्याची क्षमता आपल्यात असते, ती त्याच्या चालण्यातून निर्माण होणार्‍या आवाजामुळे. केवळ चालण्याच्या आवाजामध्ये नव्हे तर कॉरिडॉरमधल्या शांततेतही ती असते. ही शांतता चालण्याच्या आवाजाला उठाव देते, आभासी दृश्यप्रतिमा देते. त्यामुळे खरे तर आपण केवळ ऐकण्यानेही पलीकडे काय घडत असेल, याचा अंदाज लावू शकतो.
अनेकदा रस्त्यात भर वाहतुकीच्या वर्दळीत आपण एखाद्या मित्राला भेटतो, त्याच्याशी बोलताना आपण एरवी मोठ्याने ऐकू येणारे वाहनांचे आवाज काही काळ मागे टाकतो. दैनंदिन जीवनातील ही ऐकण्याची प्रक्रिया लक्षात घेऊनच सिनेमा बनवावा लागतो. कथेतील महत्त्वाच्या घटकांचाच आवाज प्रामुख्याने प्रेक्षकाला ठळकपणे ऐकू येणे आवश्यक असते. त्यापासून प्रेक्षकाचे लक्ष दुसरीकडे वळू नये, यासाठी असे करावे लागते. जर तसे घडले नाही तर साउंड डिझायनरचे ते फार मोठे अपयश असते. जर प्रेक्षकाला हा प्रयत्न लक्षात आला तरी तेदेखील अपयशच. कारण प्रेक्षकाचे लक्ष कथेतून काढून अनावश्यक दृश्यांवर वेधण्याने प्रेक्षकाच्या ध्यानात कथेऐवजी साउंडची दुनिया येते. त्याला अनावश्यक गोष्टींचे आवाज नीट ऐकू येतात. पर्यायाने तो चित्रपट प्रेक्षकाला कथा कितीही सशक्त असली, अभिनय उत्तम असला तरी गोंधळवण्यात यशस्वी ठरतो, तो साउंड डिझायनिंगद्वारा नियोजनबद्ध गोंधळ न घातल्याने !

साउंड डिझायनिंग दृश्यांची प्रतीकात्मकता वाढवतं. दृश्यांची लांबीही कमी करतं. एका खोलीत बसून समुद्र न दाखवता केवळ त्याच्या लाटांचे, वार्‍याचे आवाज दाखवून घर समुद्राशेजारी आहे, हे सुचवता येते. एखाद्या कथेचा फ्लॅशबॅकही वर्तमानातच कथा सुरू ठेवून केवळ आवाजांद्वारे उभा करता येतो. या सगळ्या बाबी वरकरणी तांत्रिक भासतात व त्यामुळे त्यातील गर्भित अर्थ फारसा कुणी लक्षात घेत नाही. पण या तांत्रिक बाबी सांभाळताना, घडवताना कलात्मक आणि संवेदनशील दृष्टिकोन लागतो, हे विसरून चालत नाही. मात्र दुर्दैवाने, या क्षेत्राची आर्थिक व वेळेच्या पातळीवर गांभीर्याने दखल घेतली जात नाही. आपल्याकडे जितका वेळ चित्रपटाच्या चित्रीकरणाला दिला जातो, इतर बाबींना दिला जातो, गाण्यांच्या संगीताला दिला जातो, तितका साउंड डिझायनिंगला दिला जात नाही. निव्वळ एक ते दोन महिन्यात हे काम संपवणे अपरिहार्य असते. परदेशात मात्र केवळ साउंड डिझायनिंगवर सात ते आठ महिने काम चालते. त्यांचे बजेटही तितकेच असते. मात्र आपल्याकडे ‘ऐकणे’ हा प्रकार चित्रपटाच्या बाबतीत गृहीत धरला जातो. प्रेक्षक आणि चित्रपटसृष्टीतले बहुतांश निर्माते व दिग्दर्शकदेखील ‘ऐकणे’ आणि पर्यायाने साउंड डिझायनिंग गृहीत धरतात. आर्थिक गणितात साउंड डिझायनिंगला फारसा वाव दिला जात नाही, ते यामुळेच.