आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article About Swatantryavir Vinayak Damodar Savarakar

सावरकर : विचार, कृती आणि उद्देश (रसिक विशेष)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१४ सप्टेंबर ’रसिक’ अंकामध्ये मराठी विश्व साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर विनोद शिरसाठ यांचा प्रा. शेषराव मोरे यांनी संमेलनाध्यक्षपदावरून घेतलेल्या भूमिकेचे विश्लेषण करणारा लेख प्रकाशित झाला होता. त्यावर दीपक पटवे यांनी प्रतिवाद करणारा लेख लिहिला. ‘रसिक’च्या परंपरेला जागत विषयाबाबतचे विविध दृष्टिकोन समोर यावेत, या उद्देशाने दिवंगत समाजचिंतक य. दि. फडके यांच्या १९८४मध्ये प्रकाशित ‘शोध सावरकरांचा’ या संशोधनपर पुस्तकातील हा उतारा.

सोबत, य. दि. फडके यांच्या पत्नी डॉ. वासंती फडके यांचे ताजे टिपण आणि विनोद शिरसाठ यांनी प्रतिवादास पाठवलेले उत्तर...
मांसाहाराचा प्रकट पुरस्कार, गाई वाचवण्याच्या नादात हिंदू लढाया हरले, असे इतिहास सांगत असल्यामुळे गाय ही माता अगर देवता नसून केवळ एक उपयुक्त पशू आहे, हे त्यांचे आग्रहाचे प्रतिपादन, या साऱ्याच्या मागे हिंदू राष्ट्र बळकट बनविण्याची त्यांची इच्छा होती.
तात्या रत्नागिरीला पोहोचताच बाबाही त्यांना भेटण्यासाठी रत्नागिरीला लगेच आले. २३ जानेवारीला रत्नागिरीला अखिल भारतीय हिंदुमहासभेची एक शाखा स्थापन करण्यात आली. हा निर्णय ज्या सभेत घेतला गेला, त्या सभेत बाबा हजर होते. तात्या मात्र त्यांच्यावरील निर्बंधामुळे हजर राहिले नव्हते. बाबांची बिनशर्त मुक्तता झालेली असल्याने उघड राजकारण करण्यात त्यांना कसलीच आडकाठी नव्हती. अंदमानातील पठाण वॉर्डरांची अरेरावी आणि त्यांनी केलेला छळ यामुळे सावरकरबंधू कडवे हिंदू बनले होते. १९०८ साली दोघेही आपल्या क्रांतिकार्यात मुसलमानांचे सहकार्य घेत असत. लाला हरदयाळ यांचे सहकारी सय्यद राझा यांचे बाबांनी नाशिकच्या गणेशोत्सवात व्याख्यानही केले होते. तेव्हा मुसलमानदेखील देशभक्त असण्याच्या शक्यतेविषयी बाबा आणि तात्या या दोघांच्याही मनात संशय नव्हता. तात्या लंडनमध्ये भारतभवनात गुप्त संघटना बांधीत होते, तेव्हा त्यांनी जे स्नेही जोडले त्यांमध्ये आर. एम. खान, बॅ. असफअली, सिकंदर हयातखान, सय्यद राझा, मिर्झा अब्बास हे मुस्लिम युवक होते. मिर्झा अब्बास हे नाशिक-भगूर येथे सावरकरांच्या घरी काही दिवस राहिलेही होते. ते विश्वासू व निकटचे स्नेही असल्यामुळेच त्यांना हेमचंद्र दास, सेनापती बापट यांच्याबरोबर बाँब तयार करण्याची विद्या शिकण्यासाठी तात्यांनी पॅरिसला पाठवले होते. सिकंदर हयातखान यांचे वडील हे इंग्रज राज्यकर्त्यांच्या मर्जीतील राजनिष्ठ गृहस्थ असले तरी तात्यांना सिकंदर हयातखान यांच्या देशभक्तीबद्दल तेव्हा संशय नव्हता. नाहीतर आक्षेपार्ह साहित्य सरकारच्या कचाट्यातून सहीसलामत सुटावे, म्हणून हिंदुस्थानात परत जावयास निघालेल्या सिकंदर हयातखानांच्या सामानात दडवण्याची क्लृप्ती तात्यांनी लढवलीच नसती! १८५७च्या भारतीय स्वातंत्र्यसमराच्या हकिकतीतही नानासाहेब पेशवे यांचा विश्वासू मित्र अझीमुल्ला याच्या बुद्धिमत्तेविषयी, निष्ठेविषयी लिहिताना तात्यांच्या लेखणीला भरते आल्याचे जाणवते. इंग्रजी राजवट उखडून टाकण्यासाठी हिंदू व मुसलमान यांनी एकत्र येऊन दिलेल्या अयशस्वी लढतीचा ‘स्वातंत्र्यसमर’ असा गौरव करताना तात्यांनी त्यात भाग घेणाऱ्या बेगम हजरतमहल, मौलवी अहमदशहा वगैरे शूर मुसलमानांची तोंड भरून तारीफ केलेली आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याची शक्यता त्यांनी त्या काळात निकोप व मोकळ्या मनाने स्वीकारली होती. अंदमानातून परतल्यानंतरच्या काळात तात्यांचा मुसलमानांबद्दलचा दृष्टिकोन पार पालटलेला दिसतो. लंडनमध्ये ज्यांनी तात्यांना पाहिले होते, त्या सेनापती बापट यांच्यासारख्या थोर क्रांतिकारकाला तात्यांचे हे मतपरिवर्तन विशेष जाणवत असणार. म्हणूनच मुसलमानांची मनधरणी करण्याबद्दल गांधीजी व काँग्रेस यांच्यावर तुटून पडणाऱ्या सावरकरांचे विचार आपल्याला मान्य नसल्याचे सेनापती बापट १९३७ नंतर जाहीररीत्या सांगत असत. मुसलमानांबद्दलची तात्यांची मते पालटलेली दिसताच आम्हाला १९०८ सालचे सावरकर हवेत; १९३७ सालचे नकोत, असे पुढे म्हटले जात असे, हे लक्षात ठेवावयास हवे.

कारणे कोणतीही असोत, मुसलमानांबद्दलच्या तात्यांच्या दृष्टिकोनात अंदमानातील कारावासात प्रथम बदल होऊ लागला आणि तो रत्नागिरीपर्वात उघडउघड व्यक्त होऊ लागला.
हिंदुसमाजसंरक्षकाची ही भूमिका आरंभापासूनच होती, असा आभास त्यांनी नंतरच्या काळात केलेल्या लेखनात जाणीवपूर्वक निर्माण केला असला आणि सावकरभक्तांनी तो खरा असल्याचा विश्वास बाळगला तरी अंदमानात डांबले जाण्यापूर्वीची त्यांची भाषणे, पुस्तके, तसेच तोपर्यंतचे कार्य यांचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यास त्यांचा मुसलमानांबद्दलचा दृष्टिकोन पुढे बदलला, ही वस्तुस्थिती स्वीकारावी लागतेच. त्यामुळे रत्नागिरीस आल्या आल्या हिंदुसभेची शाखा स्थापन करण्यात बाबांनी घेतलेला पुढाकार आणि तात्यांनी या उपक्रमात दिलेले प्रोत्साहन याचे नवल वाटत नाही. बाबा आणि तात्या अंदमानात असताना ते तिथे जाण्याच्या आधीच इंग्रजांच्या आशीर्वादाने स्थापन झालेली मुस्लिम लीग मुसलमानांत मूळ धरू लागली होती. लखनौ येथे बॅ. जिना यांच्यासारख्या तेव्हाच्या तरुण राष्ट्रीय वृत्तीच्या मुसलमान नेत्याला हाताशी धरून लोकमान्य टिळक यांनी करार घडवून आणला होता. या करारानुसार, टिळकांनी मुसलमानांना दिलेले झुकते माप डॉ. मुंजे यांच्यासारख्या धर्मवीर अनुयायास तेव्हाही अजिबात आवडले नव्हते.

पुढे खिलाफतीच्या प्रश्नावर आंदोलन करून काँग्रेसपासून वाढत्या संख्येने दुरावत चाललेल्या मुसलमानांची पुन्हा हिंदूंबरोबर एकजूट करण्याचा प्रयत्न गांधीजींनी करून पाहिला. त्यासाठी मौलाना शौकतअली व महमदअली या कडव्या धर्मनिष्ठ मुसलमान नेत्यांना काँग्रेस पक्षात आवर्जून प्रतिष्ठेचे स्थान दिले. गांधीजींच्या या प्रयत्नाला काही काळ यश आल्यासारखे दिसले; पण अखेर मुसलमानांमधील जातीयवाद्यांची सरशी झाली. जातीय दंगलींचे वाढते प्रकार, इंग्रज राज्यकर्त्यांचा अल्पसंख्य मुसलमानांवरील वरदहस्त, मुसलमानांसाठी जागा राखून ठेवण्याचे धोरण, काँग्रेसच्या व्यासपीठावरून वंदेमातरम् गीत म्हणण्यास होत असलेला प्रकट विरोध वगैरेमुळे हिंदू-मुस्लिमांमधील फूट वाढत होती. अशा स्थितीत स्वामी श्रद्धानंद यांनी हिरिरीने चालवलेली शुद्धीकरणाची मोहीम, मदनमोहन मालवीय, लाला लजपतराय वगैरे काँग्रेस नेत्यांनाही हिंदूंचे संरक्षण करण्याची वाटू लागलेली निकड या गोष्टींची भर पडल्याची परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची बनली. बदलत्या राजकीय परिस्थितीला प्रतिसाद देणाऱ्या सावरकरबंधूंनी मुसलमानांबद्दलची आपली मते बदलली, असे एक स्पष्टीकरण देता येईल. हे मान्य करणाऱ्यालाही त्यामुळे अंदमानात जाण्यापूर्वी सावरकरबंधू कडवे मुस्लिमविरोधक नव्हते, ही वस्तुस्थिती स्वीकारावयास खळखळ करण्याचे कारण नाही.

इस्लाम धर्म धोक्यात आहे, अशी कोणी आरोळी देताच मतभेद विसरून एकत्र येणाऱ्या मुस्लिमांशी सामना द्यावयाचा असेल तर जातिभेदाच्या तटबंदीमुळे परस्परांत सामंजस्याचा, सहकार्याचा अभाव असलेल्या हिंदू समाजास एकजीव, एकसंध व समर्थ बनवणे जरूर आहे, असे तात्यांना वाटत होते. आघाताला प्रत्याघाताने उत्तर द्यावयाचे तर बळजबरीने, फसवणुकीने अगर पैशाच्या आमिषाला बळी पडलेल्या धर्मांतर केलेल्या लोकांना हिंदू करून घ्यावयाचे, हा एक तोडगा होताच. त्याबरोबरच रोटीबंदी, बेटीबंदी, सिंधुबंदी वगैरे बेड्यांनी जखडलेल्या हिंदू समाजातील अस्पृश्यतेसारख्या अनिष्ट रूढींचे निर्मूलन करावयाचे, असा नेटाने प्रयत्न करणेही जरूर होते. या दोन्ही उपायांचा अवलंब धार्मिक व सामाजिक सुधारणा म्हणून करणे शक्य होते. त्यामुळे राजकारणात जाहीररीत्या किंवा खासगीरीत्या भाग घेत असल्याचा आरोप करणेही कठीण होते. हे ओळखून शुद्धीची आणि अस्पृश्यता-निवारणाची मोहीम तात्यांनी राजरोस हाती घेतली. अस्पृश्यता-निवारणाचा कार्यक्रम त्यांनी कर्मठ सनातन्यांच्या रोषाची फिकीर न करता रत्नागिरीतील वास्तव्यात धडाडीने पुढे रेटला, ही वस्तुस्थिती त्यांच्या विरोधकांनी मान्य करावयास हवी. मात्र सर्व माणसे समान, हे तत्त्व त्यांच्या अस्पृश्यता निर्मूलनाच्या कार्याला प्रेरणा देत होते, असे म्हणण्यापेक्षा या कार्यक्रमामुळे एकसंध व प्रबळ हिंदू राष्ट्र निर्माण होईल, हा त्यांचा विश्वासच या दिशेने त्यांनी केलेल्या कार्याच्या मुळाशी होता, असे म्हणणे बरोबर ठरेल.

मांसाहाराचा प्रकट पुरस्कार, गाई वाचवण्याच्या नादात हिंदू लढाया हरले, असे इतिहास सांगत असल्यामुळे गाय ही माता अगर देवता नसून केवळ एक उपयुक्त पशू आहे, हे त्यांचे आग्रहाचे प्रतिपादन, या साऱ्याच्या मागे हिंदू राष्ट्र बळकट बनविण्याची त्यांची इच्छा होती. विज्ञानाची उपासना केल्याने हिंदू राष्ट्र शस्त्रसंपन्न बनेल, म्हणून विज्ञानावर ते भर देत असत. एखाद्या परधर्मीय स्त्रीने हिंदूशी विवाह केला तर त्याचे स्वागत करणारे तात्या एखाद्या हिंदू स्त्रीने मुसलमानाशी विवाह केला की टीका करीत. पहिल्या प्रकारात हिंदूंचे संख्याबळ वाढत असे, तर दुसऱ्या प्रकारामुळे हिंदूंचे संख्याबळ घटत असे. ज्या धार्मिक व सामाजिक सुधारणांमुळे हिंदू समाज सामर्थ्यशाली होईल असे त्यांना वाटत होते, त्या त्या धार्मिक व सामाजिक सुधारणांचा ते नुसता वाणीने व लेखणीने जोरदार पुरस्कार करून स्वस्थ बसत नसत तर आवश्यक त्या वृत्तीची जोडही देत असत. मात्र त्यांची ही झुंज न्याय, समता ही तत्त्वे प्रस्थापित करण्यासाठीच असती तर त्यांचा लढा फक्त हिंदूंपुरताच मर्यादित राहिला नसता, या वस्तुस्थितीचेही अवधान ठेवावयास हवे. खेरीज १९३७ साली बिनशर्त मुक्तता झाल्यानंतर त्यांनी पुन्हा राजकारणात प्रत्यक्ष भाग घेण्याची संधी मिळताच धार्मिक व सामाजिक सुधारणा घडवून आणण्याच्या कार्यास वाहून घेणे किंवा त्यांस अग्रक्रम देण्याचे कारणच उरले नव्हते. रत्नागिरीला तेरा वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी चोख पार पाडलेली हिंदू समाजसुधारकाची भूमिका त्या वेळच्या विशिष्ट परिस्थितीमुळे त्यांनी पार पाडली, हे विसरता येणार नाही. सरकारने घातलेल्या व त्यांनी स्वीकारलेल्या अटींमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत धार्मिक व सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी सारे बळ एकवटण्याखेरीज कृतिप्रिय तात्यांपुढे अन्य पर्यायच नव्हता.

(श्रीविद्या प्रकाशनाच्या य. दि. फडके लिखित ‘शोध सावरकरांचा’ पुस्तकातील
‘रत्नागिरी ते नाशिक; पुन्हा रत्नागिरीस परत’ या चौथ्या प्रकरणातील हा उतारा डॉ. वासंती फडके यांच्या परवानगीने प्रकाशित करण्यात येत आहे.)
पुढील स्लाइड्सवर वाचा, दैवताकडून माणसाकडे (रसिक विशेष)