आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतप्त मातांची गोष्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ईशान्य भारताबद्दल अनेक वर्षांपासून बातमीदारी करणाऱ्या तेरेसा रहमान या गुवाहाटीस्थित पत्रकार. कामानिमित्त अनेकदा मणिपूरमध्येही जाणाऱ्या. दरवेळी त्यांना इंफाळमध्ये २००४मध्ये झालेल्या एका अभूतपूर्व निदर्शनाबद्दल काही ना काही ऐकायला मिळे. थंगजम मनोरमा या ३२ वर्षीय कथित दहशतवादी महिलेला आसाम रायफल्सच्या जवानांनी निर्घृणपणे गोळ्या घालून ठार केल्याचा निषेध म्हणून बारा मणिपुरी महिलांनी विवस्त्रावस्थेत कांगला किल्ल्यासमोर निदर्शनं केली, आणि भारतीय सैन्याला थेट आवाहन केलं की, या आमच्यावर बलात्कार करा. मणिपूरमधली जनता दहशतवादी व भारतीय लष्कर यांच्या कात्रीत सापडलेली होती, अजूनही आहे. केव्हाही घरावर पडणारे छापे, तरुण मुलांना उचलून नेणारी यंत्रणा, कधीही होणारे बाॅम्बस्फोट, या पार्श्वभूमीवर दैनंदिन जीवन विस्कळीत होतं, अनेक वर्षं. त्यात मनोरमाला ठार मारण्यात आल्यानंतर या बारा मातांनी ही निदर्शनं केली. तेरेसा जेव्हाजेव्हा मणिपूरमध्ये जात, तेव्हा या मातांपैकी कोणालातरी भेटत. गप्पा मारत. त्यांच्या आयुष्यात काय चाललंय, त्यांनी हे क्रांतिकारी पाऊल का उचललं असेल, याविषयी जाणून घेत. कोणीतरी या मातांवर पुस्तक लिहील, याची त्यांना खात्री वाटे. परंतु एकदा त्यांना या बारा जणींपैकी एकीचा मृत्यू झाल्याचे कळले. आणि त्यांनी ठरवले की, आपणच या मातांविषयी लिहायला हवे. यातून जन्माला आलेले हे पुस्तक. ईशान्य भारत आपल्यापेक्षा दूर अंतरावर फक्त भौगोलिकदृष्ट्या नव्हे, तर आपल्यातले वैचारिक, भावनिक, सांस्कृतिक अंतरही मोठे. त्यामुळे तिकडच्या बातम्याही आपल्यापर्यंत क्वचित पोचतात, त्याही अर्ध्यामुर्ध्या. म्हणूनच हे पुस्तक वाचताना आपल्याच देशातल्या, आपल्यासारख्याच मध्यमवर्गीय मातांची ही कहाणी अंगावर काटा आणते. हे पुस्तक म्हणजे या बारा जणींचे चरित्र नव्हे. तर त्यांच्या जीवनकथेतून दहशतवादाचा सामान्य माणसाच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो, हे आपल्यासमोर येते. यात मणिपूरचीही माहिती उत्तमरीत्या गुंफलेली आहे. यात एका गायकाचे उद्गार आपलं आयुष्य किती सुरक्षित आहे, याची जाणीव करून देतात. तो म्हणतो, सतत बंदुका रोखलेल्या दिसतात आपल्यावर. मी जे पाहतो त्याबद्दलची गाणी मी म्हटली नाहीत तर आयुष्य त्याआधीच संपून जाईल कदाचित.
बातम्या आणखी आहेत...