आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक उनाड भटकंती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही निसर्गाशी तादात्म्य पावलात की, अनेकदा निसर्ग तुमच्यावर खुश होऊन अनेक मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवता येण्यासारखे क्षण अलगद तुमच्या पुढे आणून ठेवत असतो. कालचा दिवस मात्र खूपच वेगळा होता. अनेक निसर्गातल्या दुर्मीळ गोष्टी मला एकाच दिवसात, एकाच भटकंतीत अनुभवता आल्या होत्या...

गेली ३४ वर्षे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा सहवास रोज लाभत आलाय. बाजूलाच राहात असल्यामुळे असेल किंवा निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याची आवड असल्यामुळे असेल, जवळपास रोजच एखादी तरी फेरी उद्यानात असतेच. या अशा फेरीत नेहमीच काहीतरी नवीन पाहायला, अनुभवायला मिळत असते. गेली अनेक वर्षे निसर्गवेड अंगात भिनल्यामुळे असेल, पण राष्ट्रीय उद्यानात फिरण्यासाठी वेळकाळाचे बंधन मी अजिबात मानत नाही. कालही असाच उद्यानात शिरलो. उद्यानात फिरताना मी नेहमीच मळलेल्या वाटा सोडून भटकंतीला सुरुवात करतो. सध्या पुन्हा एकदा हवेत उष्णता निर्माण झाल्यामुळे फुलपाखरांचे विभ्रम दिवसभर अनुभवता येताहेत.

कालही असाच शिरल्या-शिरल्याच निसर्ग माहिती केंद्राच्या फुलपाखरू उद्यानाच्या बाहेरच्या बाजूला पोहोचलो आणि अनेक सुंदर फुलपाखरे नजरेस पडली. अनेक रंगीबेरंगी फुलपाखरे घाणेरी, मुसांडा या फुलपाखरांच्या फूड प्लांट्सवर रुंजी घालत होती. म्हणून थोडा वेळ तिथे रेंगाळलो; तर तिथे ग्लासी टायगर, स्ट्रीप टायगर, प्लम जुडी, पाम फ्लाय अशी अनेक पदव्यांप्रमाणे नावे दिलेली फुलपाखरे. या राष्ट्रीय उद्यानात १५७ जातींची सुंदर फुलपाखरे आढळतात. तिथून थोडे पुढे गेल्यावर तुळशी तलावातून उगम पावणारी दहिसर नदी लागली. नदीच्या काठावर बसून पक्षीनिरीक्षण करण्यात एक वेगळीच मजा असते! कधीतरी एखादा छोटा खंड्या नदीच्याच पात्रात उगवलेल्या झाडाच्या फांदीवर बसलेला दिसतो. या खंड्याचे मध्येच उडत पाण्यात सूर मारणे आणि पाण्यातून अचूक मासे टिपणे अनुभवण्यात कित्येक तास निघून जातात, ते कधीकधी आपल्या लक्षातही येत नाही... याही वेळी अगदी तसेच झाले. एक खंड्या नदीच्या पात्रावर सूर लावत होता आणि त्याच्याच बरोबर त्याच्याच पद्धतीने सूर मारण्याचा प्रयत्न एक कावळाही करत होता. जणू काही खंड्याने कावळ्याला पाण्यावर सराईतपणे सूर कसे मारायचे, हे शिकवण्याचा विडाच उचलला होता... खंड्या त्या कावळ्याचा प्रशिक्षक झाला होता आणि कावळा त्याचा विद्यार्थी!!!

ही गम्मत अनुभवल्यावर थोडा पुढे गेलो, आणि एका झाडाजवळ थबकलोच. ते झाड चक्क फुलपाखरांनी भरून गेले होते. नीट निरखून पहिले, तर टायगर जातीची अनेक फुलपाखरे त्या झाडाच्या फांद्यांवर, पानांवर लटकली होती. माझे फुलपाखरांवरच्या संशोधनाचे दिवस आठवले. मग लक्षात आले की, दुपारी उन्हाच्या तलखीपासून बचाव व्हावा म्हणून, त्यांनी या झाडाच्या सावलीचा आश्रय घेतला होता. परंतु या सर्वांमुळे ते झाड मात्र फुलपाखरांचे झाड झाले होते. त्यातली सर्व फुलपाखरे मधूनच आपले पंख उघडझाप करत होती, त्यामुळे त्यांच्या पंखांवरचे रंग मधूनच कोवळ्या उन्हात चमकत होते. ते रंग आणि ती फुलपाखरांची नयनरम्य हालचाल केवळ पाहात राहावेसे वाटत होते.

हे असे अनेक सुंदर क्षण मला माझ्या जंगल भटकंतीत नेहमीच अनुभवायला मिळत आलेत. काल तर माझ्या आयुष्यातले सर्व ग्रह कुंडलीत जमून आले होते. पुढे गेलो. एका ठिकाणी खूप पानगळ झाली होती. त्या पानांचेही किती आकार होते, किती रंग होते. त्यातूनच एक मुंग्यांची रांग निघाली होती. ती आपल्या इवल्याशा तोंडांमध्ये धान्याचे कण साठवत, आपले लयबद्ध मार्चिंग करत आपल्या वारुळाकडे निघाली होती. त्यांची ती लयबद्धता बघून आणि त्यांची ती मेहनत करण्याची वृत्ती पाहून मनात विचार आला की, प्रत्येकाने यांच्याकडून ही अखंड मेहनत करण्याची वृत्ती आणि लयबद्धता अंगात भिनवली, तर आपलेही जीवन किती सुकर होईल. थोडे मग चालत चालत शिलोंढा या राखीव भागापर्यंत येऊन आतमध्ये शिरलो. फर्लांगभर चालत पुढे गेलो असेन, अचानक गुरगुर ऐकू आली म्हणून थबकलो. तर तिथे वन्यप्राण्यांसाठी पाणी पिण्यासाठी एक पाण्याचे टाके बांधण्यात आलेय, त्या टाक्यातच एक बिबट्याची मादी आणि तिची दोन महिन्यांची दोन पिल्ले बसली होती. आणि बिबट्याच्या मादीला माझी चाहूल लागल्यामुळे असेल, ती मादी आपल्या बच्च्यांचे रक्षण करण्यासाठी म्हणून माझ्याकडे पाहून गुरगुरत होती. जणू काही सांगत होती... तू माझ्या राज्यात आला आहेस आणि ही माझ्या बच्च्यांबरोबर खेळण्याची वेळ आहे, तेव्हा तू इथून मुकाट्याने निघून तरी जा किंवा मला माझ्या बच्च्यांबरोबर शांतपणे खेळू तरी दे... हे सर्व अनुभवत असतानाही माझे मन मात्र एका वेगळ्याच आनंदाने भरून आले होते. अशा प्रकारचे दुर्मीळ क्षण नेहमीच माझ्या निसर्ग भटकंतीत किंवा संशोधन करताना, मी वेगवेगळ्या जंगलात अनुभवले आहेत. परंतु बिबट्याची मादी आणि तीही दिवसाढवळ्या तिच्या पिल्लांबरोबर खेळताना पाहायला मिळणे, आणि तेही अगदी काही फुटांच्या अंतरावर, हे माझ्यासाठी एक आगळे बक्षीस होते.

तुम्ही निसर्गाशी तादात्म्य पावलात की, अनेकदा निसर्ग तुमच्यावर खुश होऊन अनेक मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवता येण्यासारखे क्षण अलगद तुमच्या पुढे आणून ठेवत असतो. कालचा दिवस मात्र खूपच वेगळा होता. निसर्गातल्या अनेक दुर्मीळ गोष्टी मला एकाच दिवसात, एकाच भटकंतीत अनुभवता आल्या होत्या. जणू निसर्गदेवता माझ्यावर प्रसन्न होती. हे सर्व अनुभवून मग प्रसन्न मनाने मी माझ्या परतीच्या वाटेला लागलो आणि माझ्या नेहमीच्या आवडत्या जागी म्हणजेच राष्ट्रीय उद्यानातल्या कृष्णगिरी उपवनातल्या गांधी टेकडीवर येऊन बसलो. सूर्यास्ताची वेळ जवळ येऊन ठेपली होती. सोबतीला तिथे राहणाऱ्या आदिवासी आजीने केलेला गवती चहाचा पेला होता... मावळतीचे रंग अनुभवत, माझी कालची जंगलातली भटकंती मनात साठवत मी घराकडे परतलो होतो...
saurabh.nisarg09@gmail.com