आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article About Vilas Sarang By Vishram Gupte In Rasik

एन्कीच्या राज्यात : अस्मितेचा अधुरा प्रबंध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आत्मचरित्रात्मक तपशील प्रथमपुरुषीच नव्हे, तर तृतीयपुरुषी निवेदनातूनसुद्धा सांगितले जातात. दिवंगत विलास सारंग यांनी प्रमोद वेंगुर्लेकरच्या माध्यमातून आत्मप्रत्ययाला प्रमाण मानून घटना-प्रसंग, संवाद-विसंवाद ‘एन्कीच्या राज्यात’ या कादंबरीत चितारले असल्याची शक्यता तपासत, सारंग यांची कादंबरीकार म्हणून असलेली लेखनशैली, त्यावरचा प्रभाव यांचा माग काढत एका ग्रंथप्रकल्पाच्या निमित्ताने 'विश्राम गु्प्ते' यांनी लिहिलेला हा लेख...
१९८३ साली प्रकाशित झालेली विलास सारंग ह्यांची कादंबरी, 'एन्कीच्या राज्यात' चं कथानक एकरेषीय आहे. कालक्रमानुसार घटना घडतात. क्वचित ठिकाणी भूतकाळाचे संदर्भ येतात. ते कादंबरीच्या घटनाक्रमांना स्मृतीचे संदर्भ पुरवतात. 'जसे घडले तसे अलिप्तपणे सांगितले' हा कादंबरीचा पवित्रा दिसतो. हा पवित्रा किंवा ही 'नॅरेटिव्ह स्ट्रटेजी' ऐंशी आणि नव्वदीच्या आधुनिक लेखकीय संवेदनशीलतेला धरूनच आहे.

या अर्थाने एन्की... ही 'बिढार', ‘जरिला', ‘झूल' या कादंबर्यांच्या पंक्तीत बसणारी वास्तववादी शैलीतली अस्तित्त्ववादी म्हणजे परात्मभावी प्रेरणेची कादंबरी आहे. ही कादंबरी लिहिताना "वास्तववादी मनोधारणेचा बोजड पगडा त्या वेळी माझ्या मनावर होता’ हा विलास सारंगांचा कबुलीजबाब ‘एन्कीच्या राज्यात' विषयी ह्या लेखात आहे.(संदर्भ: 'सर्जनशोध आणि लिहिता लेखक') सुमारे वीस वर्षानंतर स्वतःच्या कलाकलाकृतीवर बोलताना सारंग ह्या रचनेविषयी थोडं असमाधानही व्यक्त करतात.

कादंबरी तृतीय पुरुषी निवेदनशैलीचा वापर करते पण ज्या एका माणसाच्या जगण्याबद्दल कादंबरी सविस्तर सांगत राहाते तो माणूस म्हणजे प्रोफेसर प्रमोद वेंगुर्लेकर हा प्रोटॅगॉनिस्ट लेखकाचं बौद्धिक आणि भावनिक प्रतिबिंब असू शकतं. या अर्थाने एन्की... लेखकाचं प्रछन्न आत्मचरित्र ठरतं.

आत्मचरित्रात्मक तपशील प्रथम पुरुषीच नव्हे तर तृतीय पुरुषी निवेदनातून सुद्धा सांगितले जातात. विलास सारंगांनी प्रमोद वेंगुर्लेकरच्या माध्यमातून स्वतःच्या सबजेक्टिविटीला म्हणजे जाणीवेला (आत्मप्रत्ययाला) प्रमाण मानून घटना, प्रसंग, पात्रांचं येणं-जाणं, बोलणं, संवाद, विसंवाद एन्की...त चितारले असण्याची एक शक्यता आहेच.

ह्या कादंबरीचं मोठं वैशिष्टय़ म्हणजे ती मराठी पर्यावरणाबाहेरची आहे. तिला अमेरिका आणि इराक ह्या दोन भिन्न सांस्कृतिकतेचे संदर्भ आहेत. सुरुवातीची थोडी पानं अमेरिका आणि उरलेली सगळी पानं इराक हा कादंबरीचा भौगिलिक-सामाजिक अवकाश आहे. मराठी लेखक परदेशात जाऊन प्रवासवर्णन न लिहिता परदेशाचा आपल्या वाययीन कलाकृतीसाठी नेपथ्य म्हणून वापर करणारा लेखक मराठीत विरळा आहे.

१९८३ साली जागतिकीकरणाची कल्पना कोणी केली नव्हती. जग 'एक मोठे खेडे' होण्यापूर्वी एन्की... वाचकांना मिळाली त्यामुळे निव्वळ पर्यटकीय नजरेने लिहिलेल्या, हलक्या फुलक्या आणि पृष्ठभागावरच वावरणाऱ्या परदेशी प्रवासवर्णनांच्या तुलनेत एन्की...एक गंभीर साहित्यकृती ठरते.
एन्की...त एक अनोखं (एक्झॉटिक) समाजवास्तव आधुनिक संवेदनशीलतेच्या म्हणजे पुरोगामी मूल्याग्रहांतून व्यक्त होतं. ह्या मुक्त जाणिवेचं नाविन्य नव्वदीच्या सुरुवातीला होतं. आज, म्हणजे एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात सांस्कृतिक संक्रमणानंतर व ग्लोबल मिडियाच्या सर्वव्यापी भिंगाखाली परदेश आणि स्वदेश दोन्ही संकल्पना खचून गेल्यात. म्हणून परदेशी कादंबरीतलं हे अपरिचित तत्त्व तुलनेने कमी प्रभावी झालं आहे असं म्हणता येतं.

१९८३साली एन्की..चं रोचक जग २०१०साली बी.बी.सी., सी.एन.एन. वगैरे बातमीपत्रांमुळे, टुरिझमच्या जागतिक वासनेमुळे आणि वैश्विकिकरणाच्या मानसिक अधिसत्तेमुळे पुरेसं परिचित आणि रुटीन झालं आहे. म्हणून एन्की...लिहून पाव शतकांचा कालावधी सरून गेल्यानंतर एन्की...कडे राजकीय, सांस्कृतिक, ऐतिहासिक घडामोडींचा दस्तावेज म्हणूनही बघता येतं. विशेषत: इराकवर अमेरिकेने केलेल्या परवाच्या आक्रमणानंतर एन्की...मधला सोशालिस्ट सत्तेचा दहशतवाद बदललेल्या परिप्रेक्ष्यात तितकासा भयकारक वाटत नाही.

परंपरा विरुद्ध आधुनिक संवेदनशीलता, लोकशाही विरुद्ध हुकुमशाही, मुक्त अभिव्यक्ती विरुद्ध दमनकारक राज्यशक्ती ह्या दोन परस्पर विरोधी मूल्यांचा टकराव कादंबरीत दिसून येतो. पण हा मूल्यसंघर्ष कादंबरीचा केंद्रबिंदु वाटत नाही. असं काही असतं तर एन्की...राजकीय-सामाजिक कादंबरी ठरली असती. ती तशी नाही. एन्की... व्यक्तिनिष्ठतेचा पसारा मांडते. ती प्रमोद वेंगुर्लेकरची आध्यात्मिक चिंतातूरता (अँग्स्ट) व्यक्त करते.

परक्या आणि होस्टाईल संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर कादंबरीचं घटनाचक्र फिरत असलं तरी एन्की... मुलतः मानवी कुंठेची कादंबरी आहे. ती प्रमोद वेंगुर्लेकरच्या अधिभौतिक हताशेचीही अभिव्यक्ती आहे. प्रमोद वेंगुर्लेकरचा भौतिक आणि आधिभौतिक प्रवास कालक्रमानुसार कादंबरीत वर्णून सांगितला आहे. एन्की....चं राजकीय असणं तिच्या आत्मशोधक असण्यासारखं मध्यवर्ती नाही हे नमूद करणं आवश्यक आहे.

मुक्त अभिव्यक्ती विरुद्ध अभिव्यक्तीचा संकोच आणि व्यक्तिगत अस्तित्त्वाचं आर्त विरुद्ध समाजिकतेचा सामुहिक आग्रह ह्या दोन परस्पर विरोधी प्रेरणा अभिजात लेखकांच्या आस्थेचा विषय असतात. विलास सारंगांच्या लिखाणात ह्या मूलगामी प्रेरणांचे पडसाद ऐकू येतात. म्हणून एन्कीला कालातीत आयाम प्राप्त होतात.

एन्की...स्वेच्छेने नव्हे तर निरुपाय झाल्यामुळे बहुसांस्कृतिक होऊ घातलेल्या एका पारंपारिक, तिसऱ्या जगातल्या विकासोन्मुख इराकी समाजातलं बंदिस्त वास्तव टिपते. ते टिपताना अंतर्गत राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक ताणतणाव चितारते. इस्लाम व सोशालिझम अशा सर्वकष सत्तेच्या 'ग्रँड नॅरेटिव'च्या (महाकथ्याच्या) पार्श्वभूमीवर, एन्की... व्यक्तिनिष्ठतेचा (सबजेक्टिविटीचा) आणि स्मरणरंजनाचा 'लिटिल नॅरेटिव' किंवा लहानखुरं अनुभव कथन सादर करते. प्रमोद वेंगुर्लेकरच्या व्यक्तिगत प्रेरणा सामाजिकतेशी समांतर जाणाऱ्या नाहीत. त्या विसंवादी आहेत. म्हणूनच त्या आर्टिस्टिक आहेत. एन्की...एका आर्टिस्टची कुंठा व्यक्त करते.

सबजेक्टिव्ह ट्रूथ विरुद्ध ऑबजेक्टिव रियालिटी हे कुठल्याही कलाकाराला लढावं लागणारं द्वंद्व एन्कीत भेटतं व्यक्तिनिष्ठ समांतर विचारविश्व सादर करताना ही कादंबरी नायकाच्या व्यक्तिगत अस्मितेची आंस आणि त्या व्यक्तीची अस्तित्त्वमूलक तळमळ (अँग्स्ट) व्यक्त करते. माणूस आणि त्याची अस्मिता ही देश-काल-परंपराबद्ध असते की ती जनुकीय असते. माणूस पर्यावरणाचा गुलाम असतो की तो जन्मतःच मुक्त असतो? हा प्रश्न एन्की...मध्ये अध्याह्रत वाटतो.

एन्कीचा नायक वैचारिक भूमिका घेऊन जगतो. ही भूमिका आधुनिक संवेदनशीलतेला जवळ जाणारी आहे. फ्रीडम, डेमॉक्रसी, रॅशनॅलिटी, ऑबजेक्टिविटी इत्यादी प्रेरणा आधुनिक संवेदनशीलतेची ओळख असतात. ह्या अर्थाने प्रमोद वेंगुर्लेकर आधुनिकतेचा प्रवक्ता आहे. लेखक विलास सारंगांबद्दल सुद्धा हे निरिक्षण ग्राह्य ठरतं.

वरवर बघितलं तर एन्की एका मराठी माणसाचा परदेशातला अनुभव विस्तारून सांगणारी कादंबरी आहे. पण तिचं ध्येय इराकवर्णन नाही. एन्की...चं ध्येय कुंठित जगण्यावर, म्लान अस्तित्त्वभावावर परदेश गमनाचा उतारा कितपत प्रभावी ठरू शकतो ह्याची चाचपणी करणं हा दिसतो. कादंबरीच्या सुरुवातीलाच ह्याचे संकेत मिळतात.

"भारतातल्या आयुष्यात काही खरेखुरे, निखळ संबंध जोडता येणार नाही’ (एन्की...पृष्ट ६) हा प्रमोद वेंगुर्लेकरचा दृढ समज झाला आहे. ‘निखळ नातेसंबंध' ही आदर्शवादी संकल्पना आहे. त्याचा अर्थ व्यक्तिपरत्त्वे बदलू शकतो. निखळ म्हणजे निःस्वार्थी, मनमोकळे, परस्परपुरक की स्वला गोंजारणारे हे प्रश्न सुद्धा ह्या संदर्भात उपस्थित करता येतात. नात्याबद्दल पुढे कोरडी भूमिका घेणारा प्रमोद निखळ नातेसंबंधाबद्दल बोलतो, ते कदाचित परदेशात गवसतील हा आशावाद व्यक्त करतो. एन्कीच्या अखेरीस ह्यामधली विफलता व्यक्त होते.

नातेसंबंधाबद्दलची ही निराशजनक जाणीव प्रमोदच्या नेणीवेत का आणि केव्हा आली ह्याची सविस्तर कारणपरंपरा कादंबरीत मिळत नाही. मात्र कादंबरीत प्रमोदचं भावनिक जग जसं उलगडतं त्यावरून प्रमोद हा एकांडा माणूस असल्याचं जाणवतं. हा एकांडेपणा त्याची अस्तित्त्ववादी निवड (एक्झिस्टंशियालिस्ट चॉईस) वाटतो. एकूणच "कुटुंबाविषयी,आईवडलांच्या चिकट मायेच्या आवाक्यात राहण्याविषयी" सुद्धा प्रमोदला तिटकारा असल्याचे संकेत कादंबरीत मिळतात.

भोवतालच्या जगाशी संबंध जोडण्यातलं अपयश आणि ‘चिकट' कौटुंबिकतेबद्दल घृणा ह्या दोन प्रेरणा प्रमोद वेंगुर्लेकरचं एलिनेशन किंवा परात्मभाव व्यक्त करणार्या आहेत. पाश्चात्य ऑपेरा संगितात ‘ओव्हर्चर' नावाची प्रारंभीची संगित रचना असते. तिच्या विशिष्ट लयीत ऑपेराच्या कथानकाचे, भावुकतेचे संकेत दडलेले असतात. एन्की...च्या पृष्ट ६ वरच्या दीर्घ परिच्छेदात प्रमोद वेंगुर्लेकरच्या इतरांपासून तुटलेल्या, उदास, परात्मभावी मनस्थितीचे पूर्वसंकेत मिळतात. १९८०च्या दशकात मराठी कादंबरीत परात्मभावाची दस्तक विरळा होती. ती प्रामुख्याने 'बिढार' आणि तिच्या पठडीतल्या इतर मराठी कादंबऱ्यांनी दिली होती.

जगण्याविषयी संभ्रमित, चिंतातूर सूर लावलेल्या प्रमोद वेंगुर्लेकरचे प्रश्न आणि चांगदेव चतुष्टयात पडलेले चांगदेव पाटलाचे प्रश्न या दोहोंमध्ये साधर्म्य आहे. दोघही पेशाने प्राध्यापक आहेत. दोघांनी आपला गाव सोडलेला आहे. दोघंही सच्चं जगू बघणारे आहेत. दोघही इंग्लिश लिटरेचरवाले आहेत. दोघंही साहित्योपासक आहेत. दोघही तीक्ष्ण नजरेने जगाकडे बघणारे आहेत. दोघही व्यक्तिनिष्ठतेची कसोटी लावून जगणारे दिसतात. चांगदेव पाटील आणि प्रमोद वेंगुर्लेकर ह्या दोघांमध्ये पुरेसं साम्य आहे.

हा केवळ योगायोग नाही. ज्या काळात चांगदेव चतुष्टय आणि एन्की... लिहिल्या गेली त्या काळाचा हा महिमा आहे. मराठी साहित्यात त्या काळात अस्तित्त्ववादी नाटकं आणि कादंबऱ्यांना भरभराटीचे दिवस आले होते. माणूस परिस्थितीशरण आहे की तो स्वतंत्र आहे? या प्रश्नाला मध्यवर्ती मानून त्या काळात अनेक पाश्चात्य लेखक-लेखिका लिहीत होत्या. एन्की...एका जागतिक वाययीन ट्रेंडचा भाग म्हणून आज समजावून घेता येते.

मी कोण? माझं माझ्या परिसराशी नेमकं नातं कुठल्या स्वरुपाचं? माझी ओळख किंवा अस्मिता नेमकी कुठली? असे एकाहून एक भारी प्रश्न एन्की...विचारू इच्छिते. ह्या कादंबरीने पंचवीस वर्षांपूर्वी मराठी वाचकांसाठी निश्चितच नवे पेच, नव्या चिंता निर्माण केल्या होत्या. हे पेच आज सुटले आहेत असं म्हणता येत नाही. म्हणजे एन्कीचं म्हणणं आजही गैरलागू झालेलं नाही. मात्र त्यातलं सामाज वास्तव पुरेसं परिचित झालेलं आहे.

विश्वाच्या असंबद्ध पसाऱ्यात स्वस्थता लाभेल असा स्वतःचा कोपरा शोधणारा 'बिढार', 'जरीला', 'झूल' चा प्राध्यापक चांगदेव पाटील आणि कंटाळवाण्या जगण्यात काहीतरी नाविन्यपूर्ण घडण्याची वाट बघणारा एन्की...मधला प्रोफेसर प्रमोद वेंगुर्लेकर दोघंही त्यांच्या अस्तित्त्वमूलक तळमळीमुळे, आध्यात्मिक हताशेमुळे सहोदर आहेत ह्याची नोंद कराविशी वाटते.

भोवळ आणणाऱ्या निःसत्त्व सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणात स्वत्त्व टिकवण्याची अहोरात्र खटपट करणारे मराठी प्रो.चांगदेव पाटील किंवा प्रो. प्रमोद वेंगुर्लेकर बदललेल्या सांस्कृतिक संदर्भात जगण्याची, जाणीवेची, आत्मभानाची नेमकी कुठली सम पकडतात हा प्रश्न आज एन्की...कडे वळून बघतांना तातडीचा ठरतो.

एन्की...चा विशिष्ट परिसर, पर्यावरण आणि तिची मानसिकता ग्लोबलाईज्ड काळात किती मात्रेत बदलली? ज्या मानवी स्वातंत्र्याच्या संकोचाबद्दल एन्की...सांगते त्या स्वातंत्र्यसंकोचाचे नव्या ग्लोबलाईज्ड काळातले संदर्भ कुठले? गेल्या पंचविस वर्षांमध्ये जग कितपत बदललं? बदलाची ही दिशा सकारात्मक की नकारात्मक? हे प्रश्नही एन्की...चं पुनर्मुल्यांकन करतांना उपयुक्त ठरणारे आहेत.

आज सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरणात वावरणारा 'स्व' आणि त्याच्याशी कायम द्वंद्वात्मक नातं सांगणारा 'स्वेतर' या दोन घटकांमधली वैचारिक, सांस्कृतिक दरी किंवा त्यांचा आपसातला ताणतणाव उत्तरआधुनिक साहित्याचा प्रतिपाद्य विषय होतोय.

भोवताली निर्माण होणारं 'डायस्पोरिक लिटरेचर' याचा पुरावा आहे. स्वदेश सोडून परदेश जवळ करणाऱ्या माणसांना परदेशी संस्कृतीत जो उपरेपणाचा अनुभव येतो, स्वतःची जागा हरवलेल्या माणसांना जगण्याच्या ज्या वाटाघाटी कराव्या लागतात, इच्छा-आकांक्षांना जी मुरड घालावी लागते, अनपेक्षित, अपरिचित मार्ग स्वीकारावे लागतात याचा मानसिक ताण व्यक्त करणारं साहित्य म्हणजे लिटरेचर ऑफ डायस्पोरा.
'इंडियन डायस्पोरा' ही कल्पना १९८३ साली रुढ झालेली नव्हती. आज एन्की...ला वाचनालयातल्या 'लिटरेचर ऑफ डायस्पोरा' नावाच्या कपाटात ठेवता येईल. लेखक ज्यांचा अनुभव घेतो त्या परदेशी प्रथा, परंपरा आणि संस्कृतीचं एत्तद्देशीय नव्हे तर उपऱ्याच्या नजरेतून चित्रण हा डायस्पोरिक साहित्याचा विशेष आहे. स्वदेशाबद्दलचं स्मरणरंजन सुद्धा ह्या साहित्याचा भाग आहे.

प्रमोद वेंगुर्लेकर इराकच्या भूमीवर आलटून पालटून अमेरिका आणि मुंबईला आठवतो. स्वतःच्या बालपणात ओसाड अंधारातल्या घसरगुंडीवरून घसतराना जाणवलेला 'पोकळपणा' प्रमोदच्या व्यक्तिमत्त्वाचा पासवर्ड आहे. एन्कीत ह्या पोकळपणाचे संदर्भ धूसर दिसले तरी ते प्रमोदच्या जीवनजाणीवेला अधोरेखित करणारे आहेत. ह्या संदर्भात 'अवघा डोंगर पोकळ आहे' हा चांगदेव चतुष्टयाचा साक्षात्कार आठवतो.

मानवी जाणीव नेमकी काय असते? हा फिनॉमेनॉलॉजीचा आद्य प्रश्न आहे. ह्या जाणीवेचं सविस्तर, यथार्थ वर्णन करणे एडमंड हुसर्लच्या फिनॉमेनॉलॉजीचं ध्येय होतं. तत्त्वज्ञानाच्या ह्या शाखेत मानवी जाणीव तिच्या उद्दिष्टांच्या आधारे (इंटेशन्स) समजूतीच्या आवाक्यात येते असं मानलं जातं.

एन्कीचं... फिनॉमेनॉलॉजिकल विश्लेषण करायचा जर कोणी खटोटोप केलाच तर प्रमोदच्या जाणीवेचा झोत नेमका काय? हा प्रश्न संयुक्तिक ठरु शकतो. ही जाणीव संभ्रमित आहे, व्याकुळ आहे, माणूसघाणी (मिसअँथ्रोप) आहे आणि तिला एका आर्टिस्टिक व्हिजनची, कलात्मकतेची आंस आहे असं नोंदवता येतं.

एन्की...चं कथानक तसं कालक्रमाने उलगडत जातं. त्यात फारसं मागेपुढे होत नाही. कथानकाचे टप्पे बघितले तर एन्की... प्रमोद वेंगुर्लेकरची रोजनिशी वाटावी इतकी सरळ आणि तपशीलवार आहे. ह्या तपशिलांना उदास, संभ्रमित आणि अलिप्त मानसिकतेचं अस्तर आहे. सारंगांची अस्तित्त्वावादी विचारसरणीतली आस्था आणि तिच्यातली त्यांची वैचारिक गुंतवणूक बघितली तर ही अलिप्तता अनपेक्षित नाही.

एन्की...तिच्या अतिवैचारिकतेमुळे कृतीशील कादंबरी ठरत नाही. तिच्यात उत्कटताही नावापुरतीच दिसते, मात्र तिची हताशाग्रस्त व्हिजन अस्वस्थ करणारी आहे. साहित्य ही लेखकाची 'कृती' असते असं जीन पॉल सार्त्र म्हणाला. अस्तित्त्ववादी लेखकांच्या बाबतीत ही कृती प्रायः हताश मानसिकतेच्या अभिव्यक्तितून उमटते. संज्ञाप्रवाही निवेदन शैलीतून अस्तित्त्ववादी चिंतातूरता व्यक्त होते.

लेखकाची जाणीव किंवा त्याचं अंतःकरण, तिथे उद्भवणारे संभ्रम, शंका, कुशंका, प्रश्नं, तळमळ, हे सारं रसायन रुढ अर्थाने अस्तित्त्ववादी कादंबरीला इंधन पुरवतं. ऊर्जा नव्हे, उत्साह नव्हे, तर कायमचा विकलभाव, हताशा हे गुण अस्तित्त्ववादी विचारसरणीतले मैलाचे दगड असतात. एन्की ह्या अर्थाने अस्तित्त्ववादी कलाकृती ठरते.

प्रमोद वेंगुर्लेकर हा कादंबरीचा (न)नायक. तो अमेरिकेत लिटरेचरमध्ये डॉक्टरेट करायला जातो. भारतात असलेल्या आई-वडलांना नावापुरतं आठवतो. प्रमोदला कौटुंबिकतेत रस दिसत नाही. वडलांचं आलेलं पत्र तो तातडीने न वाचता सावकाश उघडतो. प्रमोदच्या मागे वडील लग्नाचा तगादा लावतात. प्रमोदने डॉक्टरेट करून भारतात यावं, तिथे गोवा विद्यापिठासारख्या नव्या विद्यापिठात नोकरी करावी अशी प्रमोदच्या वडलांची इच्छा आहे. प्रमोद मात्र निर्विकार आहे. हे निर्विकारपण मनाच्या कुंठित अवस्थेतून आलं आहे. त्याचे संकेत कादंबरीच्या सुरुवातीच्या प्रकरणात पुरेशे मिळतात.

प्रमोद, गीतेत ज्याचं वर्णन केलं आहे तसा स्थितःप्रज्ञ नाही. स्थितःप्रज्ञता ज्ञानी माणसाची अवस्था आहे असं भगवत्गीता सांगते. ही आध्यात्मिक अवस्था आहे. प्रमोद विचारी आहे, पण त्याच्या प्रेरणांना 'आध्यात्मिक' म्हणता येणार नाही. प्रमोद वेंगुर्लेकर वैयर्थाच्या भावनेतून विकलांग झालेला वाटतो. त्याला ऍबसर्डिटीचा साक्षात्कार झालेला आहे. त्यामुळे तो उदास आहे. प्रमोद वेंगुर्लेकर आतून मोकळा (फ्री) नाही. 'इनर फ्रिडम' वेंगुर्लेकरकडे नाही.

डॉक्टरेट झालेल्या प्रमोदला अमेरिकेतच एका कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरीची ऑफर असते पण ती न स्वीकारता तो "मानवी संस्कृतिचा पाळणा" असलेल्या इराकमधे, बसरा शहरातल्या एका कॉलेजमध्ये नोकरी स्वीकारतो. हा त्याचा निर्णय वरवर बौद्धिक वाटतो. मानवी समाज, मानवी संस्कृती, ह्या बद्दल प्रमोद वेंगुर्लेकरच्या धारणा आहेत. त्या तपासून बघणं एन्की...च्या प्रवासाचं एक ध्येय असू शकतं. आदिम मानवी अवस्थेबद्दल प्रमोदची चिंतनशीलता कादंबरीचं उपकथानक आहे.

आधुनिक जीवनजाणीव आत्मसात केलेला प्रमोद अमेरिकेसारख्या प्रगत देशाऐवजी इराकसारख्या अप्रगत पारंपारिक अशियन देशात नोकरी स्वीकारतो त्याचं एक कारण त्याच्या मनात अनपेक्षित तत्त्वाबद्दल सुप्त रोमँटिक आकर्षण आहे. ते पुरेसं धूसर आहे. कसं ते बघा:
"...त्याचं मन ओढावलं. मनात अस्पष्ट, स्वप्नाळू कल्पना आली की अशा अतिशय वेगळ्या ठिकाणी आपल्या आयुष्याला अशी एखादी कलाटणी मिळू शकेल की, त्याद्वारे आपली सध्याची कुचंबलेली स्थिती आपोआप उलगडून निघेल..."

ह्या वाक्यात 'कलाटणी' आणि 'कुंचबलेली स्थिती' हे दोन शब्द अर्थपूर्ण आहेत. प्रमोदच्या जाणीवेचा झोत किंवा तिचा ध्यास पुरेसे स्पष्ट करणारे हे शब्दं आहेत. मचुळ, कंटाळवाण्या, कुंठित मनोवस्थेला कलाटणी देणारा निर्णय घ्यावा असं वाटणारा प्रमोद वेंगुर्लेकर हा जागतिक साहित्यातल्या अस्तित्त्ववादी प्रोटॅगॉनिस्टांच्या मालिकेतला एक प्रवक्ता आहे.

ही मालिका `क्राईम अँड पनिशमेंट'च्या रॉसकॉल्निकोव्ह पासून सुरू होते. ह्या परंपरेत द `आऊटसायडर'चा मेरुसाँ, `नॉशिया'चा रॉकेंटिन, `कॅचर इन द राय'चा होल्डन कॉलफिल्ड, `कोसला'चा पांडुरंग सांगवीकर आणि 'बिढार'चा चांगदेव पाटील इत्यादी अँटिहोरोंचा समावेश होतो. ह्या ननायकांचा भोवतालच्या जगाशी नाळ जुळत नाही. कारण त्यांच्या मते बाह्य, ऑबजेक्टिव जग खोटं आहे. भंपक आहे. `फोनी' आहे. आभासात्मक आहे. इनऑथेंटिक आहे.

स्वतःचं जग आत्मनिष्ठतेच्या क्रिस्टलबॉल मध्ये बघणारी ही अस्तित्त्ववादी बंडखोरांची फौज. ह्या फौजेमध्ये एन्की...चा प्रमोद वेंगुर्लेकर सामील होतो. संवेदनशीलतेच्या मुख्य धारेतून पळून आलेला प्रमोद वेंगुर्लेकर एक `डेझर्टर', म्हणजे भगौडा आहे असंही म्हणता येतं. एरवी भगौडय़ांना कोर्टमार्शल होतं. साहित्यात मात्र अस `डेझर्टर्स' नवी स्कूल स्थापतात. अनुयायी मिळवतात. ह्याचं कारण ह्यांची अल्टरनेटिव, पर्यायी जीवनदृष्टी.

इराकसारख्या मागासलेल्या देशात नोकरीसाठी जाणाऱ्या प्रमोदच्या तुंबलेल्या मनाला स्वतःच्या जगण्याचा अवरोधित प्रवाह मोकळा करण्याची आंस दिसते. काहीतरी निर्णायक, काहीतरी रोचक व्हावं ही त्याची अपेक्षा आहे. संभ्रमित मन ही प्रमोदची ओळख किंवा अस्मिता आहे. ही कुंठा, हा संभ्रम त्यातून येणारी उदासी कादंबरीचा सर्वव्यापी मूड आहे. अवघ्या कादंबरीवर उदासीचे सावळे ढग आले आहेत.

अमेरिकेतल्या मैत्रिणीला सोडून प्रमोद नोकरीसाठी बसऱ्याला पोहोचतो. तिथे कस्टमवाल्यांचा अनपेक्षित त्रास होतो. त्याचा रेडिओ कस्टमवाले ठेवून घेतात. मुक्त देशातून हुकुमशाही देशातलं हे आगमन प्रमोदला तापदायक वाटतं. ह्यापुढे ह्याच हुकुमशाहीशी जुळवून त्याला बसऱ्यात राहावं लागतं. तसं राहाताना प्रमोदला तापदायक तडजोडी कराव्या लागतात, भयगंड सतावतो, एकाकीपणा भोगावा लागतो. ताप येतो, ग्लानी येते, उदास स्वप्नं दिसतात. अस्तित्त्वाच्या पोकळपणाचे संदर्भ उजळले जातात.

बसऱ्याच्या कॉलेजमध्ये तो अशियन मुलामुलींना इंग्लिश लिटरेचर हा विषय शिकवू लागतो. विकासोन्मुख अशियन देशांमधले विद्यार्थी साहित्य, संस्कृती इत्यादी विषयांकडे कलावादी नव्हे तर उपयुक्ततावादी नजरेने बघतात. डिग्रीचा नोकरीशी संबंध जोडतात. डिग्रीच्या विद्यार्थ्यांना इंग्लिश कंपोझिशन, शेक्सपिअर वगैरे लेखक शिकवणारा प्रमोद फारसा उल्हासित नसतो.

एकांडा प्रमोद बसऱ्याच्या धुळकट, चिखल असलेल्या गल्लीबोळींमधून भटकतो. नदीकाठच्या हॉटेलात बसून पाण्याकडे बघत वेळ काढतो. बसऱ्यातल्या भारतीय क्लबमध्ये जातो. तिथे भारतीय चाकरमान्यांशी जुजबी संबंध प्रस्थापित करतो. स्वतःच्या एकांड्या जीवनजाणीवेमुळे फार कोणाशी प्रमोदची नाळ जुळतच नाही. त्याचे मैत्रिसंबंध हे वरवर आहेत. मित्रांसोबत बिअर पितांना सुद्धा प्रमोद एकटाच वाटतो. नशेत सुद्धा तो तोलून मापून बोलतो.

प्रमोदचा फ्रांस्वा नावाचा एक लेबनॉनचा सहकारी आहे. तो स्वतःला फ्रेंच म्हणवून घेतो. कायम ओठात सिग्रेट ठेवून बोलणाऱ्या फ्रांस्वाचा आणि प्रमोदचा संवाद बर्यापैकी जुळतो. दोघं सहकारी बसरा जवळच्या पिकनिक स्पॉट्सला भेटी देतात. जिथे काहीच बघण्यासारखं नसतं तिथे प्रमोद रमतो. स्वतःच्या तंद्रीत हरवतो. फ्रांसवाला आणि इराकी पोलिस आणि गार्डांना ह्याचं आश्चर्य वाटतं. आधुनिक सौंदर्यवादी प्रेरणा जोपासणारा व्यक्तिनिष्ठ प्रमोद हा आधुनिकपूर्व इराकी समाजात उठून दिसतो. त्याचं अस्तित्त्व अपवादात्मक ठरतं.

लौकरच मारिआ नावाच्या विवाहित स्त्री सोबत प्रमोदचं जुळतं. मारिया प्रमोदच्या डिपार्टमेंटमध्येच टायपिस्ट म्हणून नोकरीला आहे. ती मुळची अर्जेंटिनाची, पुढे अमेरिकेत नाझर नावाच्या इराकीला भेटते, लग्न करते, इराकमध्ये येते. नाझरसोबत, आपल्या मुलांसोबत कंटाळ्याने जगते. कंटाळा हा सुद्धा एन्की...चा मूड असल्याचं दिसतं. तर ह्या मारियाला काहीतरी नवं हवं आहे.(कलाटणी देणारं) ते प्रमोद तिला देतो.

प्रमोदच्या घरी पलंगावर दोघांचा संभोग होतो. त्यात तांत्रिक कोरडेपणा आहे. भारतीय परंपरेत एक भावपरंपरा आहे. शांतभाव, दास्यभाव, वात्सल्यभाव, सख्यभाव, माधूर्यभाव इत्यादी. परमेश्वराशी एकरुप होण्यासाठी ह्या भाववैविध्याचा दाखला संतपरंपरेत मिळतो.

ह्या भावसम्मुचयात `प्रेमभाव' अनुस्युत आहे. मात्र पाश्चात्य परंपरेत ज्याचा गवगवा झाला त्या परात्मभावाचा भारतीय परंपरेत उल्लेख नाही. ह्या परात्मभावाचा साक्षात्कार झालेला प्रमोद वेंगुर्लेकर प्रेमभावाला पारखा झालेला वाटतो. म्हणूनच "संभोगातून समाधी" मिळण्याऐवजी ती क्रिया सुरू असतांना प्रमोदला खोलीतला टाईपरायटर दिसतो.

हे टाईपरायटर प्रमोदच्या मनातलं एलिनेशन आहे. परात्मभाव. तुटलेलंपण. भावुकतेचं भाष्पिभवन. प्रमोद-मारियाचं नातंच मुळात जुजबी आणि अलिप्त आहे. प्रमोद आणि मारिया कंटाळलेपणावरचा उतारा म्हणून शैय्यासोबत करतात. ते एकत्र येतात पण एकमेकांना कायम अनोळखीच राहातात.

ह्या जवळ येण्यात प्रमोद जान ओतताना दिसत नाही. मारिया सुद्धा हातचं राखून प्रमोदसोबत सुख घेते. पुढे ती प्रमोदपासून दूर होते. प्रमोद-मारियाच्या जवळ येण्यात आणि दूर जाण्यात लेखकाने फारशी भावनिक गुंतवणूक केलेली दिसत नाही. त्यामुळे हे नातं परस्पर सोय ह्या वस्तुनिष्ठ निकषाला प्रमाण मानून रचलेलं वाटतं.

परात्मभावात शरीर आणि मनाचं एकसंघ नातं दुभंगतं. माईंड-बॉडी द्वंद्व निर्णायक ठरून एकत्मतेची दोन शकले होतात. मग माईंड केवळ बघ्याची भूमिका स्वीकारतं. बॉडी केवळ भोगाची. म्हणूनच परात्मभावी माणूस स्वतःच्याच हाताकडे किंवा स्वतःच्या कुठल्याही अवयवाकडे तिर्हाईतासारखा बघू शकतो. आधुनिक मराठी कादंबरीवर प्रभाव गाजवणार्या सार्त्रच्या `नॉशियाचा' नायक रॉकेन्टीन ह्याचं एक उदाहरण आहे. परात्मभावी अँटोनी रॉकेन्टीनला स्वतःचाच हात पाईप किंवा फोर्क उचलू शकतो हे नवं ज्ञान होतं. ह्या मनोवस्थेत दुसऱ्या व्यक्तीशी नाळ जुळणं केवळ अशक्य असतं.
एन्की...मध्ये प्रमोद वेंगुर्लेकर ह्या तिऱ्हाईत भूमिकेचा अतिरेक करत नाही. सयंत अभिव्यक्ती असलेला प्रमोद वेंगुर्लेकर हिंसा करत नाही. `क्राईम अँड पनिशमेंट'चा न नायक, `आऊटसायडर'चा नायक सहज खून करतात. चतुष्टयातला प्रा. चांगदेव पाटील सुद्धा सहजपणे कुत्रा मारुन टाकतो. मग नामानिराळा होतो. हे एलिनेशन आहे, की सर्वज्ञान? हा संभ्रम मनात राहातोच.

परात्मभावी प्रमोद त्याच्या कलिग्जसोबत जुजबी संबंध ठेवतो. ह्या सहकार्यांशी प्रमोदचा संवाद हा आत्मसंवादासारखा (डॉयलॉग ऍज मोनोलॉग) ऐकू येतो. अमेरिकेत काय किंवा बसर्यात काय, कुठल्याही व्यक्तीमध्ये प्रमोद वेंगुर्लेकर फारसा गुंतत नाही. `हेल इज द अदर पिपल', दुसरी माणसं म्हणजेच नरक असा साक्षात्कार प्रमोदला झालेला असल्याची दाट शक्यता आहे.

प्रमोद वेंगुर्लेकरची जीवनदर्शन हे प्रायः एकांडेपणाचा जल्लोश आहे. त्यात दुसऱ्या माणसाला फारशी जागा (स्पेस) दिसत नाही. प्रमोदच्या गर्लफ्रेंडला सुद्धा ती जागा व्यापता आलेली नाही. हे एन्की...चं आगळं वैशिष्ट्य आहे. प्रमोद वेंगुर्लेकर आत्मकेंद्रित नाही. स्वतःवर मोहित झालेला नार्सिसस सुद्धा तो नाही. तरिही तो दुसर्याला सहज उपलब्ध नाही हे जाणवतं.

एन्की...मध्ये प्रमोदचं अत्यंत बुद्धीवादी, तर्ककठोर, संशयी असं व्यक्तिमत्त्व मनावर ठसतं. प्रमोद रॅशनल आहे. मात्र त्याला जे रॅशनल नाही त्या अंधतत्त्वाबद्दल उत्सुकता वाटते. म्हणून तो इराकच्या एन्की ह्या दैवताबद्दल सांगतो. आर्ष लोकदैवत असलेल्या एन्कीची इराकी लोकांवरची सत्ता त्याला संपलेली वाटत नाही. ही सत्ता प्रचलित सोशालिस्ट हुकुमशाहीमधून सुरूच आहे असं त्याला वाटतं. म्हणजे एन्की...हुकामशाहीचं आर्ष आणि आधुनिक रुपक आहे.

भोवतालच्या सहकाऱ्यांच्या कौटुंबिकतेचं वैयर्थही त्याला जाणवतं. एका सहकाऱ्याची अमेरिकन बायको इराकच्या बंदिस्त वातावरणाला विटून मायदेशी सटकून गेली आहे. दुसरा कट्टर मुसलमान हळूहळू लिबरल होत, सिग्रेट, दारूत आकंठ बुडतो. स्वतःची कट्टर अस्मिता विसरून मुक्त जीवनसरणी स्वीकारतो.

हे सगळं अलिप्तपणे टिपणाऱ्या प्रमोदला सहकारी आहेत, मित्र नाहीत. फ्रांस्वाचा अपवाद वगळता प्रमोद कोणाशीही आत्मीय संवाद करत नाही. तो कोणाशी फार आतलं शेअरच करत नाही. प्रमोद स्वतःच्या व्यक्तिनिष्ठतेच्या पिंजर्यात येरझारा घालणारा, पण डरकाळ्या न फोडणारा सचिंत वाघ आहे.

पुढे ह्या प्रमोदला सलवा नावाची तरुण इराकी मुलगी योगायोगाने भेटते. तिच्या सोबत तो बसऱ्यायालगतच्या पाणथळ प्रदेशात सहलीसाठी दोन तीनदा जातो. त्या पाणथळ प्रदेशात सर्वत्र गवत आणि पाण्याचं साम्राज्य आहे. जोडीला इराकी खेडुतांची मातीची चिखलयुक्त घरं. सगळं वातावरण एकदम स्वप्नवत मचूळ आणि उदास आहे.

ह्या दोन तीन पिकनिक्समध्ये नावेतून फिरतांना प्रमोद आणि सलवाचा निरस, वस्तुनिष्ठ आणि कंटाळवाणा संवाद ऐकू येतो. ज्या गोष्टी कुठल्याही तिऱ्हाईताशी सहज बोलल्या जातात म्हणजे हवामान, पाऊस, वारा, वेळ, वगैरे हे विषयच दोघांच्या संभाषणात ऐकू येतात. तिथेही कुठे तीव्रता दिसत नाही.

सलवाचा बाप प्रमोदच्या परिचयाचा असतो. एका पिकनिकच्या फियास्कोनंतर प्रमोदच्या ह्या प्रकरणाला पूर्णविराम मिळतो कारण तिचा इराकी बाप मुलीला ताबडतोब दूर गावी पाठवून देतो.प्रमोद परत एकदा एकटा होतो. पण त्याला सलवाचा विरह होतो असं वाटत नाही. प्रमोद प्रेमात सुद्धा एकटाच असतो, प्रेमाचा सहवसा संपल्यानंतर सुद्धा तो एकटाच आहे.

या प्रकरणाला प्रेमप्रकरण म्हणायचं की नाही हे वाचकाला ठरवायचं आहे. कारण प्रमोद-सलवाचा एकूण सहवास निरिच्छ, अलिप्त शैलीत व्यक्त होतो. त्यात प्रेमाची, नात्याची धग कुठे जाणवत नाही. कंटाळा आला म्हणून ओळखी वाढवायच्या, बोअर झालं म्हणून प्रेम करायचं असं नातेसंबंधांचं एक विपरित डायनॅमिक्स प्रमोदच्या जीवनशैलीचा भाग आहे.

प्रमोद आणि सलवाचं पावसात भिजणं, मध्येच बोट बिघडणं, पुढे कार बिघडणं, मोटारीच्या वाफाळलेल्या काचेवर प्रमोदने सलवाचं बोटाने नाव लिहिणं इत्यादी प्रसंग आणि ओढून ताणून आणलेल्या रोमँटिक मूडला साजेसे प्रेमिकांचे नियंत्रित आशयाचे संवाद कादंबरीत असूनही प्रमोद आणि सलवाचं नातं गोठलेल्या बर्फासारखंच आहे. बर्फ काही वितळत नाही.

या सगळ्या गोठलेपणाचं एक कारण इस्लामिक वातावरणाताल्या दहशतीत शोधता येतं. पण ते तितकं खरं नाही. हा गोठलेपणा प्रमोदच्या माणूसघाणेपणातून, त्याच्या परात्मभावातून थेट येतो. भावनांचं अभिव्यक्तिकरण राजकीय परिस्थितीवर अवलंबून नसतं. ते तुमच्या ह्रदयस्थ पॅशनवर असतं. प्रमोद हा पॅशनलेस बुद्धीवादी आहे.

प्रमोदची जीवनजाणीव ही या जगात चुकीच्या पत्त्यावर पोहोचलेल्या अस्तित्त्ववादी विचारवंताची आहे. तो सगळ्याचं केवळ निरिक्षण करतोय असं वाटतं. दहशत नसलेल्या अमेरिकन वातावरणात सुद्धा प्रमोद आपल्या जोऑन नावाच्या अमेरिकन गर्लफ्रेंडशी वरवर संबंध ठेवतो. प्रमोदजवळ सेक्स करणारं इंद्रीय आहे मात्र दुसऱ्यावर प्रेम करणारं उत्कट मन नाही.

प्रमोदच्या प्रतिक्रिया सुद्धा विचारवंताला शोभणाऱ्या आहेत. तिथे भावनांवर सजग नियंत्रण आहे. म्हणूनच कादंबरीच्या अनेक प्रसंगात जिथे प्रमोदला राग येणं अपेक्षित आहे, तिथे त्याला "गंमत' वाटत राहाते. एका भावनेऐवजी दुसरीच भावना व्यक्त करणारा सारंगांचा प्रमोद वेंगुर्लेकर हा वाययीन अलिप्ततेचा आद्य नमुना वाटतो. या कलात्मक अलिप्ततेचं व्याकरण त्या काळी 'मौज' प्रकाशनाने हिरिरीने सादर केलेलं होतं हे सुद्धा नोंदवावसं वाटतं.
परदेशातल्या एकाकी शांतीत विचारांचं काहूर माजतं. प्रमोदला मोकळा वेळ आहे. पण त्या वेळेवर प्रमोदचं नियंत्रण नाही. अस्तित्त्वव्याकुळ प्रमोद अस्मिता या विषयावर मनोमन चिंतन करतो. धर्म, संस्कृती, प्रदेश आणि मानवाची अस्मिता ह्यावर कादंबरीत निरिक्षणं आहेत. अस्मिता ह्या विषयाबद्दल रोचक अंगाने वाचनीय असं एखादं बारकं पुस्तक लिहून काढावं असंही प्रमोदला वारंवार वाटतं. मात्र हा प्रबंध प्रमोदच्या हातून शेवटपर्यंत लिहून होत नाही.

प्रमोदच्या ह्या डायरीवजा, सरळसोट कथानकाला इराक मधल्या हुकुमशाही, दहशतवादी दमनाचे भयकारी संदर्भ आहेत. कुर्दी वंशाच्या लोकांचा किंवा कम्युनिस्टांचा इराकी सत्ता कसा छळ करते याचं चित्रण कादंबरीत येतं. नावापुरतं सोशालिस्ट असलेल्या राज्यसत्तेला एत्तद्देशीय कम्युनिस्टांचं वावडं आहे. कुर्दी वंशाचं दमन, व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच, गैर इराकींचं सामाजिक दमन, दहशत, धरपकडी, हेरगिरी ही सगळी हुकुमशाही राजवटीची वैशिष्ट्य एन्की...मध्ये भेटतात. ती पुरेश्या नाट्यमय रितीने येतात.

एन्की...बद्दल खुद्द विलास सारंगांने जे सांगितलं त्याला प्रमाण मानायचं तर ही कादंबरी राजकीय हुकुमशाहीची, टोटॅलेटेरियन स्टेटच्या दहशतीची आहे हे स्वीकारावं लागतं. कादंबरीचं तसं एक राजकीय वाचन अशक्य नाही. पण त्या ऐवजी ही कादंबरी प्रमोदच्या आत्मशोधाची, त्याच्या अस्तित्त्वमूलक प्रश्नांची तड लावणारी, त्याच्या संभ्रमाची, त्याच्या निरिच्छ, अलिप्ततावादी संवेदनशीलतेची शोधकथा असून ती हुकुमशाही राजवटीच्या पार्श्वभूमीवर घडते हे म्हणणं अधिक संयुक्तिक ठरेल.

एन्की... लिहिताना सारंगांना स्वतःचे अस्तीत्त्वमूलक प्रश्न सर्वाधिक महत्त्वाचे वाटले आहेत. त्यानंतर भोवतालच्या राजकीय सांस्कृतिक वातावरणाशी असलेला प्रमोद वेंगुर्लेकरचा तणावग्रस्त नातेसंबंध. हा दुसऱ्या श्रेणीत जातो. कादंबरीत भेटणारे राजकीय-सांस्कृतिक संदर्भ तिसर्या श्रेणीत जाणारे वाटतात. केंद्रबिंदू व्यक्तिगत आर्त, त्यानंतरचं वर्तूळ सामाजिक आणि शेवटलं वर्तूळ राजकीय आहे. व्यक्तिगत आर्त आणि सामाजिक वास्तव यांचा परस्पर विसंवादी आलेख म्हणूनही एन्की...कडे बघितलं जाऊ शकतं.

एन्की...मानवी अस्मितेवर विचार करणारी कलाकृती आहे. मात्र हा विचार बंदिस्त नसून तो धूसर आणि द्वयर्थी आहे. ही धूसरता किंवा अँबिग्विटी समुद्राच्या तोंडाशी, नदीतल्या चिखलात वावरणाऱ्या प्राण्यांच्या रुपकातून व्यक्त होते. हे प्राणी (वैज्ञानिक भाषेत त्यांना न्यूट किंवा सलॅमँडर म्हणतात) पाण्यातही आणि जमिनीवरही सहज विहार करतात. जमीनीवर ते सरड्यासारखे सरपटतात आणि पाण्यात मासे होऊन तरंगतात.
प्रमोद या प्राण्यांना निरखून बघतो. हे संदिग्ध, आदिम प्राणी मानवी प्रमोदला मानवी अस्मितेचं रुपक वाटतात. पाण्यात असताना जमिनीची आंस तर जमीनीवर असताना पाण्याची आठवण. कुठेच स्वस्थता नाही. दोन्हीकडे अर्धेमुर्धे, दोन्ही ठिकाणी परके.

एन्कीच्या राज्यात उदास, हताश मनस्थितीत वावरणारा बुद्धीवादी प्रमोद वेंगुर्लेकरची अस्मिता अशी द्वयर्थी आणि धूसर आहे. ती एकसंघ होणं शक्य नाही. जरासंघाला एकसंघ करणारा एन्की...चा व्यक्तिनिष्ठतेचा प्रबंध म्हणूनच अपुरा राहिलेला वाटतो.