आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article About Work Of Social Worker Priya Kharwade

उपक्रमांची खाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विद्यार्थ्यांना शाळेत खिळवून ठेवण्याचा ध्यास मनात असला की नावीन्यपूर्ण उपक्रमांची निर्मिती सहजपणे होते. आणि मग ती जणू आपली सवयच बनते. अशाच छोट्या-छोट्या उपक्रमांतून व खेळांतून अठरा वर्षांपासून सृजनशील विद्यार्थी घडवणाऱ्या प्रिया खरवडे यांना भेटूयात आजच्या भागात...

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा या ठिकाणी सधन कुटंुबात जन्मलेली प्रिया घरात छोटी त्यामुळे सर्वांचीच लाडकी होती. वडील पंचायत समितीत नोकरीस तर आई घरीच काम करत असे. आईने सर्व भावंडांना सचोटीने काम करायची सवय लावली. बीए झाल्यानंतर लग्न झाले व नंतर डीएड पूर्ण केले. १९९७ मध्ये नोकरीस सुरुवात केली. नोकरी करत असतानाच मराठी साहित्य व समाजशात्र विषयातून एमए केले व आता मराठी साहित्यातून पीएचडी चालू आहे.

देवळी या तालुक्याच्या ठिकाणापासून सहा किमी अंतरावर ८५० लोकसंख्येचे जामणी हे शैक्षणिकदृष्ट्या जागरूक असलेले गाव. गाव तालुक्यापासून जवळ असल्यामुळे इथल्या लोकांची शहरात दररोज ये-जा होते. अशा वेळी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना तोडीस तोड उत्तर शिक्षण उपक्रमांद्वारे देण्याची जबाबदारी शिक्षिकांवर आहे.

प्रियाबाई सांगतात की, मुलांच्या कलेने घेतले की ती लगेचच खुलतात व प्रगती करतात. त्यासाठी मुलांना संधी उपलब्ध करून द्यावी. नुसतीच संधी उपलब्ध करून द्यायची नाही तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकारात्मक विचारसरणी ठेवायची. कारण मुलं लहान असतात, ती खूप चुका करतात. अशा वेळी न रागवता त्यांना समजावून सांगणे गरजेचे असते.

अक्षरधारा : या उपक्रमांतर्गत शंख, शिंपले, दगड, फुले, बिया यांच्या साह्याने तीन अक्षरांची रांगोळी काढलेली असते. या अक्षरांना काना, मात्रा, वेलांटी, उकार लावून नवनवीन शब्द वर्गानिहाय मुले तयार करतात. सोमवार ते शनिवार असे विद्यार्थ्यांचे सहा गट करून प्रत्येक विद्यार्थ्याला सहा दिवसांतून एकदा परिपाठाची संधी मिळते. या वेळी या मुलांनी अक्षरांची रांगोळी काढायची असते, बाकीची मुले यापासून नवीन शब्द तयार करतात.

आदर्श परिपाठ : परिपाठ हा शाळेचा आत्मा असतो. या ठिकाणचा परिपाठ आदर्श आहे. यात परिपाठांतर्गत येणाऱ्या प्रत्येक बाबीचा समावेश तर असतोच, त्यासोबतच दररोज एक इंग्रजी अक्षर देऊन त्यावर आधारित शब्द घेतले जातात. यामुळे मुलांच्या इंग्रजी विषयाच्या शब्दसंपत्तीत वाढ झाली.

माझी बचत बँक : दैनंदिन जीवनात आपण बघतो की, शिकलेले लोकही बँकेत गेल्यानंतर पैसे काढणे किंवा टाकणे यासाठी कुठली स्लिप भरायची हे विचारतात. मात्र, प्रियाबाईंनी पहिली ते चौथीच्या मुलांसाठी पोस्टाचे, बँकेचे व्यवहार समजावून सांगणारी किलबिल बचत बँक’ सुरू केली. यात मुले पालकांच्या संमतीने पैशाची देवाणघेवाण करतात. या बँकेचा फायदा असा झाला की, मुलांना गणिती संबोध क्रिया सहजपणे समजायला लागल्या. या बँकेत विद्यार्थी स्वत:च्या पासबुकावरील देवघेव कौतुकाने अभ्यासतात. यामुळे मुलांना बचतीची सवय लागली व ते आपापसात स्पर्धा लावतात.

चला वाचन करूया : मुलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी येथे खुल्या कपाटाची सोय करून दिली आहे. लघु व दीर्घ मध्यंतरात यातून मुले पुस्तके घेऊन वाचून त्यावर चर्चा करतात. आपापसात काही प्रश्नांची उत्तरे न मिळाल्यास शिक्षकांना विचारतात.

कागदी मण्यांची माळ : घरातील पेपरची रद्दी मॅडम विकत नाहीत ती शाळेत आणून त्यापासून मणी तयार केले जातात. यांचा उपयोग विद्यार्थी दशक, शतक, हजार यांचा बोध घेण्यासाठी करतात. यासोबतच संख्येची स्थानिक किंमत, बेरीज, वजाबाकी अशा बहुगुणी माळा तयार केल्यात. याला कार्यानुभव या विषयाची जोड दिली.

चला आकृतिबंध शिकूया : ज्ञानरचनावादी अभ्यासक्रमात मुलांनी आपणहून ज्ञाननिर्मिती करायची आहे. यासाठी शिक्षकांनी सुलभकाची भूमिका वठवायची आहे. प्रियाताई मुलांना शेताचे, गेटवरील डिझाइन यांचे निरीक्षण करून आकृतिबंध समजावतात. प्रत्यक्ष कृतीतून मुलांना एखादा अनुभव दिल्यास तो चिरकाल टिकतो. यासाठी कला विषयांतर्गत आइस्क्रीम स्टिकपासून विविध आकार तयार करून वॉलहँगिंग तसेच चहाच्या डिस्पोजल ग्लासपासून विविध पॅटर्न शिकवले जातात.

कापसाची शाळा : कापसाच्या झाडापासून मुलांकडून विविध वस्तू तयार करतात. यात कापसापासून सुती कापड कसे तयार केले जाते, सरकी वेगळी करणे व यातून शाळेसाठी आवश्यक साहित्य बनविले जाते. बियांपासून फळा पुसण्यासाठी डस्टर, कापूस वाती तयार केल्या जातात.

सणातून समभाव : या छोटाशा गावात हिंदू, मुस्लिम समाज गुण्यागोविंदाने राहतो. शाळेत सर्वधर्मसमभावाची शिकवण देण्यासाठी रक्षाबंधन, पोळा, ईद, दिवाळी या सणांसाठी लागणारे साहित्य म्हणजे राख्या, पणत्या, आदी बनवले जाते. तसेच रांगोळी स्पर्धेतही मुले आनंदाने सहभागी होतात.

क्षेत्रभेटीतून पर्यावरण संरक्षण : शहराजवळील वीटभट्टी, लोणचे कारखाना, शेताला भेटी देऊन पीक निरीक्षण, ठिबक, तुषार सिंचन, आधुनिक यंत्राद्वारे शेती कशी करतात याची माहिती मुले घेतात.

नावीन्यपूर्ण विद्यार्थी हजेरी
मुले दररोज शाळेत नियमित येतात की नाही यासाठी शिक्षक हजेरी घेतात. यात येस किंवा नो मॅडम/ सर असेच विद्यार्थी म्हणतात. मात्र, या ठिकाणी फळांची, फुलांची, प्राण्यांची, पदार्थांची मराठी, इंग्रजी नावे याशिवाय कधी-कधी my name is..., my father’s name is... यासारखी वाक्ये घेतली जातात. याचा फायदा असा झाला की, शाळेतील ९० टक्के मुले स्वत:बद्दल ८ ते १० वाक्ये इंग्रजीतून बोलू शकतात.

विज्ञानाचे धडे घेऊया
नवीन पाठ्यपुस्तकात परिसर अभ्यास भाग १ व भाग २ अशी पुस्तके तयार केली. यात भूगोल व विज्ञान विषय एकत्र करून मुलांना सभोवतालच्या परिसरातून अनुभव आत्मसात करावयाचे आहेत. यासाठी येथे छोट्या-छोट्या प्रयोगांतून यात फुगा फुगवून पेंग्विन, बाहुलीचे मुखवटे तयार करून याद्वारे हवा कशी जागा व्यापते, यासारखे प्रयोग मुलांना शिकवले जातात.

santoshmusle1515@gmail.com